पुसेसावळीमध्ये त्यादिवशी काय घडलं? एकाची हत्या, बाहेरुन आलेले लोक आणि गावकऱ्यांना अटक

नुरउलहसन यांच्या पत्नी आयेशा
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'नूरउलहसन शादी' असं लिहिलेला दारावरचा नवा रंग आणि त्याखालची तारीख अजून तशीच आहे. नूरहसन शिकलगारचे वडिल त्याच्या समोरच टाकलेल्या बाजेवर बसून आलेल्या मुस्लीम कार्यकर्त्यांशी कागदपत्रांबाबत चर्चा करतायत.

पलिकडे दारात नूरहसनने कर्ज काढून घेतलेला जेसीबी धूळ खात पडला आहे. अंगणात एक पूर्णवेळ पोलीस तैनात आहे.

आत नूरहसनची बायको आयेशा एकीकडे आपल्या येणाऱ्या बाळाची काळजी करत तर दुसरीकडे गमावलेल्या सहचराची आठवण काढत हळून मैत्रिणींसमोर आसवं ढाळते आहे. कार्यकर्ते निघून जातात आणि मग घरात उरते ती नीरव शांतता.

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

10 अॅागस्टच्या रात्री सातारा जिल्ह्यातल्या पुसेसावळी गावातल्या दंगलीने शिकलगार कुटुंबाचं आयुष्य होत्याचं नव्हतं केलं आहे.

“ साडेआठ वाजता आले ते आमचं क्रिकेटबद्दल बोलणं चाललं होतं. क्रिकेटबद्दल बोलले ते आणि माझ्या कानात बोलून गेले मी चार महिने जमातीला जाणार आहे..

आणि माझं तुझ्यावर लै प्रेम आहे असं बोलले आणि गेले.. मी म्हणाले राहूदे आज नमाज पढायची.. तर म्हणाले नाही.. मी म्हणलं जेवून जावा तर म्हणाले नाही.. परत साडेनऊ वाजता फोन आला की दंगल झाली.. एका तासात होत्याचं नव्हतं झालं सगळं,"आयेशा शिकलगार सांगते.

आयेशा शिकलगार

ती भेट आपल्या नवऱ्याची शेवटची भेट असेल असं तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. जाण्यापूर्वी आपल्या नवऱ्यासोबत होणाऱ्या बाळाबद्दल झालेली चर्चा तिला आजही लख्ख आठवते

“आम्ही दोघंही एकुलते एक होतो. दोन्ही घरांचं ते बघायचे.. मला वाटायचं की आम्ही एकुलते एक.. मुलांना तसं नको. अजून एक मूल हवं. काय माहित होतं या बाळाच्या नशिबीसुद्धा असं एकुलतं एकच राहणं येणार आहे“ आयेशा समोरून आठवणींचा पट सरकत जातो.

तिच्या सासऱ्यांच्या लियाकत शिकलगारांच्या समोर मात्र आपण कसं जगायचं असा सवाल आहे. सरकारने न्याय द्यावा किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी थेट मागणी ते करतात.

आता पुसेसावळीत कसं वातावरण आहे?

शिकलगारांच्या घरात जे वातावरण तसंच वातावरण कमी अधिक फरकाने गावातल्या इतरांच्या घरात देखील दिसतं.

दंगलीत जे जखमी झाले आहेत त्यांच्या कोर्ट आणि दवाखान्यांच्या वाऱ्या सुरु तर ज्यांच्या घरातले लोक तुरुंगात गेले आहेत त्यांचे देखील कोर्ट आणि पोलीस स्टेशनचे खेटे घालणं सुरु आहे. ज्या मशिदीत हल्ला झाला त्याच्या बाहेर जळालेल्या गाड्यांचा खच आजही तसाच पडला आहे.

बांधकाम सुरु असलेल्या या मशिदीत फुटक्या फरशा, तुकडे पडलेली जमिन अशा सगळ्या खाणाखुणा अजूनही कायम आहेत. पण हल्ल्यानंतर मशिदीला मौलाना मात्र नाहीयेत.

