मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आता कुठे आहेत यती नरसिंहानंद?

29 सप्टेंबरला यति नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मदांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं
फोटो कॅप्शन, 29 सप्टेंबरला यती नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मदांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं
    • Author, चंदन कुमार जजवाडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

पैगंबर मोहम्मदांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे यती नरसिंहानंद यांना पोलीस अटक करू शकलेले नाहीत किंवा ते पोलिसांच्या ताब्यात देखील नाहीत. या घटनेला आता एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे.

29 सप्टेंबरला यती नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

त्यांनी हे वक्तव्य दिल्यानंतर रस्त्यांवरील सर्वसामान्य लोकांपासून ते सोशल मीडियासह सर्वत्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

यती नरसिंहानंद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात गाझियाबाद पोलिसांबरोबरच हैदराबाद पोलिसांच्या सायबर सेलनं देखील गुन्हा नोंदवला आहे.

गाझियाबाद (ग्रामीण) चे पोलीस उपायुक्त (डीसीपी) सुरेंद्र नाथ तिवारी यांच्यानुसार यति नरसिंहानंद कुठे आहेत याची त्यांना माहिती नाही.

सुरेंद्र नाथ तिवारी यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही त्यांना अटक केलेली नाही किंवा त्यांना ताब्यात देखील घेतलेलं नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही."

यती नरसिंहानंद हे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डासना शिवशक्ती धामचे महंत आणि 'जुना आखाडा' चे महामंडलेश्वर आहेत.

'महाराज कुठे आहेत ते आम्हाला माहीत नाही'

डासना मंदिराशी संबंधित भाजपा नेत्या उदिता त्यागी यांनी बीबीसीला सांगितलं की 4 ऑक्टोबरला मंदिरात खूप गोंधळ झाला होता. त्यानंतर महाराजांना (यती नरसिंहानंद) पोलीस सोबत घेऊन गेले होते.

उदिता त्यागी म्हणाल्या, "पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं की सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते महाराजांना घेऊन जात आहेत. कारण इथे आम्हा सर्वांनाच धोका होता. मात्र आता तीन दिवस झाले तरी त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. आता ते कुठे आहेत आणि कसे आहेत याची आम्हाला चिंता वाटते आहे."

उदिता त्यागी यांचं म्हणणं आहे की यति नरसिंहानंद यांच्या शोधात पोलीस मंदिरात आले नव्हते. कारण पोलीस तर तिथे नेहमीच तैनात असतात.

त्यांनी आरोप केला आहे की 5 ऑक्टोबरला मोठ्या संख्येनं लोकांनी मंदिराला घेराव घातला होता आणि दगडफेक केली होती.

याआधी देखील आरोप करण्यात आला होता की 4 ऑक्टोबरला संतप्त जमावानं मंदिराच्या परिसराबाहेर आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

नवरात्र आणि दसऱ्या सारखे सण लक्षात घेता यति नरसिंहानंद यांच्या मूळ बुलंदशहर जिल्ह्यात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

फोटो स्रोत, Bulandshahr Police/X

फोटो कॅप्शन, नवरात्र आणि दसऱ्या सारखे सण लक्षात घेता यती नरसिंहानंद यांच्या मूळ बुलंदशहर जिल्ह्यात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

गाझियाबाद (ग्रामीण)चे पोलीस उपायुक्त सुरेंद्र नाथ तिवारी म्हणाले की 4 ऑक्टोबरला (शुक्रवारी) डासना मंदिराच्या बाहेर रस्त्यावर काही तरुण येऊन गोंधळ घालत होते.

या गोष्टीची माहिती मिळाल्यावर मंदिराच्या परिसरात असलेल्या पोलिसांनी त्यांना पळवून लावत परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्यांचं म्हणणं आहे की "मंदिराच्या परिसराच्या जवळपास पूर्ण शांतता आहे. इथे आणखी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासंदर्भात काही लोक अफवा पसरवत आहेत. अफवा पसरवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल."

यति नरसिंहानंद यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठी टीका होते आहे. राजकीय वर्तुळात देखील त्यांना अटक करण्याची आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.

आता काय परिस्थिती आहे?

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या एका वृत्तानुसार, जमीयत उलेमा-ए-हिन्द या संघटनेनं यती नरसिंहानंद यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणात फक्त एफआयआर नोंदवणं पुरेसं नाही.

याआधी जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेचं उपाध्यक्ष मलित मोतसिम खान यांनी देखील यति नरसिंहानंद यांच्या 'ईशनिंदा' वाल्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या तत्काळ अटकेची मागणी केली आहे.

मोतसिम खान, यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याबद्दल म्हणाले, "हे वक्तव्य फक्त लाखो मुस्लिमांच्या भावना दुखावणारंच नाही तर दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक करण्यात आलेलं चिथावणीखोर वक्तव्य आहे.

"स्वामी नरसिंह यांनी वारंवार केलेली अपमानास्पद वक्तव्ये सहन करण्यापलीकडची आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना त्यांना तत्काळ अटक केली पाहिजे," असं खान म्हणाले.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एआयएमआयएमनं तक्रार केल्यानंतर सायबर क्राईम पोलीस स्टेशननं यती नरसिंहानंद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे.

