दाऊदचा विश्वासू छोटा राजन त्याच्याच जीवावर का उठला, दोघांमध्ये काय घडलं होतं?

फोटो स्रोत, Roli books
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
छोटा राजन टोळीच्या विकी मल्होत्राने 2004 मध्ये बँकॉकमधून इंदूरच्या एका मद्य व्यावसायिकाला फोन केला. त्यानं 4 कोटींची खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर अपहरणाची धमकी दिली.
व्यावसायिकाने त्वरीत इंदूर पोलिसांना कळवलं. इंदूर पोलिसांनी व्यापाऱ्याला ज्या फोन नंबरवरून धमकी मिळाली, तो नंबर मुंबई क्राइम ब्रांचकडे पाठवला. तेव्हापासून त्या फोन नंबरवर पोलिसांनी पाळत ठेवली होती.
2005 साली विकी मल्होत्रा भारतात आला असता, त्याने मुंबईत पाऊल ठेवताच जुनं सिमकार्ड सुरू केलं. याच सिमकार्ड वरून त्यानं 2004 मध्ये इंदूरच्या व्यावसायिकाला खंडणी मागत धमकावले होते.
सिमकार्ड सुरू होताच मुंबई पोलीस सावध झाले. पुढच्या विमानाने विकी दिल्लीला पोहोचताच मुंबई पोलिसांनी त्याला तिथं अटक केली. त्याच्यावर इंदूरमध्ये गुन्हा दाखल असल्यानं त्याला चौकशीसाठी इंदूरला आणण्यात आलं.
मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झालेले शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या ‘शॅकल द स्टॉर्म’ या पुस्तकात याबाबत तपशीलवार नोंदी आहेत.
विकी मल्होत्रा नावाचा उदय
शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या मते, “मी विकीसोबत कोणतीही थर्ड डिग्री पद्धत वापरली नाही. मी त्याला खायला काय आवडेल, ते विचारले. त्यानं शाकाहारी असल्याचं सांगत इडली आवडते, असंही म्हटलं.
मी त्याला दारुही ऑफर केली, पण त्याने मद्यपान करत नसल्याचं म्हटलं.
कुटुंबाला भेटायचं आहे का? विचारल्यावर त्यानं होकार दिला. मी त्याच्या पत्नी आणि मुलाला भेटायला इंदूरला बोलावले.
शैलेंद्र श्रीवास्तव लिहितात, “एक दिवस मी विकीसोबत सोफ्यावर बसून चहा पीत होतो. तेव्हा अचानक भावूक झाला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. यानंतर त्यानं त्याच्या गुन्हेगारी जीवनाबाबत आणि तो ज्या कारवायांचा भाग होता त्या सर्व ऑपरेशन्सबाबत सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.”

फोटो स्रोत, Shailendra Srivastava
विकीचं खरं नाव विजयकुमार यादव होतं, तो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हातील रहिवासी होता. लहानपणापासूनच तो लहान-सहान गुन्ह्यांत सहभागी होता. नंतर तो मुंबईत आला.
शैलेंद्र श्रीवास्तव सांगतात, विकीने एकदा दागिन्यांच्या दुकानातून हिऱ्यांची चोरी केली. त्यानंतर तो त्याच्या मित्रासह शाहरूख खानचा बाजीगर चित्रपट पाहायला गेला. या चित्रपटात शाहरुखने साकारलेल्या पात्राचं नाव विकी मल्होत्रा होतं.

फोटो स्रोत, Shailendra Srivastava
त्याच्या मित्रांनी त्याचं नाव विकी मल्होत्रा ठेवलं आणि तिथूनच तो विजयकुमारऐवजी विकी मल्होत्रा म्हणून ओळखला जाऊ लागला.
अंडरवर्ल्डमध्ये आल्यानंतर त्याची ओळख ‘नाना’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या छोटा राजनशी झाली आणि हळूहळू तो त्याचा खास बनला.


