'हिंदुत्ववाद्यांशी संघर्षाचे प्रसंग आले; पण ते कधीही दडपणाला बळी पडले नाहीत'

डॉ. मेघा पानसरे, गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, डॉ. मेघा पानसरे, गोविंद पानसरे
    • Author, डॉ. मेघा पानसरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(गोविंद पानसरे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे प्रणेते आणि प्रखर बुद्धिवादी म्हणून ओळखले जात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 2021 रोजी डॉ. मेघा पानसरे यांनी हा लेख बीबीसी मराठीसाठी लिहिला होता. आज, 24 नोव्हेंबर, कॉ. पानसरेंच्या जन्मदिनानिमित्त पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

16 फेब्रुवारी, 2015 या दिवसाची सकाळ आम्हा सर्वांसाठी एक भयंकर हिंसक अनुभव घेऊन आली.

खरंतर दररोज सकाळी सव्वा सातच्या दरम्यान ते आणि मी विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी जात असू. पण तीन दिवस कॉम्रेड पानसरे काहीसे आजारी होते. त्यांना ताप आला होता. त्यामुळे ते घरीच होते.

दररोजचे चालणे न झाल्याने ते उमाताईसोबत घरासमोर काही अंतर पाय मोकळे करण्यासाठी म्हणून बाहेर पडले. परत येताना घरासमोरच मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना गोळ्या घातल्या.

घरासमोर कोणीतरी ओरडल्याचा आवाज झाला. मी आणि माझी मुले धावत बाहेर गेलो. तिथले दृश्य पाहून भयंकर धक्का बसला. रस्त्याकडेला उमाताई खाली आडव्या पडल्या होत्या. कॉम्रेड पानसरे मात्र तोंडातून प्रचंड रक्तस्त्राव होत असूनही मागे हात टेकून बसले होते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते.

आम्ही त्यांना जवळ घेतले. परिस्थिती इतकी भीषण होती की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे अत्यावश्यक होते. मुलांना त्यांना धरून ठेवण्यास सांगून मी धावत घरात गेले. कारची किल्ली आणि मोबाईल घेतला. कार अगदी त्यांच्या जवळ उभी केली. तिघांनी धरून त्यांना कारमध्ये बसवले आणि तिथून जवळच्याच अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.

सुरुवातीस ते डॉक्टरांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नव्हते. पण मग एका क्षणी प्रतिसाद मिळताच डॉक्टरांनी भरभर उपचार सुरू केले. उमाताईंनाही उपचार सुरू झाले. आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या जिल्हा पोलीसप्रमुखांना फोन करायचा होता. एका पोलीस ठाण्यात फोन करून त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना झाल्या घटनेची माहिती दिली. आणि मग आम्हाला रडू कोसळलं.

20 फेब्रुवारी 2015 ला कॉम्रेड पानसरेंचा दु:खद अंत झाला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हिंदुत्ववाद्यांशी संघर्ष

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्या माणसानं संपूर्ण आयुष्य तळागाळातील, गोरगरीब-कष्टकरी लोकांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले. समाजाला धर्माची चिकित्सा करण्यास शिकवले. विवेकवाद शिकवला. लोकांच्या जगण्यातील प्रश्नांचे कारण नशीब वा मागच्या जन्मीचे पाप नसून सामाजिक-राजकीय-आर्थिक व्यवस्था आहे, हे त्यांना समजावे म्हणून प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. त्या 82 वर्षांच्या वृद्धास गोळ्या घालून संपवले गेले.

कॉम्रेड पानसरेंना कोणीही वैयक्तिक शत्रू नव्हते. वर्गसंघर्ष आणि धर्मांधता, जमातवाद व जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष हा त्यांच्या चळवळीतील कामाचा गाभा होता. सर्व शोषित-वंचितांना समतेचे, सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी सर्व डाव्या संघटना, कामगार, शेतकरी व दलित संघटना आणि अल्पसंख्यांक यांनी एक व्हावे, असा त्यांचा प्रयत्न होता.

अनेकदा कट्टर हिंदुत्ववाद्यांशी संघर्षाचे प्रसंग आले. परंतु ते आपल्या विचारांवर ठाम राहिले. कधीही दडपणाला बळी पडले नाहीत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल त्यांच्या दृष्टीने मोठे होते.

त्यांच्यावर हल्ला झाला त्याच्या आदल्याच दिवशी ते एका ग्रंथ महोत्सवात भाषण करण्यास गेले होते. बाहेर आल्यावर त्यांची पत्रकारांनी मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले होते की महात्मा गांधींसारख्या वृद्धाचा गोळ्या घालून खून करतात, यात कसले शौर्य आहे? हा तर भेकडपणा आहे. परंतु त्यांनाही त्याच प्रकारे भेकडपणे मारले गेले.

डॉ. गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, डॉ. गोविंद पानसरे

पुढील 3 वर्षे खुनाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यात आम्ही इतके गुंतून गेलो आहोत की कधीकधी हा एक अंतहीन प्रवास वाटू लागतो. अनेक महिने तपासाच्या प्रक्रियेत काही निष्पन्न होत नव्हते.