डासनाच्या याच मंदिरात यति नरसिंहानंद महंत आहेत (फाईल फोटो)
फोटो कॅप्शन, डासनाच्या याच मंदिरात यती नरसिंहानंद महंत आहेत (फाईल फोटो)

भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी यती नरसिंहानंदांनी केलेल्या वक्तव्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या यति नरसिंहानंद कुठे आहेत? याची माहिती पोलिसांकडेही नाही आणि डासना मंदिरशी संबंधित लोकांकडेही नाही. सोमवारी नरसिंहानंदांच्या शोधात मंदिरातील लोक गाझियाबाद पोलीस आयुक्तांना भेटण्यास गेले होते.

देशातील अनेक राज्यांमध्ये यति नरसिंहानंद यांना अटक करण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.

दरम्यान डासना मंदिराकडून ऑल्ट न्यूज चे संस्थापक मोहम्मद झुबैर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोशल मीडियावर यती नरसिंहानंदांच्या विरोधात लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप मोहम्मद झुबैर यांच्यावर करण्यात आला आहे.

अदिता त्यागी यांनी आरोप केला आहे की यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याचा एक भाग संपादित करून सोशल मीडियावर टाकण्यात आला.

याआधी कोणते वाद निर्माण झाले होते?

यति नरसिंहानंद हे वादग्रस्त धार्मिक नेते आहेत.

यति नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह वक्तव्यांशी त्यांचं जुनं नातं आहे. विशेषत: मुस्लीम समुदायाविरोधात त्यांनी अनेकवेळा चिथावणीखोर वक्तव्यं केली आहेत.

2022 मध्ये हरिद्वारमध्ये यति नरसिंहानंद यांना द्वेष पसरवणारं भाषण (हेट स्पीच) करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. हरिद्वारमध्ये त्यावेळेस 'धर्म संसद'चे आयोजन करण्यात आले होते.

त्यात यति नरसिंहानंद यांनी एक चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्याच वर्षी 17 ते 19 डिसेंबर दरम्यान धर्म संसदेच्या वेळेस हिंदुत्वासंदर्भात साधू-संतांनी केलेली वादग्रस्त भाषणं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या वादग्रस्त भाषणांवर जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामध्ये ब्रिटन आणि अमेरिका या देशांचाही समावेश होता.

त्यावेळेस बीबीसीच्या टीमनं यती नरसिंहानंद यांची मुलाखत घेताना त्यांनी धर्म संसदेत केलेल्या वक्तव्यांशी निगडित प्रश्न विचारला होता.

त्यावर नरसिंहानंद आणि त्यांचे समर्थक बीबीसीच्या टीमबरोबर हमरीतुमरीवर आले होते. त्यांनी बीबीसीच्या टीमला जबरदस्ती रोखून ठेवलं होतं.

या प्रकरणात पोलिसांनी नरसिंहानंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली होती.

'द हिंदू' या वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार 2021 मध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात यती नरसिंहानंद यांच्या विरोधात जामिया नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

त्यावेळेस आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्लाह खान यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं की महंतांनी पैगंबर मोहम्मदांविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेविरोधात डासना मंदिराच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Udita Tyagi

फोटो कॅप्शन, मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेविरोधात डासना मंदिराच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

2022 च्या सुरुवातीला यती नरसिंहानंद यांना महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात हरिद्वार पोलिसांनी अटक केली होती.

2021 मध्ये यती नरसिंहानंदांनी राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्यं केल्याबद्दल त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

गाझियाबादच्या डासना देवी मंदिरात 11 मार्च 2021 ला नळाचं पाणी प्यायल्याबद्दल आसिफ या मुस्लीम मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. इतकंच नाही तर या मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल सुद्धा करण्यात आला होता.

यती नरसिंहानंद यांनी या मुलाला मारहाण करण्यात आल्याबद्दल, खंत देखील व्यक्त केली नव्हती.

कोण आहेत यती नरसिंहानंद?

जवळपास 58 वर्षांचे यती नरसिंहानंद सरस्वती आणि वाद यांचं जुनं नातं आहे. मागील काही वर्षांपासून मुस्लीम आणि महिला यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्यं केल्याचे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आहेत.

गाझियाबादच्या डासनामधील ज्या मंदिराचे ते पुजारी आहेत, त्या परिसरात मुस्लिमांना येण्यास मनाई असल्याच्या सूचनेच्या जुन्या पाट्या देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असतात.

त्यांच्या या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांचे व्हिडिओ हजारो लोक सोशल मीडियावर पाहतात. त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या संख्येनं उजव्या विचारसरणीचे लोक दिसून येतात.

हरिद्वारमध्ये झालेल्या धर्म संसदेत करण्यात आलेल्या वक्तव्यांवर जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या (फाईल फोटो)

फोटो स्रोत, BBC/Varsha Singh

फोटो कॅप्शन, हरिद्वारमध्ये झालेल्या धर्म संसदेत करण्यात आलेल्या वक्तव्यांवर जगभरातील अनेक देशांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या (फाईल फोटो)

डासना मंदिराशी संबंधित उदिता त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारी होण्याआधी नरसिंहानंद सरस्वती एक इंजिनीअर होते. त्यांनी रशियामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि ब्रिटनसह इतर काही देशांमध्ये काम देखील केलं आहे.

त्यांचं खरं नाव दीपक त्यागी आहे. त्यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील आहे.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, भारतात परतल्यावर दीपक त्यागी समाजवादी पार्टीशी देखील जोडलेले होते.

ते जवळपास 25 वर्षांपासून डासना मंदिराशी जोडलेले आहेत. 2021 मध्ये त्यांना 'जूना आखाड्या'नं महामंडलेश्वर ही पदवी दिली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.