विनोद कुमार शुक्ल यांच्या साहित्यातला वंचित, शोषित भारतीय माणूस कसा आहे?

    • Author, वैभव वाळुंज
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विनोद कुमार शुक्ल यांचं नुकतंच निधन झालं.

"अपने होने में

मैं फोटो हो रहा हूँ

कि किसी तरह

अपने न होने को

फोटो में छोड जाऊँ.."

असं आपल्या कवितेतून सांगून निवर्तले. भाषिक सीमांच्या मर्यादा न जुमानता भावनांना आपल्या शब्दांमधून व्यक्त करणाऱ्या या साहित्यिकाची हयातीत बिगरहिंदी साहित्यविश्वानं किती दखल घेतली, हा वादाचा मुद्दा असला, तरी त्यांच्या जाण्यानं काहीएक गोष्टी किमान अधोरेखित केल्या. याच गोष्टींचा उल्लेख इथे करण्याचा मानस आहे.

विनोद कुमार शुक्ल यांच्या जाण्यात आपल्यातला असा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला, ज्यांच्या लेखणीनं बहारदार किंवा पल्लेदारपणाने नव्हे, तर साधेपणानं जगभरातील वाचकांवर मोहिनी टाकली.

मात्र, हिंदी जगताच्या पलीकडे भारताची एक प्रादेशिक भाषा वापरून लिहिणारा लेखक आजच्या आणि उद्याच्या भारताविषयी, तसेच त्याच अनुषंगाने कष्टकरी, वंचित जनतेच्या अस्तित्वाविषयी काय सांगून जातो, यावर क्वचितच भाष्य केलं गेलं.

एक महान साहित्यिक असण्यापलीकडे शुक्ल यांच्या साहित्यातील मजूर-आदिवासी समाजासाठीची भूमिका अधोरेखित करायला हवी.

काही दिवसांपूर्वीच, इंडिया टुडेच्या 'MO.of.Everything' या युट्युब चॅनेलवर 10 युवा विद्यार्थी विरुद्ध राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्यात भारतीय भाषा आणि इंग्रजीचा वरचष्मा याविषयी यादव बोलत होते. विकसित आणि आधुनिक राष्ट्र होण्यासाठी आपल्याला भारतीय भाषांनाच माध्यम बनवावं लागेल, असं त्यांचं मत होतं.

परदेशी शिकणाऱ्या 10 'युवा, सवर्ण आणि अतिश्रीमंत' विद्यार्थ्यांशी 'भारत आधुनिक कसा बनू शकेल' यावर बोलताना त्यांनी अचानक "तुमच्यापैकी किती जणांना 'विनोद कुमार शुक्ल' माहीत आहेत?" असा सवाल केला.

मुलं शांत झाली, एकानं 'मी नाव ऐकलंय' असं म्हटलं. "ते हिंदीतील सर्वात प्रसिद्ध लेखक आहेत. ज्या दिवशी त्यांना नोबेल पुरस्कार मिळेल, त्या दिवशी तुम्ही सगळे त्यांचं लेखन वाचायला सुरुवात कराल. त्याआधी का नाही!", यादव उद्गारले.

नव्या विकसित भारताच्या वाटेवर वंचित घटकांची आणि प्रादेशिक भाषांची फरफट मांडताना योगेंद्र यादवांसारख्या सजग व्यक्तीला एकाएकी शुक्ल यांची आठवण येणं, हा योगायोग नसावा. तरीही अशा राजकीय चर्चेत तुलनेने अराजकीय समजले जाणारे शुक्ल का आठवावेत?

शुक्ल हे तसे थेट राजकीय विषयांवर लिहिणारे लेखक नव्हते. किंबहुना, राजकीय चर्चा, माध्यमं यांपासून ते कटाक्षानं दूर राहत. एवढंच नव्हे, तर शहरं, ओळखीपाळखी आणि प्रसिद्धी याचाही त्यांना सोस नव्हता.

जगातील आधुनिक साहित्य किंवा आघाडीच्या लेखकांची त्यांच्याकडे उठबस नसायची. संकोच आणि विसराळूपणा या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वात प्रभावी छटा होत्या. ते जगभर फिरले नाहीत, जास्त मार्गदर्शनपर बोलले नाहीत.

