You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नांदेडचे जवान सचिन वनंजे यांनी श्रीनगरमध्ये गमावला जीव, 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीने दिला निरोप
जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक अंत्यविधीला उपस्थित होते. आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सचिन वनंजे यांच्या पत्नीने पतीला अखेरचा निरोप दिला.
6 मे रोजी जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे आठ फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील 29 वर्षीय सचिन वनंजे या जवानाचा मृत्यू झाला होता.
तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूरला आणण्यात आलं. त्यावेळी पत्नी, भाऊ आणि आई वडिलांसह उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.
तीन वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
सचिन वनंजे हे देगलूर तालुक्यातील दमलोर इथले मूळ रहिवासी होते. ते सध्या देगलूरमधील फुले नगर इथं राहत होते. 2017 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले होते.
सचिन यांची पहिली पोस्टिंग सियाचीनमध्ये होती. त्यानंतर पंजाबमधील जालंधर इथं त्यांनी सेवा बजावली.
गेल्या दीड वर्षापासून ते श्रीनगर इथं ड्युटीवर होते. त्यानंतर 6 मे रोजी सचिन यांची दुसरीकडे पोस्टिंग झाली होते.
त्यासाठी संबंधित चौकीकडं सैन्य दलाचं वाहन घेऊन जात असताना 8000 फूट खोल दरीत त्यांचं वाहन कोसळलं. या दुर्घटनेत सचिन वनंजे यांनी जीव गमावला.
सचिन वनंजे यांचा विवाह 2022 मध्ये झाला होत. सचिन यांच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ, पत्नीसह आठ महिन्यांची मुलगी आहे.
सचिन यांचे वडील यादव वनंजे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो भरती झाला तेव्हाच आम्ही मुलगा देशाला दिला, अशी आमची भावना होती.
युद्धाच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. युद्ध असो वा कोणत्याही स्थितीत सैनिक देशाचं रक्षण करायला जातात. त्यांचा मला अभिमान आहे."
मुंबईतील जवानाचाही मृत्यू
दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री उरी याठिकाणी केलेल्या हल्ल्यात मुंबई येथील जवानाचा मृत्यू झाला आहे.
मुरली श्रीराम नाईक (वय 23) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. मुरली नाईक हे घाटकोपर येथील कामराज नगर येथील रहिवासी होते. तर त्यांचं मूळ गाव आंध्र प्रदेशात होतं.
मुरली नाईक यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील उरी येथे होती. मुरली नाईक अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते.
पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत हे हल्ले सुरू होते.
या हल्ल्यांत शुक्रवारी (9 मे) पहाटे 3.30 च्या सुमारास मुरली नाईक यांचा मृत्यू झाला. मुरली नाईक यांच्या निधनाची बातमी कळताच मुंबईतील घाटकोपर परिसर शोकाकूल झाला आहे.
भारत-पाकिस्तान तणावात आजची स्थिती?
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (10 मे) पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून 'भारताच्या पायाभूत सुविधांवर हल्ले' झाल्याचे दावे 'खोटे' असल्याचं म्हटलं.
विक्रम मिस्री म्हणाले, "भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज प्रणाली, सायबर प्रणाली इत्यादींवर मोठ्या प्रमाणात हल्ला होऊन ते नष्ट झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे आहेत."
"मी सर्वांना आवाहन करतो की, पाकिस्तान सरकारकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीनं कृपया दिशाभूल होऊ देऊ नका," असंही आवाहन मिस्री यांनी केलं.
भारतानं अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता.
या आरोपांचे खंडन करताना विक्रम मिस्री म्हणाले, "भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केले आहे हा आणखी एक हास्यास्पद दावा आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)