You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
AI आपलं पाणी 'गिळून' टाकतंय, एका प्रश्नाच्या उत्तरासाठी चॅटजीपीटी किती पाणी वापरतं?
- Author, सारा इब्राहिम
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस
आर्टिफिशीयल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर वेगानं वाढतो आहे.
या नव्या टेक्नॉलॉजीसाठी मोठ्या प्रमाणावर वीजेची गरज असते. डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याचा वापर केला जातो.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील अर्धी लोकसंख्या आधीपासूनच पाण्याच्या कमतरतेशी दोन हात करत आहे.
हवामान बदल आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे येणाऱ्या काळात हे संकट अधिकच गहिरं होत जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पाण्याची असलेली कमतरता एआयच्या वाढत्या वापरामुळे अधिकच वाढू शकते का, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे.
ओपनएआयचे चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर (सीईओ) सॅम ऑल्टमन यांचं असं म्हणणं आहे की, चॅटजीपीटीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी जवळपास एका चमच्याच्या पंधराव्या भागाएवढं पाणी लागतं.
मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कंपनीच्या जीपीटी-3 मॉडेलकडून 10 ते 50 प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जवळपास अर्धा लीटर पाणी लागतं. याचा अर्थ, प्रत्येक उत्तरासाठी जवळपास 2 ते 10 चमचे पाणी वापरलं जातं.
पाण्याच्या वापराचा हा अंदाज अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ- कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे, त्याचं उत्तर किती मोठं आहे, त्याचं उत्तर कुठं प्रोसेस होत आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातील कॅल्क्यूलेशनसाठी किती गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, या साऱ्या गोष्टींवर पाण्याचा वापर अवलंबून असतो.
अमेरिकेतील संशोधकांच्या अभ्यासामध्ये, 500 मिलीलीटरचा अंदाज लावण्यात आला आहे, त्यामध्ये वीज तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा वापरही पकडण्यात आला आहे.
वीज तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्यामध्ये कोळसा, गॅस अथवा अणू उर्जा केंद्रांमधील टर्बाईन्स चालवण्याकरीता वाफ तयार करण्यासाठी लागणारं पाणी इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे.
सॅम ऑल्टमन यांनी दिलेल्या आकडेवारीमध्ये कदाचित याचा समावेश करण्यात आलेला नाही. बीबीसीने ओपनएआयला याबाबत विचारलं तेव्हा कंपनीने हिशेब करण्याची पद्धत सांगितली नाही.
ओपनआयचं असं म्हणणं आहे की, चॅटजीपीटी प्रत्येक दिवशी एक अब्ज प्रश्नांची उत्तरे देतं आणि चॅटजीपीटी हे काही एकमेव एआय बॉट नाही.
या अमेरिकन अभ्यासाचा अंदाज आहे की, 2027 पर्यंत एआय इंडस्ट्री प्रत्येक वर्षी डेन्मार्कसारख्या संपूर्ण देशापेक्षा चार ते सहा पट अधिक पाणी वापरेल.
या अभ्यासातील एक लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाईडचे प्रोफेसर शाओलेई रेन यांचं असं म्हणणं आहे की, "जेवढा अधिक आपण एआयचा वापर करु, तितकं जास्त पाणी खर्च होईल."
आपण जे काही ऑनलाईन काम करतो, मग ते मेल पाठवणं असो, व्हीडिओ पाहणं असो, वा डीपफेक तयार करणं असो, हे सगळंच मोठमोठ्या डेटा सेंटर्समध्ये असलेल्या हजारो कॉम्प्युटर्समधल्या सर्व्हरकडून प्रोसेस केलं जातं. यातील काही डेटा सेंटर्स अनेक फुटबॉल मैदानांइतके मोठे असतात.
या सर्व्हर्समध्ये जेव्हा सातत्याने वीज वाहते, तेव्हा ते प्रचंड गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी अत्यंत स्वच्छ आणि ताज्या पाण्याची फार गरज असते. हे थंड करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. मात्र, काही सिस्टीममध्ये वापरण्यात आलेल्या पाण्याच्या 80 टक्के भागाचं बाष्पीभवन होतं.
