शिकारी कुत्र्यानं माणसांसोबत राहणं कसं सुरू केलं? संशोधनातील पुराव्यातून समजली 'ही' माहिती

कधी कधी आपण हे विसरुनच जातो की, जगातल्या सगळ्या कुत्र्यांचे पूर्वज हे लांडगे होते.

म्हणजे लांडग्यांपासूनच उत्क्रांत होत कुत्रे बनले. अगदी जगातला सर्वांत लहान समजला जाणारा चिहुआहुआ कुत्रा असेल किंवा सगळ्यांत मोठ्ठा कुत्रा, सगळ्यांचे पूर्वज लांडगेच होते.

कुत्र्यांचं सगळ्यात जवळचं नातं करड्या लांडग्यांशी आहे. आजही या प्रजातीचे काही लांडगे जंगलांमध्ये आढळतात आणि ताकदवान शिकाऱ्यांपैकी एक समजले जातात.

मग अशा या शिकारी प्राण्याने आपल्या सोबत राहणं कसं सुरू केलं? कुत्र्यांबद्दल जगभरातील लोकांना इतकं प्रेम, जिव्हाळा का वाटतो?

आपण इथपर्यंत कसे पोहोचलो?

कुत्रे असे प्राणी होते, ज्यांना माणसाने पाळीव बनवलं किंवा माणसाळवलं, म्हणजेच माणसांशी मिसळून घेण्यास शिकवलं.

कुत्र्याच्या एका प्राचीन डीएनएचा 2017 मध्ये अभ्यास करण्यात आला. त्यावरून एक शक्यता लक्षात आली की, युरोपमध्ये 20 हजार ते 40 हजार वर्षांपूर्वी लांडग्यांपासून कुत्रे उत्क्रांत झाले.

कुत्र्यांना पाळीव बनवण्याची प्रक्रिया ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या लांडग्यांच्या प्रजातींपासून सुरू झाली. ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून हजारो मैल दूर होती.

कुत्र्यांना माणसाळवण्याची प्रक्रिया नेमकी सुरू झाली कशी याचं ठोस उत्तर आतापर्यंत मिळालं नाही.

संशोधक याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी अनेक वेगवेगळे सिद्धांत मांडले जात आहेत.

उदाहरणार्थ, एका प्रसिद्ध सिद्धांतानुसार माणसाने लांडग्याची पिलं पकडून त्यांना पाळीव बनवलं. हळूहळू कमी आक्रमक असलेल्या लांडग्यांना निवडून शिकारीमध्ये मदत करण्यासाठी पाळलं.

दुसऱ्या एका प्रसिद्ध सिद्धांतानुसार माणसांनी नाही, तर लांडग्यांनी स्वतःला पाळीव बनवलं.

या सिद्धांतानुसार काही लांडग्यांना माणसांची कमी भीती वाटायची. ते मानवी वस्तीजवळ येऊन राहायला लागले, तिथलं उरलं-सुरलं अन्न खाऊ लागले.

हळूहळू माणसांच्या लक्षात आलं की, लांडग्यांचं जवळ असणं फायद्याचं आहे. ते धोक्याची जाणीव करून देतात आणि त्यांच्यामुळे आसपासची जनावरं वस्तीपासून लांब राहतात.

या सिद्धांतानुसार जे लांडगे जास्त नीडर आणि माणसांना कमी घाबरणारे होते, ते सहजपणे टिकून राहिले आणि अधिकाधिक पिलांना जन्म दिला.

डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार कमी घाबरण्याचा आणि माणसांशी जुळवून घेण्याचा गुण प्रत्येक पिढीत वाढत गेला आणि हळूहळू कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी तयार झाले.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील इव्होल्युशनरी जिनोमिक्स (वेगवेगळ्या प्रजातींच्या जीनोममध्ये काळानुसार कसे बदल होतात याचा अभ्यास) आणि जेनेटिसिस्ट ग्रेगर लार्सन यांचं म्हणणं आहे की, सुरुवातीला माणूस आणि लांडगे दोघांनाही सोबत राहण्याचा फायदा होता. शिकार करणं सोपं होत होतं.

ग्रेगर लार्सन सांगतात की, माणसाने लांडग्यांना पाळीव बनवलं, असं आपण म्हणत असू तर त्याचा अर्थ आपण जाणीवपूर्वक ही गोष्ट केली असा होतो.

आपल्याला माहीत होतं की, आपण काय करतोय, आपल्याकडे एखादी योजना तयार होती आणि त्यानुसार आपण वागत होतो. पण कदाचित असं नव्हतं.

ते सांगतात,"मला वाटतं की, लांडगे आपल्याला त्यांच्या समुहातलं समजू लागले. त्यामुळे चौकीदाराप्रमाणे सतर्क राहू लागले आणि त्यामुळे सुरक्षितता वाढली. दुसरीकडे लांडग्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांना नियमितपणे खाणं मिळत होतं."

रंजक संशोधन

हजारो वर्षांपासून माणसाने कुत्र्यांना निवडून पाळलं, जेणेकरून त्यांच्यामध्ये शिकार करण्याचा आणि कळपाला (प्राण्यांच्या) सांभाळण्याचा गुण विकसित होईल.

काळानुसार या कुत्र्यांची कामंही बदलत गेली.

