लालकृष्ण आडवाणी : भाजपला सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारा नेता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साइट X वर याची घोषणा केली.
"लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे कळवताना मला अतिशय आनंद होतोय. मी त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं या सन्मानाबद्दल अभिनंदन केलं. "आमच्या काळातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक असलेले आडवाणीजी यांचे भारताच्या विकासातील योगदान अविस्मरणीय आहे," असं मोदी यांनी म्हटलं आहे.
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते देशाचे उपपंतप्रधान असा आडवाणी यांचा प्रवास राहिला आहे.
देशाचे गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
आडवाणींना 'भारतरत्न' देण्याचा निर्णय हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण असल्याचंही मोदी म्हणाले.
11 नोव्हेंबर 1995 रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भाजपने एक विशाल सभा आयोजित केली होती.
त्या सभेला पक्षाध्यक्ष लालकृष्ण आडवाणी बोलत होते. त्यांनी एक अचानक घोषणा केली की, पुढील निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.
आडवाणींकडून या शब्दांची अपेक्षा ना पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती ना संघ नेतृत्वाला.
ते हॉटेलमध्ये परतताच आडवाणींचे निकटवर्तीय गोविंदाचार्य यांनी त्यांना विचारले होते की, 'तुम्ही RSS सोबत चर्चा न करता एवढी महत्त्वाची घोषणा का केली?'
त्यावर आडवाणी म्हणाले, “मी संघाला याबाबत सांगितले असते तर त्यांनी ते मान्य केले नसते”
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनीही आडवाणी अशी घोषणा करणार असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, अशी कबुली दिली होती.
लालकृष्ण आडवाणी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ही घोषणा करण्यात आली.
आडवाणींनी नंतर त्यांच्या 'माय कंट्री माय पीपल' या आत्मचरित्रात लिहितात, "मी जे काही केले तो त्याग नव्हता. देश आणि पक्षासाठी काय योग्य आणि चांगले काय आहे याचे तर्कशुद्ध मूल्यांकन केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो."

फोटो स्रोत, Getty Images
आडवाणी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ
आडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला.
ते कराचीच्या पारशी भागात जमशेद क्वार्टर्समध्ये राहायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथल्या प्रसिद्ध सेंट पॅट्रिक शाळेत झाले.
अनेक दशकांनंतर, जेव्हा आडवाणी पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना भेटले, तेव्हा त्यांनी 45 मिनिटांच्या भेटीची पहिली 20 मिनिटे सेंट पॅट्रिक शाळेबद्दल बोलण्यात घालवली होती.
पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त टीसीए राघवन म्हणतात, "जेव्हा आडवाणी यांनी कराची येथील सेंट पॅट्रिक्स शाळेला 2005 मध्ये भेट दिली, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या सन्मानार्थ 'For He's a Jolly Good Fellow' हे गाणे गायलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
आडवाणी RSS चे सदस्य झाल्याचीही एक रंजक गोष्ट आहे.
आडवाणींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, "शालेय शिक्षण संपल्यानंतर मी हैदराबाद, सिंध येथे माझ्या सुट्ट्या घालवत होतो. त्या दिवसांमध्ये मी तिथे टेनिस खेळायला शिकत होतो. एके दिवशी, सामन्याच्या मध्यभागी माझ्या टेनिस जोडीदाराने सांगितले की मी आता निघतो"
"मी त्याला विचारले की, असा सेट पूर्ण केल्याशिवाय तू निघून कसा जाऊ शकतोस? त्याने उत्तर दिले, मी काही दिवसांपूर्वीच RSS चा सदस्य झालो आहे. मी शाखेत जायला उशीर करू शकत नाही”
काही दिवसांनी आडवाणी स्वतः आरएसएसचे सदस्य झाले. अशा प्रकारे, एका टेनिस सामन्याने त्याच्या RSSमध्ये प्रवेशासाठी मैदान तयार केले.
वाजपेयींसाठी राजस्थानहून दिल्लीत आले
फाळणीनंतर महिनाभरात म्हणजे सप्टेंबर 1947मध्ये अडवाणी कराचीहून दिल्लीला रवाना झाले.
ब्रिटीश ओव्हरसीज कॉर्पोरेशनच्या विमानाने दिल्लीला पोहोचलेल्या काही निर्वासितांपैकी त्यांचा समावेश होता.
आडवाणींनी राजस्थानमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
1957 च्या निवडणुकीनंतर दीनदयाल उपाध्याय यांच्या विनंतीवरून आडवाणी दिल्लीत आले.