एआयची कामं, जसं की, इमेज तयार करणं, व्हीडिओ तयार करणं अथवा जटील पद्धतीचा कंटेट तयार करणं, या आणि अशा सर्व कामांसाठी सामान्य ऑनलाईन कामे जसे की, ऑनलाईन शॉपिंग अथवा सर्च करणं, इत्यादी कामांच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक कम्प्युटिंग पॉवरची गरज भासते. त्यामुळेच, या कामांमध्ये वीजेचा वापरही अधिक प्रमाणात होताना दिसतो.
दोन्हींमध्ये किती फरक पडतो, त्याची अचूक आकडेवारी मिळणं कठीण आहे. मात्र, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा (आयईए) असा अंदाज आहे की, चॅटजीपीटीला विचारण्यात आलेला एक प्रश्न हा गूगलवर करण्यात आलेल्या एका सर्चच्या तुलनेत जवळपास 10 पट अधिक वीज खर्च करतो.
आणि जेव्हा अधिक वीजेची गरज भासते, तेव्हा उष्णताही अधिक निर्माण होते. यामुळे, सर्व्हर्सना थंड करण्यासाठी पाण्याची गरजही अधिक लागते.
मोठ्या एआय कंपन्या या गोष्टीची माहिती देत नाहीत की, त्यांच्या एआयशी निगडीत घडामोडींसाठी किती पाणी लागतं, मात्र, एआयला लागणाऱ्या एकूण पाण्याच्या वापराचे आकडे सातत्याने वाढतानाच दिसत आहेत.
गूगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या ओपनआयमध्ये मोठी गुंतवणूक केलेल्या आणि शेअरहोल्डर असलेल्या कंपन्या आहेत.
या तिन्ही कंपन्यांच्या एन्व्हायरमेंटल रिपोर्टनुसार, 2020 नंतर त्यांच्या पाण्याच्या वापरामध्ये गतीने वाढ झालेली आहे. या दरम्यानच्या काळात गूगलच्या पाण्याचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. अमेझॉन वेब सर्व्हीसेसने (एडब्ल्यूएस) कोणतीही आकडेवारी दिलेली नाहीये.
जसजशी एआयची मागणी वाढेल तसतसा 2030 पर्यंत डेटा सेंटर्सकडून होणाऱ्या पाण्याचा वापरही जवळपास दुप्पट होईल, असा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा (आयईए) अंदाज आहे.
यामध्ये, वीज तयार करण्यासाठी आणि कॉम्प्युटर चीप तयार करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचाही समावेश केलेला आहे.
गूगलचं असं म्हणणं आहे की, त्यांच्या डेटा सेंटर्सनी 2024 मध्ये पाण्याच्या स्त्रोतांकडून 37 अब्ज लीटर पाणी घेतलं आहे. त्यामधील 29 अब्ज लीटर पाणी 'वापरलं' गेलं तर अधिकतर पाणी बाष्पीभवन होऊनच उडून गेलं.
पाण्याचा हा वापर अधिक आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याची तुलना कशासोबत करता यावर अवलंबून आहे.
संयुक्त राष्ट्रांनुसार, एवढ्या प्रमाणातील पाणी 16 लाख लोकांची एका वर्षापर्यंत 50 लीटर पिण्याच्या तसेच इतर वापराची गरज पूर्ण करु शकते. अथवा, गुगलच्या मते, हे पाणी नैऋत्य अमेरिकेतील 51 गोल्फ कोर्सना एका वर्षासाठी सिंचन करण्याइतकं आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक दुष्काळग्रस्त भागांमध्ये, जसे की, युरोप, लॅटीन अमेरिका आणि अमेरिकेतील एरिझोना राज्यामध्ये डेटा सेंटर्सना होणारा विरोध सातत्याने चर्चेत आहे.
स्पेनमध्ये 'युअर क्लाऊड इज ड्राईंग अप माय रिव्हर' नावाचा एक पर्यावरणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा ग्रुप तयार झाला आहे. हा ग्रुप वाढत्या डेटा सेंटर्सना विरोध करतो.
सध्या प्रचंड दुष्काळ असलेल्या चिली आणि उरुग्वेमध्ये पाण्याच्या वापराबाबत होणाऱ्या विरोधानंतर गूगलने आपल्या डेटा सेंटर्सच्या उभारणीबाबतची योजना स्थगित केलेली आहे अथवा तिच्यात बदल केले आहेत.
एनटीटी डेटानुसार, जगभरात 150 हून अधिक डेट सेंटर्स आहेत. कंपनीचे सीईओ अभिजीत दुबे सांगतात की, "गरम आणि दुष्काळग्रस्त भागामध्ये डेटा सेंटर्स उभं करण्यातील रस वाढतो आहे."
