'तेजस' अपघाताबाबत दुबईच्या माध्यमांमध्ये काय म्हटलं जात आहे? प्रत्यक्षदर्शींनी घटनेबद्दल काय सांगितलं?

फोटो स्रोत, Giuseppe CACACE / AFP via Getty Images
दुबईमध्ये आयोजित एअर शोमध्ये 21 नोव्हेंबरला भारताचे तेजस विमान कोसळून अपघात झाला. याची माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली. या अपघातात पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला.
दुबईतून प्रकाशित होणाऱ्या इंग्रजी दैनिक गल्फ न्यूजने त्यांच्या वेबसाइटवर तेजस अपघातासंबंधी अनेक रिपोर्ट प्रसिद्ध केले आहेत.
यातील एका वृत्तात गल्फ न्यूजने म्हटलं की, भारताने तेजसच्या ऑइल लीकच्या दाव्यांना फेटाळलं असून ते दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.
तर, पीआयबीच्या फॅक्ट चेक सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली. त्या पोस्टमध्ये म्हटलं, "विविध प्रॉपगंडा अकाउंट्सकडून एक व्हीडिओ शेअर केला जात आहे. हा व्हीडिओ दुबई एअर शोमधील असल्याचा दावा करत विमानातून तेल गळती होत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हे दावे पूर्णपणे खोटे आहेत."
दुबईच्या अमरात अल-यूम या न्यूज वेबसाइटने प्रकाशित केलेल्या बातमीत, दुबई विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष शेख अहमद बिन सईद अल-मकतूम यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. तसेच पायलटच्या कुटुंबियांप्रति आणि सहकाऱ्यांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?
गल्फ न्यूजच्या अन्य एका वृत्तात म्हटलं, "जेव्हा तेजस विमान अपघातग्रस्त झाले, तेव्हा आमचा एक रिपोर्टर तेथे उपस्थित होता. विमान खाली कोसळताच सर्वत्र धुराचे लोट पसरले. काही क्षणांतच आपत्कालीन पथकं घटनास्थळी दाखल झाली."
या वृत्तात पुढे दिलेल्या माहितीनुसार, "एअर शो पाहण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती. दुपारी दीडच्या सुमारास भारताच्या सूर्य किरण टीमने भारत–यूएई संबंधांचा उत्सव साजरा करणाऱ्या फॉर्मेशनने आकाश उजळून टाकलं. उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या वाजवत वातावरणातला उत्साह वाढवला. शेकडो लोकांनी त्यांचे मोबाईल फोन बाहेर काढत व्हीडिओ रेकॉर्डिंग करत क्षण टिपले."
गल्फ न्यूजच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार, "काही मिनिटांनी F-35 च्या आवाजाने गर्दीचे लक्ष वेधून घेतले. जवळपास 2.10 च्या सुमारास आणखी एक जेट दिसला, एव्हिएशन पत्रकारांनी लगेच भारताचे तेजस विमान म्हणून त्याची ओळख पटवली."

फोटो स्रोत, @Suryakiran_IAF
त्यावेळी एअर शोदरम्यान तेथे उपस्थित असलेले गल्फ न्यूजचे एक पत्रकार सांगतात, "प्रदर्शन सुरू झाल्यानंतर सुमारे 3 मिनिटांनी विमान वेगाने वर गेलं. पण चढाईदरम्यान त्याची शक्ती अचानक कमी झाल्यासारखी वाटली आणि अचानक ते वेगाने खाली येऊन प्रेक्षकांसमोरच खुल्या मैदानात कोसळलं."
"या अपघाताचा आवाज इतका जोरदार होता की, कान बधिर झाले. मी क्षणभर थबकलो, काय घडलं काहीच कळालं नाही. मी अजूनही फोनवर रेकॉर्ड करत होतो, पण माझ्या आजूबाजूला गोंधळ उडाला होता."
त्यांनी सांगितलं की, त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका फिलिपिनो प्रेक्षकाने घाबरत म्हटलं, "ओ माय गॉड… मला आशा आहे की पायलट ठीक असेल."
गल्फ न्यूजच्या या वृत्तानुसार , "इतर लोकांनीही त्या क्षणाचं वर्णन केलं. भारतीय प्रवासी शाजुद्दीन जब्बार आपल्या पत्नी शाइनी आणि मुलगी अॅशलेसोबत एअर शो पाहत होते. त्यांनी सांगितलं की ही दुर्घटना काही सेकंदांतच घडली."
प्रत्यक्षदर्शी शाहद अल-नक्बी म्हणाले, "आम्ही एअर शो पाहत होतो इतक्यात अचानक धुराचे लोट उठले आणि मोठा आवाज झाला. लोक घाबरून पळू लागले. मग रुग्णवाहिका आली. ही घटना घडण्याआधी अतिशय सुंदर शो सुरू होता. पायलटला वाचवता आलं नाही हे खूप दुर्दैवी आहे. आपल्या डोळ्यांदेखत एखाद्याचा मृत्यू होणं हृदयद्रावक आहे."

