जेव्हा आपल्याच अपत्याच्या लिंगबदलासाठी आईनं दागिने विकले, माय'लेकी'च्या संघर्षाची गोष्ट

- Author, मेघा मोहन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
लिंगभेद हा मानवी समाजाला असलेला एक शाप आहे. पुरुषी वर्चस्वाच्या वातावरणात जिथे महिलांनाच समानतेसाठी मोठा संघर्ष करावा लागतो, तिथे ट्रान्सजेंडर समुदायाची काय स्थिती असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. किंबहुना त्यांचं अस्तित्वच समाजाला मान्य नसतं.
त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठीसुद्धा ट्रान्सजेंडर लोकांना प्रचंड संघर्ष करावा लागतो.
श्रीजा या ट्रान्सजेंडर महिलेचं आयुष्य, करावा लागलेला संघर्ष आणि ट्रान्सजेंडर समुदायाची स्थिती याबद्दल जाणून घेऊया.
न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर, 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये कायदेशीररित्या विवाह करणाऱ्या श्रीजा या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरल्या.
'अम्माज प्राईड' या माहितीपटात, विवाहासाठी सरकारची मान्यता मिळवण्यासाठी श्रीजानं केलेल्या संघर्षाची आणि तिची आई, वल्ली यांनी तिला दिलेल्या ठाम पाठिंब्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"श्रीजा ही एक भेट आहे," असं सांगताना श्रीजाच्या आई म्हणजे 45 वर्षांच्या वल्ली यांनी त्यांच्या मुलीला मिठी मारली.
"मला माहिती आहे की, माझ्याकडे जे आहे, ते सर्व ट्रान्सजेंडर लोकांकडे नसतं," असं 25 वर्षांच्या श्रीजा सांगतात. त्या तामिळनाडूच्या थूथुकुडी या बंदरावरील शहरात राहतात.


"माझं शिक्षण, माझी नोकरी, माझा विवाह - सर्वकाही आईच्या पाठिंब्यामुळेच शक्य झालं," असं त्या पुढे म्हणतात.
'अम्माज प्राईड' (आईचा अभिमान) या माहितीपटात श्रीजा आणि त्यांच्या आईनं पहिल्यांदाच त्यांची कहाणी सांगितली आहे.
तामिळनाडूत कायदेशीर विवाह करणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला म्हणून आलेल्या अनुभवांचं कथनही श्रीजा यांनी त्यात केलं आहे.
निळा टी-शर्ट घातलेला, एक 29 वर्षांचा भारतीय पुरुष एका 25 वर्षांच्या भारतीय महिलेबरोबर उभा आहे. त्या महिलेनं काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
दक्षिण आशियातील हा एक पारंपरिक पोशाख आहे. महिलेनं केस मागच्या बाजूला वळवलेले आहेत. तर महिलेच्या अंगावर भारतीय दागिने आहेत.
ट्रान्सजेंडर महिला आणि बिगर ट्रान्स पुरुष यांचा तामिळनाडूतील पहिला कायदेशीर नोंदणी झालेला विवाह हा अम्माज प्राईड या माहितीपटाचा विषय आहे.
'लेकीच्या पाठिशी नेहमीच उभी राहीन'
श्रीजा आणि त्यांचे पती अरुण या दोघांची भेट पहिल्यांदा 2017 मध्ये एका मंदिरात झाली होती. त्या दोघांचे काही कॉमन फ्रेंड होते. भेटीनंतर त्यांच्यात मेसेजद्वारे गप्पा सुरू झाल्या.
श्रीजा यांची एक ट्रान्सजेंडर म्हणून ओळख आधीच सर्वांसमोर आली होती. तसंच त्यांचं संक्रमणदेखील सुरू झालं होतं.
"आम्ही खूप गप्पा मारायचो. एक ट्रान्स वुमन म्हणून तिनं तिचे अनुभव मला सांगितले," असं 29 वर्षांच्या अरुण यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Chithra Jeyaram/ BBC
काही महिन्यांतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य एकमेकांच्या साथीनं जगण्याचं ठरवलं.
मात्र, 2018 मध्ये त्यांनी केलेल्या विवाहाची नोंदणी करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश आलं नाही. 1955 हिंदू विवाह कायद्यानं विवाहाची व्याख्या वधू आणि वर यांच्या मिलनाशी केलेली आहे.
त्यामुळेच ट्रान्स वुमनना त्यातून वगळण्यात आलं आहे, अशा स्वरुपाचा युक्तिवाद करत त्यावेळी रजिस्ट्रारनं त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यास नकार दिला होता.
मात्र एलजीबीटी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानं या जोडप्यानं नेटानं त्यांचं नात सर्वांसमोर आणलं. त्यांची बाजू मांडली. त्यातून त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.
कायदेशीर आणि सामाजिक संघर्ष
2019 मध्ये मद्रास उच्च न्यायालयानं त्यांचा विवाहाचा अधिकार योग्य ठरवल्यानंतर या जोडप्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली.
निकालात न्यायालयानं, ट्रान्सजेंडर लोकांना 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार "वधू" किंवा "वर" म्हणून ओळखलं जावं असं सांगितलं.
एलजीबीटी कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या या निकालाकडं ट्रान्सजेंडर लोकांच्या स्वीकृतीसंदर्भातील भारतातलं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं. सांस्कृतिक बाबींना, रुढींना आव्हान दिल्यानं श्रीजा आणि अरुण हे दोघेही स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झाले.
मात्र, प्रसारमाध्यमांमधून यासंदर्भात आलेल्या वृत्तांमुळे नकारात्मक चर्चाही झाली.
"ज्या दिवशी स्थानिक पातळीवर बातम्या आल्या, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं," असं अरुण म्हणतात. ते वाहतूक क्षेत्रात मजुरीचं काम करायचे. त्यांना वाटतं की, हे ट्रान्सफोबियामुळे झालं.
त्यानंतर ऑनलाईन ट्रोलिंग सुरू झालं.
"ट्रान्सजेंडर महिलेशी विवाह केला म्हणून माझ्यावर टीका करत लोकांनी मला अपमानास्पद मेसेज पाठवले," असं अरुण म्हणतात.
या सर्व तणावामुळे हे जोडपं काही काळ वेगळं झालं.
मात्र, असं असूनही, श्रीजा यांनी त्यांचं शिक्षण उत्तमरित्या सुरू ठेवलं. त्या अभ्यासात हुशार होत्या. हायस्कूलमध्ये त्या वर्गात नेहमी पहिल्या येत असत.