ते म्हणतात की, जमिनीची उपलब्धता, वीजेची पायाभूत सुविधा, सौर आणि पवन यांसारखे अक्षय ऊर्जा स्रोत आणि सोपे नियम यामुळे कंपन्यांसाठी असे परिसर आकर्षक ठरतात.
तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, जिथे जास्त आर्द्रता असते तिथे गंजण्याची समस्या वाढते आणि इमारत थंड ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. या कारणास्तव, कोरड्या भागात डेटा सेंटर्स उभारणं कधीही फायदेशीर मानलं जातं.
गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा या कंपन्या आपल्या ताज्या एन्व्हायरमेंटल रिपोर्ट्समध्ये ही गोष्ट मान्य करतात की, ते दुष्काळग्रस्त भागातून पाणी घेत आहेत.
या कंपन्यांच्या ताज्या एन्व्हायरमेंटर रिपोर्ट्सनुसार, गूगलचं असं म्हणणं आहे की, ते जितकं पाणी घेतात, त्यातील 14 टक्के पाणी अशा भागातून येतं, जिथे पाण्याच्या कमतरतेचा धोका सर्वाधिक आहे आणि 14 टक्के पाणी अशा भागातून घेतलं जातं, जिथं पाण्याच्या कमतरतेचा धोका मध्यम स्वरुपात आहे.
मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की, त्यांना लागणारं 46 टक्के पाणी अशा भागातून येतं, जिथे "पाण्याचा ताण" अनुभवला जातो.
दुसऱ्या बाजूला, मेटाचं असं म्हणणं आहे की, त्यांना लागणारं 26 टक्के पाणी अशा भागातून येतं जिथं पाण्याची अधिक अथवा सर्वाधिक कमतरता भासते. एडब्ल्यूएसने (अमेझॉन वेब सर्व्हीसेस) कोणतेही आकडे दिलेले नाहीत.
प्रोफेसर रेन सांगतात की, ड्राय अथवा एअर कुलिंग सिस्टीमचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, त्यामुळे, पाण्याच्या जागी अधिक वीज खर्च होते.
मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि अमेझॉनचं असं म्हणणं आहे की, ते 'क्लोज्ड लूप' सिस्टीम तयार करत आहेत, ज्यामध्ये पाणी अथवा इतर एखादा तरल पदार्थ सातत्याने सिस्टीममध्ये वाहता राहतो. शिवाय, तो सतत बदलावाही लागत नाही.
अभिजीत दुबे यांचं असं म्हणणं आहे की, भविष्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये या प्रकारच्या सिस्टीम्सची अधिक गरज भासेल, कारण, इंडस्ट्री या सिस्टीमला आपलंसं करण्याबाबतीत अद्यापही फारच प्राथमिक अवस्थेत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
डेटा सेंटरमधून निर्माण होणारी उष्णता जवळच्या घरांमध्ये वापरता येईल, अशी सिस्टीम देखील बनवली जात आहे. जर्मनी, फिनलंड आणि डेन्मार्क सारख्या देशांमध्ये हे काम केलं जात आहे.
तज्ञांचं म्हणणं आहे की, कंपन्या सामान्यतः स्वच्छ, गोडं पाणी वापरण्यास प्राधान्य देतात, जे पिण्यासाठी वापरले जातं. कारण, ते बॅक्टेरिया आणि गंजण्याचा धोका कमी करते.
मात्र, काही कंपन्या आता समुद्राचं पाणी किंवा कारखान्यातील सांडपाणी (जे पिण्यायोग्य नाही) वापरण्याचा प्रयत्न करत आहेत.
धोकादायक हरितगृह वायू असलेल्या मिथेनची गळती शोधणं किंवा इंधन वाचवणाऱ्या मार्गांवर वाहतूक वळवणं, अशा कामांकरीता एआयचा वापर आधीपासूनच केला जात आहे. जेणेकरुन, पृथ्वीवरचा ताण कमी होऊ शकेल.
संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या युनिसेफमधील इनोव्हेशन ऑफिसचे डायरेक्टर थॉमस डेव्हीन सांगतात की, "एआय जगभरातील मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि कदाचित हवामान बदलासारख्या गोष्टींमध्ये मोठा बदल आणू शकतं."
