तेजस विमान अपघातात मृत्यू झालेले कॅप्टन नमांश स्याल यांना पत्नीनं दिला अंतिम निरोप

फोटो स्रोत, ANI
दुबईमध्ये तेजस विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश स्याल यांच्या पार्थिवाववर रविवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील त्यांच्या पतियाळकर या गावात त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सकाळपासूनच लोकांची गर्दी होती.
नमांश स्याल यांच्या पत्नी विंग कमांडर अफशां स्याल यांनी वायुसेनेचा गणवेश परिधान करून अंत्ययात्रेत सहभाग घेतला. त्यांनी पतीला लष्करी सन्मानासह अंतिम सलामी दिली .
मूळ गावी पोहोचण्यापूर्वी, विंग कमांडर नमांश यांचं पार्थिव कोइम्बतूरमधील सुलूर हवाई तळावर आणण्यात आलं होतं.
तिथं भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास वायुसेनेच्या विशेष विमानानं पार्थिव कांगडा विमानतळावर आणलं.

फोटो स्रोत, Getty Images/@SukhuSukhvinder
संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित दुबई एअर शोमध्ये शुक्रवारी (21 नोव्हेंबर) उड्डाण प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय बनावटीचं लढाऊ विमान 'तेजस' कोसळलं होतं.
या अपघातात पायलटला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला, असं हवाई दलाने सांगितलं.
वृत्तसंस्था पीटीआयने घटनेचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये एक विमान सरळ जमिनीवर कोसळताना दिसत असून मोठ्या प्रमाणात आग आणि धुराचे काळे लोट उठताना दिसत आहेत.
पीटीआयच्या माहितीनुसार, ''हे विमान 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास कोसळले.''
वृत्तसंस्था एपीनुसार, ''हे प्रात्यक्षिक दुबईतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ असलेल्या अल-मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित करण्यात आलं आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा विमानतळावर धुराचे मोठे लोट दिसले आणि सायरनचा आवाज कानावर पडू लागला.''

फोटो स्रोत, Getty Images
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं, ''दुबई एअर शोमध्ये हवाई प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय हवाई दलाच्या एका धाडसी पायलटचे निधन झाल्याची बातमी अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. या कठीण प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे.''
भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल चौहान आणि भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकाऱ्यांनी तेजस विमान दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या संरक्षण मंत्रालयानं या घटनेवर निवेदन जारी केलं. मंत्रालयाने एक्सवर म्हटलं, ''दुबई एअर शोमधील उड्डाण प्रदर्शनादरम्यान भारताचे एक तेजस लढाऊ विमान कोसळले. त्यात पायलटचा मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे.''
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरचे लोकसभा खासदार आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी या घटनेवर एक्सवर दुःख व्यक्त करत लिहिलं, ''दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात वीरभूमी हिमाचलच्या कांगडा जिल्ह्याच्या नमांश स्याल जी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. कुटंबाप्रति माझ्या संवेदना.''
कोण आहेत पायलट विंग कमांडर नमांश स्याल
पायलट नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी 'एक्स'वर विंग कमांडर नमांश यांचा फोटो पोस्ट करत लिहिलं, ''दुबई एअर शोमध्ये झालेल्या तेजस विमान अपघातात हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याचा वीर पुत्र नमांश स्याल यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे.''
''देशाने एक शूर, कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी पायलट गमावला आहे. शोकाकुल कुटुंबाप्रति मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. वीर पुत्राला नमन. स्याल जी यांच्या शौर्याला, कर्तव्यनिष्ठेला आणि राष्ट्रसेवेप्रती असलेल्या समर्पणाला नमन.''

