दोन अनोळखी लोक, एकमेकांचे प्राण वाचवले आणि आता निर्माण झालं 'रक्ताचं नातं'

फोटो स्रोत, AFP
- Author, शेरन बार्बर आणि नताली राईट
- Role, बीबीसी न्यूज
स्टेम सेलच्या गुप्तपणे केलेल्या दानामुळं मॉरियस वॉर्नर यांनी एका ब्रिटिश डॉक्टरांचे प्राण वाचवले. पण कदाचित यामुळंच त्यांचाही जीव वाचला होता. कारण त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण यामुळं त्यांना जीवनाचा एक हेतू समजला, असं या जर्मन तरुणानं म्हटलं.
डॉक्टर निक एम्ल्बल्टन यांना एक दुर्मिळ प्रकारचा ब्लड कॅन्सर होता. त्यामुळं त्यांच्यासमोर बोन मॅरो (अस्थिमज्जा) प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
पण त्यांना त्यासाठी युकेमध्ये योग्य डोनर (अवयव दाता) मिळाला नाही, त्यामुळं त्यांनी जगभरात शोध सुरू केला.
बीबीसी न्यूज आणि अँथनी नोलान नावाच्या एका सामाजिक संस्थेनं जवळपास दोन वर्ष डोनर शोधण्यासाठी त्यांची मदत केली.
'मृत्यूपत्रही तयार केले'
60 वर्षीय डॉक्टर निक यांनी सुमारे वीस वर्षांहून जास्त काळ न्यूकॅसल येथील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात सेवा दिली. या दरम्यान त्यांनी हजारो चिमुकल्यांचे प्राण वाचवले.
पण 2021 मध्ये त्यांनाच डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.
"पुढं नेमकं काय घडणार आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती," असं डॉक्टर निक यांनी रुग्णालयाच्या वऱ्हांड्यामध्ये फिरताना सांगितलं.
"मी मनाची पूर्णपणे तयारी केली होती. कदाचित माझा मृत्यूही झाला असता. त्यामुळं मी मृत्यूपत्रही तयार करून ठेवलं होतं," असंही त्यांनी सांगितलं.
"मी पत्नी आणि मुलांना ही बातमी सांगितली. मला मुलांबाबत अत्यंत वाईट वाटत होतं. त्यांना उर्वरित आयुष्य त्यांच्या वडिलांशिवाय घालवावं लागू नये, असंच सारखं वाटत होतं."
बोन मॅरो प्रत्यारोपणानंतर नुकसान झालेल्या रक्ताच्या पेशी निरोगी पेशींबरोबर बदलल्या जातात. पण त्या पेशी एकमेकांशी जुळत नाहीत, तोपर्यंत शरीर आपोआप त्यांना नाकारत असतं.
"आम्ही आधी युकेमध्ये नोंदणी केलेल्या डोनरचा शोध घेतला. आम्हाला इथेच डोनर मिळेल अशी आशा होती," असं अँथनी नोलान संस्थेचे चार्लोट ह्युजेस म्हणाले.
"पण आम्हाला यात यश आलं नाही. त्यानंतर आम्ही जगभरात अशा डोनरचा शोध घेत असतो. कारण मॅच होणारा डोनर जगभरात कुठेही मिळू शकतो."
'भेटीने भारावून गेले'
प्रत्यारोपण यशस्वी होईपर्यंत दान करणारा आणि रुग्ण हे दोघंही एकमेकांसाठी अनोळखीच असायला हवे.
दोन वर्षांनी प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचं, निक यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी बीबीसी न्यूजला डोनरला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली.
अँथनी नोलानच्या मदतीनं बीबीसी न्यूजनं ड्रेस्डनजवळच्या केमनित्झमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय मारियस यांची माहिती मिळवली. ते किशोरवयीन होते तेव्हापासून त्यांचं नाव डोनरच्या यादीत नोंदवलेलं होतं.

मारियस युकेला जाऊन निक यांना भेटण्यासाठी तयार झाले. न्यूकॅसलच्या फ्रीमन हॉस्पिटलच्या कॅन्सर सपोर्ट सेंटरमध्ये त्यांचं प्रत्यारोपण झालं होतं. तिथंच त्यांची भेट ठरली होती.
ते दोघं एकमेकांना भेटले आणि त्यांची गळाभेट झाली.
"त्यावेळी मी भारावून गेलो होतो आणि माझं अंग थरथरू लागलं होतं," असं मारियस म्हणाले.
'माझ्या शरीरात तुमचं रक्त'
"कॅन्सरच्या सर्व पेशी नष्ट झाल्या आहेत," असं निक त्यांना म्हणाले.
"त्यांनी जेव्हा माझं रक्त तपासलं तेव्हा त्या रक्तातील सर्व पेशी तुमच्या होत्या.तुम्ही नसते तर माझा मृत्यू झाला असता."
"मला चार मुलं आहेत. वडिलांशिवाय ती पोरकी झाली असती. मला खरंच मनापासून तुमचे आभार मानायचे आहेत. धन्यवाद"
या सर्वामुळं भावूक झालेल्या मारियस यांच्याकडंही बोलण्यासाठी शब्द नव्हते.
"यू आर वेल कम" एवढंच ते म्हणाले.
त्यानंतर दोघांच्याही डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. निक पुन्हा एकदा त्यांच्याकडं पाहत धन्यवाद म्हणाले.
'जीवनाचा अर्थ गवसला'
मारियस यांनी याबाबत आठवत सांगितलं की, प्रत्यारोपण यशस्वी झालं होतं आणि त्यामुळं रुग्णाचे प्राण वाचू शकले.
"हे समजल्यानंतर माझ्या डोळ्यातून फक्त अश्रूच बाहेर पडत होते," असं ते म्हणाले.
"हे सांगताना मी कामाला जात होतो त्यामुळं मला कार थांबवावी लागली. कारण मला ताजी हवा हवी होती. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते."
त्यानंतर मारियस म्हणाले की, त्यांनी आधी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण या प्रत्यार्पणानंतर जणू त्यांना जगण्याचा एक हेतू मिळाला होता. त्यामुळं निक यांनीही एकप्रकारे त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली, असंही ते म्हणाले.
"मी 13 वर्षांचा होतो तेव्हापासून काही मानसिक समस्यांचा सामना करत होतो. आयुष्यभर मी याचा सामना करत होतो," असं ते म्हणाले.
"मला माझ्या जीवनाचा मार्ग शोधणं कठीण झालं होतं. जीवनाचा अर्थच माझ्या लक्षात येत नव्हता. पण आता मी म्हणू शकतो की, मी काहीतरी चांगलं केलं आहे. मला जीवनाचा अर्थ समजला आहे."
आता या दोघांच्या शरीरातही एकच रक्त वाहत आहे. त्यामुळं या दोन अनोळखी व्यक्ती उर्वरित संपूर्ण आयुष्य 'रक्ताचे भाऊ' म्हणून एकमेकांच्या संपर्कात राहणार आहेत.











