सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रपतींनी दिली उपराष्ट्रपती पदाची शपथ, असा आहे त्यांचा प्रवास

फोटो स्रोत, CPRADHAKRISHNAN/FB
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी सकाळी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.
सी. पी. राधाकृष्णन यांनी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे.
मंगळवारी (9 सप्टेंबर) झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं पडली.
'उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 98.02 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी संध्याकाळी 6 वाजता सुरु झाल्याचं' निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी सांगितलं की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 767 खासदारांनी मतदान केले. त्यापैकी 752 वैध होते आणि उर्वरित 15 मतं अमान्य करण्यात आली.
त्यांच्यासमोर विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी उभे होते.
संख्याबळ एनडीएच्या बाजूने असल्याने, सीपी राधाकृष्णन यांचा विजय आधीच निश्चित मानला जात होता. परंतु क्रॉस व्होटिंग होऊ शकते अशी शंकाही व्यक्त केली जात होती.
बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली आणि सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली.
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या नियमांनुसार सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याचं पी.सी. मोदी यांनी सांगितलं.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संबंध
उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार असलेले सी. पी. राधाकृष्णन यांचा देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी संबंध होता. हा संबंध होता नावाचा.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावरून सी.पी.राधाकृष्णन यांचं नाव ठेवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Facebook/Governor of Maharashtra
सी.पी.राधाकृष्णन यांच्या आई जानकी अम्मल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली.
"माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्यानं माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखं बनावं, अशी आम्ही प्रार्थना केली होती. त्यासाठी आम्ही त्यांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं. आज आमच्यासाठी तसं घडण्याचा क्षण आला आहे," असं त्यांच्या आी म्हणाल्या.
सी पी राधाकृष्णन कोण आहेत?
सी पी राधाकृष्णन भाजपाचे माजी वरिष्ठ नेते आहेत. ते प्रदीर्घ काळापासून पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. ते दोनवेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तसंच त्यांनी भाजपाच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीदेखील सांभाळली आहे.
सी पी राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तामिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
1998 आणि 1999 असे दोन वेळा ते निवडून गेले होते. मात्र त्यानंतर 2004, 2014 आणि 2019 मध्ये त्यांना लागोपाठ तीन वेळा कोईंबतूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

फोटो स्रोत, X.COM/ @CPRGuv
फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांची नियुक्ती झारखंडच्या राज्यपालपदी झाली होती. त्यानंतर जुलै 2024 मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले.
सी पी राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी चळवळीतून केली होती.
2007 मध्ये ते तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळेस त्यांनी राज्यात 93 दिवसांची 19,000 किलोमीटरची यात्रा केली होती. यात त्यांनी मुख्यत: नदी जोडो, दहशतवाद, समान नागरी कायदा, अस्पृश्यता आणि व्यसनाचे दुष्परिणाम यासारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं होतं.
यानंतर देखील त्यांनी धरणं आणि नद्यांच्या मुद्द्यांवर 280 किलोमीटर आणि 230 किलोमीटरच्या दोन यात्रा काढल्या होत्या.
आरएसएसशी संबंध आणि सक्रिय राजकारण
चंद्रपुरम पोनुसामी (सी पी) राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 ला तामिळनाडूतील तिरुप्पुरमध्ये झाला होता. त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली.
त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि 1974 मध्ये ते भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य झाले.
1996 मध्ये त्यांची नियुक्ती तामिळनाडूत भाजपाच्या सचिवपदी करण्यात आली. यानंतर ते कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
खासदार असताना ते संसदीय स्थायी समितीचे (वस्त्रोद्योग मंत्रालय) अध्यक्ष होते. याशिवाय सी पी राधाकृष्णन, स्टॉक एक्सचेंज घोटाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष संसदीय समितीचे सदस्य होते.

2004 मध्ये सी पी राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण केलं. तैवानला जाणाऱ्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्यदेखील होते.
2016 मध्ये ते कोचीस्थित कॉयर बोर्डाचं अध्यक्ष झाले. चार वर्षे त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून होणारी नारळाच्या शेंड्यांची (कॉयर) निर्यात 2532 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. 2020 ते 2022 दरम्यान राधाकृष्णन भाजपाचे केरळमधील प्रभारी होते.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते?
उपराष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष होते. त्याच्या निवडणूक मंडळात राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांसह आमदारदेखील मतदान करतात.
मात्र उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारच मतदान करू शकतात. या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करत नाहीत.
मजेशीर गोष्ट अशी की राष्ट्रपती लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत, मात्र या निवडणुकीत ते मतदान करतात.
तसंच विशेष बाब म्हणजे, दोन्ही सभागृहांमधील नामांकित खासदार राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. मात्र ते उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.
उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 60 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. त्यासाठी निवडणूक आयोग निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करतात. ते लोकसभा किंवा राज्यसभेचे महासचिव असतात.
निवडणूक अधिकारी एक सार्वजनिक सूचना जारी करतात आणि नामांकनं मागवतात. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक लागतात.
प्रस्तावक आणि अनुमोदक राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असू शकतात. उमेदवाराला 15000 रुपये जमाही करावे लागतात. त्यानंतर निवडणूक अधिकारी अर्जाची छाननी करतात आणि योग्य उमेदवारांचं नाव जाहीर करतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
एखादी व्यक्ती भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून जाण्यासाठी तेव्हाच पात्र ठरते, जेव्हा ती काही अटींची पूर्तता करते. उदाहरणार्थ, ती भारताची नागरिक असली पाहिजे. त्या व्यक्तीचं वय 35 वर्षांपेक्षा कमी असता कामा नये. तसंच राज्यसभेवर निवडून जाण्यासाठीच्या अटींसाठी पात्र ठरत असला पाहिजे.
जर एखादी व्यक्ती भारत सरकार किंवा एखाद्या राज्य सरकारअंतर्गत एखाद्या लाभाच्या पदावर असेल तर तो उपराष्ट्रपती म्हणून निवडून जाण्यास पात्र ठरत नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












