You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुंभमेळ्यातल्या मौनी अमावस्येसाठी जमलेल्या गर्दीनं प्रयागराजची काय अवस्था झाली आहे?
- Author, सैय्यद मोझिज इमाम आणि विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आलेली गर्दी आता हळूहळू कमी होत आहे.
भाविक आपापल्या घरी परतत आहेत, पण परतीचा सुरक्षित प्रवास हेच त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान बनलंय.
कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारही सतर्क झालंय.
गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. मात्र परत जाण्यासाठी उतावीळ झालेल्या भाविकांना एक एक क्षण थांबणं अवघड वाटू लागलंय.
प्रयागराज जंक्शनवर हजारो लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपापल्या रेल्वेची वाट बघत थांबलेत. त्यासोबतच आता कुंभमेळ्यातून आलेल्या प्रवाशांचा ओघ वाढतोय.
त्यामुळे रेल्वे सेवांसोबतच प्रयागराज आणि आसपासच्या भागातल्या मुलभूत सेवा आणि संसाधनांवरचा ताण वाढतोय.
सोबती हरवले, रेल्वे शोधणं झालं अवघड
प्रयागराज रेल्वे जंक्शनवर जमलेली ही गर्दी जवळच्या मध्य प्रदेशातल्या रिवा आणि सतना जिल्ह्यांसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता आणि दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंतच्या अनेक भागातून आली आहे.
पटनाकडे जाणाऱ्या कुंभ स्पेशल रेल्वेतल्या डब्ब्यात खाली जमिनीवर बसलेल्या आरती देवी सांगतात, "आम्ही नऊ जणी आमच्या गावातून कुंभसाठी आलो होतो. मात्र, बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत आमच्यातल्या पाच जणींची ताटातूट झाली. आमचं 'पवित्र स्नानं'ही झालं नाही. आता जबरदस्तीनं परत जावं लागतंय. गावाकडून तीन लोक त्यांना शोधण्यासाठी येणार आहेत."
चेन्नई ते प्रयागराज असा 1700 किलोमीटरचा प्रवास करून आलेले चंद्रूही एक मोठी बॅग घेऊन रेल्वे शोधत होते.
"मी इथं तीन दिवसांपासून आहे. गर्दीचं व्यवस्थापन आणि इथली व्यवस्था याच इथल्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत. लाखो लोक इथं आलेत, पण त्यांच्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. लोकांना फार दूरपर्यंत पायी चालत जावं लागतंय आणि परत येताना जाणवणारे प्रश्न तर वेगळेच आहेत. काहीही करून इथल्या लोकांना घालवायचा प्रयत्न प्रशासन करतंय," ते म्हणाले.
प्रयागराज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवर तैनात असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसातल्या एका हवालदाराने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली. "काहीही करून लोकांना शहरातून बाहेर काढा असे आदेश आम्हाला मिळाले आहेत. हजारो प्रवासी चुकीच्या रेल्वेत चढलेत, पण निदान स्थानकावरची गर्दी कमी होतेय. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा धोका टळतो. कोणत्याही रेल्वेत बसवून लोकांना त्यांच्या घराच्या दिशेने पाठवणं एवढंच आम्ही पाहतोय," हवालदारांनी सांगितलं.
या बातम्याही वाचा:
प्रत्येक 13 व्या मिनिटाला रेल्वे असतानाही गर्दी नियंत्रणाबाहेर
प्रयागराजमध्ये आठ कोटींपेक्षा जास्त लोक आहेत असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (29 जानेवारी) सांगितले.
महाकुंभ मेळा भरलाय तो भाग किंवा प्रयागराजमधून बाहेर पडायचे रस्ते कुठेही लोकांची ये-जा थांबू नये असे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत. रेल्वेशी समन्वय साधून सतत रेल्वे उपलब्ध असतील याची खात्रीही त्यांनी करून घ्यायला सांगितलीय.
स्वतः मुख्यमंत्री परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत, असं अधिकारी म्हणतायत.
या काळात नेहमीच्या आणि खास कुंभमेळ्याच्या अशा 300 पेक्षा जास्त गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सोडल्या गेल्यात, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत होते.
