You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनेत्री कादंबरी जेठवानी प्रकरणाला मोठं वळण, वरिष्ठ IPS अधिकारी अटकेत
वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि आंध्र प्रदेशच्या गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख पी. एस. आर. अंजनेयुलू यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी मंगळवारी (22 एप्रिल) हैदराबादमध्ये अटक केली.
मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांच्या छळाच्या प्रकरणात अंजनेयुलू यांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या सीआयडी अधिकार्यांनी त्यांना हैदराबादला अटक केली आणि नंतर त्यांना विजयवाडा इथं नेण्यात आलं.
अभिनेत्री जेठवानी यांच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपींना अटक का करण्यात आली नाही, अशा निरीक्षण उच्च न्यायालयानं अलीकडेच नोंदवल्यानंतर सितारामअंजनेयुलू यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंजनेयुलू यांना राज्य सरकारनं निलंबित केलं होतं.
मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी नरेंद्र कुमारी जेठवानी यांच्या प्रकरणात नियमबाह्य काम केल्याचा आरोप अंजनेयुलू यांच्यावर आहे.
या प्रकरणात, आंध्र प्रदेश सरकारनं सप्टेंबर 2024 मध्ये 1590, 1591, आणि 1592 जी.ओ जारी केले होते. त्यानुसार अंजनेयुलू, विजयवाडाचे पोलीस आयुक्त कांती राणा टाटा आणि विशाल गुन्नी या आणखी एका वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं.
अंजनेयुनू यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज नाही
या प्रकरणातील आरोपी असलेल्या उर्वरित पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला होता.
मात्र, पीएसआर अंजनेयुलू यांनी अद्याप या प्रकरणात कोणत्याही न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला नाही.
हे नेमकं काय प्रकरण आहे?
आंध्र प्रदेश सरकारने यापूर्वीच या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पदावरुन निलंबित केलं होतं.
या अधिकाऱ्यांमध्ये गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख पीएसआर अंजनेयुलू, विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त क्रांती राणा ताता आणि आणखी एक आयपीएस अधिकारी विशाल गुन्नी यांचा समावेश होता.
या तिन्ही अधिकाऱ्यांनी मुंबईतील बॉलीवूड अभिनेत्री कादंबरी नरेंद्र कुमारी जेठवानी यांच्या खटल्यामध्ये काही नियमांचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याआधी, विजयवाडाचे तत्कालीन एसीपी हनुमंत राव आणि इब्रहीमपट्टणमचे सीआय सत्यनारायण यांनाही याच प्रकरणामध्ये डीजीपींकडून निलंबित करण्यात आलं होतं.
दुसऱ्या बाजूला गेल्या शुक्रवारी (13 सप्टेंबर) कादंबरी जेठवानी यांनी इब्रहीमपट्टणम पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार त्यांनी असा आरोप केला आहे की, कुक्कला विद्यासागर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या विरोधात एक खोटा खटला दाखल केला असून त्याद्वारे आपला मानसिक छळ केला आहे.
इब्रहीमपट्टणमचे सीआय चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, विद्यासागर यांच्याविरोधात कलम 192, 211, 218, 220, 354, 467, 420, 469, 471 आणि 120 ब अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मात्र, 2 फेब्रुवारी, 2024 रोजी कुक्कला विद्यासागर यांनी अभिनेत्री कादंबरी नरेंद्र विद्यासागर यांच्याविरोधात याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीअंतर्गत त्यांनी अभिनेत्री जेठवानी यांच्याविरोधात असा आरोप केला होता की, या अभिनेत्रीने बनावट सह्यांचा वापर करुन त्यांची जमीन इतरांना विकण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, हे विद्यासागर कुक्कला आहेत तरी कोण? अभिनेत्री कादंबरी जेठवानी आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय घडलंय? या दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यामागचं नेमकं कारण काय आणि या प्रकरणामध्ये तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित का करण्यात आलंय? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा सविस्तर वृत्तांत...
तीन अधिकाऱ्यांना का केलं निलंबित?
कादंबरी जेठवानी या चित्रपट अभिनेत्री असून मुंबईमध्ये असतात. त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये असं म्हटलं आहे की, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी एक उद्योजिका, डॉक्टर आणि मॉडेल म्हणून काम केलं आहे.
30 ऑगस्ट रोजी कादंबरी जेठवानी यांनी विजयवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी काही पोलिसांविरोधातही आरोप केले आहेत.