त्यानंतर त्यांचा परिचय नवनिर्वाचित खासदार अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत करून देण्यात आला. जेणेकरून ते दिल्लीतील इंग्रजी भाषिक उच्चभ्रू लोकांमध्ये प्रवेश करू शकतील.
त्यानंतर आडवाणी वाजपेयींसोबत त्यांच्या 30 राजेंद्र प्रसाद रोड येथील निवासस्थानी राहू लागले.
1960 मध्ये 'ऑर्गनायझर'चे संपादक के.आर. मलकानी यांनी त्यांना त्यांच्या वृत्तपत्रासाठी चित्रपट परीक्षणे लिहायला लावली.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी 'नेत्र' या टोपणनावाने फिल्म रिव्ह्यू करायला सुरुवात केली. त्या दिवसांत आडवाणींना पत्रकारांच्या कोट्यातून आरके पुरममध्ये राहण्यासाठी फ्लॅट मिळाला होता. तेव्हा इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार आर रंगराजन त्यांचे शेजारी असायचे.
त्यांचा मुलगा आणि प्रख्यात इतिहासकार महेश रंगराजन सांगतात, "त्या काळात आडवाणी त्यांच्या स्कूटरवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झंडेवालान इथल्या मुख्यालयात घेऊन जायचे. माझे वडील त्यांच्यासोबत त्यांच्या स्कूटरवर बसायचे आणि बहादूरशाह जफर रस्त्यावरील त्यांच्या ऑफिसला उतरायचे. काही दिवसांनी माझ्या वडिलांनी कार घेतली तेव्हा भूमिका बदलल्या. मग आडवाणी बहादूरशाह जफर मार्गावर गाडीतून खाली उतरून झंडेवालानची बस पकडू लागले.
सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा
आडवाणी 1970 मध्ये राज्यसभेचे सदस्य झाले. 19 वर्षांनंतर म्हणजेच नोव्हेंबर 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.
1973 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघातील बंड यशस्वीपणे दडपण्यात आले.
एकेकाळी प्रजा परिषदेचे नेते आणि जनसंघाचे अध्यक्ष असलेले बलराज मधोक यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
1984 च्या निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवानंतर, 1986 मध्ये त्यांना पक्षाचे पुनरुज्जीवन आणि त्याची मूळ विचारधारा मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली.
1990 पर्यंत ते काँग्रेस पक्षाला समान पातळीवर आव्हान देण्याच्या स्थितीत होते. लोकनेते नसतानाही पक्षात गांधीवादी समाजवाद अंगीकारण्याची चर्चा थांबवण्यात ते यशस्वी झाले.

फोटो स्रोत, Getty Images
निलांजन मुखोपाध्याय त्यांच्या 'द आरएसएस आर्चन्स ऑफ द इंडियन राइट' या पुस्तकात लिहितात, "1990 मध्ये आडवाणींच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने राम मंदिराचा मुद्दा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला."
"हिंदूंचे परम पूजनीय धर्मगुरू रामाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रथयात्रेमुळे ते पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते, यात शंका नाही, पण त्या यात्रेत आडवाणींची उपस्थिती होती. त्या आंदोलनाला वैधता दिली. जी यापूर्वी कधीही दिसली नव्हती.
'6 डिसेंबर 1992 जीवनातील दुःखद दिवस'
आडवाणी यांनी भारतीय राजकारणात सुसंगत आणि तर्कसंगत शब्दसंग्रह असलेल्या भाषेचा यशस्वी वापर केला. त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या विरोधातील किंवा त्यांच्या मताशी असमहत असलेल्यांनाही ते आवडत होते.
1990 हे वर्ष पूर्णपणे आडवाणींचं होतं. 23 ऑक्टोबरला लालूप्रसाद यादव यांनी बिहारच्या समस्तीपूरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा अधिनयमाच्या कलम 3 अंतर्गत त्यांना अटक केली. त्यावेळी भाजपनं व्ही.पी.सिंह सरकारला दिलेला पाठिंबा मागं घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत तत्कालीन राष्ट्रपती आर वेंटकरमण यांना कळवण्याची जबाबदारी अटल बिहारी वाजपेयींवर होती.
दोन वर्षांनी जेव्हा अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा आडवाणी तिथं उपस्थित होते. झाशीच्या गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत असताना त्यांनी 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये दोन लेख लिहिले होते.