प्रयागराजवरून विशेष रेल्वे सोडल्या जात आहेत, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली. मंगळवारी (28 जानेवारी) संध्याकाळी जवळपास 150 गाड्या स्थानकावरून सुटल्यात.
प्रयागराज जंक्शनचे स्थानक अधिक्षक शिवमुर्ती यांनी बीबीसीला सांगितलं की, मौनी अमावस्येच्या पवित्र स्नानानंतर 28 जानेवारीच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 29 जानेवारीला रात्री 10 वाजेपर्यंत 90 पेक्षा जास्त गाड्या स्थानकावर येऊन गेल्यात.
"प्रत्येक 13 मिनिटांनी एक रेल्वे इथं पोहोचत आहे. रेल्वे पोलीस दल, प्रादेशिक पोलीस, कुंभमेळ्याचा व्यवस्थापकीय गट आणि रेल्वेचे कर्मचारी कामावर तैनात आहेत. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी प्रत्येक रेल्वेच्या प्रत्येक डब्यात कमीतकमी दोन पोलीस आहेत," ते म्हणाले.
प्रयागराज जंक्शन, प्रयागराज छिवकी, नैनी जंक्शन आणि सूबेदारगंज रेल्वे स्थानक या आसपासच्या भागातून 100 गाड्या सोडल्या जात आहेत. तर प्रयागराज भागातल्या उत्तर रेल्वे स्थानकावरून 19, फाफामऊ स्थानकावरून 3, पुर्वोत्तर रेल्वेच्या रामबाग स्थानकावरून 7 आणि झुसी स्थानकावरून 21 गाड्या सोडल्यात.
प्रयागराजमधल्या प्रत्येक स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जवळपास 7 सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाचे मंत्री दिलीप कुमार यांनी दिली. त्यावर रेल्वे विभागाच्या वॉर रूममधून लक्ष ठेवलं जातंय. ही वॉर रूम खास त्यासाठीच तयार करण्यात आली आहे.
बीबीसी प्रतिनिधी चंदन जजवाडे यांच्याशी बोलताना रेल्वे मंत्रालयाने सांगितलं की, प्रयागराजमधल्या लहान-मोठ्या आठ रेल्वे स्थानकावरून पाच दिशांना प्रत्येक 20 मिनिटांनंतर एक गाडी सोडली जात आहे.
कुंभमेळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास एक कोटी भाविकांनी रेल्वेने प्रवास केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मंगळवारी (28 जानेवारी) संध्याकाळपासूनच प्रयागराजला जाण्यासाठी भाविकांची गर्दी स्थानकांवर येत होती. अनेक रेल्वे रद्द झाल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या गाडीतून जाण्यासाठी प्रवाशांमध्ये झटापट होताना दिसत होती.
प्रयागराजपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोक रेल्वे बोगीच्या दाराला लटकून आले होते. बछरावन स्थानकांवर प्रवाशांची गर्दी नियंत्रित करताना आरपीएफच्या जवानांना बरेच प्रयत्न करावे लागले.
दुसरीकडे, उत्तर प्रदेश परिवहन निगमकडूनही 8000 हून अधिक बस गाड्या सोडल्या गेल्यात.
कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं लखनौ - प्रयागराज हाय वेवरच्या बछरावन भागातल्या लोकांशी बोलताना बीबीसीच्या प्रतिनिधींना समजलं.
भीतीनं कसंही करून बसने किंवा रेल्वेने भाविक परत जाण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे परिवहन सेवांवही ताण पडत आहे.
कोलकाताहून आलेल्या राणी घरी परत जाण्यासाठी बस स्थानकावर वाट पहात उभ्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही आला होता. मात्र त्यांची ताटातूट झाली. दोघांचं फोनवर बोलणं झालं तेव्हा तो व्यवस्थित असल्याचं आणि घरी परत जात असल्याचं त्याने कळवलं.
कुंभमेळ्यातील गर्दीमुळे प्रयागराजचे रस्ते बंद
रंजीत कुमार एक टॅक्सी चालक आहेत. कुंभमेळ्याची सुरुवात झाली तेव्हा दररोज ते भाविकांना प्रयागराजला नेऊन सोडत असत.
