गुगलने आपली चूक केली मान्य, तुर्की भूकंपावेळी 1 कोटी लोकांना इशाराच पाठवला नाही

फोटो स्रोत, EPA
- Author, जेम्स क्लेटन, ॲना फॉस्टर आणि बेन डेरिको
- Role, बीबीसी न्यूज
तुर्कस्थानमध्ये 2023 साली झालेल्या विनाशकारी भूकंपावेळी गुगलच्या इशारा देणाऱ्या यंत्रणेनं वेळेवर आणि योग्य प्रकारे काम केलं नसल्याचं आता समोर आलं आहे.
या यंत्रणेनी अचूकपणे काम केले असते तर लाखो लोकांना अलर्ट मिळाला असता ज्यामुळे ते संकटातून बाहेर येऊ शकले असते. त्यामुळे अशा तंत्रज्ञानाविषयी आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
2023 मध्ये तुर्कीत झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या वेळी इशारा देणारी यंत्रणा अचूकपणे काम करण्यात अपयशी ठरल्याचं गुगलनं मान्य केलं आहे.
भूकंपाच्या केंद्रापासून 98 मैलांच्या आत राहणाऱ्या 1 कोटी लोकांना गुगलचा 'High Alert' मिळू शकला असता, ज्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी 35 सेकंद मिळाले असते.
परंतु, त्याऐवजी 7.8 तीव्रतेच्या पहिल्या भूकंपासाठी फक्त 469 लोकांनाच 'टेक अॅक्शन' असा इशारा पाठवण्यात आला होता.
55 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू
गुगलनं 'बीबीसी'ला सांगितलं की, सुमारे पन्नास लाख लोकांना कमी तीव्रतेचा इशारा पाठवण्यात आला होता.
जो केवळ हलके धक्के किंवा हादऱ्यांसाठी (लाइट शेकिंग) दिलेला असतो आणि फोनवर पाठवलेला तो इशारा फारसा ठळकपणे दिसत नाही.
यापूर्वी गुगलनं 'बीबीसी'ला त्यांची सिस्टिम नीट काम करत असल्याचं सांगितलं होतं.
हा इशारा देणारी सिस्टिम अँड्रॉईड फोनवर काम करते आणि तुर्कीतील 70 टक्क्यांहून जास्त फोन अँड्रॉईडचे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
6 फेब्रुवारी 2023 रोजी दक्षिण-पूर्व तुर्कीला दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले, ज्यात 55,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 1 लाखांहून अधिक लोक जखमी झाले. भूकंपाच्या धक्क्यांनी जेव्हा इमारती कोसळल्या, त्यावेळी अनेक लोक झोपेतच होते.
भूकंप होण्याच्या दिवशी गुगलची इशारा देणारी सिस्टिम (अलर्ट सिस्टिम) सक्रिय होती. परंतु या सिस्टिमला भूकंप किती तीव्रतेचा आहे, हे ओळखता आलं नाही.
"प्रत्येक भूकंपातून आम्ही काही ना काही शिकतो आणि त्यानुसार आमची सिस्टिम अधिक चांगली करत राहते," असं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
'हे कसं काम करतं?'
गुगलची 'अँड्रॉईड अर्थक्वेक अलर्ट्स' (एइए) नावाची सिस्टिम अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या हजारो मोबाईल फोनमधून येणारे हादरे ओळखण्यास सक्षम आहे.
भूकंपाचे धक्के जमिनीतून तुलनेनं थोडं हळूहळू पसरत असल्यामुळे लोकांना आधीच इशारा दिला जाऊ शकतो.
गुगलचा सर्वात महत्त्वाचा आणि तीव्र इशारा 'टेक अॅक्शन' म्हणून ओळखला जातो. हा इशारा आल्यावर फोनवर जोरात अलार्म वाजतो, 'डू नॉट डिस्टर्ब' मोड असला तरी तो बंद होतो आणि पूर्ण स्क्रीनवर इशारा दाखवला जातो.
जेव्हा जोरदार धक्के जाणवतात आणि जीवाला धोका असतो, तेव्हा हा इशारा लोकांना पाठवला जाणं अपेक्षित असतं.

फोटो स्रोत, Getty Images
एइए सिस्टिममध्ये 'बी अवेअर' नावाचा एक सौम्य इशाराही असतो. हा हलक्या धक्क्यांची किंवा हादऱ्यांची शक्यता सांगतो, पण 'डू नॉट डिस्टर्ब' मोड चालू असेल, तर तो फोनवर ठळकपणे दिसत नाही किंवा त्याला ओव्हरराईड करत नाही.
तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटाला भूकंप झाला, तेव्हा अनेक लोक झोपेत होते. हादरेही खूप तीव्र स्वरुपाचे होते, त्यामुळे 'टेक अॅक्शन' सारखा तीव्र इशारा म्हणजेच हाय अलर्ट मिळणं खूप गरजेचं होतं. कारण अशाच प्रकारचा इशारा लोकांना जागं करू शकला असता.