तेव्हा कॉम्रेड पानसरे यांचे स्नेही अॅड. अभय नेवगी यांच्या सल्यानुसार कुटुंबीयामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि तपासासाठी एक पथक नेमले जावे, अशी आमची मागणी होती.

न्यायालयाच्या सुनावणीच्या अगदी काहीच दिवस आधी शासनाने एक विशेष तपास पथक नेमल्याचे जाहीर केले. परंतु तरीही तपासावर उच्च न्यायालयाच्या देखरेखीची मागणी आम्ही तशीच लावून धरली.

दरम्यान दाभोलकर कुटुंबीयांनी सुद्धा अॅड. नेवगी यांच्यामार्फत तशीच याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. तेव्हापासून आजतागायत साधारण दर महिन्याला उच्च न्यायालय तपास अधिकाऱ्यांकडून गोपनीय तपास प्रगती अहवाल घेते आणि त्यावर भाष्य करते.

उच्च न्यायालयाच्या देखरेखीमुळेच आजवर तपासात काही प्रगती दिसते आहे. परंतु अद्याप गुन्ह्यातील शस्त्र, वाहन हे महत्त्वाचे पुरावे तपासात हाती लागलेले नाहीत.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

सनातनच्या साधकाला अटक

30 ऑगस्ट 2015 रोजी धारवाडमध्ये प्रा. कलबुर्गींचा खून झाला आणि मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बसव वचनांचे ते मोठे संशोधक होते. त्यावेळी त्यांनाही धार्मिक कट्टरवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या, असे समजले.

काही लेखक-कवींसोबत आम्ही कर्नाटकातील बुद्धीजीवींना आवाहन केले की, त्यांनी या खुनाचा निषेध करावा आणि शासनाकडे खुन्यांना पकडण्याची मागणी करावी. 16 सप्टेंबर 2015 रोजी श्रीविजय कलबुर्गी, मी, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आणि कन्नड भाषेतील चंद्रशेखर पाटील (चंपा), गिरीश कर्नाड असे अनेक मान्यवर लेखक-कवी मिळून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. सर्वांनी मिळून मागणी केली की त्वरित खुन्यांना पकडावे. त्या प्रकरणात अद्याप काही प्रगती झालेली नाही.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

फोटो कॅप्शन, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी

16 सप्टेंबर 2015 रोजी सकाळी बेंगलोरहून परत आले आणि त्याच दिवशी या खून प्रकरणातील पहिल्या संशयितास अटक झाली. हा संशयित सनातन संस्थेचा साधक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दाभोलकर प्रकरणात सी.बी.आय.ने सनातन संस्थेच्याच विरेंद्र तावडे यास खुनाच्या कट-कारस्थानात सहभागी असल्याबद्दल अटक केली.

प्रत्यक्ष खुनी गोव्यातील मडगाव बाँबस्फोट प्रकारणातील आरोपी असून ते आजही फरार आहेत. परंतु हे खून वैचारिक भूमिका मान्य नसल्याने करण्यात आले, असे मत मा. उच्च न्यायालयानेही नोंदवले आहे.

मेघा पानसरे

गौरी लंकेशची अखेरची भेट

सप्टेंबर 2017 मध्ये बेंगलोरमधील गौरी लंकेश या पत्रकार, मानवी हक्कांबद्दल जागृत स्त्रीचा खून झाला. खुनाची पद्धत साधारण आधीच्या खुनांसारखीच आहे.

गौरीसुद्धा दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्याच पठडीतील कार्यकर्ती होती. प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाबाबत कर्नाटक सरकारच्या तपास यंत्रणेने काहीच प्रगती केली नाही म्हणून 26 ऑगस्ट 2017 रोजी मी, प्रा. डॉ. गणेश देवी, डॉ. सुरेखा देवी, प्रा. राजेंद्र चेन्नी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यास गेलो होतो.

तेव्हा बाहेर आल्यावर मुख्यमंत्री निवासाच्या फाटकापाशी आमची गौरी लंकेशशी भेट झाली. मधल्या काळात कलबुर्गी खुनाचा निषेध आणि तपासाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांत आमची भेट झाली होती. तेव्हा आता लवकरच बेंगलोरला एक व्यापक मीटिंग घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवूया, असा निर्णय सर्वांनी घेतला.

निघण्यापूर्वी आम्ही एकमेकींना जवळ घेतले आणि आपापल्या मार्गाने गेलो. तीच आमची शेवटची भेट ठरली. 5 सप्टेंबरला तिचा खून झाला. ही अंतर्बाह्य हादरवून टाकणारी, अतिशय धक्कादायक घटना होती. कितीतरी वेळ त्यावर विश्वासच ठेवणे शक्य होईना.

डॉ. गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

तेव्हा मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका सेमिनारसाठी गेले होते. रात्रभर बेंगलोरहून प्रसारमाध्यमांचे फोन येत होते. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या बातम्यांमुळे गौरीने त्या दिवशी आम्हाला तिला काही धमक्या आल्याबद्दल किंवा धोका असल्याचे सांगितले होते का हे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते.

