भारतीय मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत करण्यात आलेल्या दाव्यात किती तथ्य आहे?

    • Author, श्रृती मेनन आणि शादाब नाझ्मी
    • Role, बीबीसी रिअलिटी चेक

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत अनेक दावे केले आहेत.

सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारतात भाजपच्या शासनकाळात मुस्लिमांची परिस्थिती बिकट बनली, हा आरोप फेटाळून लावला.

बीबीसीने त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर नजर टाकली. ते खालील प्रमाणे –

‘भारतातील मुस्लिम लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे.’

या दाव्याबाबत ठोसपणे काहीच सांगता येणार नाही. कारण भारताच्या जनगणनेची ताजी आकडेवारी उपलब्ध नाही.

अमेरिकेच्या प्यू रिसर्च या संशोधन संस्थेने केलेल्या अंदाजानुसार भारतात मुस्लिमांची लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे.

मुस्लीम लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर इंडोनेशिया तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

पण, प्यू रिसर्चची ही आकडेवारी भारत आणि पाकिस्तानच्या मागच्या जनगणनेवर आधारित आहे. भारतात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. तर पाकिस्तानातील शेवटची जनगणना 2017 मध्ये झाली होती.

पाकिस्तानच्या जनगणनेच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे.

पाकिस्तानमध्ये 2017 च्या जनगणनेसाठीची मोजणी सुरू असताना काही प्रांत आणि शहरांमध्ये (सिंध, कराची, बलुचिस्तान) काही अडचणी आल्याचं सांगण्यात आलं होतं.

प्यू रिसर्चमध्ये धार्मिक विषयांशी संबंधित सहयोगी संचालक कोनार्ड हेकेट म्हणतात, “पाकिस्तानच्या आकडेवारीबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या असण्याची शक्यताही आहे.”

“भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे.”

निर्मला सीतारामन यांचं हे वक्तव्य योग्य आहे. पण भारतात सगळ्याच धर्मांच्या अनुयायांची लोकसंख्या वाढत आहे.

पण गेल्या काही दशकात भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीची आकडेवारी पाहिली तर 1991 पासून भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्या वृद्धी दरामध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं.

त्याच प्रकारे एकूण लोकसंख्येचा वृद्धि दरसुद्धा 1991 पासून कमी झाला आहे.

2019 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अधिकृत आकडेवारीनुसार प्रमुख धार्मिक समूहगटांमध्ये मुस्लीम लोकसंख्येचा प्रजनन दर सर्वाधिक आहे.

पण माहितीनुसार, गेल्या दोन दशकांमध्ये या दरातही घट झाल्याचं पाहायला मिळतं.

प्रत्यक्षात प्रति महिला जन्मदरातील ही घट मुस्लिमांमध्ये हिंदूंपेक्षा जास्त आहे.

1992 साली हा जन्मदर 4.4 होता, तो 2019 मध्ये 2.4 आहे.

पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या संघमित्रा सिंह म्हणतात, “जन्मदरात बदलामागे आर्थिक आणि सामाजिक कारण असतात. त्याचा संबंध धर्माशी जोडता येणार नाही.”

त्या पुढे म्हणतात, “जन्मदरातील घट ही शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा या योग्यरित्या पोहोचल्याचा परिणाम आहे.”

असं असूनसुद्धा काही हिंदू समूह आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मुस्लिमांच्या वाढीबाबत संभ्रमात टाकणारे दावे करत राहतात. काही वेळा तर ते हिंदूंना अधिक मुलांना जन्माला घालण्याचं आवाहनही करतात.

भारतात एके दिवशी मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल, हा दावा तज्ज्ञांनी फेटाळून लावलेला हे. भारतात सध्या हिंदूंची लोकसंख्या 80 टक्के आहे.

खरं तर कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे काम पाहणारे राष्ट्रीय समितीचे माजी अध्यक्ष देवेंद्र कोठारी यांनी भविष्यातील एका शक्यतेबाबत सांगितलं.

ते म्हणतात, प्रजनन दरात नोंदवलेली घट पाहिल्यास पुढील जनगणनेत हिंदू लोकसंख्येचं प्रमाण मुस्लिमांपेक्षा जास्त वाढलेलं असेल.

“मुस्लिमांच्या परिस्थिती बिकट असती तर 1947 च्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असती?”

मुस्लिमांविरोधात भारतात द्वेष वाढत आहे, याबाबत प्रश्नाचं उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, असं असतं तर भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असती का?

त्या पुढे म्हणतात, “भारतात मुस्लीम व्यापार करू शकतात, मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात. सरकारकडून त्यांना मदतही मिळते.”

भारतात मुस्लिमांसह इतर अल्पसंख्याक समूहांना लक्ष्य केलं जात आहे, मानवाधिकार संस्थांनीही त्याची नोंद घेतली आहे.

2023 मध्ये जारी केलेल्या अहवालात ह्यूम राईट्स वॉचने म्हटलं, “भाजप सरकारने धार्मिक अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लिमांसोबत भेदभाव करणं सुरू ठेवलेलं आहे.”

धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धच्या गुन्ह्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. पण स्वतंत्र संशोधन आणि संस्थांनी द्वेषभावनेतून केलेल्या हिंसा प्रकरणात वाढ नोंदवली आहे.

“पाकिस्तानात सर्व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या संख्येत घट होत आहे, ते संपत आहेत.”

निर्मला सीतारामन मुस्लीम बहुल पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्धच्या हिंसेचा संदर्भ देताना म्हणाल्या की यामुळे येथील बिगर-मुस्लीम लोकसंख्या कमी होत आहे.

पाकिस्तान हा एक मुस्लीम बहुल देश आहे. 2017 च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात 2.14 टक्के हिंदू, 1.7 टक्के ख्रिश्चन आणि 0.09 अहमदिया आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसा झाली, हे वास्तव आहे. त्यांच्यावर अनेक अत्याचार झाले.

2020 चा ह्यूमन राईट्स वॉचच्या अहवालानुसार पाकिस्तानात अहमदिया मुस्लिमांविरुद्ध हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानमधील ईशनिंदा कायदा आणि अहमदिया मुस्लिमांविरुद्ध बनवलेल्या कायद्यांमुळे त्यांच्यावर अत्याचार होतात.

हिंदू आणि ख्रिश्चनांवरसुद्धा ईशनिंदेचे आरोप लावण्यात येतात. त्यांच्यावर हल्ले होतात.

पाकिस्तानच्या सेंटर फॉर सोशल जस्टीस या मानवाधिकार संघटनेनुसार 1987 ते 2021 या कालावधीत 1855 जणांविरुद्ध ईशनिंदा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

पण, सीतारामान यांनी म्हटल्याप्रमाणे अल्पसंख्याकांची आकडेवारी कमी झाली, किंवा त्यांना नष्ट करण्यात आलं, हे सिद्ध करणारी ताजी आकडेवारी उपलब्ध नाही.

यापूर्वी, बांगलादेश आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या लोकसंख्येतील घटीसंदर्भात भाजपच्या दाव्यानुसार काही आकडेवारी समोर आली होती.

पण ही आकडेवारी दिशाभूल करणारी होती. कारण त्यामध्ये अशा अल्पसंख्यांकांनाही सामील करण्यात आलं होतं, जे तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)