बाबरला भारतात मेवाडचा राजा राणा संगानं बोलावलं होतं? इतिहास काय सांगतो?

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

इतिहासात काही क्षण असे असतात, जे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक प्रवाहाची दिशा बदलून टाकतात. खानवाचं युद्ध हे असंच एक निर्णायक युद्ध होतं.

एका बाजूला मोगल सम्राट बाबर तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानातील राजपूत शक्तीचं प्रतीक राणा संगा होते. जखमी अवस्थेतही रणभूमीत उतरलेल्या राणा संगा यांच्या पराक्रमानं बाबराचीही झोप उडाली होती.

राणा संगा यांची युद्धनीती, बाबरच्या डावपेचांचा प्रभाव आणि खानवाच्या रणात नेमकं काय घडलं याविषयी जाणून घेऊया.

पंधराव्या शतकात मेवाड हे उत्तर भारतात एक शक्तिशाली साम्राज्य म्हणून उदयास आले होते.

मेवाडचा पाया बप्पा रावल यांनी रचला होता. ते गुजरातमधून आले आणि राजस्थानच्या नैऋत्य भागात स्थायिक झाले होते.

आपल्या भावांसोबतच्या सत्ता संघर्षानंतर राणा संगा सन 1508 मध्ये मेवाडच्या गादीवर बसले होते.

त्यावेळी त्यांचं वय 27 वर्षे होतं. मेवाडच्या सिंहासनावर आरूढ होताच राणा संगा यांनी आपल्या विजयाची मोहीम सुरू केली होती. सर्वप्रथम अबू आणि बुंदी यांनी तहाचा मार्ग स्वीकारला.

आमेरच्या सैन्यानं मेवाडवर हल्ला केला तेव्हा राणा संगांनी आमेरचा राजा माधो सिंह याला कैद केलं.

सतीश चंद्र त्यांच्या 'मध्ययुगीन भारताचा इतिहास' (हिस्ट्री ऑफ मिडियवल हिस्ट्री) या पुस्तकात लिहितात की, 1517 च्या युद्धात राणा संगा यांनी माळव्याचा शासक महमूद दुसरा याला पकडून चित्तोड येथे आणलं होतं.

त्याच वर्षी इब्राहिम लोदीने मेवाडवर हल्ला केला. परंतु, खतौली येथे राणा संगांच्या हातून त्याचा पराभव झाला.

सतीश चंद्र लिहितात, "या लढाईत राणा संगांच्या डाव्या हाताच्या कवचात बाण घुसला. संपूर्ण शरीरात विष पसरण्याचा धोका असल्यानं राणांचा जीव वाचवण्यासाठी वैद्यांनी त्यांचा हात कापला होता.

बऱ्याच दिवसांनी ते बरे झाले. पण आता त्यांचा एकच हात उरला होता. राणा संगा हिंमत हारले नाहीत. त्यांनी नियमितपणे एका हातानंच तलवारबाजीचा सराव केला."

हा तोच काळ होता जेव्हा फरघाना खोऱ्यात जन्मलेला बाबर भारताचे दरवाजे ठोठावत होता.

बाबरकडे पोहोचले दूत

सन 1526 मध्ये पानिपतच्या निर्णायक युद्धाच्या काही महिन्यांपूर्वी, दिल्लीचा शासक इब्राहिम लोधीच्या दरबारातील काही लोक, त्याचा मुलगा दिलावर खानच्या नेतृत्वाखाली बाबराला भेटायला गेले होते. त्यांनी बाबरला भारतात येऊन लोधीला सत्तेवरून हटवण्यास सांगितलं.

इब्राहिम लोधी हा हुकूमशहा आहे आणि त्यानं आपल्या दरबारींचा पाठिंबा गमावला आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.

बाबरने आपल्या 'बाबरनामा' या आत्मचरित्रात लिहिलं की, "जेव्हा आम्ही काबूलमध्ये होतो, तेव्हा मेवाडचा राजा राणा संगा यांचाही एक दूत त्यांच्या शुभेच्छा घेऊन माझ्याकडे आला होता.

आग्र्याहून इब्राहिम लोधीवर ते हल्ला करणार असल्याची त्यांची योजना त्यांनं सांगितली होती. मी दिल्ली आणि आग्रा दोन्ही काबीज केलं. पण त्यांनी मला त्यांचं तोंडही दाखवलं नाही."

