कामसूत्र हा ग्रंथ केवळ शारीरिक संबंधाविषयी नाही; यात नेमकं काय लिहिलंय?

कामसूत्र हा वात्स्यायन ऋषींनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ.
पाश्चिमात्य जगामध्ये या ग्रंथाकडे एक ‘एरॉटिक साहित्य’ म्हणूनच पाहिलं जातं. कदाचित सध्याच्या घडीला भारतातही अनेकजण ‘कामसूत्रा’कडे शारीरिक संबंधांचं वर्णन करणारा ग्रंथ याच दृष्टीने पाहात असतील.
ज्यावेळी कॅथलिक चर्च 'शरीर एक वाईट गोष्ट आहे. शारीरिक सुख व्यर्थ आहे आणि ते मिळवण्याची इच्छा बाळगणं पाप आहे. मूल जन्माला घालणं हे सेक्समागचं एकमेव उद्दिष्टं असावं,' अशी भूमिका घेत होतं, त्याच काळात वात्स्यायन ऋषी गंगेच्या किनारी बसून कामसूत्राची रचना करत होते.
शारीरिक आनंद ही एक अतिशय चांगली गोष्ट असून ती चांगल्या रीतीने कशाप्रकारे मिळवता येऊ शकते, हे सांगत होते.
मग वात्सायनासारख्या ब्रह्मचारी ऋषीने लिहिलेला हा ग्रंथ केवळ कामुकतेबद्दलच बोलतो? या ग्रंथाकडे सेक्स मॅन्युअलसारखं पाहणं खरंच किती योग्य आहे?
‘कामसूत्र’ हे खरंतर नीट समजून न घेतलेलं किंवा चुकीच्या पद्धतीने समजून घेतलेलं पुस्तक आहे.
खोलात जाऊन या ग्रंथाची रचना, त्याचा आशय समजून घेतला तर कामसूत्राबद्दलचे अनेक गैरसमज दूर होतील. केवळ कामसूत्रच नाही, तर प्राचीन भारतातील लैंगिकतेबद्दलचे विचार आणि आपण त्यापासून किती-कसे दुरावलो, हेही लक्षात येईल.
बीबीसीने यासंबंधी एक विशेष रिपोर्टही केला होता.
कामसूत्राची रचना

फोटो स्रोत, Getty Images
कामसूत्र हा वात्स्यायन ऋषीनं लिहिलेल्या रचनांचा हा संग्रह आहे. कामसूत्राचा निश्चित काळ माहीत नाही.
अभ्यासकांच्या मते, हा ग्रंथ इसवी सन पूर्व चौथ्या शतकात लिहिला गेला असावा, तर काही संशोधक कामसूत्र इसवी सन तिसऱ्या शतकात लिहिल्याचं मानतात.
हा ग्रंथ गुप्तांच्या राजवटीच्या काळात लिहिल्याचंही मानलं जातं. अर्थात, कामसूत्रात कोठेही गुप्त राजवटीचा उल्लेख नाहीये.
खरंतर हे एक पुस्तक नाहीये. हा सात पुस्तकांचा संच आहे, ज्यामध्ये 36 प्रकरणं आहेत. यामध्ये एकूण 1250 श्लोक आहेत.
कला इतिहासाच्या अभ्यासक आणि संशोधक डॉ. अलका पांडे कामसूत्राच्या रचनेबद्दल सांगतात की, ‘कामसूत्रा’तील सात पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक हे ‘चांगलं जीवन’ कसं जगता येईल, याबद्दल आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी धर्म (नैतिक मूल्य), अर्थ (आर्थिक मूल्य), काम (शारीरीक मूल्य) यांचा त्यात समावेश आहे.
आपल्याला माहिती आहे की, ‘काम’ म्हणजे लैंगिक सुख आणि ‘उत्तम जीवन’ जगण्यासाठी तेही महत्त्वाचं आहे.
या पुस्तकसंचातील दुसरं पुस्तक हे कामक्रीडा, लैंगिक आसनांबाबत आहे.
‘कामसूत्रा’मधील या पुस्तक संचाबद्दल अधिक माहिती देताना लेखिका आणि प्राध्यापिका माधवी मेनन सांगतात की, यातील एक पुस्तक हे केवळ गृहसजावट, स्थापत्याबाबत आहे.
