You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिराबाई पेडणेकर: मराठीतल्या पहिल्या महिला नाटककार, ज्यांची नाटकं केवळ 'कलावंतिणीचं घराणं' म्हणून नाकारली
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
"पुरुषानेही स्त्रीवर अव्यभिचारी, अचल प्रेम करायला हवे. स्त्रीनिष्ठा अपेक्षिणाऱ्या पुरुषांच्या दुटप्पी आणि दांभिकतेचा निषेध करावा तितका थोडाच. प्रेमाच्या साम्राज्यात स्त्री-पुरुष समान हवेत."
हे धाडसी विचार आहेत शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या हिराबाई पेडणेकर या महिलेचे. ज्या काळात मराठी रंगभूमीवर फक्त पुरुष कलांकाराचं वर्चस्व होतं, त्या काळात हिराबाईंनी नाटक लिहियचं धाडस केलं होतं.
त्या काळात स्त्रिया रंगभूमीवर काम करत नव्हत्या, पुरुषच स्त्री पात्रं रंगवत असत, अशा काळात अनेक अडचणींचा सामना करत हिराबाईंनी आपलं नाटक रंगभूमीवर उभं केलं होतं.
मात्र हे करत असताना त्यांच्या वाट्याला उपेक्षाही तितकीच आली. त्याचं कारण होतं त्यांचं एका कलावंतिणीच्या घरात जन्माला येणं.
परंतु तरीही, सगळे अडथळे पार करत, सरस्वतीची उपासना करणाऱ्या हिराबाईंनी साहित्य-नाट्य जगात स्वतःची जागा निर्माण केलीच.
बालपण आणि जडणघडण
सावंतवाडीत 22 नोव्हेंबर 1885 रोजी, शेवन्तुबाईच्या पोटी हिराचा जन्म झाला. शेवन्तुबाई आपल्या तीन बहिणी भीमाबाई, मैनाबाई आणि जिजीबाई यांच्यासोबत सावंतवाडीला राहायच्या आणि पिढीजात गायकी करायच्या. सणासुदीला पेडणे या त्यांच्या गोव्यातील गावी जायच्या.
पुढं भीमाबाई आणि मैनाबाई उपजीविकेसाठी मुंबईला आल्या, तर शेवन्तुबाई सावंतवाडीलाच राहिल्या.
त्या देवदासी होत्या. देवदासी देवळात सेवा देत, गायन-नृत्य करत, यजमानांच्या आश्रयानं राहत. देवदासी म्हणायला देवाला अर्पण केलेली स्त्री असली, तरी तिचं शारीरिक शोषण केलं जायचं.
तर अशा समाजात जन्माला आलेली हिरा जेव्हा आठ वर्षांची होती, तेव्हा तिच्या आईचं निधन झालं. म्हणून गिरगावजवळील कांदेवाडीतील गांजावाला चाळीत राहणाऱ्या आपल्या भीमा मावशीकडं हिराला यावं लागलं.
छोट्याशा हिराची जडणघडण पुढं मुंबईत मावशीच्या सहवासात, कलावंतिणींच्या वस्तीत झाली.
सावळा रंग, बोलक्या डोळ्याची हिरा शाळेत जाऊ लागली. तिथंच तिला कविता करायचा आणि त्यांना चाली लावण्याचा छंद लागला.
हिरा शाळेत जात असली तरी ती गाण्यापासून दूर जाणार नाही, याची काळजी भीमा मावशीनं घेतली होती. कारण हेच तर त्यांच्या पोटापाण्याचं साधन होतं. त्यामुळेच सातवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही हिराचं संगीत सुरू राहिलं.
शंकरराव धुळेकर बुवा, परशुरामबुवा बर्वे, भास्करबुवा बखले, बडोद्याचे फय्याज खान यांच्याकडून तिनं संगीताचे धडे घेतले.
खरंतर हिराला गाण्याची गोडी तिची खास वर्गमैत्रीण अंजनीमुळे लागली होती. अंजनी मालपेकरची आई नबुबाई प्रसिद्ध गायिका होती. अंजुला गाणं शिकवायला भेंडीबाजार घराण्याचे मोठे गायक नजीर खाँ घरी यायचे, तेव्हा हिरा तिथं असायची.
त्यामुळे तिच्याही मनात नकळतपणे गाण्याची आवड निर्माण झाली. शाळा संपल्यानंतर जसं गाणं सुरू होतं, तसंच तिचं लिखाणही सुरू होतं.