बाबरचा चुलत भाऊ मिर्झा हैदर यानंही आपल्या 'तारीख-ए-रशिदी' या पुस्तकात राणा संगांचा एक दूत बाबरला भेटायला आला होता असा उल्लेख केला आहे.

बाबरचा आणखी एक चरित्रकार स्टॅनली लेन पूल यानंही आपल्या 'बाबर' या पुस्तकात राणा संगांचा दूत बाबरला भेटल्याचं नमूद केलं आहे.

आणखी एक इतिहासकार रघुबीर सिंह आपल्या 'पूर्व-आधुनिक राजस्थान' या पुस्तकात लिहितात, "राजपूतांच्या राजकीय दूरदृष्टीच्या अभावामुळे राणा संगा यांना बाबरला काबूलहून बोलावण्याची प्रेरणा मिळाली होती, जेणेकरून कमकुवत इब्राहिम लोदीचा युद्धात पराभव करता येईल.

त्यामुळं, राणा संगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राणींपैकी एक कर्मावती हिने तिचा मोठा मुलगा विक्रमजीत याला मेवाडच्या गादीवर बसण्यास मदत करण्यासाठी शत्रू बाबरचे सहाय्य घेण्यास मागंपुढं पाहिलं नव्हतं."

बाबरनं पानिपतमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव केला

जी.एन. शर्मा हे त्यांच्या 'मेवाड अँड द मुघल एम्पर्रस' या पुस्तकात प्रश्न उपस्थित करतात, "त्यावेळी बाबरची योद्धा म्हणून अशी ख्याती नव्हती, त्याचबरोबर इतर राजपूतांमध्ये दुसऱ्या राजांकडे दूत पाठवण्याची परंपरा नव्हती."

मात्र, 1526 मध्ये पानिपतच्या युद्धात बाबर इब्राहिम लोदीच्या विरोधात उभा राहिला, तेव्हा तेथे राणा संगांचं कोणतंही अस्तित्व नव्हतं. खुद्द बाबरने बाबरनामामध्ये याची पुष्टी केली आहे.

बाबरनं बाबरनामात लिहिलं आहे, "पानिपतच्या युद्धात आमचं सैन्य फक्त 30 हजार होतं, तर इब्राहिम लोधीच्या सैनिकांची संख्या एक लाख होती."

सतीश चंद्र लिहितात, "बाबरच्या चतुर नेतृत्वाने त्याच्यापेक्षा तीनपट मोठ्या सैन्याचा पराभव केला. तोफखान्याचा वापर केल्यानं इब्राहिम लोदीचे हत्ती खवळले. ते स्वतःच्या सैन्याला पायदळी तुडवत पळू लागले.

बाबरच्या शिस्तबद्ध आणि कुशल सैन्यानं इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि बाबरनं दिल्लीचा ताबा घेतला."

'राणा संगांनी बाबरला साथ दिली नाही'

सन 1519 मध्ये गागरौनच्या लढाईत मालवाचा महमूद खिलजी द्वितीयचा पराभव केल्यानंतर राणा संगांचा प्रभाव आग्र्याजवळून वाहणाऱ्या पलियाखार नदीपर्यंत पोहोचला होता. गंगा खोऱ्यातील बाबरचे साम्राज्य आता संगांसाठी धोक्याचे बनले होते.

सतीश चंद्र लिहितात, "बाबरनं राणा संगांवर कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्याचं म्हणणं होतं की, राणा संगा यांनी त्याला भारतात बोलावलं होतं आणि इब्राहिम लोदीविरुद्धच्या लढाईत पाठिंबा देण्याचं वचन दिलं होतं. परंतु, बाबरच्या लढ्यादरम्यान ते त्याला मदत करण्यासाठी पुढे आले नव्हते.

संगा यांनी बाबरला कोणतं वचन दिलं होतं ते आम्हाला माहीत नाही. कदाचित तैमूरप्रमाणे बाबरही लुटालूट करुन परत जाईल, असं त्यांना वाटलं असावं. पण बाबरच्या भारतात राहण्याच्या निर्णयानं परिस्थिती पूर्णपणे बदलली."

बाबरचा असा विश्वास होता की, भारत जिंकण्याच्या त्याच्या मोहिमेतील सर्वात मोठा अडथळा मेवाडचा राणाच असेल.

