रवींद्र महाजनी यांचं निधन; दोन-तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

फोटो स्रोत, social media
अभिनेते रवींद्र महाजनी यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
मराठी सिनेसृष्टीतलं 1970,1980 च्या दशकातलं एक देखणं आणि रुबाबदार व्यक्तिमत्त म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत.
त्यामुळे रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी (14 जुलै) सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह बंद खोलीत आढळला.
शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.
सात ते आठ महिन्यांपासून ते या ठिकाणी एकटेच राहायला होते अशी माहिती समोर आली आहे
शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली होती.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शेजाऱ्यांना ते प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते आहेत याची देखील माहिती नव्हती. ते कायमच एकटे असायचे.
तिथे काम करणाऱ्या सफाई कर्मचारी महिलेने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "ते नेहमीच माझ्याशी चांगलं बोलायचे. पण ते इतरांशी खूप काही बोलायचे नाहीत. नेहमी घरातच असायचे. मी कचरा आणायला गेले की दारातून कचरा द्यायचे. चार पाच दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला काहीतरी दुखापत झाली होती. मी त्यांच्याशी याविषयी बोलले तेव्हा ते म्हणाले की, मी दवाखान्यात जाऊन येईन. त्यानंतर माझी सुट्टी असल्यामुळे मी काही आलेच नाही."
त्या पुढे म्हणाल्या "शुक्रवारी जेव्हा मी त्यांच्याकडे कचरा मागायला दाराची बेल वाजवली तेव्हा त्यांनी दार उघडलं नाही. मला वाटलं ते झोपले असतील म्हणून मी पुन्हा थोड्यावेळाने येऊन दार वाजवलं पण तेव्हाही त्यांनी दरवाजा उघडला नाही."
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत म्हटलंय की, “आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”

फोटो स्रोत, Eknath Shinde Twitter
अभिनेता गश्मीर महाजनी हा रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
गश्मीरच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत रवींद्र म्हणाले होते की, “मी मुलाला नृत्याच्या टिप्स नाही देत. उलट मीच माझ्या मुलाकडून कधीकधी नृत्याच्या टिप्स घेत असतो. अभिनयाच्या टिप्सही मी त्याला देत नाही.
अभिनय हा आपला आपणच करायचा असतो, असं मी त्याला नेहमी सांगत असतो. आपल्या मुलानं प्रत्येक धाटणीचे चित्रपट करावेत, अशी माझी इच्छा आहे.”
गश्मीर 15 वर्षांचा असताना महाजनी कुटुंबावर आर्थिक संकट आलं होतं. त्यांना जवळपास चाळीस लाखांचं कर्ज झालं होतं. या कर्जाची परतफेड करता यावी, कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, या उद्देशाने गश्मीरने 15 व्या वर्षी स्वतः डान्स वर्कशॉप घेतलं होतं. त्यानंतर सतराव्या वर्षी त्याने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही सुरू केली. पुढच्या पाच-सहा वर्षांत महाजनी कुटुंबाने आपल्यावरचं हे कर्ज फेडलं होतं.
महाजनी यांचा प्रवास
रवींद्र महाजनी यांचा जन्म पुण्यात आला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती.
वडिलांच्या निधनानंतर रवींद्र यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली.
लोकमत फिल्मीनुसार, रवींद्र यांनी सुरुवातीला टॅक्सीचालक म्हणून काम केलं. त्याकाळी रवींद्र दिवसा अभिनयाचे धडे गिरवायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे.

फोटो स्रोत, Gashmeer Mahajani
मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना अभिनयाची संधी मिळाली.
याच नाटकाचा प्रयोग पाहून शांतारामबापूंनी रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडलं. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला.
या मराठी चित्रपटाद्वारे ते घराघरात पोहचले.
रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला.
त्यांचे लक्ष्मीची पाऊले, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, कळत-नकळत, हे चित्रपट विशेष गाजले.
रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