फोटो स्रोत, @SukhuSukhvinder
या अपघातावर भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं, "शुक्रवारी (21 नोव्हेंबर) दुबई एअर शोमध्ये एरोबॅटिक प्रदर्शनादरम्यान भारतीय हवाई दलाचं (IAF) तेजस विमान कोसळलं. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हे कधीही भरुन न निघणारं नुकसान आहे."
"भारतीय हवाई दल या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करते. या दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहोत. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना केली जात आहे," अशी माहिती हवाई दलाने दिली.
नमांश यांच्या वडिलांनी काय सांगितलं?
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने नमांश यांचे वडील जगन्नाथ स्याल यांच्याशी संवाद साधला.
जगन्नाथ स्याल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, ''माझं त्याच्याशी गुरुवारी (20 नोव्हेंबर) शेवटचं बोलणं झालं. त्याने मला टीव्ही किंवा युट्यूबवर त्याचा एअर शो पाहण्यास सांगितलं होतं."
''शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मी यूट्यूबवर एअर शोचा व्हीडिओ शोधत होतो. तेव्हाच मला विमान कोसळल्याची बातमी दिसली. मी ताबडतोब माझ्या सुनेला फोन केला. माझी सूनही विंग कमांडर आहे. तिला मी काय झालंय ते तपासण्यास सांगितलं. काही वेळेतच एअर फोर्सचे 6 अधिकारी आमच्या घरी आले आणि काहीतरी गंभीर घडल्याचं मला समजलं," अशी माहिती त्यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
जगन्नाथ स्याल हे शाळेत मुख्याध्यापक होते, ते आता निवृत्त झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ते आणि त्यांच्या पत्नी वीणा स्याल सध्या तामिळनाडूतील कोयंबटूरमध्ये त्यांचा मुलगा नमांश यांच्या घरी आहेत.
त्यांनी इंडियन एक्प्रेसला सांगितलं, ''दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही कांगडा येथील आमच्या गावातून कोयंबटूरला आलो. नमांश यांच्या पत्नी कोलकत्यात प्रशिक्षणात असल्यानं नातीची काळजी घेण्यासाठी ते कोयंबटूरला आहेत."
2009 मध्ये एनडीए उत्तीर्ण झाल्यानंतर नमांश स्याल डिफेंस फोर्समध्ये भरती झाले. नमांश अभ्यासातही खूप हुशार असल्याचं त्यांच्या वडिलांनी इंडियन एक्प्रेसला सांगितलं.
जगन्नाथ स्याल म्हणाले, ''एअर फोर्सचे अधिकारी आम्हाला माहिती देण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारलं की पार्थिव कधी येईल. त्यांनी निश्चित वेळ सांगितली नाही, परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवस लागतील असं त्यांनी सांगितलं.''
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथून लोकसभा खासदार आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी या घटनेवर एक्सवर दुःख व्यक्त करत म्हटलं, ''दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात वीरभूमी हिमाचलच्या कांगडा जिल्ह्याच्या नमांश स्याल जी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. कुटंबाप्रति माझ्या संवेदना.''
तेजस विमानाची वैशिष्ट्ये काय?
सिंगल इंजिन असलेले 'तेजस' हे संपूर्णतः स्वदेशी म्हणजेच भारतीय बनावटीचे लढाऊ विमान असून त्याचे उत्पादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही कंपनी करते.
हे विमान दुरूनच शत्रूच्या विमानांना लक्ष्य करू शकते आणि शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता त्यात आहे. वजनाने हलके असले, तरी त्यात सुखोईइतकीच शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
2004 पासून तेजसमध्ये अपग्रेडेड इलेक्ट्रिक इंजिनचा (F404-GE-IN20) वापर केला जात आहे. तेजस मार्क-1 व्हेरिएंटमध्ये सध्या F404 IN20 हे इंजिन वापरण्यात आले आहे. मार्क-1A व्हेरिएंटमध्येही हेच इंजिन वापरले जाणार आहे. भविष्यात तेजस मार्क-2 मध्ये अधिक शक्तिशाली जनरल इलेक्ट्रिक F414 INS6 या इंजिनचा वापर करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तेजस लढाऊ विमाने सुखोई लढाऊ विमानांपेक्षा हलकी असतात आणि 8 ते 9 टन वजन वाहून नेऊ शकतात. शिवाय, ध्वनीच्या गतीपेक्षाही जास्त म्हणजेच मॅक 1.6 ते 1.8 इतक्या वेगाने हे 52 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतात.
तेजसमध्ये काही विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जसे की अॅक्टिव इलेक्ट्रॉनिकली-स्कॅन रडार, 'बियॉन्ड विज्युअल रेंज' (BVR) मिसाइल क्षमता, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि एअर-टू-एअर रिफ्युएलिंग.
यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडसोबत 97 तेजस विमानांच्या खरेदीचा करार केला. 2027 मध्ये त्यांची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
याआधी 2021 मध्ये भारत सरकारने 83 तेजस विमानांचा करार केला होता. ते 2024 पर्यंत भारताला सोपवणं अपेक्षित होतं. परंतु, अमेरिकेतून आयात होणाऱ्या इंजिनांच्या तुटवड्यामुळे ही प्रक्रिया लांबली.
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केल्या संवेदना
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देत एक्स पोस्टमध्ये म्हटले, ''दुबई एअर शोमध्ये झालेल्या तेजस विमान अपघातात भारतीय हवाई दलाच्या धाडसी पायलटचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. त्यांच्या शौर्याचा आणि सेवेचा सन्मान करत राष्ट्र त्यांच्यासोबत उभं आहे.''

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या अपघातावर दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, ''देशाने एका शूर वायुयोद्ध्याला गमावलंय. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी तत्काळ आणि योग्य चौकशी आवश्यक आहे. आमच्या वैमानिकांचे प्राण आणि सुरक्षा सर्वांत महत्वाची आहे.''
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