फोटो स्रोत, @SukhuSukhvinder
8 वर्षांपासून दुबईमध्ये राहणारे हाफिज फैसल मदनी यांनी गल्फ न्यूजला सांगितलं, "ही अतिशय दु:खद आणि अनपेक्षित घटना होती. हा माझा पहिला एअर शो होता. मी माझा भाऊ मोहम्मद उस्मानसोबत हा एरियल शो पाहायला आलो होतो. आम्ही आत प्रवेश करतानाच अचानक एक जेट खाली पडताना दिसलं. ते 'तेजस विमान' असल्याचं नंतर कळालं. अपघातातून पायलट वाचू शकले नाहीत, हे माहीत झाल्यानंतर खूप वाईट वाटलं."
"ही दुर्घटना घडली तेव्हा एअर शो पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये यूकेचे विल गिलमोर देखील होते," असे यूएईच्या सरकारी वृत्तपत्र द नॅशनल न्यूज ने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
विल गिलमोर या वृत्तपत्राला माहिती देताना म्हणाले, "त्यावेळी मी म्हटलं होतं की, विमान जमिनीच्या खूप जवळ आहे आणि त्याच्याकडे उड्डाण घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही असं दिसत होतं. मी कोणालाही बाहेर काढताना किंवा असं काहीही पाहिलं नाही. हे सगळं अगदी क्षणार्धात घडलं."
गिलमोर पुढे म्हणाले, "मी एका तंबूच्या मागे होतो, त्यामुळे विमान जमिनीवर कोसळलं तो क्षण अस्पष्ट आहे. आम्हाला फक्त धुराचे लोट दिसले. अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली आणि लगेचच सायरनचा आवाजही कानावर पडू लागला. उत्साहातून थेट दु:खात, क्षणार्धात परिस्थिती बदलली."
तज्ज्ञ काय म्हणतात?
दुबईतून प्रकाशित होणाऱ्या खलीज टाइम्सने लंडनस्थित स्ट्रॅटेजिक एअर रिसर्चचे मुख्य विश्लेषक साज अहमद यांच्याशी याबाबत चर्चा केली.
ते म्हणाले, "ज्या प्रकारचा स्टंट केला जात होता, तो जमिनीपासून अतिशय कमी उंचीवर होता. पायलटकडे लूप पूर्ण करून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे विमान कोसळलं आणि पायलटचा मृत्यू झाला."
ते पुढे म्हणाले, "तपास अजून प्राथमिक टप्प्यात आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे ही घटना अनेक कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झाली."

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या एका वृत्तात खलीज टाइम्सने लिहिलं, "नमांश स्याल हे सुलूर एअर बेसवरील 45 स्क्वाड्रन 'फ्लाइंग डॅगर्स'चे अत्यंत कुशल डिस्प्ले पायलट होते. एअरो इंडिया आणि अनेक राष्ट्रीय एअरशोमध्ये त्यांनी आपल्या अप्रतिम उड्डाण कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती."
पुढे लिहिलं आहे की, "नमांश परदेशी इंजिनने सुसज्ज असलेले भारताचे स्वदेशी हलके लढाऊ विमान (LCA) HAL तेजस उडवत होते.
हा अपघात 'तेजस'चा दुसरा अपघात असून आंतरराष्ट्रीय एअर शोमधील पहिलीच जीवघेणी घटना आहे."
याआधी गेल्यावर्षी मार्चमध्ये एक तेजस विमान कोसळलं होतं. ते पहिल्या पिढीतल्या 40 LCA विमानांपैकी एक होतं. आणि अपघातापूर्वी विमानाचा एकमेव पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला होता.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











