पुसेसावळीच्या घटनेनंतर कसं बदललं लोकांचं आयुष्य, कशी आहे गावातील परिस्थिती?

आएशा शिकलगार

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, आएशा शिकलगार
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

10 सप्टेंबर 2023 मध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी या ठिकाणी मशिदीवर जमावाने दगडफेक केली होती. या हल्ल्यात नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुसेसावळीत अनेक दिवस तणावाचं वातावरण होतं. एका वर्षानंतर, बीबीसी मराठीने पुसेसावळीला भेट दिली. या घटनेनंतर लोकांचे आयुष्य कसे बदलले त्याचा हा रिपोर्ट.

“त्यांची कमी खूप जाणवते, प्रत्येक क्षणाला. ते असते तर हे असं झालं नसतं! माझ्या मुलीला वडिलांचा आधार राहिला असता. आता मी जो स्ट्रगल करतेय, तो करावा नसता लागला,” हे बोलत असताना आएशा शिकलगार यांच्या डोळ्यात पाणी तरळतं. पुसेसावळी घटनेच्या वर्षभरानंतर पती नूरहसन शिकलगार यांना आठवताना आएशा भावूक होतात.

आई आणि लहान मुलीसमोर आपण खंबीर आहोत, हे दाखवण्यासाठी आएशा त्यांच्यासमोर कधी रडत नाहीत.

परंतु, एकटी असताना अश्रूंना मी वाट मोकळी करते, असं त्या सांगतात.

गेल्यावर्षी ज्यावेळी नूरहसन यांचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यावेळी आएशा गरोदर होत्या.

आएशा आणि नूरहसन यांच्या लग्नाला आठच महिने झाले होते. आएशा गरोदर होत्या म्हणून माहेरी आल्या होत्या.

नूरहसन हे त्यांच्या राहत्या घरी पुसेसावळीत होते. नमाज पठणासाठी ते मशिदीत गेले आणि तिथे जमावाने दगडफेक केली.

वर्षभरात विविध कारणांनी अनेकदा पुसेसावळीत तणाव निर्माण झालाय

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, वर्षभरात विविध कारणांनी अनेकदा पुसेसावळीत तणाव निर्माण झालाय

गेल्यावर्षी पुसेसावळीत हिंसाचाराची घटना घडली. पुसेसावळीतील काही तरुणांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस आक्षेपार्ह आहे असं म्हणत गावातील लोकांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी निषेध मोर्चा काढला होता.

त्यानंतर हा मोर्चा जेव्हा मशिदीजवळ आला, तेव्हा त्यातील काही जणांनी मशिदीवर दगडफेक केली होती. त्यातच नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला होता.

या कथित आक्षेपार्ह स्टेटसविरोधात काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

दोन्ही समुदायांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केलं होतं. परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत असताना पुन्हा त्या व्हीडिओचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि 10 सप्टेंबरला मोर्चा निघाला. मशिदीवर दगडफेक झाली आणि तणाव निर्माण झाला.

गावातल्या मुस्लिमांच्या गाड्या आणि दुकानांचंही नुकसान या जमावाने केलं. रात्री पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली आणि त्यानंतर एकूण 37 जणांना अटक केली.

'मृत्यूचे खापर आपल्यावर फोडले जाईल याची कल्पनाच नव्हती'

पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला आधार मिळावा ही आएशा यांची अपेक्षा काही काळातच भंग पावली. उलट, मृत्यूचे खापरच त्यांच्यावर फोडल्यामुळे पतीच्या मृत्यूचे दुःख दुहेरी झाल्याचं त्या सांगतात.

सासरच्या मंडळींनी आपल्यालाच जबाबदार धरल्याचे आएशा सांगतात.

त्या सांगतात, “माझ्या सासरच्यांचं असं म्हणणं होतं की मी अपशकुनी आहे. 8 महिन्यांच्या आतच नवऱ्याबरोबर अशी घटना घडली. घटनेच्या दोन महिन्यांतच त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं.”

आता त्यांच्या सासरच्या घरी कुणीच राहत नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे सासरे वारले. त्यानंतर आएशा यांच्या सासू त्यांच्या माहेरी निघून गेल्या. त्यामुळे या घराला आता कुलुप आहे. आएशा यांनी सासरच्या मंडळींबाबत जे विधान केले त्याबाबत सासरच्या मंडळींची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने प्रयत्न केला. पण संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांची बाजू मिळू शकली नाही.