भूकंपानंतरच्या काही महिन्यांत 'बीबीसी'ला अशा लोकांशी बोलायचं होतं, ज्यांना हा इशारा मिळाला होता. कारण ते गुगलचे तंत्रज्ञान किती उपयोगी ठरलं दे दाखवू इच्छित होते.
भूकंपाने प्रभावित झालेल्या भागांतील शहरांमध्ये आणि गावांमध्ये आम्ही अनेक महिने लोकांशी बोलत राहिलो. परंतु, भूकंप येण्यापूर्वी 'टेक अॅक्शन' सारखा गंभीर इशारा मिळालेली एकही व्यक्ती आम्हाला सापडली नाही. त्यानंतर आम्ही आमचे निष्कर्ष त्या वर्षाच्या शेवटी प्रकाशित केले.
'प्रणालीच्या मर्यादा'
गुगलच्या संशोधकांनी 'सायन्स' जर्नलमध्ये नेमकं काय चुकलं याची माहिती दिली आहे. त्यांनी यामागचं कारण 'भूकंप ओळखणाऱ्या अल्गोरिदममधील मर्यादा' असं सांगितलं आहे.
पहिल्या भूकंपावेळी सिस्टिमनं हे धक्के फक्त 4.5 ते 4.9 तीव्रतेचे असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, पण प्रत्यक्षात तो भूकंप 7.8 तीव्रतेचा होता.
त्या दिवशी नंतर आलेला दुसरा मोठा भूकंपसुद्धा सिस्टिमने कमी तीव्रतेचा असल्याचं दाखवलं. या वेळी फक्त 8,158 फोनवर 'टेक अॅक्शन' इशारा पाठवण्यात आला आणि जवळपास चार लाख लोकांना 'बी अवेअर' इशारा मिळाला.
भूकंपानंतर गुगलच्या संशोधकांनी अल्गोरिदममध्ये बदल केला आणि पहिला भूकंप पुन्हा एकदा तपासण्यासाठी कॉम्प्युटरवर चाचणी घेतली.
या वेळी सिस्टिमने सर्वाधिक धोक्यात असलेल्या लोकांसाठी 1 कोटी 'टेक अॅक्शन' इशारे तयार केले आणि भूकंपाच्या केंद्रापासून दूर असलेल्या लोकांसाठी 67 लाख 'बी अवेअर' इशारे पाठवले.
"प्रत्येक भूकंप इशारा प्रणालीला एकच मोठं आव्हान असतं, मोठ्या तीव्रतेच्या भूकंपांसाठी अल्गोरिदम अचूकपणे सेट करणं," असं गुगलकडून 'बीबीसी'ला सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु, कोलोरॅडो स्कूल ऑफ माईन्सच्या सहाय्यक प्राध्यापक एलिझाबेथ रेड्डी यांचं म्हणणं आहे की, ही माहिती मिळण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणं ही चिंतेची बाब आहे.
"याला इतका वेळ लागल्याने मी खरोखर निराश आहे," असं त्या म्हणाल्या.
"आपण कुठल्या छोट्या घटनेविषयी बोलत नाहीये तर इथे लोकांचा जीव गेला आहे आणि या इशाऱ्याचं काम योग्य पद्धतीनं झालेलं दिसलं नाही," असं त्या म्हणाल्या.
गुगलचं म्हणणं आहे की, त्यांची इशारा देणारी सिस्टिम ही फक्त एक पूरक साधन आहे. ती राष्ट्रीय इशारा प्रणालीची जागा घेऊ शकत नाही.
परंतु, काही शास्त्रज्ञांना चिंता आहे की काही देश अशी तंत्रज्ञानं वापरत आहेत ज्याची अजून पूर्ण चाचणी झालेली नाही आणि त्यावर खूप विश्वास ठेवत आहेत.
"हे तंत्रज्ञान किती चांगलं काम करतं, याबद्दल पूर्ण पारदर्शकता असणं खूपच गरजेचं आहे," असं पॅसिफिक नॉर्थवेस्ट सिस्मिक नेटवर्कचे संचालक हॅरोल्ड टोबिन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
"काही देश असं गृहीत धरतील का की, गुगल इशारे देतोय, मग आपल्याला काही करायची गरज नाही?"
गुगलच्या संशोधकांनी म्हटलं की, भूकंपानंतर केलेल्या अभ्यासामुळे सिस्टिम अधिक चांगली सुधारली आहे आणि एइए सिस्टिमने आता 98 देशांमध्ये इशारे पाठवले आहेत.
'बीबीसी'ने गुगलला विचारलं आहे की, 2025 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपावेळी एइए सिस्टिमने कसं काम केलं, पण त्यांच्याकडून अद्याप त्यांचं उत्तर मिळालेलं नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