बंगाली, मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवरही तिनं प्रभुत्वं मिळवलं होतं.
नाटकाचं वेड
या कलावंतिणींकडे नाटकातील मंडळींचा वावर असायचा. कारण त्या काळी पुरुष मंडळी स्त्री पात्रं करायची. त्यामुळे स्त्रीयांचं बोलणं, चालणं, उभं राहणं, स्वभाव तसेच इतर हालचाली टिपण्यासाठी नाटककार आणि नट मंडळी कलावंतिणीच्या घरी यायची.
गोविंद बल्लाळ देवल ऊर्फ गो. ब. देवल हे सुद्धा भीमाबाईंकडे यायचे. भीमाबाईंचं गाणं त्यांना आवडत असे. हे देवल मामा हिराबाईंवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करायचे.
देवल हे किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नाटककार होते. अनेकदा त्यांच्यासोबत अन्य दिग्गज मंडळीही भीमाबाईच्या घरी यायची.
नाटक, नाट्यपदांची रचना आणि चाली याबद्दल चर्चा करायची. ही तर हिरासाठी एक प्रकारची नाटकाची शिकवणीच असायची.
शिवाय, ती कधी कधी मावशीसोबत नाटक पाहायला ही जायची. या सगळ्या वातावरणात हिरातील नाटककार घडत होती. ती छोटी छोटी नाटुकली बसवायची आणि मैत्रिणी गोळा करून त्याच्या तालमी सुद्धा करायची.
एकदा तिच्या लाडक्या देवलमामाचं 'संगीत शारदा' हे नवीन नाटक रंगमंचावर आलं होतं. वृद्ध आणि कुमारी विवाह असा विषय असलेल्या या नाटकाचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हिरा यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
आपणही असं एखादं नाटक लिहायलाच हवं असा तिनं निर्धारच केला. नाटकाची जणू नशाच तिला चढली होती आणि त्यातूनच जन्म झाला तो 'जयद्रथ विडंबन' या नाटकाचा.
पहिल्या नाटकाची गोष्ट
सिंधपुरीचा राजा जयद्रथ, द्रौपदी आणि पांडव यांच्यावरील 'जयद्रथ विडंबन' हे हिराबाईंचं पहिलं नाटक.
"पडली जेव्हा संकटी मी या, मत्प्रिय मित्र न ये या समया,
मधु जोवरी कमलातरी तोवरि, धावुनी भुंगही येती त्यावरी,
शुष्क होय जरी तेच कमल तरी, दृष्टी न फिरविती मुळीही तयावरी,
त्यापरि दिसते कृतिहि मज खरी, धिक्कार असो मित्र व्बा"
सुखाचे धनी अनेक जण होतात, पण संकटाच्या काळात कुणी कुणाचा नसतो, अशा अर्थाची ही त्यातली एक रचना आहे.
देवलमामांच्या आग्रहावरून आणि नाटक दखल घेण्यायोग्य असल्यानं श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्याविषयी रामकृष्ण रघुनाथ मोरमकर संपादक असलेल्या 'विविधज्ञानविस्तार' या मासिकामध्ये अभिप्राय लिहायचं ठरवलं.
मात्र एका 'कलावंतिणी'च्या पुस्तकाबद्दल काहीही छापण्यास संपादक तयार झाले नाहीत. यामुळे हिरा दुखावल्या गेल्या.
त्यामुळे त्यांनी 'जयद्रथ विडंबन' नाटक पुस्तक रूपात प्रकाशित करण्याच्या निर्णय घेतला आणि 1904 साली 19 वर्षांच्या हिरा यांच्या 71 पानांच्या 'जयद्रथ विडंबन' या नाटकाला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त झालं.
यामुळे हिराबाईंची नाट्य-साहित्य वर्तुळात चर्चा झाली. हिरा आता 'कवयित्री हिराबाई पेडणेकर' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
'संगीत दामिनी' उभं राहिलं अन् नाटककार हा मान मिळला
'जयद्रथ विडंबन' नंतर हिरा यांनी कल्पनारम्य सुखांतिकेवर कोल्हटकरांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन नाटक लिहायला घेतलं. त्याचं नाव होतं 'संगीत दामिनी'. 'संगीत दामिनी' रंगमंचावर यावं अशी हिराची तीव्र इच्छा होती.