त्यांच्या साहित्यातही परीकथा, कल्पनांचं अगम्य विश्व, धावतं जग, चमचमीत कथानक, हिंसक किंवा विनोदी संवाद, अलंकारिक भाषा यांची रेलचेल अजिबात नसे.

मोजकीच पात्रे, त्यांची सामान्य नावं, शिरस्त्याच्या घटना, शिळोप्याच्या गप्पा त्यांच्या लिखाणात असत. त्यात क्रांतीची भाषा, जगाच्या वाढत्या समस्या, पेटून उठणं, प्राणपणानं झुंजणं, मूल्यांच्या मोडतोडीची हळहळ, संविधान असा कुठलाही अविर्भाव नसे. मग तरीही अशा राजकीय चर्चेत तुलनेने अराजकीय समजले जाणारे शुक्ल का आठवावेत? असा प्रश्न पडू शकेल.

याचं उत्तर शुक्ल यांच्या सोप्या लेखनातच आहे. आपल्या कविता-कादंबऱ्यांमधून शुक्ल यांनी अतीव साधेपणाने आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दैनंदिन भोवतालाचंच वर्णन आणि अभिसरण केलं. पण माणसांचं माणूसपण त्यांच्या या साधेपणात एवढं केंद्रस्थानी असे की, आपोआपच त्या लिखाणाला राजकीय, आर्थिक व सामाजिक समतेच्या, धर्मातीत मानवतेच्या आणि अन्यायाविरुद्ध कार्यरत राहण्याच्या मूल्यांचा बाज येई.

माणसाच्या अस्तित्वाला त्यांचं लेखन आणि निरीक्षण आरपार छेदून जाई. त्यातून फुलणारा अर्थ आपोआपच कर्मकांडविरोधी असे, त्याला न्यायाची चाड असे.

अँटोनियो ग्राम्शीने ऑरगॅनिक इंटलेक्ट अर्थात 'सहज प्रतिभेची' संकल्पना मांडली आहे. त्या संकल्पनेप्रमाणे त्यांचं लिखाण होतं ते श्रीमंतांच्या मुजोरीविरुद्ध, व्यवस्थेच्या पिळवणूकविरोधात, शोषणाविरुद्ध, वंचितांच्या हक्कांसाठी, स्त्रियांच्या अतोनात अंतर्गत दुःखांच्या विरोधात त्यांचं लेखन आपोआप उभं राही.

त्यात मसालेदार पात्र, प्रसंग टाकण्याची गरजच दिसत नसे. त्याला जीवनाच्या रसाचं एवढं सहजी कोंदण असे की, फुलातून दरवळ यावा इतक्या सहज त्यातून माणूसपणाचा अर्थ निघे.

शब्दांचा सोस न करता वाचकांना संदर्भांचे, सत्तांचे, अर्थाचे आणि अनर्थाचेही धागेदोरे लीलया कळत.

'शब्देविण संवादु, दुजेवीण अनुवादू' असा त्यांचा त्यांच्या वाचकाशी खेळ चाले. भाषेचा असाधारण सोपेपणा वापरत, कधी वाक्याव्यस्थेला डोईवर उभं करत, शब्दबंधांचे आभास देत भाषेतून हवा तो परिणाम अलगद काढून घेणं त्यांच्या लेखनशैलीचा सर्वात मोठा पैलू होता.

एकच एक मुख्य कथानक देखील नसताना त्यांच्या कादंबरीत लहानसहान घटनांचे पुंजके असत आणि ते एकत्र येऊन अर्थाची आखीव रांगोळी उभारत. अनायासे एखादेच वाक्य असं येऊन जाई की त्या साध्या प्रसंगांना एकत्र ओवण्याची चावीच वाचकाला मिळून जाई आणि गर्भित अर्थ सापडे.

समीक्षकांच्या नजरेतून त्यांचं लेखन अनेकदा 'जादुई वास्तववाद' म्हणून गणल्या जाणाऱ्या साचापलीकडे वाचकांच्या आत्मिक नैतिकतेनं त्यांच्या लेखनाचे लागणारे अर्थ बहुप्रवाही होतं.

