आइस्क्रीमसारख्या दिसणाऱ्या सिनेमा थिएटरमागचा माणूस - वामन मोरेश्वर नामजोशी

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI
- Author, चेरलन मोरान
- Role, बीबीसी न्यूज, मुंबई
भारतातलं सर्वात सुंदर चित्रपटगृह कुठलं आहे माहिती आहे का? काही मोजक्याच पण आकर्षक सिनेमागृहांमध्ये अग्रस्थानी येतं ते हे आइसक्रीमच्या गुलाबी गोळ्यासारखं पाघळतंय असं वाटणारं चित्रगृह.
बाहेरून दिसतंय ते बघून त्याच्या आतल्या रूपाची कल्पनाही येणार नाही. चित्रगृहाच्या आत गेलात की, चमकणारे स्पेस बग असावेत तशी छताला लटकवलेली आधुनिक झुंबरं दिसतील; प्लास्टरचं नक्षीकाम केलेल्या (स्टको डेकोरेटेड) भिंती आणि काचेच्या तावदानांचं रेलिंग पिवळ्या झगमगाटात न्हाउन निघालेलं दिसेल. प्राचीन आणि आधुनिक शैलींची मिश्र सजावट या चित्रपटगृहात आहे.
हे वर्णन आहे जयपूरच्या राज मंदिर या प्रसिद्ध चित्रपटगृहाचं. पश्चिम राजस्थानातलं हे एक पडदा चित्रपटगृह सुरू झालं 1976 मध्ये. पण अजूनही इथे हाउसफुलचा बोर्ड लागलो आणि पर्यटकांचंही हे आकर्षण स्थळ असतं.
इतकं वाखाणलेलं आणि प्रसिद्ध असूनही या चित्रपटगृहाचा निर्माता कोण हे बहुतेकांसाठी गुलदस्त्यात असतं. या चित्रपटगृहाचं डिझाइन केलं होतं वामन मोरेश्वर नामजोशी या मराठमोळ्या नावाच्या इंटिरिअर डिझायनरने. या माणसाने 1930 ते1970 दरम्यान देशभरात एक-दोन नाही जवळपास तीन डझन सिंगल स्क्रीन चित्रपटगृह बांधली. तरीही नामजोशींचं नाव फारसं कुणाला परिचित नसतं हे विशेष.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI
यातली अनेक चित्रपटगृहं त्या वेळी गाजणाऱ्या थोड्या झगझगीत अशा आर्ट डेको शैलीमध्ये बांधली गेली. डिझायनिंगचे कथित नियम दूर सारून नावीन्य साजरं करणारी ही शैली आधुनिक होती. प्रसिद्ध वास्तुविशारद रजत सोधी सांगतात, '"या इमारती रेखीव आरेखन, वळणदार रचना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ठळकपणे ओळख देणारी डिझाइनिंग एलिमेंट आणि नियॉन लायटिंग, काँक्रीट असं आधुनिक साहित्य वापरून बांधल्या गेल्या."
"एकाच वेळी भव्य आणि प्रवाही असं या शैलीचं स्वरूप असल्याने या वास्तूंचं आरेखन आपण पुढे आणि चांगल्याकडे वाटचाल करत असल्याचं निदर्शक होतं", ते सांगतात.
नामजोशींनी बांधलेली अनेक चित्रपटगृह आता पाडली गेली आहेत किंवा भग्नावस्थेत आहेत. पण जी अजून टिकली आहेत त्यातून या माणसाची दुर्मीळ कलात्मक प्रतिभा दिसते.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतलं लिबर्टी सिनेमागृह ही एक सुंदर आर्ट डेको वास्तू आहे. मायामीनंतर जगात या शैलीने ओतप्रोत भरलेल्या वास्तू याच शहरात दिसतील. 1949 मध्ये बांधलेल्या लिबर्टी थिएटरने त्या काळातल्या ब्लॉकबस्टर बॉलिवूड सिनेमांचे प्रीमिअर पाहिले. गोठलेलं कारंजं आणि इलेक्ट्रिक दिव्यांची कल्पक रचना यासाठी लिबर्टी प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI
1954 मध्ये दिल्लीत सुरू झालेलं गोल्चा चित्रपटगृह आता बंद पडलं आहे. पण त्या वेळी वैशिष्ट्यपूर्ण काचेची शिल्पं, भव्य वक्राकार जिने आणि शिल्पाकृतींनी कोरलेलं वेगळं छत यासाठी ते ओळखलं जायचं.