आपल्या विरोधातील फसवणुकीच्या खटल्यामध्ये पोलीसांनी आपल्यावर आणि आपल्या पालकांवर खोटे आरोप लावून, अटक करुन आपला मानसिक छळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
कादंबरी जेठवानी यांच्या वकिलांनी अशीही माहिती दिली की, हा गुन्हा दाखल करताना कादंबरी जेठवानी यांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावेही दिली होती.
या तक्रारीनंतर, आंध्र प्रदेशचे डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनंतर, विजयवाडा पोलीस कमिशनर राजशेखर बाबू यांनी अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांच्याविरोधातील खटल्याचा तपास केला.
त्यानंतर डीजीपी द्वारका तिरुमला राव यांना पाठवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये हा खटला दाखल करण्यामध्ये आणि त्याचा तपास करण्यामध्ये बऱ्याच अनियमितता असल्याचा दावा करण्यात आला. डीजीपी द्वारका तिरुमला राव यांनी हा रिपोर्ट राज्य सरकारला सादर केला.
या रिपोर्टच्या आधारावर, आंध्र प्रदेश सरकारने पीएसआर अंजनेयुलु, कांती राणा ताता आणि विशाल गुन्नी यांच्या निलंबनाचा आदेश दिला.
मात्र, या प्रकरणाची सुरुवात झाली आहे ती कुक्कला विद्यासागर यांनी दाखल केलेल्या खटल्यापासून. विद्यासागर यांनी 2 फेब्रुवारी, 2024 रोजी अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हाच खटला आता तीन अधिकाऱ्यांच्या निलबंनासाठी कारणीभूत ठरला आहे.
कोण आहेत विद्यासागर कुक्कला?
कुक्कला वेंकटराम विद्यासागर हे कृष्णा जिल्ह्यातील मोव्वा मंडल कोसुरू गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडील कुक्कला नागेश्वर राव हे कृष्णा जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. 2014 च्या निवडणुकीआधी, विद्यासागर यांनी वायएसआरसीपी पक्षाच्या मछलीपट्टणम मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम केलं आहे.
2014 च्या निवडणुकीमध्ये, विद्यासागर यांनी वायएसआरसीपी पक्षाकडून पेनामलूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
30 ऑगस्ट रोजी साक्षी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं की, "माझे वडील नागेश्वर राव यांचा 2013 साली मृत्यू झाल्यानंतर सहानुभूती म्हणून 2014 च्या निवडणुकीमध्ये मला वायएसआरसीपी पक्षाकडून तिकीट देण्यात आले. मात्र, पराभवानंतर मी पक्ष आणि राजकारणापासून पूर्णपणे अंतर राखलं. सध्या मी पूर्णपणे माझ्या उद्योगावर लक्ष केंद्रीत केलं आहे."
निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, विद्यासागर यांचे VM Coallogix Pvt Ltd, VM Bulklogix, VM Agri India Pvt Ltd, VM Infra Pvt Ltd या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत. तेच या सर्व कंपन्यांचे संचालकही होते.
साक्षी टीव्हीला दिलेल्या मुलाकतीमध्ये त्यांनी पुढे म्हटलं की, "मुंबईमध्ये माझा बिझनेस करत असताना मला ती भेटली होती. तेव्हा मी तिच्यासोबत एक फोटोही काढला होता. सप्टेंबर 2023 मध्ये, मला ब्लॅकमेल करण्यात आलं. मी वाराणसीतील एक हॉटेल चार दिवसांसाठी बूक केलं. त्यावेळी लक्षात आलं की, तिने आधी आपल्या नावाची, जन्मतारखेची तसेच इतर प्रकारची जी माहिती दिली होती ती पूर्णपणे वेगळी होती."
विद्यासागर यांनी याच मुलाखतीमध्ये असाही दावा केला आहे की, अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांनी त्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने त्यांची जमीन विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.
अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांच्याविरोधातील खटला काय?
जग्गय्यपेटा शहरातील त्यांची पाच एकरची जागा कादंबरी जेठवानी यांनी बनावट सह्यांचा वापर करुन दोघांना विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत विद्यासागर यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी इब्राहीमपट्टणम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. यासाठी त्यांनी 5 लाख रुपयांचा अॅडव्हान्सही घेतला आहे, असे विद्यासागर यांचे म्हणणे आहे.
या तक्रारीनुसार, जेठवानी यांनी नागेश्वर राजा आणि त्यांचे जावई भारत कुमार यांना बनावट सह्यांचा वापर करुन आपली जमीन विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यसागर यांचा आहे.