'आपण जेवढे स्थानिक होऊ तितके आपण वैश्विक बनत जाऊ' हा शुक्ल यांचा होरा अगदी जागतिकीकरणाच्या विस्फोटातही वारंवार सिद्ध झालेला दिसतो.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील जाती-वर्ण-वर्गाचे संबंध रेखाटणं असो की हिंदी भाषेचा रूढ वाक्यप्रवाह विस्कळीत करून त्याच्या अनर्थावर आरूढ होऊन निरूपण करणं असो; शुक्ल यांनी व्यावसायिक तंबू न उभारता, अकादमिक लेखनाच्या पलीकडचे आलेख सामान्य जनांसाठी खुले केले. तेही कोणता गाजवाजा वा नव्या तत्त्वज्ञानाचा डिंडीम न करता.

हिंदीतील आघाडीच्या समीक्षकांनी अनेकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. विशेषतः ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर हे सत्र अजूनच वाढलं. पण आपला असंतोष आणि उठाव व्यक्त करण्यासाठी शुक्ल यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली होती, तिच्याशी ते एकनिष्ठ राहिले.

प्रत्येक रचनेत काळेबेरे शोधणाऱ्या 'कृष्णपक्षाच्या' टीकाकारांना त्यांचा सवतासुभा दाखवणारा, दरिद्रनारायणाचे, आदिवासी कष्टकऱ्यांचे जगणे नव्या पद्धतीतून खुबीने आणि परिणामकारक रीतीनं मांडणारा 'शुक्लपक्ष' नजरेस पडलाच नाही.

शुक्ल यांनीही या चाव्या बळजबरीने कुणाच्या हातात कोंबल्या नाहीत. वाचकाच्या नैतिकतेवर त्यांची अढळ श्रद्धा असावी, म्हणूनच त्यांचा विद्रोह वाचकांपर्यंत आपसूक पोचला.

आपल्या लिखाणात त्यांनी कष्टकऱ्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान अव्याहत पेरलं. त्यात दारिद्र्याची हळहळ नव्हती, उलट जीवनाची सुलभ शक्यता उलगडून दाखवण्याची आस दिसे. आकडेवारी आणि आकांडतांडव करण्यापेक्षा नैतिक अनुभूतीतून सुरेख जगण्याचा आलेख त्यांनी पेरला.

उदाहरणार्थ, रटाळ रोजंदारीतील मंद उत्कटता बघून बा. सी. मर्ढेकरांना 'सकाळ नित्याची ही आली' म्हणावं वाटे; तिथं शुक्ल आपल्या 'नौकर की कमीज' कादंबरीत घराची ओली कौले आणि नोकरीचा ससेमिरा यांच्या मध्यात हलक्या उन्हानं येणा-जाणारा हुरूप रेखाटतात.

मुख्यधारेतील माध्यमांनी अनेक वर्षे दुर्लक्षित केलेला छत्तीसगडमधील मुरिया आदिवासींच्या ओडिशा-आंध्रमध्ये झालेल्या विस्थापनाचा (Internally Displaced People) प्रश्न त्यांनी 'आदिवासी! हांका पड़ा है' सारख्या कवितांमधून आपल्या भावनांतून वैश्विक केलेला दिसतो.

नामदेव ढसाळ किंवा तुकोबारायांसारखी त्यांची लेखणी टोकाचा विद्रोह करत नाही. पण तरीही 'नाही रेच्या' क्षीण विरोधाला अधोरेखित करण्याचं प्रामाण्य त्यांच्याकडे होतं.

"इस तरह की गाली गरीब आपस में देते थे। रईस लोगों को दी जाने वाली गाली सच नहीं होती थी। उनको गाली नहीं लगती थी", असं म्हणून मजुरांच्या मनातील विद्रोहामागील सूक्ष्म वेदना त्यांनी हळूवार टिपल्या.

कुसुमाग्रज आपल्या 'आदिवासी' कवितेत म्हणतात, तसं शुक्ल यांच्या साहित्यातील वंचितांच्या आवाजाची अनुभूती फक्त तर्कांच्या चलनाने उमगत नाही.