 पुसेसावळीचा बाजार
फोटो कॅप्शन, गावात एक अस्वस्थ शांतता भरुन राहिली आहे

या सगळ्यामुळे गावात एक अस्वस्थ शांतता भरुन राहिली आहे. खरंतर आम्ही पुसेसावळीला गेलो तो दिवस आठवडी बाजारचा. पुसेसावळीचा बाजारसुद्धा मोठा.

पण दंगलीनंतर बाजारपेठच ठप्प झाल्याचं स्थानिक सांगतात. बाजार भरतो, सजतो, पण गावातले लोक वगळता फारसं कोणी खरेदीला फिरकताना दिसत नाही. गावातल्या दुकानांची पण तीच परिस्थिती कमी अधिक फरकाने झाली आहे.

'दंगलीआधीचा एक महिना गावात तणाव होता'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

10 सप्टेंबरला दंगल झाली. पण त्याच्या महिनाभर आधीपासूनच गावात तणाव होता. 18 आॅगस्टच्या दरम्यान एका मुस्लीम मुलाच्या खात्यावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले गेले होते.

त्यानंतर गावात तणाव वाढला. या मुलावर कारवाई झाली. पण या घटनेनंतर अशांततेचा सिलसिला सुरु होईल हे ग्रामस्थांच्याही मनात कदाचित आलं नसेल. हे स्टेटस आणि ते ठेवले गेल्याची माहिती व्हायरल झाली. आणि त्यानंतर गावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघाला.

गावातल्या लोकांसह यात साधारण चार ते पाच हजार लोक सहभागी झाल्याचं ग्रामस्थ सांगतात. यात आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा सहभाग मोठा होता असं त्यांचं म्हणणं.

यानंतर दोन्ही बाजूंनी पोलिसांना निवेदनं दिली गेली. डीवायएसपींच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंची एकत्रित बैठकही घेण्यात आली.

शांतता राखण्याविषयी चर्चा झाली. आणि परिस्थिती निवळतेय असं वाटत असतानाच पुन्हा दोन नवे स्टेटस आणि कमेंटचे स्क्रिनशॅाट व्हायरल झाले.

यातला एक स्क्रिनशॅाट व्हारयल झाला ती तारीख होती 10 सप्टेंबर. ज्याच्या खात्यावरुन हा स्क्रिनशॅाट व्हारयल झाला त्याला त्याच संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं स्थानिक सांगतात.

'घोषणा देत काठ्या, लोखंडी झाला, दगड हातात घेत हल्ला केला'

आक्षेपार्ह वक्तव्य असणाऱ्या या स्क्रिनशॅाटच्या निषेधाचे पोस्टर, डीपी आणि स्टेटस काही वेळातच ठेवले गेले. काय होतंय हे कळायच्या आतच जमाव जमला आणि मोर्चा निघाला.

हा मोर्चा मशिदीजवळ पोहोचला तेव्हा नमाज संपून लोक एकमेकांशी बोलत होते.

यावेळी मशिदीत असलेले स्थानिक रहिवासी शाहीद अत्तार सांगतात, "आम्ही साडेआठ वाजता नमाज पठणाला आलो. नमाज पठण केल्यावर थोडा वेळ बोलत बसलो. बोलत असताना बाहेरून कालवा चालू झाला. जय श्रीरामाच्या अशा घोषणा चालू झाल्या.

त्यानंतर मग काही जमाव आत आला. ..असं म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. मग सगळं झाल्यानंतर आम्ही एक एकजण बाजूला जायला लागलो.. त्यावेळी ही घटना घडली. मारा मारा एवढाच आवाज जास्त होता.”

 पुसेसावळी

या सगळ्या प्रकारातच नूरहसन शिकलगारचा मशिदीतच जीव गेला. काहीवेळात पोलीस दाखल झाले, परिस्थिती आटोक्यात आली आणि मग सुरु झाली धरपकड.

गावातल्याच जवळपास 27 जणांना या प्रकरणात पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न या आरोपांखाली अटक केली आहे. यातले बहुतांश जण तरुण आहेत.

कोणी शिक्षण घेत असलेलं तर कोणी शिक्षण संपवून नुकतंच नोकरीला सुरुवात केलेलं.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार या सगळ्यांनी, 'जय श्रीरामच्या घोषणा देत काठ्या, लोखंडी झाला, दगड हातात घेत हल्ला केला. पोलिसांवर, सरकारी वाहनावर देखील दगडफेक केली.'

