विनोद तावडेंना 4 तास घेराव घालणारे ठाकूर पिता-पुत्र जिंकले की हरले? जाणून घ्या

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना नालासोपाऱ्यात चार ते पाच तास घेराव घालणारे हिंतेद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर हे दोघेही निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
हितेंद्र ठाकूर हे वसई मतदारसंघातून त्यांच्याच बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांचा पराभव भाजपच्या स्नेहा दुबे यांनी 3 हजार 153 मतांनी केला.
वसई मतदारसंघाचा निकाल :
- स्नेहा दुबे पंडित (भाजप) - 77,553 मतं (विजयी)
- हितेंद्र ठाकूर (बविआ) - 74,400 मतं (पराभूत)
क्षितिज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आणि बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातून उमेदवार होते. त्यांचा पराभव राजन नाईक यांनी केलाय.
नालासोपारा मतदारसंघाचा निकाल :
- राजन नाईक - 1,65,113 मतं (विजयी)
- क्षितिज ठाकूर - 1,28,238 (पराभूत)
- विजय पाटील (काँग्रेस) - 62,324 मतं (पराभूत)
भाजपच्या राजन नाईक यांनी तब्बल 36 हजार 875 मतांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला.
याच राजन नाईक यांना भेटण्यासाठी आलेल्या विनोद तावडे यांना ठाकूर पिता-पुत्रांनी घेराव घातला होता. मतदानाच्या आदल्या दिवशी नालासोपाऱ्यात मोठा गदारोळ झाला होता आणि परिस्थिती तणावाची बनली होती.
मुंबईच्या जवळ असणाऱ्या आणि भौगोलिकदृष्ट्या पालघर जिल्ह्यात येणाऱ्या नालासोपारा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी अक्षरश: तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कारण ठरले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे.
नालासोपारा पूर्व येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप करत, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा सगळा गोंधळ एखाद्या चित्रपटाला शोभावं असंच होतं.
विनोद तावडे नालासोपाऱ्यात भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यासाठी गेले होते. याच राजन नाईक यांनी आता क्षितिज ठाकूर यांचा पराभव केला आहे.
मुळात भाजपसारख्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणिसांना अशा पद्धतीने अडवून ठेवणारे हे हितेंद्र ठाकूर कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय?
ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात तो बहुजन विकास आघाडी म्हणजेच बविआ हा पक्ष किती मोठा आहे? त्यांचं कार्यक्षेत्र कोणतं आहे?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही वसई, विरार आणि नालासोपारामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बोललो आणि त्यांची मतं जाणून घेतली.


विवांता हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या म्हणण्यानुसार ते नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्या कार्यकर्त्यांना 'आचारसंहिता' समजावून सांगण्यासाठी विवांता हॉटेलमध्ये पोहोचले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
विनोद तावडे वाड्यावरून मुंबईला जात असताना ते विवांता हॉटेलमध्ये थांबले. त्यानंतर काही वेळाने बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्याचे उमेदवार क्षितिज ठाकूर त्यांचे कार्यकर्ते आणि माध्यमांचे प्रतिनिधी घेऊन तिथे पोहोचले.
त्यानंतर जे काही घडलं ते महाराष्ट्रात अनेकांनी बघितलं. विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप हितेंद्र आणि क्षितिज ठाकूर यांनी केला.
क्षितिज ठाकूरांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणिसांना घेराव घालत आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय विनोद तावडेंना सोडणार नाही अशी भूमिका घेतली.