"वायएसआरसीपीचे नेते कुक्कला विद्यासागर यांच्या खोट्या तक्रारीनंतर मला आणि माझ्या आई-वडिलांना अटक करण्यात आली. जेव्हा मी 2 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली तेव्हा त्याच दिवशी ते मुंबईला आले आणि त्यांनी मला त्याच दिवशी अटक केली. त्यांनी मला 42 दिवस तुरुंगात ठेवलं. काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे मला बेकायदा पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आलं.
ज्यांनी माझ्याविरोधात चुकीचा खटला दाखल त्या विद्यासागर यांना अटक व्हायला हवी. तसेच ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझा छळ केला त्या त्यांच्याविरोधात कारवाई व्हायला हवी. मला आणि माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळायला हवे," असे कादंबरी जेठवानी यांनी 14 सप्टेंबर रोजी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
विद्यासागर यांना कादंबरी यांच्याबरोबर करायचा होता विवाह
कादंबरी जेठवानी यांनी म्हटलं की, विद्यासागर कुक्कला यांनी विशिष्ट होतू ठेवून माझ्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
"गेल्या दहाहून अधिक वर्षांपासून मी विद्यासागर यांना ओळखते. मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो."
त्यांनी 2015 साली मला लग्नासाठी मागणी घातली होती. मी त्यास नकार दिला. त्यानंतर या नकाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी माझ्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे, असा आरोप कादंबरी जेठवानी यांनी केला आहे.
पुढे त्यांनी म्हटलं होतं की, "या खटल्यामुळे माझे आर्थिक नियोजन बिघडले असून माझे करिअर देखील उद्ध्वस्त झाले आहे. मी मानसिकदृष्ट्या खचले आहे. या सगळ्यासाठी जबाबदार असलेल्या कुक्कला विद्यासागर यांना कठोर शिक्षा व्हायला हवी."
ज्या पोलिसांमुळे आपलं करिअर उद्ध्वस्त झालं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी आंध्र प्रदेश सरकारकडे केली होती.
काय आहेत सरकारी आदेश?
सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन करताना तीन वेगवेगळे आदेश काढले आहेत.
"कुक्कला विद्यासगर यांनी कादंबरी जेठवानी यांच्याविरोधात 2 फेब्रुवारी, 2024 रोजी तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीच्या आधीच म्हणजेच 31 जानेवारी रोजी अंजनेयुलू यांनी विजयवाडा शहराचे कमिशनर कांती राणा ताता आणि डीसीपी विशाल गुन्नी यांना कादंबरी यांना मुंबईमधून अटक करण्याचे तोंडी आदेश दिले." असे अंजनेयुलु यांना निलंबित करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशामध्ये म्हटलं आहे.
पुढे या सरकारी आदेशामध्ये असेही म्हटलं आहे की, "या सगळ्या प्रक्रियेमध्ये अंजनेयुलु यांनी आपल्या पदाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला असून आधारहीन आणि अपूर्ण तक्रारीच्या आधारावर कारवाईचे आदेश दिले आहेत."
पोलीस कमिशनर कांती राणा ताता यांनीही कोणताही प्राथमिक तपास न करता अंजनेयुलू यांच्या आदेशानंतर जेठवानी यांना अटक करण्यासीठीची कारवाई केली.
विशेष म्हणजे जेठवानी यांच्याविरोधातील तक्रार 2 फेब्रुवारीला दाखल करण्यात आली असली तरीही पोलीस कमिशनर यांनी मुंबईला जाण्यासाठीच्या फ्लाईट्सची तिकीटे 1 फेब्रुवारीलाच बूक केली होती.
अतिरिक्त आयुक्त रामनमूर्ती, सीआय श्रीधर, शरीफ, सत्यनारायण, आरएसआय दुर्गादेवी, कॉन्स्टेबल टी. मौनिका, वाय. रमेश, एम. गीतांजली, एस. रम्या यांनी एफआयआर नोंदवण्यापूर्वीच कोणत्याही लेखी सूचना आणि वरिष्ठांकडून परवानगी घेण्यापूर्वी विमानाची तिकिटे विकत घेतल्याचे आढळून आले.
जेठवानी यांच्याविरोधातील ही तक्रार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता दाखल करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला डीसीपी विशाल गुन्नी हे सकाळी साडेसात वाजताच कोणत्याही लेखी आदेशाशिवाय मुंबईकडे निघाल्याचे सरकारी आदेशामध्ये म्हटले आहे.
सध्यातरी सरकारने पाच पोलिसांच्या विरोधात कारवाई केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)