गुजरातच्या किनाऱ्यावर हजारो कोटींचं ड्रग्ज येतं तरी कुठून?

फोटो स्रोत, X/@IndianNavy
भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) पथकानं मंगळवारी सामूहिक कारवाई करत पोरबंदरच्या किनाऱ्यावरून सुमारे 3300 किलो ड्रग्ज जप्त केलं आहे.
भारतीय नौदलानं एक्स या सोशल मीडिया साईटवर या कारवाईशी संबंधित माहिती शेअर केली आहे.
या कारवाईत 3089 किलो चरस, 158 किलो मेथम्फेटामाइन आणि 25 किलो मॉर्फीन जप्त केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनसीबी, नौदल आणि गुजरात पोलिसांचं या यशाबाबत कौतुक केलं आहे.
कसं पकडलं ड्रग्ज?
भारतीय नौदलाच्या माहितीनुसार सर्व्हिलान्स मिशनवरील P8I LRMR एअरक्राफ्टद्वारे मिळालेले इनपुट्स आणि एनसीबीनं दिलेल्या दुजोऱ्याच्या आधारे भारतीय नौदलाच्या लढाऊ जहाजाला संशयास्पद नावेकडं पाठवण्यात आलं.
त्यानंतर काही वेळानं भारतीय युद्धनौकेनं संशयास्पद जहाज पकडलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केलं.
ही आतापर्यंतची ड्रग्ज जप्तीची सर्वांत मोठी कारवाई असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. संशयास्पद जहाज गुजरातच्या किनाऱ्याजवळ सागरी सीमारेषेजवळ अडवण्यात आलं होतं.
त्यानंतर 27 फेब्रुवारीलाच अंमली पदार्थांसह जप्त करण्यात आलेलं जहाज आणि त्यातील क्रू मेंबर्स यांना भारतीय बेटाजवळ कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या संस्थांच्या ताब्यात देण्यात आलं.

फोटो स्रोत, X/IndianNavy
अमित शाहांनी केलं कौतुक
भारतीय गृहमंत्री अमित शाह यांनी या ऑपरेशनबद्दल एनसीबी, भारतीय नौदल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी यांनी एक्सवर याबाबत प्रतिक्रिया दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मार्गदर्शन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील ही कारवाई नशामुक्त भारताच्या दिशेनं कटिबद्ध असल्याचं दर्शवते."
एनसीबीचे उपमहासंचालक(ऑपरेशन्स) ज्ञानेश्वर सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
"भारतीय नौदल, एनसीबी आणि गुजरात पोलिसांच्या एटीएस शाखेच्या या संयुक्त कारवाईत सुमारे 3300 किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. आकडेवारीचा विचार करता ही देशातील सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यात चरस आणि हशीश सर्वाधिक प्रमाणात जप्त केलं आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
"या प्रकरणी 5 संशयित विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्यानं ते संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळीच एनसीबी, नेव्ही आणि गुजरात एटीएसचं या यशाबद्दल कौतुक केलं आहे."
हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार एनसीबीनं गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय नौदलाच्या साथीनं तीन मोहिमा राबवल्या आहेत.
फेब्रुवारी 2022 मघ्ये गुजरातच्या किनाऱ्यावरून 221 किलो मेथम्फेटामाइन जप्त केलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये केरळच्या किनाऱ्यावरून 200 किलो हाय ग्रेड हेरोइन जप्त केलं होतं.
गेल्यावर्षी मे महिन्यात एनसीबीनं पाकिस्तानातून आलेल्या एका जहाजातून 12 हजार कोटींचं 2500 किलो मेथम्फेटामाइन जप्त केलं होतं.
गुजरातमध्ये ड्रग्ज कुठून येतं?
गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध संस्थांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
त्यापैकी बहुतांश कारवाया गुजरातच्या किनारी भागात करण्यात आलेल्या आहेत. त्यात कच्छ, जामनगर, सौराष्ट्रचे इतर काही भाग आणि दक्षिण गुजरातमधील काही ठिकाणांचा समावेश आहे.
2023 मध्ये स्थानिक पोलिसांनी कच्छच्या गांधीधामपासून 30 किमी अंतरावरील मीठी रोहर गावाच्या समुद्र किनाऱ्यावरून 80 किलो कोकेन जप्त केलं होतं.
त्यापूर्वी 2021 मध्ये एनआयए या तपाससंस्थेनं मुंद्रा बेटावरून जवळपास 21 हजार कोटी रुपयांचं तीन हजार किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. त्यापूर्वी आणि नंतरही हे प्रकार सुरुच होते.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी हे अंमली पदार्थांच्या जप्तीच्या घटना म्हणजे गुजरातमधील सुरक्षादलांचं यश आणि अंमली पदार्थांविरोधात सरकारचं कठोर धोरण असल्याचं सांगतात.
पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत कसं पोहोचतं आणि त्याची ऑर्डर नेमकं कोण देतं?
सुरक्षा संस्थांच्या मते, गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इराणमधील आहे.
डीआरआयच्या सुत्रांच्या मते, तपासात अफगाणिस्तानच्या नागरिकांची नावंही समोर येत आहेत. त्यांच्याबाबत चौकशीही करण्यात आलेली आहे.
अफगाणिस्तानात सत्ताबदल झाल्यामुळं अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे का? यावरही सुरक्षा संस्थांशी संलग्न इतर संस्था लक्ष ठेवून आहेत.