फोटो स्रोत, X
त्यानंतर विनोद तावडे, राजन नाईक, क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद होणार असं दिसत होतं. माध्यमांचे कॅमेरे लावलेले होते, राजन नाईक यांनी बोलायला सुरुवातही केली होती पण तेवढ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद थांबवायला सांगितली.
सुरुवातीला प्रचंड आक्रमक दिसणारे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर शेवटी विनोद तावडेंना त्यांच्या गाडीतून बाहेर घेऊन जाताना दिसले. त्यानंतर तावडेंनी पत्रकार परिषद घेण्याची आणि ती रद्द करण्याचीही घोषणा केली.
माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले. हितेंद्र ठाकूर म्हणाले की भाजपच्याच नेत्याने पैसे वाटप होत असल्याची टीप दिली तर विनोद तावडे म्हणाले की, भाजपच्या नेत्याने टीप दिल्याचा दावा साफ खोटा असून तिथे जर काही गैरप्रकार घडला असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी.
हितेंद्र ठाकूर नेमके कोण आहेत?
वसईचे विद्यमान आमदार असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म 1961 मध्ये झाला. सध्या 63 वर्षांचे असणारे हितेंद्र ठाकूर वयाच्या 29व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले.
त्याआधी 1988मध्ये वसई तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ भाई (जयेंद्र) ठाकूर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांच्यावर सुरेश दुबे या बिल्डरच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. पण पुढे त्या आरोपात जयेंद्र ठाकूर पुराव्याअभावी निर्दोष सुटले होते.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी त्यांच्याविरोधात जे चार्जशीट फाइल केलं होतं त्यात असं म्हटलं होतं की जयेंद्र (भाई) ठाकूर यांनी ऐंशीच्या दशकात नालासोपारा, वसई-विरार या भागात जमिनीच्या व्यवसायातून आणि उलाढालींमधून पैसे कमावले.
प्रसंगी त्यांनी दमदाटी केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. जयेंद्र ठाकूर यांची 2023 मध्ये हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्यावर बहुजन विकास आघाडीचे सचिव आजीव पाटील यांनी म्हटले होते की मुळात हा आरोपच धादांत खोटा होता. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा करणार नाहीत.
हितेंद्र ठाकूर यांच्या राजकीय प्रवासाबद्दल ज्येष्ठ पत्रकार अमित जोशी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "भाई ठाकूर यांचं वसई-विरार भागावर वर्चस्व होतं. त्याकाळात मुंबईत वेगवेगळ्या गँग्स सक्रिय होत्या. मुंबईत डी कंपनी, उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी आणि वसई-विरारमध्ये ठाकूर कुटुंबाचा दबदबा होता. त्याकाळी वसईत विरळ लोकवस्ती होती. वसईतील बिल्डर लॉबी आणि टँकर लॉबीवर ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व होतं. सुरुवातीच्या काळात हितेंद्र ठाकूर राजकारणात येण्याची चित्रं नव्हती. मात्र पुढे जाऊन हितेंद्र ठाकुरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची माणसं निवडून आणली आणि पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला."
वसईमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी वाढत चाललेली बांधकामं आणि सिमेंटच्या जंगलांविरोधात 'हरित वसई वाचवा' नावाने आंदोलन केलं होतं.
त्याविषयी बोलताना लेखक सॅबी परेरा म्हणाले की, "फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्थानिक टँकर लॉबीकडून होणाऱ्या पाण्याच्या अमर्याद उपशाविरोधात आवाज उठवला होता. वसई-विरार, नालासोपारा आणि परिसरातील गावांमधून शहरातील बांधकामांना पाणी देण्यासाठी जमिनीखालील पाण्याचा उपसा सुरु होता. हा उपसा होऊ नये आणि वसईचा निसर्ग वाचावा म्हणून फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी हरित वसई वाचवा आंदोलन केलं होतं."

फोटो स्रोत, hitendravthakur/facebook
पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार विधानसभा मतदारसंघातून 1990च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि पुढे त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. याच पक्षाचं नाव बदलून पुढे बहुजन विकास आघाडी असं करण्यात आलं.
1990 नंतर हितेंद्र ठाकूर चारवेळा आमदार झाले. एवढंच नाही मागच्या 34 वर्षांमध्ये बहुजन विकास आघाडीने वसई-विरार, नालासोपारा, डहाणू आणि पालघर जिल्ह्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर राजकीय सत्ता मिळवली आहे.
हितेंद्र ठाकूर यांना मिळालेल्या राजकीय यशामागची कारणं सांगताना अमित जोशी म्हणाले की, "या भागात राहणाऱ्या मराठीभाषिक लोकांमध्ये बहुजन विकास आघाडीने लोकप्रियता मिळवली. अर्थात याला ठाकूर कुटुंबाच्या वर्चस्वाची किनार असली तरी या भागात राहणाऱ्या महिलांना सुरक्षा देऊन या पक्षाने महिलांची मतं मिळवली."
हितेंद्र ठाकुरांच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना लोकसत्ताचे पत्रकार सुहास बिऱ्हाडे म्हणाले की, "हितेंद्र ठाकूर यांनी विकासकामांवर भर दिला. कुठल्याही जातीचं किंवा धर्माचं राजकारण त्यांनी केलं नाही. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या बॅनरवर कोणत्याही धर्माच्या महापुरुषांचा किंवा इतर कोणत्याही मोठ्या नेत्याचा फोटो नसतो आणि त्यामुळेही हा पक्ष लोकप्रिय झाला.
"बविआचा संपूर्ण प्रचार हा ठाकूर कुटुंबाभोवतीच फिरत असतो आणि त्यांच्याबाबत अनेक बातम्या येत असल्या तरी सामान्य नागरिकांना त्रास न देण्याचं धोरण असल्यामुळे इतर पक्षांना त्यांचा पराभव करणं अवघड आहे," असं बिऱ्हाडे सांगतात.
हितेंद्र ठाकुरांना विवेक पंडित यांनी राजकीय आव्हान निर्माण केलं होतं. 2009च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या विवेक पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभवही केला होता पण त्यांचा राजकीय जम मात्र इथे बसू शकला नाही असं अमित जोशी सांगतात.
वसई-विरारमध्ये बविआची किती ताकद आहे?
बहुजन विकास आघाडी हा प्रामुख्याने पालघर जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला एक पक्ष आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. बोईसर, वसई आणि नालासोपारा मतदारसंघात बविआचे उमेदवार विजयी झाले.
वसईमधून स्वतः हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातून त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बोईसरमधून राजेश पाटील महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.
मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत हितेंद्र ठाकूरांच्या पक्षाचे तिन्ही आमदारांच्या भूमिकेकडे अनेकांचं लक्ष राहिलेलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली आणि बविआने लोकसभेत भाजपला पाठिंबा दिला.

