नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाचे किती आणि कोण मंत्री? एका मुस्लीम व्यक्तीचाही समावेश

नितीश कुमार यांनी गुरुवारी (20 नोव्हेंबर) दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. हे दोघेही आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

पाटणा इथल्या गांधी मैदानावर झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्याशिवाय विजय कुमार चौधरी, मंगल पांडे, श्रवण कुमार आणि लेशी सिंह यांच्यासह एकूण 26 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

या 26 मंत्र्यांमध्ये तीन महिला आणि एका मुस्लीम नेत्यांचाही समावेश आहे. महिला आमदारांमध्ये लेशी सिंह या संयुक्त जनता दल (जेडीयू) आमदार आहेत. रमा निषाद आणि श्रेयसी सिंह या भाजपच्या आमदार आहेत.

नितीश यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री मोहम्मद जमा खान हे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार आहेत. ते चैनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

बुधवारी (20 नोव्हेंबर) एनडीएच्या 202 आमदारांच्या बैठकीत नितीश कुमार यांची सर्वानुमते नेतेपदी निवड करण्यात आली.

जेडीयूनेही आपल्या स्वतंत्र बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड केली होती.

बुधवारी (20 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) आमदारांच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक केशव प्रसाद मौर्य यांनी भाजपच्या आमदारांच्या गटाचे नेते म्हणून सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा केली. विजय कुमार सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली.

एनडीएने गेल्या आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली.

243 जागांपैकी एनडीएला 202 जागा मिळाल्या. भाजपा 89, जेडीयू 85, एलजेपी (आर) 19, हिंदुस्तानी अवाम मोर्चा 5 आणि आरएलएम 4 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले.

सम्राट चौधरी

सम्राट चौधरींनी 7 वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आधी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि गेल्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

सम्राट चौधरी यांनी या निवडणुकीत तारापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

मुंगेरच्या लखनपूर गावात जन्मलेल्या सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी हे 6 वेळा आमदार होते. ते खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांची आई पार्वती देवी या देखील तारापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

विजय कुमार सिन्हा

विजय कुमार सिन्हा हे नितीश कुमार यांच्या आधीच्या सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री होते. ते लखीसराय मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अमरेश कुमार यांचा 24 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

विजय कुमार सिन्हा यांचा जन्म लखीसरायच्या तिलकपूर गावात झाला आहे. ते आरएसएस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही सक्रीय होते.

2017 मध्ये नितीश कुमार यांनी त्यांच्याकडे कामगार मंत्रालय सोपवलं होतं. 2020 मध्ये एनडीएच्या विजयानंतर सिन्हा यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. पण 2022 मध्ये नितीश कुमार यांनी महाआघाडीसोबत हातमिळवणी केली आणि अविश्वास प्रस्तावाच्या दबावामुळे सिन्हा यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मोहम्मद जमा खान

संयुक्त जनता दल (जेडीयू) आमदार मोहम्मद जमा खान हे नितीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील एकमेव मुस्लीम मंत्री आहेत.

मोहम्मद जमा खान हे चैनपूर विधानसभा मतदारसंघातून जनता दलाचे (युनायटेड) आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे बृज किशोर बिंद यांचा पराभव केला.

लेशी सिंह

संयुक्त जनता दलाने (जेडीयू) लेशी सिंग यांना धमदाहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

धमदाहा ही सीमांचलमधील (पूर्णिया) एक महत्त्वाची विधानसभा जागा आहे. येथे 2015 पासून संयुक्त जनता दलाचे वर्चस्व आहे.

2020 मध्ये लेशी सिंह यांनी आरजेडीचे दिलीप कुमार यादव यांचा 33 हजार 954 मतांनी पराभव केला.

2015 मध्ये लेशी सिंह यांनी आरएलएसपीचे शिवशंकर ठाकूर यांचाही 30 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

नितीश कुमार यांनी समता पार्टीची स्थापन केल्यापासून लेशी सिंह त्यांच्यासोबत आहेत.

लेशी सिंह यांनी बिहार महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

श्रेयसी सिंह

श्रेयसी सिंह जमुई विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार मोहम्मद शमशाद आलम यांचा पराभव केला.

श्रेयसी सिंह या एक प्रसिद्ध नेमबाज आहेत. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत (गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया) महिला डबल ट्रॅप स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी, त्यांनी 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत (ग्लासगो, स्कॉटलंड) रौप्यपदक जिंकले होते.

2020 मध्ये, त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर 2020 ची निवडणूक जमुई येथून जिंकली.

श्रेयसी यांनी दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्या दहावीत असताना त्यांना अथेन्स ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारे राज्यवर्धन सिंह राठोड यांनी नेमबाजीला करिअर म्हणून पुढे नेण्याची प्रेरणा दिली.

श्रेयसी या दिवंगत दिग्विजय सिंह यांच्या कन्या आहेत. दिग्विजय सिंह बिहारमधील बांका येथील खासदार आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होते.

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी

भाजप

  • सम्राट चौधरी
  • विजयकुमार सिन्हा
  • दिलीप जैस्वाल
  • मंगल पांडे
  • रामकृपाल यादव
  • नितीन नवीन
  • संजय सिंग वाघ
  • अरुण शंकर प्रसाद
  • सुरेंद्र मेहता
  • नारायण प्रसाद
  • रमा निषाद
  • लखेंद्र सिंग रोशन
  • श्रेयसी सिंग
  • प्रमोद कुमार

संयुक्त जनता दल (जेडीयू)

  • विजयकुमार चौधरी
  • बिजेंद्र प्रसाद यादव
  • श्रावणकुमार
  • अशोक चौधरी
  • लेशी सिंह
  • मदन साहनी
  • सुनील कुमार
  • मोहम्मद जामा खान

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)

  • संजय कुमार
  • संजयकुमार सिंग

हिंदुस्थानी अवाम मोर्चा

  • संतोष सुमन (जीतन राम मांझी यांचा मुलगा)

राष्ट्रीय लोक मोर्चा

  • दीपक प्रकाश (उपेंद्र कुशवाह यांचा मुलगा)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.