त्यासाठी तिचा अखंड खटाटोप चालू होता परंतु हाती काहीच लागत नव्हतं. कारण ते नाटक एका नायकिणीचं होतं आणि नायकिणीचं नाटक रंगभूमीवर आणून प्रतिष्ठा धुळीला मिळवायची कोणाची इच्छा नव्हती.
मात्र, काही काळानं केशवराव भोसले यांच्या 'ललितकलादर्श' या कंपनीनं हिराबाईंच्या कुळाचा विचार न करता त्यांचं नाटक रंगभूमीवर आणायला तयारी दर्शवली.
अशाप्रकारे, 1911 साली 'संगीत दामिनी' चा पहिला प्रयोग नाशिकमध्ये झाला.
त्यावेळी 'संगीत दामिनी', संगीतकार-नाटककर्ती हिराबाई पेडणेकर' अशी जाहिरात दिमाखात थिएटरबाहेर झळकली होती. हिराच्या स्वप्नानं वास्तवाचं रूप घेतलं होतं.
स्त्री शिक्षणाविषयी आस्था, स्त्री-पुरुष प्रेमाविषयीचे विचार, एकनिष्ठता, पतिव्रता अशा मूल्यांचे प्रतिबिंब या नाटकात उमटलं होतं.
त्या काळात नाट्य व्यवसायात स्त्रीच्या सहभागाचा कुणी विचारही करू शकत नव्हतं. अशा काळात पुरुष नाटककारांच्या पंक्तीत एका कनिष्ठ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या समाजातील स्त्रीनं नाटककर्ती म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.
मात्र, या नाटकाचे जास्त प्रयोग होऊ शकले नाहीत. त्यामुळे 'संगीत दामिनी' सुद्धा नंतर पुस्तक रूपात प्रसिद्ध झालं. हिराबाईंचं काम एवढंच नव्हतं.
तर साधारण 10 -12 वर्षांच्या काळात त्यांनी त्यावेळी नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवराव भोसले, गडकरी, तात्यासाहेब केळकर, चिंतामनराव वैद्य, मामा वरेरकर,नाट्याचार्य खाडिलकर, गणपतराव बोडस, वि. सी. गुर्जर, बालकवी ठोंबरे, लेले, रेंदाळकर यांच्यासोबत काम केलं होतं.
अनेक नाटकं त्यांनी संगीतबद्ध केली होती. 'मनोरंजन' आणि 'उद्यान' या दोन प्रसिद्ध साप्ताहिकांसाठी कविता लिहिल्या होत्या. 'माझे आत्मचरित्र' नावाची एक विनोदी लघुकथाही लिहिली होती.
प्रेम, विरह आणि दारूचं व्यसन
नारायण दत्तात्रय जोगळेकर ऊर्फ नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक कंपनीतील एक भागीदार आणि प्रमुख नट होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हिरा, देखण्या जोगळेकरांच्या प्रेमात पडल्या.
ते विवाहित असले तरी त्यांचाही हिराबाईंवर खूप जीव होता. मुंबईत आले की ते आपल्या त्यांना भेटायला यायचेच. नंतर नंतर तर हिराबाई सुद्धा त्यांच्यासोबत नाटकांच्या दौऱ्यावर जायच्या.
मात्र, नंतर नंतर सततच्या नाटक दौऱ्यांमुळे जोगळेकरांची प्रकृती बिघडू लागली. इतकी की, बेळगावच्या नाटक दौऱ्या दरम्यान जोगळेकरांना जो काही ताप भरला तो उतरायचं नावंच घेईना.
अखेर, 15 नोव्हेंबर 1911 ला दुपारी दोनच्या सुमारास जोगळेकर हे जग सोडून गेले आणि त्यांच्या जाण्यानं जोगळेकरांच्या प्रेमात बुडलेल्या हिराबाईंचं अवघं भावविश्व उद्ध्वस्त झालं.
हिराबाई अशा वातावरणात वाढल्या होत्या जिथे मुलींना देहविक्री करायलाही भाग पाडलं जायचं. पण हिराबाईंनी याला कडाडून विरोध केला होता. त्यांच्या मावशीनं तर एका वयस्कर व्यक्तीकडून भरपूर पैसे घेऊन हिराबाईंचा सौदाही केला होता. पण हिराबाईंनी मावशीचा डाव उधळून लावला.
