रशियामध्ये 8.8 तीव्रतेचा भूकंप; अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images
युएस जिओलॉजिकल सर्व्हेनी सांगितले आहे की रशियात पूर्व किनारी प्रदेशात 8.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. यानंतर प्रशांत महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
US जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार रशियातील कमचटका बेटाच्या 136 किमी पूर्वेला आणि 19 किमी खोल या भूकंपाचे केंद्र आहे.
गेल्या अनेक दशकातला हा सर्वांत मोठा भूकंप असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या भूकंपामुळे काय नुकसान झाले याची अद्याप माहिती हाती आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
US जिओलॉजिकल सर्व्हेनी म्हटले आहे की पुढील तीन तासांमध्ये रशिया आणि जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अलास्कासहित अनेक क्षेत्रांमध्ये धोक्याचा इशारा दिला आहे.
सुरुवातीला हा भूकंप 8.7 तीव्रतेचा आहे अशी माहिती देण्यात आली होती पण नंतर ते जिओलॉजिकल सर्व्हेकडून अपडेट करण्यात आले असून हा भूकंप 8.8 तीव्रतेचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जपानमध्ये त्सुनामीची नोंद
जपानमध्ये सुरुवातीच्या लाटा या 30 सेमी (12 इंच) आहेत असे सांगितले आहे. या लाटा त्सुनामीच्या आहेत.
होक्काईडो प्रांतातील न्युमेरा या शहराच्या किनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटांची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जपानमधील अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत, असे जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी सांगितले.

नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून उंचीवर आश्रय घ्यावा असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर होक्काईडो प्रांतातील मुकावा या ठिकाणी एका इमारतीच्या टेरेसवर आश्रय घेतल्याचे व्हीडिओ समोर आले आहेत.
किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जपानने फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले
त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर जपानने फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
जपानच्या टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (TEPCO) ने म्हटलं आहे की, फुकुशिमा दाईची आणि फुकुशिमा दाईनी अणुप्रकल्पांमधील कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना उंच ठिकाणी नेण्यात आलं आहे.
2011 साली जपानमध्ये आलेल्या 9.0 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीनंतर, त्यांच्या फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली होती.

फोटो स्रोत, Getty Images
TEPCO ने सांगितलं आहे की, या प्रकल्पांना सध्या कोणतंही नुकसान झालेलं नाही आणि त्सुनामीसंदर्भातील इशाऱ्यांवर लक्ष ठेवलं जात आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला,TEPCO ने घोषणा केली होती की इंधनाचा कचरा पूर्णपणे काढून टाकण्यास 12 ते 15 वर्षे उशीर होऊ शकतो, त्यामुळे रेडिएशन पातळी कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल.
इतिहासातील सहाव्या क्रमांकाचा भूकंपाचा मोठा धक्का
आतापर्यंत इतिहासात नोंद झालेल्या सर्वांत मोठ्या भूकंपाच्या यादीत हा भूकंप सहाव्या क्रमांकावर असेल असं भूगर्भशास्त्राच्या प्राध्यापिका हेलन जानिसवेझकी यांनी बीबीसीच्या न्यूज डे या कार्यक्रमात सांगितले.
जिओलॉजिकल सर्व्हेनी दिलेल्या आकडेवारीनुसार 1960 मध्ये चिलेमध्ये 9.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती.
त्सुनामी म्हणजे काय?
समुद्रतळाशी जोरदार हालचाली झाल्या की किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा वेग आणि आकार आक्राळविक्राळ वाढतो. या भीषण लाटांना त्सुनामी म्हटलं जातं.
त्सुनामी हा जपानी शब्द आहे. 'त्सु' शब्दाचा अर्थ आहे समुद्र आणि 'नामी'चा अर्थ लाटा.
समुद्रात निर्माण होणाऱ्या गर्त्यांनाही त्सुनामी म्हटलं गेलं. मात्र गर्ते वेगळे असतात. समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा चंद्र-सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतात. मात्र सर्वसामान्य लाटांपेक्षा त्सुनामीच्या लाटा वेगळ्या असतात.
त्सुनामीच्या लाटांना किनाऱ्यावर धडकण्यासाठी काही वेळेला पाच मिनिटं लागू शकतात, काहींना तासभर लागू शकतो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण, पौर्णिमेमुळे लाटांची तीव्रता आणि आकार प्रचंड झाला. गेल्या काही महिन्यात क्रेकाटोआ ज्वालामुखी जागृत झाला आहे.
ऑगस्ट 1883 मध्ये क्रेकाटोआ ज्वालामुखीने इंडोनेशियात उत्पात घडवला होता. तब्बल 41 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर थडकल्या होत्या. 30 हजारहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या लाटांचा तडाखा 1945मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या तडाख्यापेक्षा 13,000 पटींनी जास्त होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