छोटा राजनची दाऊद गँगमध्ये एन्ट्री
छोटा राजनचं खरं नाव राजेंद्र निकाळजे आहे. तो चेंबूरमध्ये चित्रपटांच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री करायचा. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांची काठी हिसकावून त्यांनाच मारहाण केली होती.
1980 च्या काळात तो बडा राजन टोळीचा सदस्य बनला. अब्दुल कुंजू याने बडा राजनचा खून केल्यावर राजेंद्र निकाळजे याने सूड घेणार असल्याचं जाहीर केलं.
त्यानं कुंजूला मारण्याचे मारण्याचे प्रयत्न केले पण त्याचे सुरुवातीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र, यामुळं त्याने दाऊद इब्राहिमचे लक्ष वेधून घेतले.

फोटो स्रोत, Roli books
एस. हुसैन झैदी त्यांच्या 'डोंगरी टू दुबई - सिक्स डिकेड्स ऑफ द मुंबई माफिया' या पुस्तकात लिहितात की, “दाऊद टोळीत सामील झाल्यानंतर त्यानं क्रिकेट सामन्यादरम्यान कुंजूची हत्या केली.
कुंजू मॅच खेळत असताना अचानक त्याला पांढरी पँट आणि शर्ट घातलेले अनोळखी लोक त्याच्यासोबत क्रिकेट खेळत असल्याचे दिसले. काही कळण्याच्या आतच त्या लोकांनी कुंजूवर हल्ला चढवला.”
दाऊद गँगच्या जुन्या सदस्यांचा राग
छोटा राजन हळूहळू दाऊदच्या जवळच्या वर्तुळाचा भाग बनला. त्याचा टोळीतल्या सक्रियतेमुळं त्यानं दाऊदचंही लक्ष वेधून घेतलं. दाऊदचा त्याच्यावरील विश्वास वाढू लागला.
त्यावेळी डी कंपनीत सुमारे 5000 लोक काम करत होते. राजन यांच्यामुळं साधू शेट्टी, मोहन कोटियान, गुरू साटम, रोहित वर्मा आणि भरत नेपाळीसारखे लोकही त्याच्यासोबत सामील झाले. पण हळूहळू दाऊद टोळीतील जुन्या लोकांना राजनचा हेवा वाटू लागला.

फोटो स्रोत, X
हुसैन झैदी लिहितात की, “शरद शेट्टी, छोटा शकील आणि सुनील सावंत यांना छोटा राजन आवडत नव्हता. राजनच्या परवानगीशिवाय ते मुंबईत कोणत्याही गुन्हेगारी कारवाया करू शकत नव्हते, याचा त्यांना राग होता.
एकदा एका पार्टीदरम्यान शरद शेट्टी दाऊदला म्हणाला की, एक दिवस छोटा राजन बंड करू शकतो. या संशयानंतर हळूहळू दाऊदवर परिणाम होऊ लागला आणि छोटा राजनला महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर सारले जाऊ लागले.”
छोटा राजन आणि दाऊदमध्ये फूट
मुंबईत 1992 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने दोघांमधील दरी आणखी वाढली. मुंबई हल्ल्यापूर्वी झालेल्या बैठकांपासून दाऊदने त्याला पूर्णपणे दूर ठेवले होते, तर छोटा शकील या बैठकांना नियमित हजेरी लावत असल्याने छोटा राजनला धक्का बसला होता.
1993-94 पर्यंत दोघांमधील दरी खूप वाढली. दरम्यान, त्याचवर्षी दाऊदने त्याच्या जवळच्या लोकांना क्रूझ लाइनरवर पार्टी दिली.
हुसैन झैदी लिहितात, “पार्टीमध्ये जाण्यापूर्वी राजनला एक फोन आला. फोन करणाऱ्यानं सांगितनं की, त्या पार्टीत त्याला मारण्याची योजना आखण्यात आली होती. हे ऐकताच त्याचा चेहरा पडला.
राजनने अबूधाबीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि दुबईतून बाहेर पडण्यासाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्यानं दाऊदबद्दल सर्व माहिती देण्याची ऑफर दिली.”