कामाची भावना, आनंद वाढविण्यासाठी तुम्ही ती जागा कशा पद्धतीने तयार करू शकता, सजवू शकता हे या पुस्तकात सांगितल्याचं माधवी मेनन सांगतात.
“सहावं पुस्तक हे पूर्णपणे गणिकांबद्दल आहे. याच भागात भागात महिलांबाबत थेट लेखन आहे. आता लोक म्हणतील, ‘अरे, हे वेश्यांसंबंधित आहेत किंवा वेश्याव्यवसाय आहे’ आणि पुस्तकच फेटाळून लावतील.
परंतु गणिका या शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया नव्हत्या. भारतातील त्याकाळच्या सांस्कृतिक समाजजीवनाच्या, उच्चभ्रू जीवनाच्या एक भाग होत्या,” माधवी मेनन सांगतात.
स्त्रियांच्या इच्छेला महत्त्व
सेक्सबद्दल एक सर्वसामान्य समज हा असतो की, शारीरिक संबंधांदरम्यान पुरुषाचा आनंद महत्त्वाचा असतो, स्त्रीच्या आनंदाला महत्त्वं नसतं. या विचारसरणीला ‘कामसूत्रा’तून पहिल्यांदा छेद देण्यात आला.
महिलांना 'ऑरगॅझम' म्हणजेच सर्वोच्च सुख मिळवण्यासाठी पुरुषांवर अवलंबून रहावं लागतं असं पूर्वी मानलं जाई. पण हे सुख मिळवण्यासाठी महिलांना पुरुषांची गरजच नाही हे पहिल्यांदा ‘कामसूत्रा’तून सांगण्यात आलं.
सेक्स ही स्त्री आणि पुरूष दोघांचीही शारीरिक गरज असली, तरी त्याबद्दलच्या त्यांच्या भावना, त्यांच्या सेक्शुअॅलिटीचे स्त्रोत यांमध्ये खूप अंतर असतं.
वात्स्यायन म्हणतात, 'पुरुषांची शारीरिक इच्छा ही आगीसारखी असते. ती जननेंद्रियांपासून सुरू होऊन डोक्यापर्यंत जाते. एखाद्या आगीप्रमाणे ती सहजपणे भडकते आणि तितक्याच लवकर विरतेही. याउलट स्त्रीची सेक्सची इच्छा ही पाण्यासारखी असते. ती चेतण्यासाठी आणि नंतर निवण्यासाठीही वेळ लागतो.’
लेखिका माधवी मेनन सांगतात की, “कामसूत्रात जेव्हा जेव्हा स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक संबंधांचा भाग येतो, त्यावेळी लिहिताना वात्सायनांनी महिलांची शारीरिक अवस्था काय असली पाहिजे, त्यांनी कसं चुंबन घेतलं पाहिजे, चावा घेतला पाहिजे वगैरे लिहिलं आहे.
पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे जर तिची इच्छा असेल तरच तिने केलं पाहिजे, हेही म्हटलं आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
वात्सायनांनी स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंधांबरोबरच त्यांचं प्रेम, भावनिक नातं याबद्दलही भाष्य केलं आहे. अगदी प्रेमातल्या रुसव्या-फुगव्यांबद्दल, भांडणांबद्दलही ते बोलतात.
वात्सायनांनी त्याकाळी नात्यातला ताजेपणा टिकवून ठेवण्याबद्दल लिहिलं होतं. नात्यातला रोमांच आणि तजेला टिकवण्यासाठी दोघांमध्ये भांडणं होणंही गरजेचं असल्याचं ते सांगतात.
वात्स्यायन म्हणतात, की हे भांडण तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा दोघांमधलं नातं घट्ट असतं आणि परस्पर विश्वास असतो. मात्र दोघांमध्ये प्रेमच नसेल तर हे भांडण भयंकर ठरू शकतं. ज्यावर काही उपाय नसतो.
कामसूत्रात ते लिहितात, “भांडण नेहमी पुरुष सुरू करतो. स्त्री रागावून ओरडते. आपले दागिने फेकते. आपल्या वस्तू तोडते आणि पुरुषाला फेकून मारते. मात्र या भांडणाचा एक नियम आहे. स्त्री आपला उंबरठा ओलांडत नाही."
कामसूत्रात याचं अतिशय रंजक कारणही सांगितलंय. जे शंभर टक्के स्त्रियांच्या बाजूने आहे.