फोटो स्रोत, Arun Kumar / BBC
त्यांनी तामिळनाडूतील एका विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या काही मोजक्याच लोकांपैकी एक त्या होत्या.
श्रीजाच्या आई, वल्ली यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच शाळा सोडली होती. त्यामुळे श्रीजाचं उच्च शिक्षण घेणं ही त्यांच्यासाठी एक अभिमानाची बाब ठरली.
सरकारकडून त्यांच्या विवाहाला मान्यता मिळावी यासाठीचा संघर्ष करण्याआधीच, श्रीजा आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून विरोध आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागला.
वयाच्या 17 व्या वर्षी ट्रान्सजेंडर ही ओळख जगासमोर आल्यानंतर श्रीजा, त्यांची आई आणि त्यांचा लहान भाऊ, चिना यांना घरमालकानं घराबाहेर काढलं.
कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं. मात्र श्रीजा यांच्या आई आणि भाऊ त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे होते.
"मी नेहमीच माझ्या मुलीच्या पाठिशी उभी राहीन. सर्व ट्रान्सजेंडरना कुटुंबानं पाठिंबा दिला पाहिजे," असं असं वल्ली म्हणतात.
वल्ली यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा श्रीजा फक्त सहा वर्षांच्या होत्या. त्यानंतर वल्ली यांनी एकटीनं मुलांचं संगोपन केलं. त्या शाळेतील स्वयंपाकघरात काम करतात.
जेमतेम उत्पन्न मिळत असूनही, वल्ली यांनी मुलीच्या लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी पैशांची तजवीज केली. यासाठी त्यांनी स्वत:चे दागिने देखील विकले आणि नंतर श्रीजाची काळजीही घेतली.
"ती माझी उत्तम काळजी घेते," असं श्रीजा म्हणतात.
'मानसिकता बदललेल अशी आशा'
भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात अंदाजे जवळपास वीस लाख ट्रान्सजेंडर आहेत. ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांनी मात्र ही संख्या अधिक असल्याचा दावा केला आहे.
ट्रान्सजेंडर्सचे अधिकार आणि हिताचं संरक्षण करण्याच्या कायद्यासह भारतात ट्रान्सजेंडरर्सचा समावेश करून घेणारे कायदे मंजूर झाले आहेत. कायद्यात त्यांना "तृतीय लिंग" म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
मात्र, तरीही लोक त्यांच्याकडे हिणकसपणे किंवा टीकात्मक दृष्टीकोनातून पाहतात आणि त्यांच्याबद्दलचा भेदभावदेखील अजूनही कायम आहे.