सोधी म्हणतात, ही चित्रपटगृह एक वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशानेच बांधली होती. "बाहेरच्या नेहमीच्या जगातल्या रस्त्यावरून सिनेमातल्या विलक्षण जगात आणि त्यातल्या गोष्टीत हरवून जाण्यासाठी तुमच्या मनाला सज्ज करणाऱ्या या जागा मुद्दामच दृश्यमोहक पद्धतीने डिझाइन केल्या होत्या."
नामजोशी यांनी हे सिनेमाचं वातावरण निर्माण करण्यासाठीच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यदृष्टी वापरली. कन्सील्ड लाइट्समुळे स्वप्नवत वातावरण निर्माण झालं; थक्क करणारी छताची संरचना आणि त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती यामुळे प्रतिध्वनी कमी होईल याचीही काळजी घेतली गेली. चित्रपटातले संवाद सुस्पष्टपणे ऐकू यावेत यासाठीची ती रचना होती. लाकडी आणि काचेच्या झुंबरांच्या डिझाइनसाठीसुद्धा नामजोशी प्रसिद्ध होते. त्यांनी रचनेमध्ये ब्रह्मदेशी सागवान आणि संगमरवराचा सढळहस्ते वापर केला.
"नामजोशी हे त्या काळातले सर्वात अचूक डिझाइन करणारे बुद्धिमान आणि सर्जनशील डिझायनर होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व एक गूढच असलं तरी त्यांचं काम फारच लक्षणीय आहे", असं मुंबई आर्ट डेको या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अतुल कुमार सांगतात. त्यांची संस्था शहरातल्या आर्ट डेको वास्तूंच्या जतनाचं काम करते.
वामन मोरेश्वर नामजोशींचा जन्म १९०७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला. वडील शाळेत शिक्षक तर आई गृहिणी होती. थोरला भाऊ विष्णू त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. किशोरवयातच हे दोघे भाऊ घरातून पळून गेले आणि त्यांनी मुंबई गाठली.
मुंबईत आल्यावर छोटी-मोठी मिळेल ती कामं करत ते राहिले. रेस्टॉरंट्समध्ये काम केलं. ब्रिटीश कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिशिअन म्हणून आणि नंतर सुतार, फर्निचर डिझायनर म्हणून ते काम करत राहिले. दुसऱ्या बाजूला त्यांनी कलेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि फोटोग्राफीचाही अभ्यास केला. १९३९ मध्ये त्यांनी नामब्रोस - Nambros नावाची स्वतःची डिझाइन फर्म सुरू केली.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI
तीन वर्षांनंतर भाऊ विष्णू यांनी मुंबई सोडून दुसऱ्या शहरात बस्तान बसवलं आणि स्वतःची फर्म सुरू केली. वामन नामजोशी मात्र मुंबईतच राहिले. चित्रपटगृहाच्या आरेखनांची आपली शैली अधिक विकसित करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. नामजोशींबद्दल गेली तीन वर्षं संशोधन करणारे आणि त्यांच्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणारे पूर्वाश्रमीचे सिनेमॅटोग्राफर आणि आताचे फोटोग्राफर हेमंत चतुर्वेदी सांगतात, "हे दोघे भाऊ ज्या ब्रिटीश कंपन्यांमध्ये काम करत होते, तिथे इंमोर्टेड कॅटेलॉग्जवरून त्यांची आधुनिक शैलीतील डिझाइन्सची ओळख झाली असणार. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली असण्याची शक्यता आहे."
या मायावी वास्तुरचनाकाराबद्दल माहिती मिळवणं सोपं नव्हतं, असं चतुर्वेदी सांगतात. Google सर्चवर त्यांच्याविषयी काहीच येत नाही. चतुर्वेदी त्यांच्यासंदर्भात अनेक आर्किटेक्ट आणि डिझायनर्सशी बोलले पण कुणालाच या माणसाविषयी माहिती नाही. मग या नामजोशींचा शोध घेण्यासाठी त्यांनी टेलिफोन डिरेक्टरीतून नामजोशी आडनावाची 75 माणसं शोधून काढली आणि त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यातून हाती काहीच लागलं नाही.
मग एक दिवशी, नामजोशींशी संबंधित एका डिझायन फर्मबद्दल त्यांना समजलं आणि त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधायचं ठरवलं. त्यांच्या फोन कॉल्सना उत्तरच मिळालं नाही. शेवटी दोन वर्षांनंतर त्यांनी सहज पुन्हा प्रयत्न केला तेव्हा समोरून एका माणसाने फोन उचलला. "मी वामन नामजोशींबद्दल विचारल्यावर ते माझे दिवंगत काका असल्याचं उत्तर मला मिळालं", चतुर्वेदी सांगतात.
