You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इन्सपेक्टर झेंडे : चार्ल्स शोभराजला दोन वेळा पकडणारे मराठी अधिकारी, राजीव गांधींनी यांच्यासाठी थांबवला होता ताफा
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
बिकिनी किलर चार्ल्स शोभराजला अटक करण्यात मराठी पोलीस अधिकारी इन्सपेक्टर झेंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्यावर आधारित चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली होती.
-------------------------
शुक्रवार 23 डिसेंबर 2022 रोजी काठमांडूच्या जेलमधून 78 वर्षांचा सिरियल किलर, ज्याला 'बिकिनी किलर' म्हणूनही ओळखलं जातं, त्या चार्ल्स शोभराजची सुटका झाली.
तो जेलमधून बाहेर येतानाच्या बातम्या झळकत असताना बीबीसी मराठीने एका अशा मराठी पोलीस अधिकाऱ्यासोबत संवाद साधला ज्यांनी तब्बल दोन वेळा या चार्ल्स शोभराजला पकडून गजाआड केलं होतं. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या गुन्हेगाराला पकडण्याचे हे किस्से रोमांचकारी आहेत.
त्या मराठी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे मधुकर झेंडे. 85 वर्षांचे मधुकर झेंडे 1996 साली मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरुन निवृत्त झाले. पण त्यांच्याकार्यकाळात त्यांच्या शोभराजला पकडण्याच्या कामगिरीचा उल्लेख सतत होत राहतो.
झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला पहिल्यांदा 1971 साली मुंबईमध्ये पकडलं होतं. तेव्हा ते मुंबई पोलीस दलात सबइन्स्पेक्टर या पदावर कार्यरत होते. झेंडे सांगतात की, 1971 सालापर्यंत शोभराजची 'सीरियल किलर' अशी ओळख नव्हती.
तेव्हा तो अफगाणिस्तान, इराण या देशांमधून महागड्या इम्पोर्टेड गाड्या चोरुन आणायचा आणि मुंबईत विकायचा. पण दिल्लीमध्ये त्याने कलेल्या एका गुन्ह्यामुळे तो भारतात रडारवर आला. तो गुन्हा काय होता आणि त्यानंतर भारततल्या तपास यंत्रणांचे त्याला पकडण्यासाठी कसे प्रयत्न सुरु झाले हे झेंडेंनी सांगितलं.
“दिल्लीमध्ये अशोका नावाचं एक फाईव्ह स्टार हाॅटेल होतं. 1971 साली चार्ल्स शोभराजने तिथल्या एका कॅबरे डान्सरसोबत मैत्री केली होती आणि तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तिला त्याने सांगतिलं की आपण तुझ्यासाठी दागिने खरेदी करू. त्यासाठी त्याने दागिन्यांच्या दुकानातून दागिने घेऊन एक माणूस बोलावला. त्याला काॅफीमधून काहीतरी टाकून त्याला बेशुद्ध केलं आणि ते दागिने आणि त्या मुलीला घेऊन तो पळाला.
आपला माणूस का आला नाही हे बघण्यासाठी तो मालक वर गेला तर त्याचे दागिने गायब होते आणि त्याचा माणूस बेशुद्ध पडला होता. त्याने पोलिसांना बोलावलं. पोलिसांना सुदैवाने तिथे त्याचा पासपोर्ट सापडला त्यावर त्याचं नाव होतं चार्ल्स शोभराज. त्यानंतर तो वॉन्टेड झाला,” असं झेंडेंनी सांगितलं. या घटनेची बातमी तेव्हा वत्तपत्रांमधून झळकली आणि चार्ल्स शोभराज हे नाव लाईमलाईटमध्ये आलं.
यानंतर 1971 सालीच मधुकर झेंडेंना त्यांच्या एका खबरीकडून माहिती मिळाली की, मुंबईमध्ये एक मोठी लूट करण्याचा प्लॅन एका परदेशी व्यक्तीने बनवला आहे. त्याच्यासोबत चार-पाच परदेशी लोक आहेत आणि त्यांच्याजवळ रिव्हॉलव्हर , रायफल सारखी शस्त्रंही आहेत.
ही माहिती मिळाल्यावर मधुकर झेंडेंनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ताज हॉटेल जवळ लक्ष ठेऊ लागले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे गुन्हेगार हाती लागावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.
चार्ल्स शोभराजला पहिली अटक कशी झाली?