आपल्या वैयक्तिक जगण्यातील अनुभवांचं असं भाषांतर करतानाही त्याकडे निर्मळ तटस्थ नजरेनं पाहत राहणं त्यांना शक्य झालं.

'माझ्या समग्र साहित्यातील स्त्री म्हणजे माझी पत्नीच आहे, तिला आलेले अनुभवच मी सकळ जगातील स्त्रियांचे अनुभव म्हणून मांडले,' असं ते म्हणतात तेव्हा निरीक्षण आणि त्यातल्या एकात्मीकरणाच्या हातोटीला बघून स्तिमित व्हायला होतं.

'गांजलेल्या पिढ्यांची करुण हाक ऐकत असते कविता' असं म्हणत त्यांनी राजकीय आणि सामाजिक अन्यायालाही मानवी दुःखांच्या लोलकातून पाहिलं.

म्हणूनच की काय, आजच्या जगभरातील आदिवासी जगताच्या गळ्यातील ताईत झालेल्या महान कवयित्री जसिंता केरकेट्टा यांनी त्यांच्या लेखनाला प्रेरित करणाऱ्या लेखकांमध्ये जर्मन मार्क्सवादी कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांच्यासोबत विनोद कुमार शुक्ल यांना स्थान दिलं.

आदिवासींवर त्यांनी लिहिलेल्या कवितेनं मला मोठी प्रेरणा दिली, असं केरकेट्टा म्हणत. "विनोद कुमार शुक्ल जितने बड़े कवि हैं, उतने ही बड़े कथाकार भी हैं। यह बात हिंदी के बहुत कम लेखकों में है" हे खुद्द त्यांनी प्रांजळपणे मान्य करणं शुक्ल यांच्या राजकीय दृष्टिकोनाविषयी बरंच सांगून जातं. आदिवासींच्या नावाआडून शुक्ल यांच्यावर टीका करणाऱ्यांपेक्षा काकणभर जास्तच.

या बाबतीत त्यांचं नातं दलित-वंचितांच्या जगण्याची मांडणी करणाऱ्या उद्धव शेळके यांच्या लेखनाशी किंवा चिनी सरकारच्या वरवंट्याखाली वावरत असताना ग्रामीण जीवनाचं उत्कट दर्शन घडवणाऱ्या मो यान यांच्या लेखनाशी काही अंशी जुळतं.

मो यान, ज्यांच्या नावाचा अर्थच 'मौन राहा' असा होतो. त्यांना 2012 मध्ये नोबेल मिळाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या शैलीचे प्रयोग जगभरात झाले. चित्रकला आणि विविध चित्रपटांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं. मात्र, त्याबाबतीत शुक्ल लोकाकी झाले नाहीत. त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट 1979 मध्ये येऊनही ते तथाकथित 'मुख्य धारे'पासून अंतर राखून आपल्या अस्तित्वाचं स्वतंत्र शेत फुलवत राहिले.

शुक्ल यांच्या नसण्यानं कष्टकरी वर्गाचा सर्जनशील आवाज लोपल्याची भावना असंख्य वाचकांमध्ये तयार होण्याला त्यांचं हे लिहिण्यातून संवेदनशील असणं कारण आहे.

एकीकडे जीडीपीच्या वाढत्या अंकांचे मजले उभारत जगात अव्वल बनण्याचा दावा करणारा हा देश आणि दुसरीकडे रोजीरोटी शोधण्यासाठी अंगावर बसेल ती बंडी चढवून रोजगार हमी शोधणारा देश या दोघांमध्ये आपली बाजू शुक्ल यांनी निवडली आणि आपल्या शब्दा-शब्दांमधून प्रखरपणे मांडलीही.

विनोद कुमार शुक्ल यांनी आपल्या साहित्यात जी नैतिकता पाळली, 'नाही रे' वर्गाच्या म्हणण्याला साहित्यिक आवाज दिला, ते लिहिण्याच्या सर्जनशील क्षेत्रातल्या नवोदितांनी निश्चितच अभ्यासायला हवी, कदाचित तरच शुक्ल यांच्या 'अपने न होने को फोटो में छोड जाऊँ' म्हणण्यातील एरव्ही न दिसणाऱ्या छटा वाचकांच्या नजरेस पडतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.