फोटो स्रोत, Arun Kumar / BBC
भारतातील ट्रान्सजेंडर्सना मोठ्या प्रमाणात गैरर्वतन, मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तसंच त्यांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्यसेवेची देखील मर्यादित उपलब्धता असते, हे दिसून आलं आहे.
यातून त्यांना असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक ट्रान्सजेंडरना तर भीक मागण्यास किंवा सेक्स वर्कर म्हणून काम करण्यास भाग पाडलं जातं.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर ट्रान्सजेंडर्सना मोठ्या प्रमाणावर कुटुंबाकडूनच नाकारलं जातं.
"भारतात किंवा अगदी जगभरात फार थोड्या ट्रान्सजेंडर्सना कुटुंबाचा पाठिंबा मिळतो," असं शिवा क्रिश सांगतात. ते अम्माज प्राईड या माहितपटाचे दिग्दर्शक आहेत.
श्रीजा आणि वल्ली अनोखी कहाणी
श्रीजा म्हणतात की, या माहितीपटामुळे ट्रान्सजेंडर्सबद्दल समाजात असणाऱ्या अनिष्ठ रुढी, धारणांना तसंच त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये ज्याप्रकारच्या गोष्टी प्रसिद्ध होत असतात त्यांना आव्हान देण्यास मदत होईल.
"हा माहितीपट दाखवतो की. आम्ही नेतृत्वही करू शकतो. मी एक मॅनेजर आहे, एका टीमची कार्यक्षम सदस्य आहे," असं श्रीजा म्हणतात.
"जेव्हा लोक ट्रान्सजेंडर्सबद्दल अशा नवीन गोष्टी ऐकतील, तेव्हा त्यांचा ट्रान्सजेंडरबद्दलचा दृष्टीकोनदेखील बदलेल अशी आशा आहे."
आजी व्हायची इच्छा-वल्ली
अम्माज प्राईड हा माहितीपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आल्यानंतर आता भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
त्याची सुरुवातही झाली. चेन्नईमध्ये एलजीबीटी समुदायातील लोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी या माहितीपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
चेन्नईत हा माहितीपट दाखवण्यात आल्यानंतर, एक कार्यशाळा आयोजित केली गेली. त्यात छोट्या गटांमध्ये सहभागी झालेल्यांनी ट्रान्सजेंडर लोकांना त्यांच्या कुटुंबाकडून स्वीकारलं जाणं आणि त्यांना समुदायातून मिळणारा पाठिंबा या मुद्द्यांवर चर्चा केली.

"माहितीपटाच्या शोमुळे ट्रान्सजेंडर लोक, त्यांची कुटुंब आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा होईल, अशी आम्हाला आशा आहे," असं चित्रा जेयाराम म्हणतात. अम्माज प्राईड या माहितीपटाच्या निर्मितीत त्यांचाही सहभाग आहे.
ट्रान्सजेंडर्सबाबत समाजात असलेला समज आणि त्यांना मिळणारी वागणूक या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या पाठिंब्याचं महत्त्वं पाहता, विविध प्रेक्षकांसाठी याचे शो दाखवता येतील, अशी आशा अम्माज प्राईडच्या निर्मिती टीमला आहे.
भारतातील इतर शहरांमध्ये आणि नेपाळ, बांगलादेशसारख्या शेजारच्या देशांमध्येदेखील शो सादर करता येतील, असं त्यांना वाटतं.
श्रीजा आणि अरुण हे दोघेही आता खासगी कंपन्यांमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. लवकरच एक मूल दत्तक घेऊन कुटुंबाचा विस्तार करण्याची आशा ते दोघं व्यक्त करतात.
"आम्हाला एका सामान्य, सुखकारक भविष्याची आशा आहे," असं श्रीजा म्हणतात. तर "लवकरच आजी होण्याची माझी इच्छा आहे," असं वल्ली हसत सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