1971 सालची घटना असली तरीही मधुकर झेंडेंना ती जशीच्या तशी आठवते. त्यांच्या आठवणीत तो प्रसंग बारकांव्यासह कोरला गेलेला आहे. “आम्ही दोन-चार आॅफिसर टॅक्सीमध्ये बसून होतोे. 11 नोव्हेंबर 1971 ला शोभराज सूटबूट घालून आमच्या टॅक्सीच्या बाजूने गेला. तो बाजूने जातानाच आपल्याला हवा असलेला गुन्हेगार हाच याची खात्री पटली. आम्ही जाऊन त्याला पकडले. त्याच्या जवळ रिव्हॉल्व्हर होतं. आम्ही त्याला ताब्यात घेतलं. पण तो काही बोलायलाच तयार नव्हता.
त्याला पोलिस स्टेशनला घेऊन गेलो. तिथे त्याची उलटतपासणी घेतली. तरीही तो काहीच सांगत नव्हता. त्यानंतर त्याची झडती घेतली आणि त्यात 4-5 पावत्या मिळाल्या. त्याने आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना जवळच्या हाॅटेल्समध्ये ठेवलं होतं. मग आम्ही त्या हाॅटेलमध्ये जाऊन रेड केली. तिथून त्या सगळ्यांना पकडलं. त्यांच्याकडून रायफल्स, स्मोक बॉम्ब, हँड ग्रेनेड, सगळं मिळालं,” झेंडेंनी सांगितलं.
अशाप्रकारे पहिल्यांदा चार्ल्स शोभराज झेंडेंच्या हाती लागला. शोभराजला पकडल्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं कारण दागिने लुटीच्या केसमध्ये तो तिथे वाॅन्टेड होता.
झेंडे सांगतात की, दिल्ली पोलिसांनी शोभराजला ताब्यात घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालं. युद्धाच्या दरम्यान ब्लॅकआऊट व्हायचे. यादरम्यान शोभराजने पोटात दुखत असल्याचा बहाणा केला आणि स्वत:ला दवाखान्यात दाखल करुन घेतलं. ब्लॅकआऊटचा फायदा घेऊन तो दवाखान्यातून पळून गेला.
यानंतर त्याने गुन्हे करण्याची एक पद्धत तयार केली. चार्ल्स शोभराजने 1972-1976 या काळात 12 जणांच्या हत्या केल्याचा संशय आहे. काहींना त्याने दिलेल्या ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू आला, काहींना त्यानं बुडवून मारलं, काहींना भोसकून तर काहींना गॅसोलीन टाकून पेटवूनही दिलं.
झेंडे सांगतात की, असे गुन्हे त्याने जगभर केले. इंटरपोलने त्याची रेड कॉर्नर नोटीस लावली.
1976 साली चार्ल्स शोभराज परत दिल्लीत आला. तो आणि त्याच्या सोबत असलेल्या तीन महिलांनी काही फ्रेंच विद्यार्थ्यांना आपल्याला टूर गाइड म्हणून घेण्यासाठी राजी केलं. त्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्यांना गुंगीच्या गोळ्या दिल्या.
सुदैवाने काही विद्यार्थ्यांना पोलिसांशी संपर्क साधण्यात यश आलं. शोभराज दिल्लीत अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर खटला चालला आणि बारा वर्षांची शिक्षाही झाली. त्याची रवानगी तिहार जेलमध्ये झाली.
पण तिहार जेलमधल्या शिक्षेची दहा वर्षं पूर्ण झाल्यावर त्यानं तिथून पोबारा करण्याची योजना आखली.
तुरुंगातली पार्टी
16 मार्च 1986 ला शोभराज तिहार जेलमधून निसटला. शोभराजने तुरुंगात पार्टी दिली होती. त्यानं या पार्टीला कैद्यांसोबतच गार्ड्सनाही बोलावलं. पार्टीत वाटलेल्या बिस्कीट आणि द्राक्षांत झोपेचं औषध मिसळलं होतं. ते खाल्ल्यावर थोड्याच वेळात शोभराज आणि त्याच्यासोबत जेलमधून निसटलेले चार लोक सोडता सगळे लोक बेशुद्ध झाले. आपण पळून जाऊ शकतो याचा शोभराजला इतका ठाम विश्वास होता की, त्याने जेलमधून बाहेर आल्यावर गेटवर उभं राहून फोटोही काढून घेतला होता. यानंतर चार्ल्स शोभराजचा परत शोध सुरू झाला.