"पहिलं हे की पुरुष तिची मनधरणी करायला तिच्या मागे गेला नाही तर तो तिचा अपमान होईल. दुसरं या भांडणाचा शेवट तेव्हाच होतो जेव्हा पुरुष तिच्या पायावर पडून तिची माफी मागतो आणि हे तो घराबाहेर करू शकत नाही."
समलैंगिकता आणि तृतीय पंथीयांचा उल्लेख

फोटो स्रोत, Getty Images
सुश्रृत संहितेनुसार समलिंगी पुरुष म्हणजेच क्लिबा या लैंगिक संबंधाच्या प्रवृत्तीनुसार पाच प्रकार सांगितल्याचं लेखक लिहितात. असेक्य, सुगंधिका, कुंभिका, इर्षका आणि षंढ अशी ही वर्गवारी आहे.
तनारद स्मृतीमध्ये मुखेभाग, सेव्यका आणि इर्षका असे तीन प्रकार सांगितलेले असून याप्रकारच्या पुरुषांना स्त्रियांशी लग्न करण्यास मनाई असल्याचं लिहिलंय.
वात्सायनांनी समलिंगी पुरुषांसाठी ‘पांडा’ या शब्दाखाली 14 वेगवेगळे प्रकारचे पुरुष नमूद केले आहेत.
तर समलिंगी स्त्रियांसाठी आणि स्त्रीच्या लैंगिक ओळखीसाठी ‘नस्त्रिय’ हा शब्द वैदिक साहित्यात येतो.
वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये असलेल्या उल्लेखांमधून लेखकाने 10 प्रकारच्या नस्त्रियांची नोंद केली आहे.
स्वैरीणी - इतर स्त्रियांसोबत प्रेमसंबंध ठेवणारी
कामिनी- पुरुष आणि स्त्रिया या दोघांसोबत प्रेमसंबंध ठेवणारी
स्त्रीपुंसा - वागण्यात पुरुषी भाव असणारी
षंढी- पुरुषासारखी दिसणारी आणि जिला मासिक पाळी किंवा स्तन नाही अशी
नरषंढा- जिचं स्त्रित्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय अशी
वर्ता- जिचं स्त्री-बीज गर्भाशयात रुजू शकत नाही
सुसीवक्त्रा किंवा सुसीमुखी- जिची योनी अविकसित वा लहान आहे
वंध्या- मासिक पाळी नसणारी
मोघपुस्पा - गर्भधारणा न होणारी
पुत्रघ्नी - वारंवार गर्भपात होतो अशी स्त्री
स्वैरीणीचा उल्लेख कामसूत्रामध्ये करण्यात आलाय. तर कामिनीचा भार्गव पुराणात आणि स्त्रीपुंसाचा महाभारतात. या तिन्ही प्रकारच्या स्त्रियांची लैंगिक संबंधांच्या वर्तनावरुन वर्गवारी करण्यात आली आहे.
संस्कृत शब्द षंढा अशा पुरुषाच्या संदर्भात वापरला जातो, ज्याला जन्माने मिळालेलं पुरुषत्व संपुष्टात आलंय आणि त्याचं वागणं स्त्री सारखं आहे. या प्रवृत्तीच्या विरोधी षंढी हा शब्द अशा स्त्रीसाठी आहे जिला पुरुष म्हणून जगायचंय.
नपुंसा म्हणजे इंटरसेक्स. जन्मतःचा स्त्री की पुरुष हे लिंग ठरवणं शक्य नसतं अशा व्यक्ती.
प्राचीन वैदिक भारतात ट्रान्सजेंडरना समाजात आपली लैंगिक ओळख लपवण्याची आवश्यकता नसायची असं सांगताना बीजकोश काढण्याची प्रथा नव्हती तर लैंगिक अवयव कपड्याने घट्ट बांधून ठेवायची प्रथा होती, असं अमारा लिहितात.

फोटो स्रोत, UGC
समलैंगिकतेला स्वीकारण्याबद्दल आपल्या समाजात आजही तितका मोकळेपणा दिसत नाही. जगभरातल्या अनेक देशांमध्ये समलैंगिकतेला मान्यता मिळवण्यासाठी झगडावं लागताना दिसतं.
आज एलजीबीटीक्यू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायाला स्वतःची लैंगिक ओळख सन्मानाने मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असताना, प्राचीन भारतात मात्र या समुदायाला स्वीकृती होती, त्यांची वेगळी ओळख मान्य होती.