आधी कुत्रे माणसं राहात असलेल्या गुहांची राखण करायचे आणि आज ते गाइड डॉग किंवा विमानतळावर आढळलेल्या संशयास्पद वस्तू शोधण्याचं, हुंगण्याचं काम करतात.

माणसाच्या या हस्तक्षेपामुळेत आज कुत्र्यांच्या वेगवेगळ्या शेकडो प्रजाती अस्तित्वात आहेत.

अँथ्रोझूओलॉजिस्ट जॉन ब्रॅडशॉ यांच्या मते, कुत्र्याच्या आकारांमध्ये इतर कोणत्याही सस्तन प्राण्याच्या तुलनेत विविधता दिसून येते.

या उत्क्रांतीच्या काळात एक वेळ अशीही आली की, कुत्र्यांचं काम हे केवळ आपली मदत करण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते आपल्या कुटुंबाचा भाग बनले.

2020 मध्ये ब्रिटनमधल्या न्यू कॅसल विद्यापीठाने पाळीव जनावरांच्या स्मशानभूमीत कोरलेल्या शिलालेखांचा अभ्यास केला.

त्यावरून लक्षात आलं की, 1881 मध्ये पहिल्यांदा पाळीव प्राण्यांसाठी सुरु झालेल्या स्मशानभूमीपासून ते आतापर्यंत लोकांच्या दृष्टिकोनातून प्रचंड बदल झाला आहे.

संशोधनानुसार, व्हिक्टोरियन काळात कबरींवर पाळीव कुत्र्यांसाठी साथी किंवा मित्र असं लिहिलं जायचं. त्यानंतरच्या काळात मात्र लोक त्यांना कुटुंबाचाच भाग मानायला लागले.

विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर कुत्र्यांच्या कबरींवर कुटुंबाचा भाग मानूनच संदेश लिहिले गेले होते.

संशोधनातून हेही दिसून आलं की, विसाव्या शतकापर्यंत लोक पाळीव जनावरांसाठीही 'परलोक' असतो, असं मानायला लागले होते. म्हणजेच मृत्यूनंतरचंही जग असतं हा विचार त्यांच्या कुत्र्यांबद्दलही करायला लागले होते.

कुत्रे इतके गोंडस का वाटतात?

कॉर्नेल विद्यापीठानुसार, पिलांनी पहिले 8 ते 12 महिने आपली आई आणि भावंडांसोबत राहणं आवश्यक असतं. त्यांच्या शिकण्या-समजण्यासाठी हे वय अतिशय महत्त्वाचं आहे.

याच दरम्यान अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीने 2018 मध्ये एक संशोधन केलं. त्यातून असं लक्षात आलं की, हेच ते वय आहे जेव्हा पिलं सर्वांत जास्त गोंडस दिसतात.

प्रोफेसर लार्सन सांगतात की, याच काळात पिलं आपल्या आईवर सर्वांत जास्त अवलंबून असतात आणि स्वतंत्रपणे जगू शकत नाहीत. तेव्हाच ही पिलं आपल्याला खूप गोड वाटतात आणि त्यांना सांभाळण्याची, खाणं-पिणं देण्याची इच्छा होते.

2019 मधील एका संशोधनात आढळून आलं की, कुत्र्यांच्या डोळ्यांच्या आसपासचे स्नायू विकसित झाल्यानं ते निष्पाप, भाबडे वाटतात. त्यामुळेच आपल्याला पाहताक्षणीच ते आवडतात.

यामुळेच कुत्रे आणि माणसांमधलं नातं अधिक घट्ट झालं.

अँथ्रोझूऑलॉजिस्ट ब्रॅडशा सांगतात, "माणसापासून आपल्याला धोका नाही हे लक्षात आल्यानंतर पिलाच्या लक्षात येतं की, जगण्यासाठी माणसासोबत राहणं हे सर्वांत उत्तम आहे."

अनेक लोकांच्या मते त्यांचे पाळीव कुत्रे त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि आता वैज्ञानिकांकडे त्याचे पुरावेही आहेत.

एमोरी युनिव्हर्सिटीमधील न्युरोसायंटिस्ट आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक ग्रेगोरी बर्न्स कुत्रे आणि माणसांच्या नात्याचा अभ्यास करत आहेत.

त्यांनी कुत्र्यांना अशा पद्धतीने प्रशिक्षित केलं आहे की, ते फंक्शनल रेजोनन्स इमेजिंक स्कॅनच्या दरम्यान एकदम शांत बसतील आणि त्यांच्या मेंदूत काय सुरू आहे याचा अभ्यास करता येईल.

त्यांच्या संशोधनातून लक्षात आलं की, जेव्हा आपल्या ओळखीच्या माणसाचा वास येतो तेव्हा कुत्र्याच्या मेंदूतला चांगल्या आणि सकारात्मक भावनांशी जोडलेला भाग अधिक सक्रीय होतो.

याचाच अर्थ आपण कुत्र्यांवर प्रेम करणं थांबवू शकत नाही आणि हे प्रेम दोन्ही बाजूंनी तितकंच घट्ट असतं.

हा लेख बीबीसी रेडिओ 4 च्या 'व्हाय डू वुई डू दॅट' आणि 'नॅचरल हिस्ट्रीज'वर आधारित आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)