1986 साली शोभराजला पकडण्याचे प्रयत्न
शोभराजला पकडण्यासाठी तपास यंत्रणा काम करत होत्या. त्यातच त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक धागा त्यांना सापडला. रेल्वे पोलिसांनी 29 मार्चला अजय सिंह तोमर नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून शोभराजच्या ठावठिकाणा विषयी माहिती मिळाली.
मधुकर झेंडे सांगतात की, तोमरला अटक झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांना तातडीने बोलावून घेतलं. यावेळेस झेंडे पोलीस इन्स्पेक्टर या पदावर काम करत होते. त्यांनी 1971 साली शोभराजला पकडलं होतं. तसंच 1976 साली दिल्लीत शोभराजला अटक झाल्यानंतर साक्ष देण्यासाठी ते कोर्टात गेले होते.
तिथेही त्यांचा आणि शोभराजचा आमना सामना झाला होता. त्यामुळे शोभराज कसा दिसतो, त्याची अंगकाठी आणि त्याची गुन्हे करण्याची पद्धत याविषयी त्यांना माहिती होतं. तोमरकडून मिळालेल्या माहितीच्या भरोशावर मधुकर झेंडेंच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांनी शोभराजला गोव्यात पकडण्यासाठी एका प्लॅन बनवला.
शोभराजला पकडण्यासाठी गोव्यात शोध मोहीम
मधुकर झेंडे सांगतात की, त्यांनी शोभराजची माहिती गोळा केली. त्यातून एक समोर आलं की त्याची बायको अमेरिकेत होती. तो गोव्याहून खोट्या पासपोर्टवर बायकोला भेटायला जाण्याची शक्यता.
त्याच्याकडे एक मोटरसायकल होती आणि तिचा नंबरही झेंडेना मिळाला होता. या दोन गोष्टींच्या आधारावर ते गोव्यात गेले. तब्बल सहा दिवस ते शोभराजला शोधत होते. “गोव्यात प्रवाशांसाठी मोटरसायकल स्टॅन्ड होते. त्या मोटर सायकल स्टॅँडवर आम्ही जायचो आणि चौकशी करायचो. आम्ही विचारायचो की माझी गाडी माझा भाऊ घेऊन आलाय त्याला पाहिलंय का? तिकडे एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा होता. तो म्हणाला की तुमचा भाऊ कसा असू शकेल? ही गाडी मोरपंखी रंगाची नवीन कोरी गाडी आहे. फाॅरेनर चालवतो. तुम्ही तर भारतीय आहात. त्याच्या या उत्तरामुळे मला खात्री पटली की शोभराज नक्की त्याच भागात होता.
मी पोलिस आयुक्तांना फोन केला की अजून चार-पाच अधिकारी पाठवा. ते अधिकारी गोव्यात पोहोचले. आम्ही दिवसभर गाडी शोधत गोव्यात फिरायचो. संध्याकाळी त्या भागतल्या हाॅटेलमध्ये शोभराजची वाट बघत बसायचो,” मधुकर झेंडेंनी सांगितलं. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि 'ओ कोकेरो' या हॉटेलमध्ये शोभराजला त्यांनी पकडलं. हा किस्साही थरारक आहे. “6 एप्रिलला रात्री दहा-अकराच्या सुमारास दोन माणसं सनहॅट घालून आली. मी म्हटलं की, यांनी रात्री सनहॅट का घातली आहे. मी निरखून बघितलं तर कळलं की तो शोभराज होता. मी गुपचूप उठून भिंतीमागे लपलो. ते दोघं आले. टेबलवर बसले. त्यांनी ऑर्डर वगैरे केली. मी तेवढ्या वेळात प्लॅन केला. माझ्या सोबतचे अधिकारी आत बसले होते. मी एकटाच बाहेर बसलो होतो. त्यांच्याशी समन्वय साधून आम्ही आमच्या पोझिशन घेतल्या. काही जण बाहेर थांबली काही आत होती,” असं झेंडेंनी सांगितलं.