बाजारपेठेतील दुकानांची तोडफोड केली आणि मशिदीवर झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.

अर्थात दंगल जरी 27 तारखेला झाली तरी, त्याआधी गावात अनेक बैठका पार पडत असल्याचं स्थानिक सांगतात. या बैठका कोण आणि कशासाठी घेत होतं हे शोधलं जाणार का असा सवालही विचारतात.

'मुलाला गाडीत घातलं आणि म्हणले आम्ही चौकशी करायला नेतोय'

या 27 जणांमध्ये अनेकांच्या घरातले कर्तेच जेल मध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींच्या कुटुंबावरही उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे.

यापैकीच एक आहे अभिषेक सोलापुरेचं कुटुंब. आम्ही गेलो तेव्हा आठवडी बाजारात पथारी मांडून अभिषेकचे वडील संजय सोलापुरे भाजी विकत होते. तर मागे अभिषेकच्या पानाच्या टपरीवर त्याची आई बसली होती.

इतक्या वर्षात पानटपरीत कधीच न बसणाऱ्या अभिषेकच्या आईवर आज पोटापाण्यासाठी टपरीत बसून पानं बनवायची वेळ आली.

कोरोनानंतर पानपट्टी सुरु केलेल्या अभिषेकचा दिवसाकाठी 2 ते 3 हजारांचा व्यवसाय होत असल्याचं त्याची आई रेखा सोलापूरे सांगते. दंगल झाली तेव्हा अभिषेक घरातच होता असा त्यांचा दावा आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना रेखा सोलापूरे म्हणाल्या ," आम्हाला किती अर्धा एकर शेती. मी शिलाईचं काम करते. त्यावरच चाललंय. मुलगा 9 पर्यंत पानच बनवत होता.

"बहिणीची मुलगी होती तिला बसवायला गेला. त्यानंतर परत हितंच उभा होता. वरुन दोन पोरं आली म्हणाली दंगा चालू झालाय दुकान बंद कर. दुकान बंद केलं आणि हितंच उभा राहीला."

"पोलीस आले त्यांनी दार वाजवलं. आतलं लाईट सगळं शॅार्ट सर्किट केलं. ह्यांनी दार उघडलं. मुलगा कुठंय विचारलं.. घरात होता.. गाडीत घातलं म्हणले आम्ही चौकशी करायला नेतोय.”

 रेखा सोलापूरे

त्याच्या वडिलांना हृदयरोगाचा त्रास आहे. तरीही दिवसाकाठी थोडा पैसा गाठीशी बांधता येईल म्हणून ते भाजी विकायला बसतायत.

सोलापुरेंसारखीच परिस्थिती अटक झालेल्या इतरांच्या घरीदेखील आहे. कोणाचे गणपती तसेच राहिलेत तर कोणाचं दुकान कसंबसं चाललंय.

त्यादिवशी गावात आलेले लोक हे बाहेरचे होते असा दावा हे सगळे करतात.

स्थानिक रहिवासी शुभांगी देशपांडे म्हणाल्या, "पोस्ट पडल्यावर अर्ध्या-एक तासातच सगळी दंगल चालू झाली. आमचं घर रस्त्यावरच आहे त्यामुळं आम्हीसुद्धा बघत होतो.

सगळे मास्क वगैरे लावलेले सगळे बाहेरचे लोक होते. कोण त्यातून आम्हाला ओळखता आलेलं नाही. मास्क होते. कोणाचे चेहरे क्लिअर दिसत नव्हते"

पुसेसावळीचे गावकरी

दंगलीतच घरातला माणूस गमावल्याने न भरुन येणारं नुकसान झालेली मुस्लीम कुटुंबं असोत की घरातले कर्ते तुरुंगात गेल्याने धडपड वाट्याला आलेले हिंदू... दंगलीच्या काही तासांनी दोन्हीकडचं न भरुन येणारं नुकसान झालं आहे.

पुसेसावळी मधल्या लोकांचं आयुष्य काही काळाने पूर्वपदावर येईलही. पण गमावलेली माणसं आणि लागलेल्या गुन्ह्यांचा शिक्का मात्र इतका सहज पुसणं कोणालाही शक्य होणार नाहीये. हे नुकसान झालंय ते कायमचंच.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)