पतीच्या मृत्यूनंतर आएशा पुसेसावळीपासून अगदी काही अंतरावर असणाऱ्या राजाचे कुर्ले या गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहतात.

'भविष्याची चिंता'

वयस्कर आई-वडील आणि 8 महिन्यांच्या मुलीच्या भविष्याची चिंता आएशा यांना सतावते. त्यात त्यांचे वडील हे हार्टपेशंट असल्याचे त्या सांगतात.

या घटनेनंतर आयुष्य कसं बदललं याबद्दल आएशा म्हणतात की "न्यायाच्या बाजूने किंवा केसच्या बाजूने म्हणाल तर न्याय मिळाला आहे. कारण जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना अटक झाली आहे. पण समाजाच्या बाजूने म्हणाल तर मला अजून न्याय मिळालेला नाही. कारण जी मदत मला अपेक्षित होती जो सपोर्ट हवा होता तो अद्याप मिळालेला नाहीये."

"लोकांचा असा गैरसमज झालाय की, मुस्लीम संघटनांनी मला जी मदत जाहीर केली ती पूर्णपणे माझ्याकडे आलेली आहे. मी लाखो-कोटींमध्ये खेळतीये असं लोकांना वाटते. हा गैरसमज दूर व्हायला पाहिजे. या गोष्टीचा माझ्या जीवनावर खूप परिणाम झालाय. मी एक श्रीमंत व्यक्ती झाल्याचा त्यांचा गैरसमज झालाय," असं आएशा सांगतात.

नूरहसन शिकलगारांचं हे घर आता कुलूपबंद आहे.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, नूरहसन शिकलगारांचं हे घर आता कुलूपबंद आहे.

"10 रुपयांची वस्तू मला 50 रुपये देऊन विकत घ्यावी लागते कारण त्यांना वाटतं माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. मला 5 लाखांची मदत मिळाली. परंतु, लोक दीड कोटी रुपये मिळाल्याचे सांगतात, तसं काही नाहीये, इतकी मोठी रक्कम मला मिळालेली नाही," आएशा सांगतात.

"मला समाजाला हेच सांगायचंय की पैशापेक्षा जास्त मला सपोर्टची गरज होती. माझ्या बाळाला तो सपोर्ट मिळालेला नाहीये आणि कुठलीही शहानिशा न करता खरंच मला मदत मिळतीये का? मी कसं जगतीये हे समजून न घेता मला माझ्या मुलीसोबत राहायला सोडून दिलं आहे, हे चुकीचं आहे,” आएशा उद्विग्नतेनी सांगतात.

या घटनेला वर्ष पूर्ण होण्यास चार दिवस बाकी असताना (6 सप्टेंबर रोजी) राज्य सरकारने आएशा यांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. पण डोक्यावरचं कर्ज आणि मिळालेली मदत याचं गणित जुळत नसल्याचं त्या सांगतात.

पुसेसावळी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

पुसेसावळीत आता काय परिस्थिती?

वर्षभरानंतर पुसेसावळी पुन्हा एकदा सणासाठी गणपतीच्या आगमनाने सजलंय. बाजारपेठेत गौरी गणपतीच्या सजावटीसाठीचं साहित्य विकणारी दुकानं ठिकठिकाणी उभी राहिली आहेत. यात काही मुस्लीम व्यापारीदेखील गणेश मूर्ती आणि फळांचे नैवेद्यासाठी लागणारे वाटे विकताना दिसतात.

शांतता दिसत असली तरी बाजारपेठेला गेल्या वर्षभरात म्हणावी तशी उभारी न मिळाल्याचं स्थानिक रहिवासी संजय सोलापुरे नोंदवतात.

सोलापुरेंचा मुलगा अभिषेक यालादेखील या प्रकरणात अटक झाली होती. आता त्याला जामीन मिळाला आहे आणि चार्जशीटमध्ये पुरेसे पुरावे न मिळालेल्या संशयितांमध्ये त्याचा समावेश आहे. अभिषेकची गावातली पानटपरी मात्र अजूनही सुरू होऊ शकली नाही.