फोटो स्रोत, Roli Books
“अखेर भारतीय दुतावासानं छोटा राजनला दुबईतून पळून जाण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. काही तासांतच त्याला दुसऱ्या नावानं काठमांडू आणि तिथून पुढं मलेशियाची राजधानी क्वालालंपूरला पाठवण्यात आलं.
तेव्हापासून छोटा राजनचं एकच उद्दिष्ट होतं. ते म्हणजे, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या व्यावसायिक साम्राज्याचा नायनाट करणं.”
छोटा राजनवर दाऊदच्या गुंडांचा हल्ला
दाऊद इब्राहिम दुबईहून कराचीत आला आणि छोटा राजननं बँकॉकमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दाऊद आणि त्याचे साथीदार छोटा राजनचे राहण्याचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत होते.
एके दिवशी छोटा शकीलच्या सांगण्यावरून मुन्ना झिंगडा आणि त्याच्या साथीदारांनी छोटा राजनवर त्याच्या बँकॉक येथील अपार्टमेंटमध्ये हल्ला केला. त्यांनी आधी छोटा राजनचा केअरटेकर रोहित वर्मावर गोळ्या झाडल्या आणि नंतर त्याची पत्नी संगीता, मुलगी आणि मोलकरणीला जखमी केलं.

फोटो स्रोत, Roli books
शैलेंद्र श्रीवास्तव लिहितात की, “छोटा राजन त्याच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये लपला होता. त्याने दार आतून बंद केलं होतं. मारेकऱ्यांनी बंद बेडरूमच्या दारावर गोळीबार केला. छोटा राजनने खिडकीतून खाली उडी घेतली. विकीला हा प्रकार कळताच त्यानं पोलिसांना कळवले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना राजन फ्लॅटच्या मागे एका झाडाच्या फांदीला लटकलेला दिसला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी विकी त्याच्यासोबत सावलीसारखा उपस्थित होता.”
वाढदिवसाचं निमित्त, केकच्या बहाण्याने घरात घुसखोरी
हुसैन झैदी यांनी त्यांच्या पुस्तकात या घटनेचे अधिक तपशीलवार वर्णन केले आहे. झैदी लिहितात, “काळे कपडे परिधान केलेले चार थाई लोक छोटा राजनच्या घराच्या गेटवर पोहोचले. त्यांनी सोबत वाढदिवसाचा मोठा केक आणला होता.
ते गेटवरील गार्ड्सना म्हणाले, “आज राजनचा सहकारी मायकल डिसुझा याच्या मुलीचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय मित्रांनी त्याला सरप्राइज देण्यासाठी हा केक पाठवला आहे. गार्ड काय करावे याचा विचार करत असतानाच त्यांनी गार्डच्या हातात 200 डॉलरची एक नोट ठेवली. गार्डने गेट उघडले आणि त्यांनी आपली कार आत नेली.

फोटो स्रोत, X
“गार्ड गेट बंद करणार इतक्यात चार लोकांनी अचानक गार्डवर हल्ला चढवला. यानंतर दाऊदचे गुंड राजन आणि वर्माच्या फ्लॅटकडे वळले. त्यांनी पहिल्या माळ्यावर असलेल्या राजन आणि वर्माच्या फ्लॅटचं दार ठोठावलं.”
झैदी लिहितात, “त्या लोकांना दारात पाहून केअरटेकर वर्मा थक्क झाला. राजनला सावध करण्याआधीच त्यांनी केअरटेकर वर्माची हत्या केली. राजन कुठेही न दिसल्यानं त्यांनी बंद बेडरूमच्या दरवाजातून गोळीबार केला. एक गोळी दरवाजाला छेदून छोटा राजनच्या पोटाला लागली. त्याच रक्तबंबाळ अवस्थेत राजनने खिडकीतून खाली उडी मारली आणि दाट झाडीत लपून बसला. ही संपूर्ण घटना पाच मिनिटांत घडली.”
छोटा राजनचं रुग्णालयातून पलायन
छोटा राजनला विजय दमन या खोट्या नावानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु बँकॉकमध्ये त्याची हत्या झाल्याच्या अफवा पसरू लागल्या.
यातच, छोटा राजनवर बँकॉकमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती भारतीय यंत्रणांना मिळाली. त्यांनी राजनच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले आणि सीबीआयच्या पथकानं थायलंडला जाण्याची तयारी केली.
दरम्यान, विकी मल्होत्राने छोटा राजनला रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांशी सूत जुळवून प्रयत्न सुरू केले.