... आणि चार्ल्स शोभराजला पकडलं
मधुकर झेंडे सांगतात की सगळ्या अधिकाऱ्यांनी योग्य पोझिशन घेतल्यावर चार्ल्स शोभराजला पकडण्यासाठी ते पुढे सरसावले. “सगळ्यांनी पोझिशन घेतल्यावर मी उठलो. त्याला मागून जाऊन घट्ट पकडलं आणि म्हणालो चार्ल्स… तर तो हडबडला. त्याला पकडलं. त्याने बंदूक घेण्याचा प्रयत्न केला. ती अनलोड केली. आमच्या जवळ बेड्या नव्हत्या. तर बंदुकीच्या काॅर्डने त्याला बांधलं. हॉटेलवाल्याला म्हटलं की तुझ्याकडे काही सुतळ्या वगैरे असतील तर दे. शोभराजला पूर्ण बांधलं.
आमच्या कारच्या मागच्या सीटवर बसवलं. त्याच्याकडे डबा दिला. त्याला सांगितलं की काय सू वगैरे करायची तर याच डब्यात कर. तिथून पोलिस आयुक्तांना फोन केला की शोभराजला पकडलंय. ते एकदम आनंदित झाले. आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पनवेलपर्यंत आले होते,” झेंडेंनी सांगितलं.
यानंतर झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगिरीची बातमी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये झळकली. तेव्हा दुरदर्शनवर त्यांच्या मुलाखती झाल्या. झेंडे मिश्किलपणे सांगतात की त्यांना फार प्रसिद्धी मिळाली.
पण शोभराजला गोव्याहून मुंबईला आणतानाच्या बारा- चौदा तासांच्या प्रवासात शोभराज फार कुणाशी बोलला नाही. तुम्ही तुमचं काम केलंत. पण आता मला पकडल्याने तुम्ही फार प्रसिद्ध व्हाल असं तो झेंडेंना म्हणाल्याचं, झेंडेंनी सांगितलं.
“शोभराज हा अतिशय ब्रॅश माणूस आहे. तो पोलिसांना जुमानत नाही. तो कोर्टाला मानत नाही. तो स्वत: ला फार हुशार समजतो. मी आमच्या बारा-चौदा तासांच्या प्रवासात जेव्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला की तुम्ही तुमचं काम केलंय. mind your own business. I will mind my business. तो अतिशय निर्घृण माणूस आहे,” असं झेंडेंनी सांगितलं.
राजीव गांधींनी भेटीसाठी गाडी थांबवली
झेंडे चित्रपटाच्या निमित्ताने घेतलेल्या एका मुलाखतीत नुकतीच स्वतः झेंडे यांनी एक आठवण सांगितली होती.
राजीव गांधी पंतप्रधान असतान मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी स्वतः झेंडे यांना भेटण्यासाठी गाडी थांबवली होती. पण सुरक्षेच्या कारणामुळं तिथं भेट झाली नाही.
त्यानंतर राजीव गांधींनी त्यांना बोलावून घेत त्यांचं विशेष कौतुक केलं होतं.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पकडल्यामुळं टाईम्स मॅगझिनमध्येही त्यांचं नाव झळकलं होतं, असंही या मुलाखतीत मनोज वाजपेयींनी झेंडे यांच्याबाबत सांगितलं.
गोव्यात पकडला गेल्यानंतर शोभराजवर पुन्हा खटला चालला आणि त्याची शिक्षा वाढवली गेली. 1997 मध्ये जेव्हा त्याची सुटका झाली, तेव्हा बँकॉकमध्ये त्याच्यावर खटला चालविण्याची कालमर्यादा संपली होती.
भारताने 1997 मध्ये त्याचं फ्रान्सकडे प्रत्यार्पण केलं. 2003 साली चार्ल्स शोभराज नेपाळमध्ये परतला. यावेळेस तो अधिकच निर्धास्त होऊन आला होता. त्याने तिथे माध्यमांशी संवादही साधला.
खरंतर त्याने काठमांडूला येणं हा आश्चर्यकारक निर्णय होता. कारण नेपाळ हा एकमेव देश होता जिथे तो अजूनही वाँटेड होता.
नेपाळ पोलिसांनी त्याला काठमांडूमधल्या एका कसिनोमधून अटक केली.2004 साली त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.
21 डिसेंबर 2022 रोजी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सीरियल किलर चार्ल्स शोभराज याची सुटका करण्याचे आदेश दिले.
त्याचं वय आणि त्याला असलेल्या शारीरिक व्याधींचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं बीबीसी नेपाळीने म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)