त्यात त्यांनी '6 डिसेंबर 1992 त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद दिवस होता' हे मान्य केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
निलंजन मुखोपाध्याय यांनी याबाबत लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात की, "सुटका झाल्यानंतर, 'लेखावरून त्यांनी मशिदीबाबत माफी मागितली आहे असं समजावं का?' असा प्रश्न आडवाणींना विचारण्यात आला होता. त्यावर असं म्हणणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. पण त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं की, संघ परिवाराला गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही. त्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता."
आडवाणी यांनी सुरू केलेलं आंदोलन 2024 मध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळं एका ध्येयापर्यंत पोहोचलं. पण 22 जानेवारी, 2024 ला झालेल्या सोहळ्यात मात्र, आडवाणी सहभागी होऊ शकले नाहीत.
आग्रा शिखर परिषदेचे आयोजन
भारतीय जनता पार्टीनं 1998 मध्ये आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यावेळी लालकृष्ण आडवाणींना आधी गृहमंत्री आणि नंतर उपपंतप्रधान बनवण्यात आलं.
पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ त्याचवेळी आग्रा शिखर परिषदेतसाठी भारतात आले होते. आग्रा शिखर परिषद अपयशी ठरली. पण, तिच्या आयोजनामागं लालकृष्ण आडवाणींची महत्त्वाची भूमिका होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
"2000 च्या सुरुवातीच्या काळात अश्रफ जहांगीर काझी भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त बनले होते. त्यांना त्यावेळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील नंबर 2 असलेल्या आडवाणींबरोबर संबंध निर्माण करायचे होते. त्यावेळी अश्रफ यांना माझ्या कारमध्ये बसवून आडवाणींच्या पंडारा पार्कमधील घरी नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती," असं करण थापर यांनी त्यांच्या 'डेव्हिल्स अॅडव्होकेट द अनटोल्ड स्टोरी' या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
थापर यांच्या मते, "मी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांना तिथं नेलं. ही गोपनीय बैठक सुमारे दीड तास चालली. त्यानंतर पुढच्या 18 महिन्यांच्या काळात आडवाणी आणि अश्रफ अशा प्रकारे 20 ते 30 वेळा भेटले. मे 2001 मध्ये भारतानं जनरल परवेझ मुशर्रफ यांना आमंत्रित केल्याचं जाहीर केलं. एकेदिवशी सकाळी साडे सहा वाजता माझा फोन वाजला. आडवाणी फोनवर होते, ते म्हणाले, मुशर्रफ येणार असल्याची बातमी तुम्ही ऐकलीच असेल. याचं मोठं श्रेय आमच्या भेटींना जातं, हे आपल्या दोघांच्या मित्राला सांगा."
पाकिस्तानी उच्चायुक्त काझी यांची गळाभेट
महत्त्वाची बाब म्हणजे, मे 2002 मध्ये जम्मूच्या जवळ कालचूक हत्याकांड घडलं तेव्हा भारत सरकारनं याच अश्रफ जहाँगीर काझी यांना एका आठवड्यात भारत सोडून जाण्यास सांगितलं होतं.
"अश्रफ इस्लामाबादला रवाना होण्याच्या एक दिवस आधी सौ. आडवाणी यांनी मला फोन केला आणि तुम्ही अश्रफ आणि त्यांच्या पत्नी आबिदा यांना चहासाठी घेऊन येऊ शकता का? असं विचारलं. एकीकडे भारत सरकार या व्यक्तीला देशाबाहेर काढत आहे आणि दुसरीकडं उपपंतप्रधान त्याच व्यक्तीला चहासाठी बोलवत आहेत, हे काही मला समजलं नाही," असंही करण थापर यांनी लिहिलं आहे.
"मी त्यांना घेऊन आडवाणींच्या घरी गेलो. आम्ही अडवाणींच्या स्टडीमध्ये चहा घेतला. निघताना जेव्हा अश्रफ आडवाणींबरोबर हात मिळवण्यासाठी पुढं गेले, त्यावेळी कमला म्हणाल्या, 'गळाभेट घ्या'."
"दोघांना हे ऐकून आश्चर्य वाटलं. दोघांनी एकाचवेळी त्यांच्याकडं पाहिलं. तेव्हा कमला आडवाणी पुन्हा म्हणाल्या, गळाभेट घ्या."
"अश्रफ आणि आडवाणी यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मी आडवाणींच्या मागे उभा होतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले असल्याचं मी पाहिलं होतं."
