झाकिया जाफरी म्हणाल्या होत्या, 'मरेपर्यंत न्यायासाठी लढत राहीन'

फोटो स्रोत, Getty Images
गुजरातमधील अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांडातील पीडित आणि काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांचे शनिवारी (2 फेब्रुवारी) निधन झाले.
या वृत्ताला झाकिया जाफरी यांचा मुलगा तन्वीर जाफरी याने दुजोरा दिला आहे. त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांना याबाबत माहिती दिली.
झाकिया जाफरी यांची मुलगी निसरीन जाफरी यांनी आईसोबतचा एक फोटो आणि कॅप्शन म्हणून वाजिद अली शाह यांचा एक शेर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. त्यात म्हटलं आहे,
"दर-ओ-दीवार पे हसरत से नज़र करते हैं
ख़ुश रहो अहल-ए-वतन हम तो सफ़र करते हैं"

फोटो स्रोत, Facebook/Nishrin.Nargis.Jafri.Hussain
गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचीही हत्या झाली होती. यानंतर न्याय मिळवण्यासाठी झाकिया जाफरी यांनी अखेरपर्यंत न्यायालयीन लढाई लढली.
झाकिया यांनी गुजरातमधील 2002 च्या दंगल प्रकरणांपासून गुलबर्ग सोसायटी हत्याकांडापर्यंतच्या प्रकरणात सर्व न्यायालयीन आयुधांचा वापर करून न्याय मिळवण्यासाठी लढा दिला.
झाकिया जाफरी यांचा मुलगा तनवीर याने बीबीसीला सांगितले, "आईला वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी ग्रासलं होतं. ती माझी बहीण निसरीनकडे राहण्यासाठी सुरतहून अहमदाबादला आली होती. शनिवारी (1 फेब्रुवारी) सकाळी तिची तब्येत बिघडली. यानंतर आम्ही डॉक्टरांना घरी बोलावले होते."
झाकिया जाफरी यांचा अंत्यविधी रविवारी (2 फेब्रुवारी) सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास अहमदाबादमधील कालुपुरस्ती स्मशानभूमीत होईल. याच ठिकाणी जाफरी कुटुंबातील इतर सदस्यांनाही दफन करण्यात आलं आहे.
गुलबर्गा सोसायटी हत्याकांडानंतर झाकिया जाफरी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह 63 लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती.
न्यायासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा
2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत कार सेवकांचा मृत्यू झाला. यानंतर मोठी दंगल उसळली आणि गुलबर्ग सोसायटीमध्ये अहसान जाफरी यांच्यासह 69 लोकांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, गुजरात दंगलीत 1000 हून अधिक लोक मारले गेले. यात बहुतांश मुस्लीम होते.
हे हत्याकांड होत असताना झाकिया जाफरी यांच्या आजारपणामुळे एहसान जाफरी यांनी त्यांना घराच्या वरच्या मजल्यावर पाठवले. त्यामुळे या हिंसाचारात त्यांचा जीव वाचला होता.

फोटो स्रोत, Tanvir Jafri
झाकिया यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा येथे एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचं लग्न मूळचे बुरहानपूर येथील वकील एहसान जाफरी यांच्याशी झाले होते.
गुजरातमध्ये आल्यानंतर ते चमनपुरा येथे बराच काळ राहिले.
1993 च्या दंगलीत त्यांचे घर उद्ध्वस्त झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब गुलबर्ग सोसायटीत राहायला आले.


'मरेपर्यंत न्यायासाठी लढत राहीन'
दरम्यान, याआधी झाकिया जाफरी यांनी बीबीसीशी बोलताना या हत्याकांडप्रकरणी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, "या निर्घृण हत्याकांडात सहभागी असलेले नरेंद्र मोदी किंवा इतर लोक माफीला पात्र नाहीत."
"मी कुणालाही माफ कसे करू? इतके दिवस झाले आहेत. माझे गेलेले दिवस परत येतील का? जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे, तरच भविष्यात असं घडणं थांबेल. माझे पती स्वतः वकील होते. मीही मरेपर्यंत न्यायासाठी लढत राहीन," असं झाकिया जाफरी यांनी म्हटलं होतं.
गुलबर्ग सोसायटीत काय घडलं होतं?
28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबादमधील मुस्लीम बहुल गुलबर्ग सोसायटीवर जमावाने हल्ला केला. जमावाच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी अनेक मुस्लिमांनी तत्कालीन काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या घरी आश्रय घेतला.
मात्र, जमावाने जाफरी यांच्या घरावरही हल्ला केला. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची हत्या करण्यात आली.
जमावाने संपूर्ण गुलबर्ग सोसायटीला चारही बाजूंनी घेरले आणि अनेकांना जिवंत जाळण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी आरोप केला होता की, जमावाने हल्ला केला तेव्हा त्यांच्या पती एहसान जाफरी यांनी पोलीस आणि तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही त्यांना मदत केली नाही.
जून 2006 मध्ये, झाकिया जाफरी यांनी नरेंद्र मोदींसह एकूण 63 लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवावा अशी मागणी गुजरात पोलीस महासंचालकांकडे केली.
मोदींसह सर्व प्रशासनाने नियोजनबद्धपणे दंगलीतील पीडितांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप झाकिया जाफरी यांनी केला होता.
पोलीस महासंचालकांनी झाकिया जाफरी यांची एफआरआय नोंदवण्याची मागणी फेटाळली. याविरोधात झाकिया यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. परंतु गुजरात उच्च न्यायालयानेही 2007 मध्ये त्यांची ही याचिका फेटाळली.
गुलबर्ग सोसायटी प्रकरणाचा इतिहास

फोटो स्रोत, Getty Images
- मार्च 2008 मध्ये झाकिया जाफरी आणि 'सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस' या स्वयंसेवी संस्थेने या हत्याकांडाविरोधात संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
- या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांची 'ॲमिकस क्युरी' म्हणून नियुक्ती केली.
- एप्रिल 2009 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीच्या तपासासाठी नियुक्त केलेल्या एसआयटीला गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
- एसायटीने 2010 च्या सुरुवातीला नरेंद्र मोदींना चौकशीसाठी बोलावले आणि मे 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला.
- ऑक्टोबर 2010 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने ॲमिकस क्युरी म्हणून प्रशांत भूषण यांच्या जागेवर राजू रामचंद्रन यांची नियुक्ती केली. राजू रामचंद्रन यांनी जानेवारी 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला.
- मार्च 2011 मध्ये, एसआयटीने दिलेले पुरावे आणि त्यांच्या निष्कर्षांमध्ये सुसंगतता नसल्यानं सर्वोच्च न्यायालयाने तपास पथकाला पुढील तपास करण्याचे आदेश दिले.
- मे 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ॲमिकस क्युरीला साक्षीदार आणि SIT अधिकाऱ्यांना भेटण्याचे आदेश दिले.
- सप्टेंबर 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोदींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले नाहीत. तसेच एसआयटीला त्यांचा अहवाल खालच्या कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले.
- 8 फेब्रुवारी 2012 रोजी एसआयटीने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला.
- क्लोजर रिपोर्टविरोधात जाकिया जाफरी यांनी 15 एप्रिल 2013 रोजी याचिका दाखल केली. या याचिकेवर झाकिया जाफरी आणि एसआयटीच्या वकिलांमध्ये पाच महिने युक्तिवाद चालला.
- डिसेंबर 2013 मध्ये मेट्रोपॉलिटन कोर्टाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली.
- झाकिया जाफरी यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
- 24 जूनच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2002 च्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 60 हून अधिक लोकांना क्लीन चिट दिली. तसेच झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