पुसेसावळी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

शेतीवर मिळणाऱ्या उत्पन्नावरच घरातला चरितार्थ सुरू असल्याचं संजय सोलापुरे सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना सोलापुरे म्हणाले, “आठवड्याचा एक बाजार फक्त करतो. दुकान बंदच असतं. मी शेती करतो, घराचा खर्च रोजगार करून भागवतो. मंडळी जाते रोजगाराला. आमची गावात राहायची इच्छाच नाही," अशी खंत त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केली.

सोलापुरे आता बाजारपेठेतलं त्यांचं घर सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत. हे नवं घर काहीसं गावाच्या बाहेर आहे. पण व्यवसायाच्या चिंतेपेक्षा हे शांत ठिकाणाचं घर त्यांना बरं वाटतंय.

गावातल्या मशिदीबाहेरही नमाजच्या वेळेत शांतता असते. अजानचा आवाज ऐकून काही लोकांची ये-जा होते.

त्यावेळी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिक सतर्क होतात. वर्ष झालं तरी गावातला बंदोबस्त आजही काढला गेलेला नाही. वर्षभरात विविध कारणांनी अनेकदा तणाव निर्माण झाल्याचं पोलीस सांगतात.

तपासाची काय स्थिती ?

या घटनेत ज्यांची नावं आली त्यांना पोलिसांनी घटनेच्या रात्री अटक करायला सुरुवात केली होती. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 37 जणांना अटक केली होती. यातले अनेकजण जामीन मंजूर होऊन ते पुन्हा गावातही रहायला आले आहेत.

तर गेलं वर्षभर फरार असणाऱ्या नितीन वीरला पोलिसांनी 2 सप्टेंबरला पुसेसावळीतल्या त्याच्या राहत्या घराजवळून अटक केली आहे. या प्रकरणात खुनाचा आणि दंगलीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत.

या दोन्ही गुन्ह्यांबाबतचं दोषारोपपत्र कोर्टात सादर झालं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हायकोर्टात याचिका दाखल

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण या तपासावरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर यांचा सहभाग असल्याचा आरोप इस्लामपूरचे कांग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष शकीर तांबोळी यांनी केला आहे.

पावस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास केला जावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत केली जावी या मागणीसाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाबाबत विचारण्यासाठी बीबीसी मराठीने विक्रम पावस्कर यांच्याशी संपर्क साधला. 'हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही,' असे पावस्कर यांनी म्हटले आहे.

'घटनेपूर्वी पावस्करांनी सांगली साताऱ्यात चिथावणीखोर भाषणं केली होती,' असा तांबोळी यांचा दावा आहे. सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार सांगलीतल्या भाषणांचा फॉरेन्सिक अहवाल सादर झाला आहे.

सातारा प्रकरणात मात्र पोलिसांनी सादर केलेल्या पत्रात पोलीस म्हणतात, “फिर्यादी सरफराज बागवान यांनी दिलेल्या पहिल्या जबाबात विक्रम पावस्करांचे नाव घेतले नव्हते. पुरवणी जबाबात हे नाव घेतले. मात्र गुन्ह्यात आजपर्यंत केलेल्या तपासात पावस्करांविरुद्ध सबळ पुरावा मिळून आलेला नाही.”

शकीर तांबोळी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

या घटनेमागची पार्श्वभूमी जर समजून घेतली तर आपल्याला या गोष्टी लक्षात येऊ शकतात असं तांबोळी म्हणतात.

“राज्यात हिंदू जनआक्रोश मोर्चामुळे जे वातावरण तयार झालं होतं त्यामुळे तणावाचं वातावरण तयार झालं होतं. त्यातूनच पुढे या गोष्टी घडल्या. त्यामुळे या मोर्चांमागे जे लोक आहेत त्यांच्या अटकेसाठी आम्ही स्पेशल याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास निवृत्त न्यायाधिशांमार्फत करावा यासाठी मी याचिका केली आहे,” असं तांबोळी सांगतात.

तांबोळी यांनी केलेल्या आरोपांबाबत विक्रम पावस्करांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पावस्करांची संपर्क साधला.

'या प्रकरणावर आपल्याला कुठलेही भाष्य करायचे नाही,' असे पावस्करांनी सांगितले.

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी रिट पेटिशन आणि आरोपाबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

उच्च न्यायालयातल्या या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 23 सप्टेंबरला होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)