पुस्तके वाचवण्याचा आणि चित्रपट पाहण्याचा छंद
आडवाणींना कायम पुस्तके वाचण्याचा छंद राहिला आहे. एकदा त्यांना त्यांची कमकुवत बाजू किंवा कमजोरीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी पुस्तके आणि काही प्रमाणात चॉकलेट असं उत्तल दिलं होतं. एलविन टॉफलरचं 'फ्यूचर शॉक', 'थर्ड वेव्ह' आणि 'पॉवर शिफ्ट' ही त्यांची आवडती पुस्तकं आहेत.
त्यांना इतिहास आणि राजकारणावर लिहिलेली स्टेनली वॉलपर्ट यांची पुस्तकंही खूप आवडतात. आडवाणी कायमच चित्रपटांचेही चाहते राहिलेले आहेत.
सत्यजित राय यांचे चित्रपट, हॉलिवूडचे 'द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय', 'माय फेअर लेडी' आणि 'द साउंड ऑफ म्युझिक' त्यांचे आवडते चित्रपट आहेत.
हिंदी चित्रपटांमध्ये आमीर खानचा 'तारे जमीन पर' आणि शाहरूख खानचा 'चक दे इंडिया' चित्रपट त्यांना खूप आवडले. आडवाणींना संगीताचीही खूप आवड आहे.
लता मंगेशकर यांचं 'ज्योती कलश छलके' गाणं त्यांचं सर्वात आवडतं गाणं आहे. त्याशिवाय त्यांना मेहदी हसन, जगजित सिंह आणि मलिका पुखराज यांच्या गझल ऐकायला आवडतात.
जिन्नांचे कौतुक केल्याने अडकले वादात
आडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जिन्नांचं कौतुक केलं, त्यावेळी त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एक 'मास्टर स्ट्रोक' खेळला. पण त्यामुळं उलट त्यांची राजकीय कारकिर्द जवळपास संपुष्टात आली होती.
वरिष्ठ पत्रकार आणि इंदिरा गाँधी सेंटर ऑफ आर्ट्सचे प्रमुख, राम बहादूर राय यांच्या मते, "आडवाणींनी असं का केलं, हे आडवाणीच अधिक चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात. ते वाजपेयींसारखी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. पण ते कोणालाही मान्य झालं नाही. कारण त्यांचा यापूर्वीचा इतिहास ते मान्य करण्यात अडथळा ठरत होता."

फोटो स्रोत, Getty Images
"ते अटल बिहारी वाजपेयींना पूरक म्हणून चांगले वाटतात. पण जेव्हा स्वतः नेता म्हणून समोर येतात तेव्हा ते आरएसएसचे प्रवक्ते बनतात. या भूमिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करताच त्यांचं दुहेरी नुकसान होतं. पहिलं नुकसान म्हणजे, ज्या ठिकाणी ते उभे आहेत ती जमीन पायाखालून सरकते आणि त्यांच्याबाबत प्रचंड अविश्वास निर्माण होतो.
उपेक्षेची 'व्यथा' आणि 'भारतरत्न' सम्मान
आडवाणींना 2005 नंतर नागपूरहून येणाऱ्या संकेतांचा अर्थ लावता आला नाही. कारण त्यात वारंवार सुचवलं जात होतं की, त्यांना सक्रिय राजकारणापासून हटवण्याची वेळ आली आहे.
त्याचा परिणाम म्हणजे, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना राजकीय जीवनातील अशा अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला, जी त्यांच्याएवढी उंची असलेल्या कोणत्याही नेत्याच्या वाट्याला कधीच येता कामा नये.

फोटो स्रोत, Getty Images
2013 मध्ये गोव्यातील पक्षाच्या अधिवेशनात जेव्हा नरेंद्र मोदींना पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलं, त्यावेळी त्यांचं दुःख वाटून घेणारं कोणीही नव्हतं. ज्या नेत्यांची पूर्ण एक पिढी त्यांच्या मार्गदर्शनात किंवा संरक्षणात तयार झाली,त्याच नेत्यांकडून त्यांना मिळालेली ही एक दुःखद भेट होती.
हजारो किलोमीटरची रथयात्रा करून पक्षाला देशातील लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याला राजकारणात अशाप्रकारे उपेक्षा वाट्याला येणं काही लोकांना अत्यंत अन्यायकारक वाटलं.
शिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर अडवाणींना मार्गदर्शन मंडळात समाविष्ट करणंही अनेकांना पटलं नाही. अगदी विरोधी पक्षानंही यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणींना देशातील सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न'ने गौरवण्याची घोषणा केली आहे. हा त्यांच्या अनेक दशकांच्या परिश्रमाचा 'न्याय्य सन्मान' असल्याचं समर्थक म्हणत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