परंतु त्या दिवशी आमचे केवळ कलबुर्गी प्रकरणाबद्दल बोलणे झाले होते. दोन दिवस दिल्लीमध्ये अनेक निषेध सभा, निदर्शने झाली. प्रेस क्लब ऑफ इंडियात मोठी सभा झाली. सर्वच पत्रकार अक्षरश: सुन्न झाले होते. रविशकुमार यांनी तिथे अतिशय भावपूर्ण, पण त्याचवेळी परखड भाषण केले. प्रसारमाध्यमे जेव्हा सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात तेव्हा तो लोकशाहीला फार मोठा धोका असतो, असे ते म्हणाले.

तीन वर्षं संघर्षाची

या तीन वर्षांत देशातील, महाराष्ट्रातील असंख्य गावांत आम्ही गेलो. अनेक लोकांनी-संघटनांनी या खुनांबद्दल शोक व्यक्त केला. विवेकवादाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, लोकशाहीला असलेल्या धोक्याबद्दल जाहीर मांडणी केली.

हे लोक अनोळखी होते, पण संवेदनशील होते. विचाराने समतावादी, विवेकी होते. त्यामुळेच या काळात कधीही आम्हाला एकटे वाटले नाही. आम्ही त्याला विस्तारित कुटुंब म्हणतो. ही भावना खरोखरच आशावाद जागवते. निराशेचे अनेक प्रसंग आले तरी संघर्षशील, प्रयत्नशील राहायला मदत करते.

गोविंद पानसरे

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE

दक्षिणायनच्या माध्यमातून अनेक उपक्रमांत हजारो लोक सहभागी झाले. गुजराथमधील दांडी येथे झालेला प्रतीकात्मक सत्याग्रह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील चर्चासत्र, धारवाड येथील प्रा. कलबुर्गी यांच्या स्मृतीदिनी झालेली मूक फेरी आणि सभा, गोव्यातील तीन दिवसीय परिषद, वर्धा ते नागपूर अशी सेवाग्राम-दीक्षाभूमी यात्रा अशा असंख्य कार्यक्रमांतून लोक देशातील सद्य राजकीय परिस्थिती व हिंसक वातावरणाप्रती असहमती व्यक्त करताहेत.

दिल्लीमध्ये आयोजित केलेले 'प्रतिरोध' आणि मुंबईतील 'मुंबई कलेक्तीव्ह', उत्तरप्रदेशातील 'हस्तक्षेप', तसेच हैद्राबाद, कोची, भोपाळ, भुवनेश्वर अशा शहरांतील सांस्कृतिक व विज्ञानावर आधारित कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी मी उपस्थित राहिले. या सर्व माध्यमांतून लोक निर्भयपणे प्रकट होताहेत.

भारत हवा की हिंदुराष्ट्र?

सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती सारख्या संघटना या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट जाहीररीत्या मांडत आहेत. परधर्मीयांबद्दल विद्वेष पसरवत आहेत. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.

खुनांचा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. फरार गुन्हेगारांना अटक होणार का, हे स्पष्ट होत नाही. आम्ही मात्र शांततेच्या मार्गाने, लोकशाही पद्धतीने न्यायाची मागणी करत राहू.

शिवाय आता हा केवळ सत्ताधारी शासनाच्या विचारप्रणालीला विरोध करण्याचे साहस करणाऱ्या लोकांच्या खुनांचा प्रश्न राहिला नाही.

दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी आणि गौरी ज्यांचे रक्षण करू पाहत होते ती संविधानिक मूल्ये, धर्मनिरपेक्ष विचारप्रणाली आणि लोकशाही रचना यावरचा हल्ला रोखण्याचा प्रश्न आहे. या देशाला हिंदू धर्माधारित राष्ट्र बनवण्याच्या संघ परिवाराच्या राजकीय उद्दिष्टाविरुद्ध ते सर्व उभे होते. लोकांना धर्माद्वारे होणारे भेदभाव, शोषण, अंधश्रद्धा आणि मिथकांना प्रश्न विचारायला आणि स्वत:ची असहमती व्यक्त करायला प्रोत्साहन देत होते.

गोविंद पानसरे

फोटो स्रोत, Facebook/Medha Pansare

तेव्हा आता सर्व विवेकी, हिंसेला विरोध करणाऱ्या लोकांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आपलं देश धर्मनिरपेक्ष असावा की धर्माधारित, लोकशाहीवादी असावा की हुकूमशाही याबद्दल बोलले पाहिजे.

आपल्याला काय मान्य आहे, हिंसा की मानवता, विद्वेष की प्रेम आणि करुणा, अंधश्रद्धा की विवेक? आपल्या पुढच्या पिढीला आपण बहुरंगी सांस्कृतिक जीवन देणार आहोत की एकरंगी जगणं? लोकशाही की हिंदू पाकिस्तान? यांत निवड करायलाच हवी. निर्भयतेचे मूल्य अंगीकारले पाहिजे.

गेल्या तीन वर्षात कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या हिंसेच्या अनुभवापासून एका व्यापक, सामूहिक वैचारिक व राजकीय लढाईच्या दिशेने झालेला प्रवास आमच्यासाठी म्हणूनच फार महत्त्वाचा ठरतो.

(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)