प्यू रिसर्च : नरेंद्र मोदी 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती असल्याचा सर्व्हेमध्ये दावा

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रेरणा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

G-20 परिषदेची एक महत्त्वाची बैठक 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीस विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सध्या या बैठकीसाठी देशात जोरदार तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियता आणि प्रभाव यांच्याशी संबंधित एक सर्वेक्षण समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत 80 टक्के देशातील नागरिकांचं सकारात्मक मत आहे, असं अमेरिकेच्या प्यू रिसर्च या थिंक टँकने केलेल्या या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सर्व्हेनुसार, 10 पैकी 8 भारतीय नरेंद्र मोदींना पसंत करतात.

यामध्ये 55 टक्के भारतीयांनी नरेंद्र मोदी यांना आपली पहिली पसंती दर्शवली. तर, उर्वरित 20 टक्के नागरिकांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत.

नरेंद्र मोदींवर इतर देशांच्या नागरिकांना किती विश्वास?

भारताबाहेरील नागरिक पंतप्रधान मोदी यांच्याबाबत काय मत बाळगतात, तसंच ते मोदींवर विश्वास दर्शवतात किंवा नाही, हा प्रश्नही सर्व्हेमध्ये विचारण्यात आला.

त्याचं उत्तरही आपल्याला विस्ताराने मिळतं. जगातील 12 देशांच्या प्रौढ नागरिकांना मोदींबाबत मत विचारण्यात आलं.

जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षमतेवर 40 टक्के लोकांना भरवसा नाही. तर 37 टक्के नागरिकांना त्यांच्यावर थोडाफार विश्वास दर्शवतात, असं यामध्ये दिसतं.

विशेषतः मेक्सिको, ब्राझील येथील नागरिक नरेंद्र मोदी यांच्या प्रती नकारात्मक मत बाळगतात.

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जास्त विश्वास वाटत नाही.

अमेरिकन नागरिकांचं मत

या सर्व्हेतील माहितीनुसार, अमेरिकेतील 37 टक्के नागरिक पंतप्रधान मोदींवर विश्वास दर्शवत नाहीत. तर 21 टक्के लोकांना त्यांच्याबाबत विश्वास वाटतो.

अमेरिकेतील 42 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत ऐकलेलंच नाही किंवा त्यांना सर्व्हेमध्ये भाग घ्यायचा नाही, असं त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

तर, जपान, केनिया आणि नायजेरियातील लोकांना मोदींवर भरवसा वाटतो.

विशेषतः केनियाचे नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेवर विश्वास बाळगतात. येथील 60 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मोदींची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता यांच्यावर किमान काही प्रमाणात विश्वास वाटतो.

जपानच्या 45 टक्के नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याबाबत विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे विश्वास न दर्शवणाऱ्या नागरिकांचं प्रमाण हे 42 टक्के आहे.

इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामध्येही नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचं दिसून येतं.

सर्व्हेबाबत मौन कशामुळे?

सर्व्हेमधील बहुतांश निष्कर्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांच्या बाजूने दिसून येता.

असं असूनही भाजपचे कोणतेच नेते या सर्व्हेबाबत चर्चा करताना दिसून येत नाहीत. भाजपच्या कोणत्याही अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या सर्व्हेचा उल्लेख आढळून येत नाही.

सर्व्हे

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत जाणून घेण्यासाठी भाजप प्रवक्ते अमिताभ सिन्हा यांच्याशी बीबीसीने चर्चा केली.

ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय आहेत. असं असणं स्वाभाविक आहे. इतर कोणताच विरोधी नेता त्यांच्या योग्यतेचा नाही. विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी बनवली. पण त्यांच्यातच मतभेद आढळून येतात. पंतप्रधानांपदाच्या चेहऱ्याविषयी एकमत नाही.”

“विरोधी पक्षांकडे चेहराच नाही, त्यामुळे मोदींची लोकप्रियता कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व विरोधी पक्षाचे नेते मोदींसमोर खुजे आहेत. सर्व्हेबाबत बोलायचं झाल्यास असे सर्व्हे खूप येतात, त्यात काही विशेष असं नाही.”

“या सर्व्हेंच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह असतं. पंतप्रधान मोदींचा गवगवा आधीपासूनच आहे. त्यामुळे सर्व्हेतून ते जाणून घेण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आमचा पक्ष काम करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यावर विश्वास ठेवतो.”

राहुल गांधींचाही उल्लेख

प्यू रिसर्च सेंटरकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे.

राहुल गांधी हेच भारतीय नागरिकांच्या पसंतीक्रमावर दुसऱ्या स्थानी असल्याचं सर्व्हेमध्ये दिसतं.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

दहापैकी सहा भारतीय नागरिक राहुल गांधी यांच्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. त्याचप्रमाणे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याबाबतही 46 टक्के लोकांचं मत सकारात्मक आहे.

सर्व्हेत आणखी काय काय?