हरबन्स मुखिया आपल्या 'द मुघल्स ऑफ इंडिया' या पुस्तकात लिहितात, "जेव्हा लाहोरच्या विजयानंतर त्याला दिल्लीवरील हल्ल्याच्या वेळी मदतीचं आश्वासन देण्यात आलं, पण मदत केली नाही, तेव्हाच त्याला राणा संगांच्या मुत्सद्देगिरीचा अनुभव आला होता.

अफगाण शक्ती कमकुवत करून राणा संगांना दिल्लीवर राज्य करायचं होतं हे बाबरला समजलं होतं, पण बाबरला स्वतः दिल्लीवर राज्य करायचं होतं."

अन् दारूवर बंदी घातली

सन 1526 मध्ये पानिपतमध्ये बाबरचा विजय झाल्यापासून, राणा संगांबरोबरची त्याची लढाई आकार घेऊ लागली होती.

या काळात, जर राणा संगा बाबरविरुद्ध विजयी झाले तर महमूद लोदीला दिल्लीचं तख्त परत मिळेल, यामुळं इब्राहिम लोधीचा धाकटा भाऊ महमूद लोधीसह अनेक अफगान केवळ या आशेनं सामील झाले होते.

मेवातचे राजा इलासन खान यांनीही राणा संगांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ प्रत्येक राजपूत राजाने राणा संगांच्या समर्थनार्थ आपलं सैन्य पाठवलं.

विल्यम रशब्रुक आपल्या 'बाबर: ॲन एम्पायर बिल्डर ऑफ द सिक्स्टीन्थ सेंचुरी' या पुस्तकात लिहितात, "राणा संगांची कीर्ती आणि बयाना येथील नुकत्याच मिळालेल्या विजयाने बाबरच्या सैनिकांचे धैर्य खचलं होतं. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बाबरने राणा संगांविरुद्धचा लढा 'जिहाद' असल्याची घोषणा केली.

लढाईपूर्वी दारूची सर्व भांडी फोडून आपण किती कट्टर मुसलमान आहोत हे दाखवण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यानं आपल्या संपूर्ण राज्यात दारूच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली. बाबरनं आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जोशपूर्ण भाषण केलं.

सन 1527 साली राणा संगाशी ऐतिहासिक युद्ध करण्यासाठी बाबरनं आग्रापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानवाची निवड केली.

राणा संगा हत्तीवर बसून करत होते नेतृत्व

खानव्याच्या लढाईत दोन्ही बाजू पूर्ण ताकदीने लढल्या. बाबरनं बाबरनामामध्ये लिहिलं आहे की, "राणा संगांच्या सैन्यात दोन लाखांहून अधिक सैनिक होते, ज्यामध्ये 10 हजार अफगान आणि हसन खान मेवातीने पाठवलेले तेवढेच सैनिक होते."

बाबरने ही संख्या वाढवून सांगितली असण्याचीही शक्यता आहे. परंतु, यात कोणती शंका नाही की, बाबरचे सैनिक राणा संगांच्या सैनिकांपेक्षा खूपच कमी होते.

जी.एन.शर्मा लिहितात, "बाबरच्या सैन्यासमोर सामानाने भरलेल्या गाड्यांची एक रांग होती. या गाड्या लोखंडी साखळदंडांनी बांधलेल्या होत्या आणि त्यांच्या सैन्यासाठी एक प्रकारचे संरक्षण कवच म्हणून ते काम करत होते.

या गाड्यांच्या मागे तोफा होत्या. शत्रूला त्या दिसत नव्हत्या. त्याच्या मागे घोडेस्वारांच्या रांगा होत्या. रेषांच्या मध्ये मोकळी जागा होती ज्यातून सैनिक पुढे-मागे जाऊ शकत होते.

यानंतर, सशस्त्र पायदळ सैनिक होते, सैन्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असे अडथळे उभे केले गेले जेणेकरून त्या बाजूने हल्ल्याची भीती वाटू नये. एका बाजूला खड्डा खणण्यात आला आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठी झाडे तोडून लावली गेली."

शर्मा लिहितात, "दुसरीकडे, राणा संगांच्या सैन्याची पाच भागात विभागणी करण्यात आली होती. समोर हत्तींची रांग होती. हत्तींच्या सोंडेवर लोखंडी चिलखतही घातलेले होते.

हत्तींच्या मागे भाले असलेले घोडेस्वार होते. राणा संगा स्वतः पहिल्या रांगेत एका हत्तीवर बसले होते, जे त्यांच्या सर्व सैनिकांना दुरून दिसत होते. तर बाबर त्यांच्या सैन्यासमोर नव्हता तर मध्यभागी होता."

