अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचं उत्पादन आता चीन ऐवजी भारतात होणार; टीम कुक काय म्हणाले?

    • Author, लिली जमाली, नताली शरमन
    • Role, बीबीसी न्यूज प्रतिनिधी

अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन आणि इतर उपकरणांचं अधिकाधिक उत्पादन चीनऐवजी अन्य ठिकाणी नेण्यात येत असल्याचं अ‍ॅपल कंपनीनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनसंबंधीच्या टॅरिफ पॉलिसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अ‍ॅपलचे प्रमुख टीम कुक यांनी म्हटलं की, पुढच्या काही महिन्यांत अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन भारतात तयार होतील. iPads आणि Apple Watches सारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी व्हिएतनाम हे उत्पादन केंद्र असेल.

अ‍ॅपलचा अंदाज आहे की, अमेरिकेच्या नवीन करांमुळे त्यांच्या खर्चात या तिमाहीत सुमारे 900 दशलक्ष डॉलर्सची वाढ होईल. ट्रम्प यांनी काही महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करमुक्त केलं असलं, तरीही हा खर्च वाढू शकतो.

ट्रम्प सरकारनं अ‍ॅपलला त्यांचं उत्पादन अमेरिकेतच करण्याबाबत वेळोवेळी सांगितलं आहे. सध्या जगभरातील कंपन्या अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे झालेल्या मोठ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी तयारी करत आहेत.

1 मे रोजी अ‍ॅपलच्या आर्थिक कामगिरीबाबत गुंतवणूकदारांसोबत बोलताना टीम कुक यांनी अमेरिकेतील गुंतवणुकीसंबंधात भाष्य केलं.

कुक यांनी सांगितलं की, पुढील चार वर्षांत कंपनी अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 500 अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे.

मेड इन इंडिया

अ‍ॅपलचे प्रमुख टीम कुक यांनी सांगितलं की, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचं उत्पादन आता चीनऐवजी भारत आणि व्हिएतनाममध्ये होणार आहे.

"अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन भारतात बनवले जातील," असं त्यांनी सांगितलं. तर आयपॅड्स, मॅक, अ‍ॅपल वॉच आणि एअर पॉड्स यांचं उत्पादन व्हिएतनाममध्ये केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

अमेरिकेबाहेर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी चीन मुख्य उत्पादन केंद्र राहणार आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर अधिक कर लावण्याची घोषणा केल्यावर अ‍ॅपलचे शेअर्स घसरले होते. कंपन्यांनी अमेरिकेतच उत्पादन करावं यासाठी हे नवीन करधोरण होतं.

मात्र या निर्णयानंतर ट्रम्प सरकारवर प्रचंड दबाव आला. काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना करातून सूट देण्यात आली, ज्यामध्ये फोन आणि कॉम्प्युटरसारख्या वस्तूंचा समावेश होता.

अनिश्चिततेचा काळ

सध्या तरी या करांमुळे अ‍ॅपलच्या विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही.

अ‍ॅपलने सांगितलं की, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत त्यांचा महसूल 95.4 अब्ज डॉलर्स झाला, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी जास्त आहे.

नवीन टॅरिफ पॉलिसीनंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील अजून एक महत्त्वाची कंपनी अ‍ॅमेझॉनच्या नफ्यावरही परिणाम झाला नसल्याचं दिसलं. कंपनीनं सांगितलं की, त्यांच्या उत्तर अमेरिकेतील इ-कॉमर्स व्यवसायात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अ‍ॅमेझॉनचे प्रमुख अँडी जेस्सी यांनी म्हटलं की, या टॅरिफ पॉलिसीचे परिणाम कुठे घेऊन जातील याची कल्पना नाही. पण आम्ही याआधीही साथीरोगासारख्या संकटांना तोंड दिलं आहे आणि त्यातून सक्षमपणे बाहेर पडलो आहोत.

नवीन दिशा

मूर इनसाइट्स आणि स्ट्रॅटेजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक मूरहेड यांनी म्हटलं की, आयफोनचं उत्पादन भारतात हलवणं ही चांगली गोष्ट आहे.

मूर यांनी पुढं म्हटलं की, ही बदलाची नांदी आहे. काही वर्षांपूर्वी कुक यांनी म्हटलं होतं की केवळ चीनमध्येच आयफोन बनू शकतात.

"अ‍ॅपलला याबाबतीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे, पण ही एक चांगली सुरुवात आहे," असं मूर यांनी म्हटलं.

अ‍ॅमेझॉनदेखील टॅरिफ पॉलिसीमुळे येऊ शकणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तयारी करत आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आमच्याकडे अधिकाधिक विक्रेते असतील याची दक्षता आम्ही घेत आहोत.

येत्या काळासाठी कंपनी आधीच तयार आहे, असं म्हणताना जेस्सी यांचा रोख कंपनीचा आवाका आणि रोजच्या रोज वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या साखळीकडे होता.

सध्या तरी करांमुळे अ‍ॅमेझॉनच्या विक्रीवर काही परिणाम झालेला नाही. उलट, ग्राहकांनी काही वस्तू साठवायला सुरुवात केल्यामुळे विक्रीत थोडी वाढ झाली आहे.

2025 च्या पहिल्या तिमाहीत अ‍ॅमेझॉनची विक्री 9 टक्क्यांनी वाढून 155.7 अब्ज डॉलर्स झाली, तर कंपनीचा नफा 60 टक्क्यांनी वाढून सुमारे 17 अब्ज डॉलर्स झाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)