GALVA-108 (गे अँड लेस्बियन वैष्णव असोसिएशन) या आंतरराष्ट्रीय संस्थेने वैदिक साहित्यातील लैंगिक विविधतेवर संशोधन आणि लेखन केलंय. अमारा दास विल्यम्स यांनी 2001 मध्ये या संस्थेची स्थापना आपल्या इतर तीन सहकाऱ्यांसह केली होती.
त्यांनी 'तृतीय प्रकृती- पिपल ऑफ द थर्ड सेक्स' हे पुस्तक लिहिलं आहे.
नारद स्मृती, सुश्रूत संहिता आणि वात्सायन लिखित कामसूत्रांमध्ये लैंगिकतेच्या प्रवृत्तीनुसार वर्गीकरण दिसून येत असल्याचं ते सांगतात.
कामसूत्रामध्ये 'तृतीय प्रकृती' हा शब्द वापरला आहे.
ब्रिटीश राजवटीचा परिणाम
लिंगभाव आणि व्यक्तीच्या लैंगिक वैविध्याला जर आपल्या ग्रंथात स्थान होतं, आपण ते समजून घेत होतो, तर मग बदलत्या काळात आपण याच समाजघटकांपैकी अनुदार कसे होत गेलो? त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहातला घटक म्हणून स्वीकारायला कधीपासून संकोच करायला लागलो?
लेखिका आणि प्राध्यापिक माधवी मेनन याबद्दल सांगतात, की आपण आजही ब्रिटिश वसाहतवादाने रुजवलेल्या मानसिकतेचे दुष्परिणाम भोगत आहोत.
कामसूत्रापासूनच आपल्याकडे आता ज्याला आपण तृतीयपंथी म्हणून संबोधतो, त्या ‘थर्ड जेंडर’ला संवेदनशीलतेने समजून घेतलं होतं.
ज्यांना ‘हिजडा’ असं म्हटलं जातं, त्यांना मुघलांच्या दरबारामध्ये मानाचं स्थान होतं. वेगवेगळ्या समारंभांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ही शुभ मानली जायची.
पण ब्रिटिश भारतात आले आणि या सगळ्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती - हे काय आहे? एखादा पुरूष बाईसारखा वेश करून कसा हिंडू शकतो?
मग त्यांनी काय केलं तर ‘गुन्हेगारी जमाती कायदा’ संमत केला. जर एखादी व्यक्ती आपल्या लैंगिकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी पोशाख करत नसेल, तर त्या व्यक्तिला अटक केली जाऊ शकते, अशी तरतूदच या कायद्यात होती. हे एक उदाहरण झालं.
ज्या गोष्टी प्रजननाच्या दृष्टिने आखलेल्या लैंगिकतेच्या चौकटीत बसत नव्हत्या, त्या सर्वांचंच त्यांनी गुन्हेगारीकरण केलं.
मंदिरांमधील शिल्पं आणि समलैंगिकता

फोटो स्रोत, Getty Images
प्राचीन भारतातील लैंगिकतेबद्दलचा उदार दृष्टिकोन आणि सर्वसमावेशकता ही केवळ कामसूत्रासारख्या ग्रंथामध्येच आहे, असं नाही. प्राचीन शिल्पकलांमधूनही ती व्यक्त झालेली दिसते.
या शिल्पांबद्दल प्रसिद्ध लेखक आणि पौराणिक कथांचे (Mythology) अभ्यासक देवदत्त पट्टनायक सांगतात, "कांचीपुरम, कोणार्क, खजुराहोसारख्या मंदिरांच्या भिंतींवर समलिंगी संभोगाच्या प्रतिमा आहेत. त्यात बहुदा एकमेकींच्या उत्कट मिठीत असलेल्या स्त्रिया दिसतात.
बहुधा प्रेमात असलेल्या स्त्रियांचं त्या प्रतिनिधीत्व करत असाव्यात किंवा देवळातील नृत्यांगना पुरुषाचं मन रिझवण्यासाठी नाट्याभिनय करत असाव्यात."
"त्या मानाने लैंगिक संबंध करणाऱ्या दोन पुरुषांच्या प्रतिमा तुलनेने कमी आहेत. कदाचित त्या भिंतींवर तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रतिमा असतील आणि आपण त्यांना पुरुष किंवा स्त्री चुकून म्हणत असू. हे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून असतं."
