You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिव्या देशमुखची जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी, तिच्या यशामागची गोष्ट काय आहे?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठी
नागपूरच्या दिव्या देशमुखने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चीनच्या हौ यिफानचा जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत पराभव करून मोठी कामगिरी केली.
गुरुवारी 19 जून रोजी लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमधील दुसऱ्या टप्प्यात दिव्याने हौ यिफानला पराभूत केलं.
तर ज्युनियर गटातील क्रमांक एक असलेल्या दिव्याने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत तीन पदकं जिंकली आहेत. दिव्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देशभरातून तिचं कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिचं अभिनंदन करत तिच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, या यशातून दिव्या देशमुखची जिद्द आणि दृढनिश्चय दिसून येतो. तिची ही कामगिरी भविष्यात अनेक बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल.
2024मध्ये ऑलिम्पियाडमधील महिलांच्या स्पर्धेत सर्व 11 डाव खेळलेली दिव्या ही एकमेव भारतीय आहे.
पण, ही दिव्या देशमुख नेमकी कोण आहे? तिच्या प्रवासावर नजर टाकूया.
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची असून तिचा जन्म 9 डिसेंबर 2005 ला झाला. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हल लाईन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.
सध्या ती 18 वर्षांची असून इतक्या कमी वयात तिनं जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे. दिव्या देशमुख ही आंतरराष्ट्रीय मास्टर असून गेल्या ऑगस्ट महिन्यात जुनिअर खेळाडूंमध्ये मुलींमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. त्यावेळी तिची रेटींग 2472 झाली होती.
दिव्याला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2018 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2013 मध्ये महिला FIDE म्हणजेच International Chess Federationकडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली आहे.
पण, दिव्याला बुद्धिबळ खेळायची आवड नेमकी कशी निर्माण झाली? याबद्दल दिव्याची आई नम्रता देशमुख यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
नम्रता सांगतात, "दिव्या पाच वर्षांची होती तेव्हापासूनच बुद्धिबळ खेळतेय. पण, तिला सवय लावणं हे काही सोप्पं काम नव्हतं. दिव्याची मोठी बहिण बॅडमिंटन खेळायला जायची. त्यामुळे दिव्याही बॅडमिंटन खेळायचा प्रयत्न करायची. पण, रॅकेट तिच्यापेक्षा मोठं होतं. तिला ते सांभाळायचं नाही. त्यामुळे तिथेच जवळपास असलेल्या बुद्धिबळ अकदामीत दिव्याला प्रवेश दिला.
"बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. त्यामुळे अगदी लहान वयात तिला हा खेळ खेळण्यासाठी खूप प्रोत्साहित करावं लागलं. पण, तिला हळूहळू सवय लागली आणि आता ती जागतिक स्तरावर पोहोचली त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो."
'खेळापेक्षा कपड्यांकडे लक्ष दिलं जातं'
दिव्यानं काही महिन्यांपूर्वीच खेळात तिला आलेला अनुभव सांगितला होता. तिनं नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. यात तिनं प्रेक्षकांकडून तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल लिहिलं होतं.
प्रेक्षक आमचा खेळ गांभीर्यानं घेत नसून महिला खेळाडूंच्या बाबतीत प्रेक्षक कसे वागतात हे तिनं सांगितलं होतं. तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "पुरुष खेळाडू खेळतात तेव्हा त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं काम प्रेक्षक करत होते. पण, महिला खेळाडू खेळत होते तेव्हा बहुतांश प्रेक्षक मी कशी दिसते? मी कपडे कोणते घातले आहेत? मी केस बांधले आहेत का? मी कशी वावरते? याची चर्चा करत होते."
तिनं पुढे म्हटलं, "मी बुद्धिबळ कशी खेळत होते यासोबत त्या प्रेक्षकांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी जेव्हा मुलाखत देत होते तेव्हाही मी पाहिलं की लोक माझ्या खेळाबद्दल जाणून न घेता माझ्या शरीराकडे, माझ्या कपड्यांकडे, केसांकडे पाहत होते.
"मी खेळ कसा खेळले आणि मला काय अडचणी आल्या हे जाणून घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती."
या पोस्टची चर्चा झाल्यानंतर तिनं ती इंस्टाग्रामवरून हटवली होती.
दिव्या देशमुखसोबतच भारतीय महिला संघात आणखी काही खेळाडू होत्या. त्यांच्याबद्दलही थोडक्यात जाणून घेऊयात.
1) हरिका द्रोणावली ही गुंटूरची असून तिला FIDE ची ग्रँडमास्टर खिताब 2011 मध्ये मिळाला होती. त्याआधी 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, 2004 मध्ये महिला ग्रँडमास्टर, 2003 मध्ये महिला FIDE मास्टर खिताब मिळाला. सध्या तिची रेटींग 2502 आहे.
2) वंतिका अग्रवाल दिल्लीची असून सध्या ती 21 वर्षांची आहे. तिला 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला खिताब, 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर खिताब आणि 2017 मध्ये महिला आंतरराष्ट्री मास्टर खिताब मिळाला होता.
3) आर. वैशाली ही बुद्धिबळपटू, भारतीय ग्रँड मास्टर आर. प्रगनानंदची मोठी बहीण असून ती तामिळनाडूची आहे. 2023 मध्ये तिला ग्रँडमास्टर खिताब मिळाला होता. दोन्ही बहिण-भावांना ग्रँडमास्टर खिताब मिळवणारी ही जगातली पहिली जोडी ठली होती. तिला वर्ल्ड अंडर 14 गर्ल्समध्ये सुवर्णपदक देखी मिळालं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.