राणा संगा जखमी झाले

राणा संगांनी बाबरच्या उजव्या बाजूवर हल्ला करून त्या बाजूच्या सैन्याला छेद दिला. राणा संगा स्वतः लढाईचे नेतृत्व करत होते.

शर्मा लिहितात, "तिथं उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं की, राणा संगांचा एक डोळा नव्हता. त्यांचा एक हात कापला गेला होता. त्यांचा एक पायही काम करत नव्हता. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या, पण तरीही त्यांच्या चपळाईत आणि उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती."

पण मुघल तोफखानाही प्रचंड विध्वंस घडवत होता. हळूहळू राणा संगांचे सैन्य मागे हटू लागले.

जी.एन. शर्मा लिहितात, "दरम्यान, राणा संगांच्या कपाळावर एक बाण लागला. संगा बेशुद्ध होऊन त्यांच्या हौदात पडले. त्यांच्या काही सैनिकांनी त्यांना लगेचच हौदातून बाहेर काढून पालखीत बसवलं आणि बाहेर पाठवलं.

राणा संगा हत्तीवर नसल्याचं राणांच्या सैन्याने पाहिलं. हे पाहून त्यांचं मनोबल खचलं. सैनिकांचं खच्चीकरण झालं.

अज्जू झाला या राजपूत सेनापतीने राणांचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्यांच्या हत्तीवर स्वार झाला. पण राजाच्या अनुपस्थितीचा वाईट परिणाम आधीच झाला होता. राजपूत सैन्यानं हिंमत गमावली होती, ते सैरभैर झाले."

बाबरने बाबरनामामध्यं लिहिलं आहे की, "मी इस्लामचा प्रचार करण्यासाठी माझं घर आणि कुटुंब सोडलं होतं. मी या युद्धात शहीद होण्याचं ठरवलं होतं. पण अल्लाने माझी विनंती ऐकली.

दोन्ही सैन्य थकले होते. पण तेव्हाच राणा संगांचे दुर्दैव आणि माझे नशीब उजळलं. संगा बेशुद्ध पडले. त्यांच्या सैन्याचे मनोधैर्य खचले. मी जिंकलो."

वयाच्या 47 व्या वर्षी मृत्यू

राणा संगांच्या पराभवाचं कारण म्हणजे त्यांच्या सैन्यातील शिस्त आणि परस्पर समन्वयाचा अभाव.

विल्यम रशब्रुक लिहितात, "राणा संगांच्या सैन्यात संख्यात्मक बळ जास्त होते, त्यामुळं एकाच वेळी संपूर्ण सैन्याला निरोप देण्यासाठी वेळ लागत असत. मुघल सैन्याची संघटना आणि शिस्त राणा संगांच्या सैन्यापेक्षा चांगली होती."

सन 1527 मध्ये खानवाची लढाई संपल्यानंतर, राणा संगांनी शपथ घेतली की आपण बाबरचा पराभव करूनच चित्तोडमध्ये प्रवेश करू, परंतु ते फार काळ जगू शकले नाही.

21 वर्षे सहा महिन्यांच्या कारकिर्दीत मेवाडला साम्राज्यविस्ताराच्या शिखरावर नेणारे राणा संगा यांचं वयाच्या 47 व्या वर्षी निधन झालं.

सतीश चंद्र यांनी लिहिलं की, "असं म्हणतात की, बाबरविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्याची त्यांची जिद्द त्यांच्या दरबारींना आवडला नाही आणि त्यांनी त्यांना विष दिलं. राजस्थानच्या या शूर माणसाच्या निधनानं, आग्रापर्यंत विस्तारलेल्या अखंड राजस्थानच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला."

खानव्याच्या लढाईनं दिल्ली-आग्रा प्रदेशात बाबरचं स्थान आणखी मजबूत झालं. यानंतर त्यानं ग्वाल्हेर आणि धोलपूरचे किल्लेही जिंकले आणि अलवरचा मोठा भागही आपल्या राज्यात समाविष्ट केला.

"पानिपतच्या विजयानं भारतात मुघल राजवटीचा पाया घातला गेला. पण हा पाया बाबरच्या खानवा येथे राणा संगांविरुद्धच्या विजयामुळं मजबूत झाला," असं सतीश चंद्र लिहितात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)