पण 29 जानेवारीला परिस्थिती काही वेगळीच असल्याचं ते सांगतात. लखनौहून प्रयागराजला जाताना त्यांना भरपूर ट्रॅफिक जॅम लागलं. सकाळी सुरू केलेला प्रवास संपवायला त्यांना संध्याकाळचे पाच वाजले. तरीही प्रयागराजच्या सीमेवरच ते पोहोचू शकले. परत येताना मात्र काही त्रास नाही झाला.
भाविक इतक्या संख्येनं आले आहेत की, प्रयागराजच्या सीमेवरच्या भागात एक प्रतिक्षा क्षेत्र बनवण्यात आलं आहे. नव्याने येणाऱ्या भाविकांना काही वेळ तिथंच थांबवून ठेवलं जातं. त्या वेळात आतली गर्दी थोडी कमी होते.
प्रयागराजकडे जाणारे रस्ते सरकारनं तात्पुरते बंद केले आहेत. त्यामुळे लखनौ- प्रयागराज रस्त्यावर अनेकांनी भाविकांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करणं सुरू केलंय. आलेल्या लोकांचा परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
प्रयागराज सोडता वाराणसी आणि अयोध्येतही गर्दी वाढताना दिसत आहे. तिथला ओघ थांबवण्यासाठी प्रवासी गाड्या शहराच्या बाहेरच थांबवण्याचे आदेश सरकारनं दिलेत.
गर्दी पाहता स्पर्श दर्शनाच्या तिकीटावरही निर्बंध लावले असल्याचं काशी विश्वनाथ मंदिराचे एसडीएम शंभू शरण यांनी सांगितलं. या मंदिरालाही दररोज सहा ते सात लाख लोक भेट देतायत.
स्थानिक पत्रकार नित्यानंद मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे बाहेर गावाहून येणाऱ्या मोठ्या प्रवासी गाड्या तर 15 किलोमीटर दूरच थांबवल्या जात आहेत.
शाळा, कॉलेज आणि लग्न समारंभाच्या ठिकाणांना प्रतिक्षा क्षेत्र बनवण्याचे आदेश वाराणसीचे जिल्हाधिकारी एस राजालिंगम यांनी दिलेत.
दुर्घटनेतून सरकारनं काय धडा घेतला?
कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तिथली व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. आयएएस अधिकारी आशिष गोयल आणि भानू गोस्वामी यांना तातडीने प्रयागराजला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.
याशिवाय पाच सचिवांनाही तिथं तैनात करण्यात आलं आहे. हे सर्व अधिकारी 12 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये राहून व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.
13 जानेवारीला सुरू झालेल्या कुंभमेळ्यात सहा वेळा पवित्र स्नानाचं आयोजन केलं जातं. त्यापैकी दोन पवित्र स्नान व्यवस्थित पार पडले. तिसरे, मौनी अमावस्येला बुधवारी (29 जानेवारी) होते.
चौथं अमृत स्नान 3 फेब्रुवारी, पाचवं 12 फेब्रुवारी आणि सहावं अंतिम स्नान 26 फेब्रुवारीला होईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशातल्या काही जिल्हांतले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली.
त्यात प्रयागराज, कौशाम्बी, वाराणसी, अयोध्या, मिर्झापूर, बस्ती, जौनपूर, चित्रकूट, बांदा आंबेडकरनगर, प्रतापगढ, संतकबीरनगर, भदोही, रायबरेली, गोरखपूर या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
अयोध्या, वाराणसी, मिर्झापूर आणि चित्रकूट मधल्या अधिकाऱ्यांकडून भाविकांच्या सुविधेसोबतच सुरक्षेच्या व्यवस्थेबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
स्नान करून परतणारा प्रत्येक भाविक सुरक्षितपणे आपापल्या मुक्कामी पोहोचेल याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.
शिवाय, 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीदिवशी होणाऱ्या पवित्र स्नानाची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. पोलीस महानिर्देशक गुरुवारी (30 जानेवारी) कुंभमेळा क्षेत्रातल्या व्यवस्थांची पहाणी करणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)