त्या सुखी संसाराची, सन्मानानं आयुष्यं जगण्याची स्वप्नं पाहायच्या. पण त्यांना आपली सगळी स्वप्नं राख झाली होती, असं त्यांना वाटे. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो आपल्याला सोडून गेला हा एवढा मोठा आघात त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता.
खचलेल्या हिराबाईंनी दारूचा आधार घेतला. खरंतर, नशेच्या आहारी गेलेल्या जोगळेकरांच्या सहवासात हिराबाईंना ही दारू प्यायचं व्यसन लागलं होतं. पण आता यामुळे त्यांची प्रकृती सतत ढासळत चालली होती.
काही केल्या या दु:खातून त्या स्वतःला बाहेर काढू शकत नव्हत्या. जोगळेकरांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी हिराबाईंना सांभाळण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी काही काळासाठी हिराबाईंना स्वत:बरोबर खामगावला नेलं, पण तिथं गेल्यानंतर कोल्हटकरांच्या तुटक तुटक वागण्यानं हळूहळू त्यांच्या नात्यात कडवटपणा आला आणि दुखावलेल्या हिराबाई मुंबईला परत आल्या.
दु:खातून बाहेर काढणारे नेने आणि पालशेतमधले दिवस
मुंबईला आल्यानंतर हिराबाईंच्या आयुष्यात कृष्णाजी नेने यांचा प्रवेश झाला. त्यांच्या येण्यानं हिराबाईंच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती.
मुंबईत नोकरीला असलेले नेने, गिरगावात शांतारामांच्या चाळीत आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहायचे. त्यांच्या घरापासून काही अंतरावर हिराबाईंचं गांजावाला चाळीतील घर होतं.
कवितांमुळे त्यांना हिरा पेडणेकरांविषयी आदर होता. त्यांना हिराबाईंना भेटायची इच्छा होती. एकदा योगायोगानं त्यांची भेट झाली आणि त्यानंतर कृष्णाजींनी हिराबाईंची शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली.
खामगाववरून आल्यानंतर, मुंबईत हिराबाईंचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दिवसागणिक ढासळत चाललं होतं. त्यामुळे गाणं आणि लेखन फार होत नव्हतं. त्यांना तशा अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हिराबाईंच्या इच्छेखातर कृष्णाजी त्यांना गुहागरमधील आपल्या पालशेतच्या घरी घेऊन गेले.
पालशेतमध्ये हिराबाईंची पार्श्वभूमी कुणाला ठाऊक नव्हती. तिथं गेल्यानंतर कृष्णाजींच्या आयुष्यात पत्नीसम स्थान मिळालेल्या हिराबाईंनी त्यांच्या सांगण्यावरून नाटक, गाणं सगळं काही कायमचंच सोडून दिलं. मात्र, तिथल्या सुंदर वातावरणात हिराबाईंचं मन चांगलं रमलं.
सुरुवातीला कृष्णाजींनी हिराबाईंना वाड्यात आणल्याची गोष्ट त्यांच्या पत्नीला म्हणजे राधाबाईंना आणि मुलांना अजिबात आवडली नव्हती. मात्र, कालांतरानं त्यांच्या कुटुंबानं आणि नातेवाईकांनी कृष्णाजींच्या आयुष्यातलं हिराबाईंचं स्थान स्वीकारलं.
हिराबाई तिथं शेती आणि वाड्यातील सगळी कामं सांभाळायच्या. जवळपास 36 वर्ष त्या दोघांनी एकमेकांना साथ दिली.
कृष्णाजींनी अखेरपर्यंत हिराबाईंचा सांभाळ केला, शेवटच्या काळातही त्यांनी हिराबाईंची खूप सेवा केली. अखेर, 18 ऑक्टोबर 1951 ला हिराबाई हे जग सोडून निघून गेल्या.
संदर्भ -
- 'आद्य महिला नाटककार, हिराबाई पेडणेकर', लेखिका - शिल्पा सुर्वे, डिंपल पब्लिकेशन्स
- कृष्णाजी नेने यांचे नातू अविनाश नेने यांनी उपलब्ध करून दिलेली कृष्णाजींची कौंटुबिंक पत्रे - शिल्पा सुर्वे यांच्या मार्फत
- ललितकलादर्शचे ज्ञानेश पेंढारकर यांनी दिलेली दुर्मिळ छायाचित्रे - शिल्पा सुर्वे यांच्या मार्फत
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.