सर्व्हेमध्ये जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढत असल्याचं सांगणारे अनेक निष्कर्ष आहेत.

त्यानुसार, 68 टक्के भारतीयांना वाटतं की जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढत आहेत. 10 पैकी 7 भारतीयांच्या मते, देशाची स्थितीत आताच प्रभावी बनू लागली आहे.

इजराएल

फोटो स्रोत, Getty Images

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या देशांपैकी सर्वाधिक सकारात्मक दृष्टिकोन इजराएलचा आहे. येथील 71 टक्के लोकांचा दृष्टिकोन भारताप्रति सकारात्मक आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश लोक भारताबाबत नकारात्मक भूमिका बाळगतात. तेथील केवळ 28 टक्के नागरीक भारताबाबत पॉझिटिव्ह आहेत.

नेदरलँड्स आणि स्पेन या देशांमधील निम्मे लोक भारताबाबत टीकात्मक मत बाळगतात.

ब्रिटनमध्ये 66 टक्के लोकांना भारत आवडतो. तर, 2008 च्या तुलनेत युरोपीय देश भारताच्या प्रतिमेबाबत नकारात्मक झाले आहेत.

या देशांबाबत भारतीयांचं मत

सर्व्हेत भारतीयांनाही इतर सहा देशांबाबत मत विचारण्यात आलं. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.

निष्कर्षानुसार, भारतीयांनी म्हटलं की गेल्या काही वर्षांत अमेरिकेचा वरचष्मा वाढत चालला आहे. केवळ 14 टक्के लोकांच्या मते, गेल्या काही वर्षांत अमेरिकेचा प्रभाव घसरला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

रशियाबाबत विचार केल्यास बहुतांश भारतीयांना त्यांचा प्रभाव वाढत असल्याचं वाटतं.

तर, चीनप्रति बहुतांश भारतीयांचं मत टीकात्मक आहे. 67 टक्के भारतीयांचं चीनबद्दलचं मत नकारात्मक आहे. 48 टक्के भारतीयांना चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग यांच्याबाबत बिलकुल विश्वास वाटत नाही.

भारतीयांमध्ये पाकिस्तानचा द्वेष वाढला

दहापैकी सात भारतीय पाकिस्तानबाबत नकारात्मक मत बाळगतात. पण 19 टक्के भारतीयांचा दृष्टिकोन त्यांच्याविषयी सकारात्मकही आहे.

सर्व्हे

फोटो स्रोत, Getty Images

महिलांच्या तुलनेत पुरुष भारतीय पाकिस्तानबाबत जास्त द्वेष बाळगून आहेत. पाकिस्तानचा द्वेष करणाऱ्या भारतीयांमध्ये बहुतांश लोक हे NDA चे मतदार आहेत.

2013 मध्ये पहिल्यांदा या सर्व्हेमध्ये भारतीयांना पाकिस्तानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत त्यांच्याबाबतचा द्वेष वाढल्याचं दिसून येतं.

सर्वेक्षण कसं करण्यात आलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्यू रिसर्च सेंटरने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लोकांचं मत जाणून घेण्यासाठी उत्तर अमेरिका, युरोप, मध्य-पूर्व, एशियन-पॅसिफिक क्षेत्र, सब-सहारन आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या भागातील 23 देशांच्या नागरिकांशी संपर्क साधला.

या सर्व्हेमध्ये भारतीयांचा दृष्टिकोनही घेण्यात आला. उदा. पंतप्रधानांविषयी तुम्ही काय विचार करता, भारताचं जागतिक स्थान आणि इतर देशांच्या प्रभावाबाबत तुम्हाला काय वाटतं, अशी अनेक प्रश्नं यावेळी विचारण्यात आली.

2019 नंतर पहिल्यांदाच या सर्व्हेमध्ये आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांना सहभागी करून घेण्यात आलं. सर्व्हेसाठी भारतात 25 मार्च ते 11 मे दरम्यान 2611 प्रौढ व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. या सर्वच लोकांना फेस-टू-फेस अर्थात भेटून चर्चा करण्यात आली. अमेरिकेत 20 ते 26 मार्च दरम्यान 3576 व्यक्तींचा सर्व्हे करण्यात आला.

तर भारत आणि अमेरिकेबाहेरील 11 देशांच्या नागरिकांशी फोनवरून, इतर 10 देशांमध्ये फेस-टू-फेस आणि ऑस्ट्रेलियात ऑनलाईन पोर्टल तसंच फेस-टू-फेस या दोन्ही माध्यमांतून संपर्क साधण्यात आला.

प्यू रिसर्च सेंटर ही संस्था एक अमेरिकन थिंकटँक आहे. सामाजिक मुद्द्यांसोबत विविध विषयांवर ते सर्वेक्षण करत असतात. यापूर्वीही संस्थेने केलेले सर्वेक्षण आणि प्रकाशित केलेले अहवाल हे चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)