वयाच्या 89 व्या वर्षी 1996 साली वामन मोरेश्वर नामजोशी निवर्तले. फोनवरचा माणूस त्यांचा पुतण्या होत्या. त्याच्याशी आणि नामजोशींच्या नातीशी बोलून तसंच नामजोशींना काम दिलेल्या थिएटर मालकांशी बोलून या प्रतिभावान कलाकाराबद्दल चतुर्वेदींना तुकड्या-तुकड्यातून माहिती मिळाली.
ते सांगतात, "नामजोशी अत्यंत रागीट होते आणि परफेक्शनिस्ट होते. एखादी आपणच केलेली गोष्ट आवडली नाही तर ते ती फाडून किंवा फोडून टाकत आणि नव्याने बांधायला घेत. मनासारखं काम होईपर्यंत ते सोडत नसत, अशी माहिती मला मिळाली."
आर्ट डेको प्रेरित चित्रपटगृहांच्या बांधणीतून देशातल्या शहरी लँडस्केपचं रूपांतर करणाऱ्या सुरुवातीच्या वास्तुविशारदांपैकी नामजोशी एक होते. आर्ट डेको शैलीने प्रभावित झालेल्या सर्वात पहिल्या शहरांपैकी एक असलेल्या त्या वेळच्या बाँबे प्रांतात त्यांची तरुणपणची वर्षं गेली. त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर या शैलीचाच मोठा प्रभाव पडला असावा.

फोटो स्रोत, HEMANT CHATURVEDI
'बंदराचं शहर असल्याने सगळ्याचे आंतरराष्ट्रीय प्रभाव मुंबईवर सर्वप्रथम आणि अगदी सहजतेने पडत. आधुनिक शैलीची चळवळ किंवा आर्ट डेको नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वास्तुशैलीचा उगम पश्चिम युरोपात 1920 च्या आसपास झाला. वेगवेगळ्या सिनेमा, मॅगझिन्स, फॅशन आणि फर्निचरमधून ही शैली तत्कालीन भारतीय वास्तुविशारद आणि डिझायनर्सना भुरळ घालत होती', असं मुंबईच्या जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधले प्राध्यापक मस्तानशिर दळवी सांगतात. या शहराने रिक्लमेशनचा टप्पापण पाहिला आहे. नियोजनबद्ध, लोककेंद्रित इमारतींसाठी या शहरात समुद्र हटवून जागा निर्माण केली गेली. त्याच वेळी बांधकाम साहित्यात दगड आणि विटांची जागा काँक्रिटने घ्यायला सुरुवात केली होती. यामुळे इमारतींच्या आकारात काही प्रयोग करणंही शक्य झालं, दळवी म्हणाले.
वास्तुशैलीतल्या या बदलांमुळे शहरात लिबर्टीसारख्या रचना उभ्या राहिल्या ज्यात सर्वसामान्य नागरिकांना वास्तुरचनेत सहभागी व्हायला मिळालं. "त्या वेळच्या प्रभावशाली भव्य व्हिक्टोरिअन गॉथिक इमारती आणि शानदार ब्रिटीश बंगले याउलट आर्ट डेको शैलीतल्या इमारती सर्वसामान्यांना सामावून घ्यायला सज्ज होत्या, त्यांच्याशी दृश्यात्मक आणि प्रत्यक्ष संवाद साधत होत्या", दळवी सांगतात.
पण जसजसं बांधकाम साहित्य बदलत गेलं आणि नवीन तंत्रज्ञान आलं तसतसा सौंदर्यदृष्टीतही बदल झाला. कोरीव नक्षीकामाऐवजी अधिक उपयोजित रचना करायला आर्किटेक्ट्सनी सुरुवात केली. आता या जुन्या इमारती त्या बदलाच्या काळाची साक्ष देत उभ्या आहेत. एके काळी त्यांनी स्थानिकांना सामावून घेणारं त्यांच्या आकांक्षांशी नातं सांगणारं डिझाइन लँडस्केप या देशाला दिलं होतं.
या वास्तुशैलीचा वापर करणारे फारसे भारतीय वास्तुविशारद आणि रचनाकार जगाला माहितीदेखील नाहीत. हाच त्यांच्या विनम्रतेला आणि व्यावसायिकेला केलेला सलाम आहे, अतुल कुमार सांगतात. "ते अत्यंत विनयशील, सर्वसमावेशक आणि एकमेकांच्या कामाबद्दल पुरेपूर आदर करणारे होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या रेखाटनांवर आपल्या नावासह स्वाक्षरीही केली नाही," त्यांनी सांगितलं.
पण भारतीय रस्त्यांवर त्यांच्या काही कलाकृती आजही उभ्या आहेत आणि कुणीही, अक्षरशः कुणीही आत शिरून आतल्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