फोटो स्रोत, X/@SanghaViharsh
अफू उत्पादन करणारे शेतकरी आणि तस्करांकडून बळजबरी वसुली हा तालिबानच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.
ड्रग्ज आणि गुन्हेगारीवर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार जगातील अफूच्या एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन अफगाणिस्तानात होतं. त्यावर प्रक्रिया करून हेरोईनसह इतर अंमली पदार्थ तयार केले जातात.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एखाद्या व्यक्तीला पाच ग्रॅम हेरोईनसह अटक केली तर त्याला कमी प्रमाण समजलं जातं.
तर 250 ग्रॅम किंवा जास्त ड्रग्ज हे अधिक प्रमाण समजलं जातं. त्याला खरेदी-विक्रीशी जोडलं जातं.
काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरातच्या सलाया, ओखा, मांडवी आणि सौराष्ट्रसारख्या बंदरांवरून सोने, घड्याळं किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तुंची तस्करी केली जात होती. त्यासाठी 'धव' नावाचं लहान देशी जहाज वापरलं जात होतं.
1993 मध्ये पोरबंदरच्या गोसाबारा बंदरावर आरडीएक्स आणि शस्त्रं उतरवण्यात आली होती.
त्याचा वापर मुंबईत स्फोट घडवण्यासाठी करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून गुजरातचा वापर ट्रान्झिट रूटसारखा केला जात आहे.
काही काळापूर्वी अंमली पदार्थ कच्छ, पंजाब आणि राजस्थानच्या सीमांच्या पलिकडून भुयारं किंवा पाइपांच्या माध्यमातून भारतात यायचे.
गुजरातला जवळपास 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. हा देशातील कुठल्याही राज्यातला लाभलेला सर्वांत मोठा सागरी किनारा आहे.
गुजरातमध्ये 30 हजाराहून अधिक बोटी, लहान जहाजं यांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे खुल्या समुद्रात आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात त्यांच्या हालचालींवर निगराणी ठेवणं कठीण ठरतं.
केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या इनपुट्सबरोबरच मच्छिमारांमध्ये असलेले हेर आणि सुरक्षा संस्था, नौदल आणि कोस्ट गार्ड्सकडून समुद्रात वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सिच्या मदतीनं भारतात येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवली जाते.
ड्रग्ज कोण पाठवतं आणि खरेदी कोण करतं?
गुजरात एटीएसचे उपाधिक्षक भावेश रोजिया यांनी काही काळापूर्वी बीबीसीबरोबर बोलताना याबाबत माहिती दिली होती. गुजरातमधून जप्त करण्यात येणारं ड्रग्ज प्रामुख्यानं उत्तर भारतासाठी असतं.
"ड्रग्ज गुजरातला पोहोचल्यानंतर ते वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून शक्यतो दिल्ली आणि पंजाबला पोहोचवलं जातं," असं ते म्हणाले.
ड्रग्ज गुजरातबाहेर पाठवण्याच्या पद्धतीबाबतही त्यांनी सांगितलं होतं. ड्रग्ज एकदा गुजरातला पोहोचल्यानंतर ते रेल्वे, बस किंवा कारद्वारे गुजरातबाहेर नेलं जातं, असं ते म्हणाले होते.
"जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज गुजरातमध्ये एकाच व्यक्तीकडून मागवलं जात नाही. प्रत्येकवेळी ते वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून पाठवलं जातं आणि वेगवेगळे लोक ते गुजरातबाहेर नेण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतांश लोक हे त्याच्या आधीच पकडले जातात," असंही ते म्हणाले होते.
गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डनं नुकतीच संयुक्त कारवाई करत भारतीय सागरी सीमेच्या जवळून सुमारे 280 कोटींचं हेरोईन जप्त केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
गुजरात एटीएसनुसार, पाकिस्तानातील ड्रग्ज माफिया मुस्तफानं 'अल हज' नावाच्या जहाजातून कोट्यवधींचं ड्रग्ज पाकिस्तानातून पाठवलं होतं.
हे ड्रग्ज गुजरातमार्गे उत्तर भारतात पोहोचवायचं होतं. गुजरात एटीएसला याची माहिती आधीच मिळाली होती. त्यांनी कोस्टगार्डच्या साथीनं हे जहाज रस्त्यातच पकडलं होतं.
तटरक्षक दलानं जेव्हा नावेला घेराव घातला तेव्हा चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात आलं.
या जहाजात असलेल्या नऊ पाकिस्तानी नागरिकांना हेरोईनसह ताब्यात घेतल्यानंतर एटीएस आणि एनसीबीनं वेगवेगळी पथकं बनवून उत्तर भारताच्या अनेक राज्यांत चौकशी सुरू केली आहे.