फोटो स्रोत, Getty Images
शैलेंद्र श्रीवास्तव लिहितात, “दरम्यान, विकी भारतात आला आणि छोटा राजनचा पुतळा तयार करून एका मोठ्या सुटकेसमध्ये भरून बँकॉकला घेऊन गेला. विकीने मला सांगितले की, तो दोनदा भारतात आला होता.
पहिल्यांदा तो राजनच्या पुतळ्याचा वरचा भाग घेऊन बँकॉकला गेला आणि दुसऱ्यांदा उर्वरित भाग घेऊन बँकॉकला पोहोचला. त्याने एक मोठी दोरीही विकत घेतली. त्यानंतर पुतळ्याचे दोन्ही भाग जोडून पुतळ्याला छोटा राजनच्या पलंगावर चादरीने झाकून ठेवले.
तर, राजन दोरीच्या साहाय्याने खिडकीतून बाहेर पडला आणि सीबीआय पथकाला रिकाम्या हाताने भारतात परतावं लागलं.”
दाऊदवर कब्रस्तानात हल्ला करण्याची योजना
यानंतर छोटा राजननंही दाऊदचा सूड घेण्याची योजना आखली. दाऊदच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दाऊदला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मिशनसाठी विकी नेपाळी पासपोर्टवर काठमांडूहून कराचीला गेला होता.
शैलेंद्र श्रीवास्तव म्हणतात, “विकीने कराचीतच एका तस्कराकडून दोन एके 47 रायफल खरेदी केल्या.
दाऊद मुलीला दफन करण्यासाठी स्मशानभूमीत येईल तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्याची योजना विकीने आखली. पण, आयएसआयच्या हेरांनी तस्कराला पकडले.
त्या तस्करानं दोन नेपाळी पोरांना दोन एके-47 विकल्याचं कबूल केलं.”

फोटो स्रोत, Getty Images
“हल्ल्याची माहिती आधीच मिळाल्याने दाऊद सतर्क झाला आणि स्मशानभूमीतही गेला नाही. विकी आणि त्याचा साथीदार स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा संपूर्ण परिसराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे त्यांना दिसले.
मात्र, त्यांना दाऊद कुठेच आढळून आला नाही. दोघांनी आपली शस्त्रं तिथेच टाकून दिली आणि कसंबसं बलुचिस्तानमार्गे अफगाणिस्तानात पोहोचले.
दाऊदवर दुबईत हल्ल्याचा आणखी एक प्रयत्न
दाऊदला मारण्याच्या आणखी एका प्रयत्नाबाबत सांगताना शैलेंद्र श्रीवास्तव म्हणतात की, “यावेळी विकी आणि त्याचा साथीदार बांगलादेशी पासपोर्ट वापरून नेपाळला पोहोचले आणि तिथून दोघंही कराचीला गेले.
तिथं त्यांनी दोन एके-47 रायफल आणि दोन पिस्तूल खरेदी केल्या. त्यांनी दोन एलईडी टीव्ही सेटही विकत घेतले आणि या सेटमध्ये शस्त्रं लपवून ठेवली.
विकीनं 60 कोटी रुपयांची एक नौकाही खरेदी केली आणि तो समुद्रमार्गे दुबईला रवाना झाला. त्याच्यासोबत तो टीव्ही सेटही होता ज्यात रायफल आणि पिस्तूल ठेवले होते. त्याने इंडिया क्लबसमोरील 56 मजली इमारतीत एक फ्लॅट भाड्यानं घेतला."