वैदिक भारतात आणि पौराणिक कथांमध्ये लैंगिकतेविषयीचे हे विचार काळाच्या ओघात मागे कसे पडले याविषयी देवदत्त सांगतात-
"हे विचार लुप्त झालेले नाहीत, आजही मथुरेत शिवजीला वृंदावनात स्त्रीरुपात पुजलं जातं. आंध्र प्रदेशात ब्रह्मोत्सव साजरा केला जातो तिरुपती बालाजीला साडी नेसवली जाते, कर्नाटकात पुलिगम्मा देवीच्या पूजेला समोर एक मिशी ठेवली जाते. पुरुषरूपी देवता स्त्रियांचा वेष करतात तर स्त्रीरूपी देवता पुरुषांची आभूषणं घेतात. याचा अर्थ लिंगभावापासून आपला विचार खूप वेगळा आहे. लिंग ही अतिशय प्रवाही गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Getty Images
खजुराहो इथे टूरिस्ट गाईड म्हणून काम करणाऱ्या नरेंद्र हे मंदिरातील या प्रतिमांबद्दल बोलताना म्हणतात की, कामक्रीडा करतानाच्या प्रतिमा या आपल्या जीवनाचा भाग आहेत. त्या मूर्तिकलेच्या माध्यमातून खजुराहोसारख्या मंदिरांमधून दाखवल्या गेल्या आहेत.
ते पुढे सांगतात, “खजुराहो ही केवळ धार्मिक राजधानी नव्हती, तर ते एक शैक्षणिक केंद्रही होतं. यामध्ये केवळ कामकला नाहीये; तर समलैंगिकता दाखवली आहे, शारीरिक संबंधामधलं कौर्यही आहे. एकूणच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आणि त्याभोवती असलेल्या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न या शिल्पातून केला असल्याचं दिसतं.”
पण अनेकदा इथे येणारे पर्यटक या शिल्पांकडे तितक्या मोकळेपणाने पाहात नाहीत, असा नरेंद्र यांचा अनुभव आहे.
“इथे येणारे अनेक पर्यटक म्हणतात की, आम्हाला ही मंदिरं पाहायचीच नाहीयेत. कारण यात कामुक प्रतिमा आहेत. आमच्यासोबत मुलं आहेत, आम्ही कुटुंबासोबत आलोय,” असं नरेंद्र सांगतात.
हा कला आणि संस्कृतीचा एक वारसा आहे, याबद्दल अजूनही आपल्याकडे जागृतीच नसल्याची खंत ते व्यक्त करतात.
कामसूत्र किंवा मंदिरांमधील प्राचीन शिल्पांमध्येच नाही, तर अनेक हिंदू ग्रंथांमध्ये, साहित्यांमध्ये काम जीवनाबद्दल, लैंगिकतेबद्दल अनेक गोष्टी आहेत.
अगदी शिव-पार्वतीच्या प्रणयाबद्दल साहित्यामध्ये उल्लेख आहे. (कालिदासाचे कुमारसंभव)
चौदाव्या शतकात जयदेवाने 'गीत गोविंद' हे काव्य लिहिलं. यामध्ये श्रीकृष्णाने महिलांप्रमाणे पोशाख केल्याचा उल्लेख आहे. त्याच्या प्रतिमा तुम्ही पाहू शकता. राधा-कृष्णाने एकमेकांसारखे पोशाख परिधान केलेल्या काही प्रतिमा आहेत.
अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा काय आहे? अर्धी शिव आणि अर्धी पार्वतीची प्रतिमा. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, मुलाला जन्म देण्याच्या हेतून शारीरिक संबंध ठेवणारे स्त्री आणि पुरुष या दोनच जेंडर आयडेंटिटी अस्तित्त्वात नाहीत, तर लैंगिक ओळख ही त्यापलिकडे असू शकते.
त्यामुळेच तुम्ही जर अध्यात्म हे पवित्र आहे आणि लैंगिक संबंध हे अपवित्र आहेत, असं समजत असाल तर थोडा विचार करायला हवा. अध्यात्म आणि लैंगिकतेला कधीकाळी आपण एका सूत्रात बांधू पाहात होतो...तो काळ होता कामसूत्राचा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








