You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझं अपहरण करण्यात आलं, मी अजूनही राष्ट्राध्यक्ष आहे'; अमेरिकेतील कोर्टात मादुरो आणखी काय म्हणाले?
- Author, मॅडलिन हॅलपर्ट
- Role, न्यूयॉर्क, न्यायालयातून
न्यूयॉर्कच्या एका न्यायालयातील दरवाजातून आत येण्यापूर्वी व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्या पायातील बेड्यांच्या आवाज ऐकू येत होता.
मादुरो न्यायालयात येताच पत्रकार आणि सर्वसामान्य लोकांनी भरलेल्या गॅलरीकडे पाहत म्हणाले, त्यांचं 'अपहरण' करण्यात आलं आहे.
ते आल्यानंतर काही मिनिटांनी न्यायाधीश एल्विन हेलरस्टीन यांनी कामकाज सुरू करण्यासाठी मादुरो यांना त्यांची ओळख सांगण्यास सांगितलं.
मादुरो यांनी शांत स्वरात स्पॅनिश भाषेत उत्तर दिलं. न्यायालयात त्याचं भाषांतर करण्यात आलं, "हो, मी निकोलस मादुरो आहे. मी व्हेनेझुएला प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष आहे. 3 जानेवारीपासून अपहरण करून मला इथे ठेवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलातील कारकासमधील माझ्या घरातून मला ताब्यात घेण्यात आलं होतं."
न्यायाधीशांनी लगेचच मध्ये हस्तक्षेप केला आणि म्हणाले की, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी 'वेळ आणि ठिकाण' निश्चित केलं जाईल.
सोमवारी (5 जानेवारी) दुपारी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयात 40 मिनिटं झालेल्या या नाट्यमय सुनावणीदरम्यान मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आरोपांबाबत ते निर्दोष असल्याचं सांगितलं.
मादुरो म्हणाले, "मी निर्दोष आहे. मी एक सभ्य माणूस आहे."
त्यांची पत्नी फ्लोरेस यादेखील म्हणाल्या की, त्या 'पूर्णपणे निर्दोष' आहेत.
शनिवारी (3 जानेवारी) 63 वर्षांचे मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांना व्हेनेझुएलातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातून अमेरिकेच्या सैनिकांनी ताब्यात घेतलं होतं.
हे एक रात्रभर करण्यात आलेलं ऑपरेशन होतं. यात व्हेनेझुएलातील काही लष्करी तळांवरदेखील हल्ले करण्यात आले होते.
मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर न्यूयॉर्कमधील एका तुरुंगात नेण्यात आलं होतं.
सुनावणीदरम्यान, या दोघांनी तुरुंगातील निळ्या आणि नारिंगी रंगाचा शर्ट आणि खाकी पँट घातलेली होती.
या दोघांनी स्पॅनिश भाषेतील भाषांतर ऐकण्यासाठी हेडफोन लावलेले होते.
मादुरो पिवळ्या रंगाच्या लीगल पॅडवर अतिशय काळजीपूर्वक नोट्स घेत होते आणि ते त्यांच्याजवळ पॅड ठेवू शकतात, या गोष्टीची त्यांनी न्यायाधीशांकडून खातरजमादेखील करून घेतली होती.
मादुरो कोर्ट रूममध्ये आल्यानंतर मागे वळले आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या काहीजणांकडे पाहून डोकं हलवून अभिवादन केलं.
मादुरो न्यायालयात काय म्हणाले?
संपूर्ण सुनावणीदरम्यान मादुरा यांचा चेहरा शांत आणि निर्विकार होता.
शेवटीदेखील, जेव्हा प्रेक्षक गॅलरीत बसलेला एकजण अचानक ओरडला - 'मादुरो तुम्हाला तुमच्या गुन्ह्यांची किंमत मोजावी लागेल,' तेव्हादेखील त्यांच्यामध्ये बदल झाला नाही.
मादुरो यांनी स्पॅनिशमध्ये त्या व्यक्तीच्या दिशेनं ओरडत उत्तर दिलं, "मी एक अपहरण करण्यात आलेला राष्ट्राध्यक्ष आणि युद्धकैदी आहे."
नंतर त्या व्यक्तीला कोर्ट रूममधून बाहेर काढण्यात आलं.
न्यायालयात उपस्थित असलेल्या इतर लोकांसाठी देखील हे कामकाज भावनिक होतं.
व्हेनेझुएलाच्या रिपोर्टर मॅबोर्ट पेटिट यांनी मादुरो यांच्या कार्यकाळाचं वृत्तांकन केलं आहे.
त्यांनी सांगितलं की, मादुरो यांच्या अटकेदरम्यान झालेल्या अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे काराकासमधील फुएर्ते तिउना परिसराजवळील त्यांच्या घराचं नुकसान झालं.
त्या म्हणाल्या की, त्यांच्या माजी नेत्याला अमेरिकेच्या मार्शलांच्या देखरेखीखाली तुरुंगाच्या पोशाखात न्यायालयात आणलं जात असताना पाहणं, हा खूपच विचित्र अनुभव होता.
मादुरो यांची पत्नी फ्लोरेस खूपच शांत दिसल्या. त्यांचे डोळे आणि कपाळाजवळ जखमेच्या खुणा दिसल्या.
त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, कारवाईच्या वेळेस त्यांना या जखमा झाल्या होत्या.
त्यांनी केस बांधलेले होते आणि त्या हळू आवाजात त्यांच्या वकिलांशी बोलत असल्याचं दिसलं.
त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली.
अमेरिकेनं मादुरो यांच्यावर नार्को-दहशतवादाचा कट, कोकेन आयातीचा कट, मशीन गन आणि विनाशकारी उपकरण ठेवण्याचा कट केल्याचे आरोप केले आहेत.
मादुरो यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर अनेक लोकांवरदेखील आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)