पण ते असंही म्हणतात की, त्यांना या कंपन्यांमध्ये 'सर्वांत शक्तिशाली आणि सर्वांत प्रगत मॉडेल कोण तयार करू शकतं,' अशा प्रकारची स्पर्धा पाहण्याऐवजी, कोण अधिक 'कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे' काम करू शकतं, अशा प्रकारची स्पर्धा पाहायला त्यांना अधिक आवडेल.
कंपन्यांनी त्यांचे मॉडेल्स ओपन सोर्स करावेत, म्हणजेच ते सर्वांना उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून कुणीही त्यांचा वापर करू शकेल. तसेच, त्यांच्या गरजेनुसार ते बदलू शकेल, अशीही त्यांची इच्छा आहे.
थॉमस डेविन म्हणतात की, जर कंपन्यांनी त्यांचे मॉडेल्स सर्वांसाठी खुले केले तर मोठ्या मॉडेल्सना ट्रेन करण्याची गरज कमी होईल.
ट्रेनिंग म्हणजे सिस्टममध्ये भरपूर डेटा टाकणे आणि नंतर त्या आधारावर उत्तरे तयार करण्याची प्रक्रिया होय. कारण, या प्रक्रियेत भरपूर वीज आणि पाणी लागते.
लोरेना जौमे-पलासी या एक स्वतंत्र संशोधक आहेत. त्यांनी अनेक युरोपीय सरकारांना, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना सल्ला दिला आहे. त्या एथिकल टेक सोसायटी नावाचं नेटवर्क चालवतात. त्या सांगतात की, "एआय इतक्या वेगाने विस्तारत आहे की ते पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत बनवणं अशक्य आहे."
त्या म्हणतात की, "आपण ते अधिक प्रभावी बनवू शकतो, पण जसजसे आपण ते अधिक प्रभावी बनवू तसतसा त्याचा वापर वाढेल."
पुढे त्या म्हणतात, "भविष्यात या शर्यतीत टिकून राहण्यासाठी, मोठ्या आणि वेगवान एआय प्रणाली तयार करण्यासाठी, आपल्याकडे पुरेसा कच्चा माल नाही."
गुगल, मायक्रोसॉफ्ट, एडब्ल्यूएस आणि मेटा या कंपन्या म्हणतात की, ते प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार कूलिंग टेक्नोलॉजी निवडतात.
या सर्व कंपन्यांनी 2030 पर्यंत 'वॉटर पॉझिटिव्ह' होण्याचे ध्येय ठेवलं आहे. याचा अर्थ असा की, सरासरी ते जितक्या पाण्याचा वापर करतील, त्याहून जास्त पाणी ते परत करण्याचा प्रयत्न करतील.
यासाठी, या कंपन्या त्यांचे डेटा सेंटर्स असलेल्या भागात जलसंवर्धन आणि पुनर्भरण प्रकल्प चालवतात. या प्रकल्पांमध्ये जंगले किंवा पाणथळ जागा तयार करणे, पाइपलाइनमधील गळती शोधणे किंवा चांगल्या सिंचन पद्धतींचा अवलंब करणे इत्यादींचा समावेश होतो.
एडब्ल्यूएस असं म्हणतं की त्यांनी त्यांचं उद्दिष्ट्यं 41 टक्क्यांपर्यंत गाठलेलं आहे. तर, मायक्रोसॉफ्ट म्हणतं की ते 'योग्य दिशेने वाटचाल करत आहेत.' गूगल आणि मेटाने प्रसिद्ध केलेल्या डेटावरून असं दिसून येतं की, पाणी पुनर्संचयनाची प्रगती वेगानं होत आहे. परंतु, युनिसेफचे थॉमस डेविन म्हणतात की, एकूणातच ध्येय गाठण्यासाठी 'अजून बराच पल्ला गाठायचा आहे.'
ओपनएआय म्हणतं की ते पाणी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी 'कठोर परिश्रम' करत आहेत. ते पुढे असंही म्हणतात की 'आपल्या कम्प्युटिंग पॉवरचा विचारपूर्वक वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे.'
परंतु प्रोफेसर रेन म्हणतात की, कंपन्यांचे पाण्याच्या वापराचे अहवाल अधिक पारदर्शक आणि सुसंगत असले पाहिजेत. "जर आपण ते मोजूच शकत नसलो तर आपण ते व्यवस्थापितही करू शकणार नाही," असं ते म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.