डिजीयात्रा : केवळ चेहरा स्कॅन करून मिळवा ‘या’ विमानतळांवर प्रवेश

कोणताही विमानप्रवास करायचा झाला, तर किमान दोन-तीन तास तरी अधिकचे लागणार हे गृहित धरावं लागतं.

सुरक्षासंबंधित कारणांमुळे विमानतळावर एका प्रवाशाच्या कागदपत्रांची साधारणपणे तीन वेळा तपासणी होते. यामुळेच प्रवाशांना किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना करण्यात येत असते.

प्रवाशांचा हाच वेळ वाचवण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने डिजीयात्रा नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे.

या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचेल, तसंच सुरक्षारक्षकाकडे कागदपत्रे तासण्याची गरज भासणार नाही, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच देशातील तीन विमानतळांसाठी ‘डिजी यात्रा’ प्रणालीचा शुभारंभ केला.

ही डिजी यात्रा प्रणाली नेमकी काय आहे, ती नेमकी कशी चालते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवळ चेहरा स्कॅन करून विमानतळावर प्रवेश कसा मिळवावा, याची माहिती आपण या बातमीत घेऊ –

'डिजी यात्रा' प्रणाली काय आहे?

देशातील तीन विमानतळांवर फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी (FRT) अर्थात चेहरा ओळख प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला एका मोबाईल अपचा वापर करावा लागणार आहे.

या तंत्रज्ञानाला एकत्रित स्वरुपात डिजी यात्रा प्रणाली असं नाव देण्यात आलं आहे.

डिजी यात्रा प्रणालीचा वापर केल्यास प्रवाशांना विमानतळावरील गेटवर कोणतीही कागदपत्रे न दाखवता थेट प्रवेश मिळू शकतो.

यामध्ये आपल्या आधारकार्डवरील माहिती, तसंच आपण प्रवासापूर्वी अपलोड केलेली माहिती यांचा उपयोग करण्यात येईल.

सध्या तरी ही सेवा केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठीच सुरु करण्यात आली आहे.

कोणत्या विमानतळांवर मिळणार सुविधा?

डिजी यात्र प्रणालीमार्फत विमानतळावर थेट चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधेची सुरुवात पहिल्या टप्प्यात देशातील 7 विमानतळांवर करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

याचा शुभारंभ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 1 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आला. दिल्लीसह वाराणसी आणि बंगळुरू या शहरांच्या विमानतळांवरही चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यानंतर मार्च 2023 पर्यंत ही प्रणाली हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा या 4 विमानतळांवर सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील इतर काही विमानतळांवर ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.

‘डिजी यात्रा’चा वापर कसा करावा?

ही प्रणाली वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Digi Yatra Foundationने बनवलेलं DigiYatra App तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावं लागेल.

अॅप डाऊनलोड केल्यानंतर गेट स्टार्टेड या बटणावर क्लिक करून सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्यामध्ये टाकावा लागेल.

आता याच मोबाईल नंबरवर तुम्हाला एक वन टाईम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. हा OTP त्यामध्ये भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होऊन अॅप सुरू होतं.

यानंतर तुम्हाला स्वतःच्या ओळखीसंदर्भात माहिती यामध्ये भरावी लागेल. त्यासाठी वॉलेट पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये आयडेंटिटी क्रेडिन्शियल्समध्ये आपल्या आधार कार्डची माहिती भरावी.

तुमच्याकडे पूर्वीपासून डिजी लॉकर अप असेल तर तिथून आधार कार्ड अपलोड करता येईल. अन्यथा मोबाईलमधील आधार कार्डचा फोटो अपलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

यानंतर तुम्हाला सेल्फी काढण्यासाठी विचारलं जाईल. तो काढल्यानंतर तुमची ओळख प्रक्रिया पूर्ण होईल.

यानंतर पुढील टप्प्यात तुम्हाला तुमच्या प्रवासासंदर्भातील सर्व माहिती अपमध्ये भरावी लागेल.

यादरम्यान तुमच्या बोर्डिंग पासचा बारकोड स्कॅन करणं, त्याचा फोटो अपलोड करणं किंवा PDF फाईल अपलोड करण्याचे तीन पर्याय तुमच्याकडे आहेत.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवासासंदर्भातील माहितीची नोंदणी पूर्ण केली आहे.

यानंतर विमानतळावर गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील.

जर तुम्ही दिल्लीच्या विमानतळावर प्रवास करत असाल तर ही सुविधा तुम्हाला टर्मिनल 3 च्या गेट क्रमांक 2 वर मिळेल. इतर विमानतळावर कोणत्या ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहेल, याची सर्वप्रथम खात्री करून घ्यावी.

डिजी यात्रा प्रणालीअंतर्गत बनवलेल्या विशेष अशा ई-गेटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमचा बार-कोडेड बोर्डिंग पास/मोबाईल बोर्डिंग तेथील यंत्रासमोर दाखवावा.

यानंतर फेस रेकग्निशन सिस्टीममधील (FRS) ई-गेट कॅमेऱ्याकडे तुम्हाला पाहावं लागेल.

तुमच्या चेहऱ्यासंदर्भात खात्री पटल्यानंतर तुम्हाला विमानतळामध्ये प्रवेश देण्यासाठी ई-गेट आपोआप उघडलं जाईल.

विमानतळावर प्रवेश केल्यानंतर एअरलाइन चेक-इन डेस्कवर तुमचं सामान टाका. सामान नसल्यास थेट डिजीयात्रा गेटकडे जा.

तिथेही तुम्हाला केवळ ई-गेट कॅमेऱ्याकडे पाहावं लागेल. इथेही यशस्वी प्रमाणीकरणानंतर तुम्हाला सुरक्षारक्षकामार्फत सुरक्षा तपासणीकरिता प्रवेश देण्यासाठी ई-गेट उघडेल.

आपल्या माहितीची सुरक्षितता किती?

डिजी यात्रा प्रणाली प्रवाशांची गोपनीयता जपण्यासाठी सर्व माहिती 24 तासांमध्ये हटवली जाते, अशी माहिती केंद्रीय मंत्री शिंदे यांनी शुभारंभावेळी दिली होती.

ते म्हणाले, “प्रवाशांनी दिलेली माहिती ही कुठेही जतन करून ठेवण्यात येत नाही. शिवाय, प्रवाशांचं ओळख पत्र आणि प्रवासाचे तपशील प्रवाशाच्या स्मार्टफोनमध्येच सुरक्षित वॉलेटमध्ये साठवले जातात. अपलोड केलेला डेटा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करेल. अखेरीस सर्व माहिती 24 तासांच्या आत सर्व्हरमधून काढून टाकला जाईल.”

त्यामुळे, डिजी यात्रा अप हे वापरासाठी माहितीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube,FacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)