फोटो स्रोत, hitendravthakur/facebook
2009मध्ये बहुजन विकास आघाडीचा पहिला खासदार निवडून आला होता. त्या निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी पालघरचे खासदार होऊन युपीए सरकारला पाठिंबा दिला होता.
बविआच्या राजकीय ताकदीबाबत बोलताना सुहास बिऱ्हाडे म्हणाले की, "पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महानगरपालिका, वसई तालुका पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायतींवर बविआचं वर्चस्व आहे. 2015साली झालेल्या वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी तब्बल 107 जागांवर विजय मिळवला होता."
सुहास बिऱ्हाडे म्हणाले की, "हितेंद्र ठाकूर यांनी विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचं जाळं याभागात उभारलं आहे. याभागातल्या सहकारी संस्था देखील त्यांनी उभारल्यामुळे निवडणुकीत त्यांना मदत होते."
बहुजन विकास आघाडीच्या कामकाजाबाबत बोलताना अमित जोशी म्हणाले की, "वसईमध्ये कॅथलिक आणि इतर राज्यांमधून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, मात्र तरीही हितेंद्र ठाकूर यांनी दहीहंडी, साईबाबांचे धार्मिक कार्यक्रम आणि सामान्य लोकांची कामं करून या भागातील मतदारांची मतं मिळवली आहेत. परप्रांतीय मतांमुळे भाजपाचाही या विधानसभा मतदारसंघावर डोळा आहे, मात्र तरीही बविआच्या उमेदवारांसमोर राजकीय आव्हान निर्माण करणं सोपं असणार नाही."
क्षितिज ठाकूर कोण आहेत?
क्षितीज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून 2009 पासून ते सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत क्षितिज यांनी माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांचा पराभव केला होता.
2013 साली मुंबईतील वांद्रे वरळी-सी लिंकवरील टोल नाक्याजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी क्षितीज ठाकूर यांची कार अडवली होती. त्यावेळी क्षितिज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी विधीमंडळ अधिवेशन सुरु असताना सूर्यवंशी विधीमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी क्षितिज ठाकूर यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता.

फोटो स्रोत, hitendravthakur/facebook
ठाकूर कुटुंबावर कोणते आरोप झाले आहेत?
हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 39 कोटींची जंगम मालमत्ता आहे. हितेंद्र ठाकूर यांची स्थावर मालमत्ता सुमारे 46 कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 24 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. हितेंद्र यांनी आपण व्यावसायिक असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पत्नीही व्यावसायिका आहेत.
हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात 4 गुन्हे दाखल असून त्यांच्यावर न्यायालयात सुनावणी सुरु असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिलेली आहे.
हितेंद्र ठाकुरांचे भाऊ जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांना एका उद्योजकाच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. त्यांच्यावर टाडाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुढे हे प्रकरण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. त्यातून जयेंद्र यांची निर्दोष सुटका झाली होती.
हितेंद्र ठाकूर ईडीच्या रडारवर
हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणि पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हितेंद्र ठाकूर आणि कुटुंबीयांची ईडीने चौकशी केली होती. हा घोटाळा सुमारे 6,200 कोटींचा होता. 2021 मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते.
त्यानंतर जून 2022मध्ये बविआने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्याचकाळात राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार सत्तेत आलं होतं. त्याआधी बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडी सरकारला देखील पाठिंबा दिलेला होता. मात्र नंतर त्यांनी हा पाठिंबा काढून घेतला.
या विधानसभा निवडणुकीत भाजपने नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात काँग्रेसचे विजय पाटील आणि भाजपच्या स्नेहा पंडित यांचं आव्हान असणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











