IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्सचे सामने कोणकोणत्या दिवशी?

देशातील क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमियर लीग 2025 म्हणजेच आयपीएल 2025 (IPL 2025) ची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

त्यांच्या उत्साहात भर घालणारी बाब म्हणजे आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रविवारी (16 फेब्रुवारी) आयपीएलची वेळापत्रकाची माहिती दिली.

22 मार्च पासून आयपीएल 2025 ची सुरुवात होत असून KKR आणि RCB यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

आयपीएलच्या या मोसमात 65 दिवसांमध्ये एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. 25 मे ला आयपीएलचा अंतिम सामना कोलकात्यात खेळला जाणार आहे.

65 दिवसांत 74 सामने

यंदा आयपीएलचा 18 वा हंगाम असणार आहे. टी-20 क्रिकेटमधील ही सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे. 22 मार्चला कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) यांच्या सामन्यानं आयपीएल 2025 ची सुरुवात होणार आहे.

देशभरातील 13 वेगवेगळ्या ठिकाणी यंदाच्या आयपीएलचे सामने होणार आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ आयपीएलची धमाल क्रिक्रेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

या मोसमात 12 दिवसांमध्ये दररोज दोन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाचा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर रात्रीचा सामना रात्री 7:30 वाजता सुरू होणार आहे.

आयपीएलच्या वेळापत्रकानुसार 58 दिवसांच्या कालावधीत आयपीएलच्या 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळले जाणार आहेत.

साखळी सामन्यांमधील शेवटचा सामना मंगळवारी, 18 मे ला लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळला जाणार आहे.

त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये 20 मे ला पात्रता फेरीचा पहिला सामना (first qualifier) खेळला जाईल. तर बाद फेरीचा सामना (eliminator match) 21 मेला खेळला जाणार आहे. दोन्ही सामने हैदराबादमध्येच होणार आहेत.

पात्रता फेरीचा दुसरा सामना (second qualifier)23 मे ला कोलकात्यात खेळला जाणार आहे. 25 मे ला कोलकात्यातच रात्री 7:30 वाजता आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे.

मुंबई इंडियन्सचे सामने कधी आणि कोणाबरोबर

महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींना मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची उत्कंठा असणार आहे. आयपीएल-2025 मध्ये मुंबई इंडियन्स सामने कोणत्या दिवशी आणि कोणत्या संघाविरोधात आहेत ते जाणून घेऊया.

कोणाविरोधात कधी होणार मुंबई इंडियन्सचे सामने?

  • 23 मार्च - चेन्नई सुपर किंग्स - चेन्नई - रात्री 7:30
  • 29 मार्च - गुजरात टायटन्स - अहमदाबाद - रात्री 7:30
  • 31 मार्चला - कोलकाता नाईट रायडर्स - मुंबई - रात्री 7:30
  • 4 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स - लखनौ - रात्री 7:30
  • 7 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू - मुंबई - रात्री 7:30
  • 13 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली - रात्री 7:30
  • 17 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद - मुंबई - रात्री 7:30
  • 20 एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स - मुंबई - रात्री 7:30
  • 23 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद - हैदराबाद - रात्री 7:30
  • 27 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स - मुंबई - दुपारी 3:30
  • 1 मे - राजस्थान रॉयल्स - जयपूर - रात्री 7:30
  • 6 मे - गुजरात टायटन्स - मुंबई - रात्री 7:30
  • 11 मे - पंजाब किंग्स - धरमशाला - दुपारी 3:30
  • 15 मे - दिल्ली कॅपिटल्स - मुंबई - रात्री 7:30

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.