रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीचे छापे, जाणून घ्या ठाकरे गटाच्या नेत्याचा राजकीय ग्राफ

रवींद्र वायकर

फोटो स्रोत, Ravindra Waikar/Facebook

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांच्या घरासह इतर चार ठिकाणी इडीने छापे मारले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यासंदर्भात काही आरोप वायकर यांच्यावर करण्यात आले होते.

2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील जोगेश्वरी भागात मुंबई महानगरपालिकेची मोकळी जागा ताब्यात घेत त्या जागेवर पंचतारांकित हाॅटेल बांधण्याचा वायकरांचा घाट असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

या प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या काही बिझनेस पार्टनर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आता इडीच्या 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने वायकर यांच्या निवासस्थानी कागदपत्रांचा शोध सुरू केला आहे.

आम्ही त्यांना कफनचोर म्हणायचं की खिचडीचोर? - शिंदे

रवींद्र वायकर यांच्या चौकशीबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे.

राजकीय सूड भावनेने आकस ठेऊन कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे की कोव्हिडमध्ये किती भ्रष्टाचार केलाय, कोव्हिड बॅगमध्ये पैसे खाल्ले. 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅम केली."

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे/ Facebook

"ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सगळं रेकाॅर्डवरती आहे. मग आम्ही त्यांना कफन चोर म्हणायचं की खिचडी चोर म्हणायचं.

त्यामुळे पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नये. भीती कशाला पाहिजे. दूध का दूध होईल. राज्यात एक एक प्रकल्पांचं उद्घाटन होतंय यामुळे त्यांना पोटशूळ उठलेलं आहे."

कोण आहेत रवींद्र वायकर?

मुंबई महानगरपालिकेत रवींद्र वायकर यांनी 20 वर्षं नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरी भागातून 1992मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले.

2006-2010 याकाळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.

त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Ravindra Waikar/Facebook

2014 ला सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं.

त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते.

हिसाब तो देना पडेगा - किरीट सोमय्या

रवींद्र वायकर यांच्याबाबत बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या माध्यमांना म्हणाले की, "थोडी देर होगई, उद्धव ठाकरे आणि त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, संजय राऊत, अनिल परब यांनी कोरोना काळात पैसे कमविण्याचं पाप केलं.

जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांना बेकायदेशीर पद्धतीने जोगेश्वरी येथे दोन लाख चौरस फुटांचं अनधिकृत हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. हा घोटाळा उघडकीस आला तेंव्हा उद्धव ठाकरेंनी ते प्रकरण दाबलं. आत हे प्रकरण बाहेर आलेलं आहे.

अलिबाग-कोर्लई भागातील 19 बंगल्यांचा घोटाळा देखील ठाकरे आणि वायकर यांनी मिळून केला. रवींद्र वायकर यांनी नोटबंदीमध्येही हात धुवून घेतला होता. उद्धव ठाकरे आणि वायकर यांनी काय काय रंग उधळले आहेत हे लोकांना या चौकशीनंतर कळेल."

सूडबुद्धीने कारवाई - विरोधी पक्ष

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत म्हणाले की, "सर्व विरोधी पक्षाच्याच नेत्यांकडे धाडी पडतायत. किती शुद्ध पक्ष आहे बघा. मात्र जे लोक त्यांच्या पक्षात गेले ते सगळे शुचिर्भूत झाले, हे नेमकं कशाचं द्योतक आहे?

त्यामुळे ही कारवाई सूडबुद्धीने आणि बदनामी करण्याचे हेतूने केलेली आहे असं दिसतंय आणि त्यामुळे जनता अधिक चिडून उठेल एवढं मात्र नक्की."

अरविंद सावंत

फोटो स्रोत, SHIVSENA

माजी महापौर किशोरी पेडणेकर माध्यमांना म्हणाल्या की, "यंत्रणेला जर काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी त्यांचं काम करावं पण ते एकाच पक्षाच्या किंवा ठराविक लोकांच्या मागे ते लागतायत आणि संपूर्ण देशात ते दिसत आहे.

भाजप आणि शिंदे गटात असलेले लोक हे दूध के धुले आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी हे चित्र उभं राहिलं आहे ते धोकादायक आहे. यंत्रणांना त्यांचं काम करायला दिलं पाहिजे. आत्तापर्यंत ज्यांच्यावर आरोप झाले ते पुढे उपमुख्यमंत्री झाले बघूया पुढे काय काय होतंय?"

राजकीय रंग देण्याची विरोधकांना सवय - प्रवीण दरेकर

भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "आमदार अपात्रतेची सुनावणीचा आणि या धाडीचा काही अर्थाअर्थी संबंध आहे असं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ईडीची धाड ही अचानक पडत नाही. कुणाच्या तक्रारी असतील किंवा आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर अशा प्रकारच्या धाडी पडत असतात.

अलीकडच्या काळात धाडी पडल्या की विनाकारण संशय घेतला जातो. पण मला वाटतं की ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. त्यामुळेच ईडीने ही धाड टाकली असावी. जेंव्हा अशा धाडी पडतात तेंव्हा राजकीय आरोप करणं हे विरोधी पक्षाचं कामच आहे.

धाडी काय आज पडत नाही. ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. काँग्रेसच्या काळापासून ईडी काम करतं, पण आत्ता या नेत्यांवर जास्त धाडी पडायला लागल्या आहेत आणि मग आपलं नाव बदनाम होतंय, लोकांसमोर येतंय हे बघून अशा कारवाईला राजकीय रंग देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे."

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)