फोटो स्रोत, Shailendra Srivastava
विकी आणि त्याचा साथीदार दाऊदची वाट पाहत त्या फ्लॅटमध्ये राहू लागले. परंतु, दाऊद अनेक महिने इंडिया क्लबमध्ये आला नव्हता. दरम्यान, दुबई पोलिसांना विकी आणि त्याच्या साथीदारावर संशय आला. त्यांनी फ्लॅटची झडती घेतली मात्र कोणतंही आक्षेपार्ह साहित्य त्यांना सापडलं नाही.
श्रीवास्तव लिहितात, “पण, विकीला तो दुबई पोलीस आणि दाऊदच्या रडारवर असल्याचा अंदाज आला होता. एक दिवस त्यानं टीव्हीमध्ये लपवलेली शस्त्रं काढून इंडिया क्लबवर हल्ला केला. 19 जानेवारी 2003 रोजी घडलेल्या या घटनेत त्यानं ‘डॅनी’ म्हणून ओळखल्या जाणारा दाऊदचा साथीदार शरद शेट्टीची हत्या केली.”
दाऊदने कराचीत मांडले बस्तान
शैलेंद्र श्रीवास्तव लिहितात की, “विकी सांगितल्याप्रमाणे, दाऊदने आतापर्यंत किमान 13 नावं वापरली आहेत. त्याच्याकडे अनेक देशांचे पासपोर्ट आहेत. त्यात दोन पाकिस्तानचे, एक संयुक्त अरब अमिरातचा आणि एक येमेनचा आहे.
त्याच्या कुटुंबात पत्नी महजबीन शेख, मुलगा मोईन नवाज आणि दोन मुली माहरुख आणि मेहरीन आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
“त्याची तिसरी मुलगी मारिया हिचा 1998 मध्ये मृत्यू झाला. तर, माहरुखचा विवाह क्रिकेटर जावेद मियांदादचा मुलगा जुनैदशी झाला असून दुसरी मुलगी मेहरीनचा विवाह पाकिस्तानी-अमेरिकन नागरिक अयुबशी झाला आहे.”
छोटा राजन तिहारमध्ये
इंटरपोलने छोटा राजनविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 2015 मध्ये त्याला इंडोनेशियन पोलिसांनी बाली येथून अटक केली होती. भारतीय पोलिसांनी त्याला दिल्लीला आणलं तेव्हापासून तो तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
त्याच्यावर विविध गुन्ह्यांअंतर्गत 70 गुन्हे दाखल आहेत. त्याला 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2024 मध्ये त्याला आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
शैलेंद्र श्रीवास्तव लिहितात की, “2005 मध्ये छोटा राजन दाऊद इब्राहिमच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याला आणि त्याचा सहकारी फरीद तनाशाला दिल्लीत अटक करण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरो आणि मुंबई क्राइम ब्रँच यांच्यातील वादादरम्यान राजन गजाआड झाला.

फोटो स्रोत, Roli Books
याचा संदर्भ देत पोलिस महासंचालक पदावरून निवृत्त झालेल्या मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “विकीला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विकीला सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण मी त्याला सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला.”
तर श्रीवास्तव म्हणतात, “विकीला अटक करून दिल्लीहून मुंबईत आणण्यात आलं. मात्र, 2010 मध्ये जामीनावर सुटल्यावर तो पळून गेला. तो सध्या दक्षिण आफ्रिकेत असून छोटा राजनचा व्यवसाय पाहत आहे. त्यात हिऱ्यांच्या तस्करीचाही समावेश आहे, असंही सांगितलं जातं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











