'गॉसिप' का करावं वाटतं? ते मनोरंजक असतं की पाप? जाणून घ्या मानवी उत्क्रांतीबरोबरचा प्रवास

गॉसिप

फोटो स्रोत, Getty Images

गॉसिप म्हटलं की काहीजणांमध्ये एकदम उत्साह संचारतो, तर काहीजण त्याबद्दल नाक मुरडतात. आपल्याला आवडो की न आवडो, गॉसिप हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे.

गॉसिपमुळे तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. त्यातून तुमच्या वर्तनाचं समर्थन होऊ शकतं किंवा त्यासाठीची कारणं दिली जाऊ शकतात. ते अनेकदा मनोरंजक असतं. अनेकजण तर त्याला 'पाप' देखील मानतात.

मात्र या गोष्टी खऱ्या आहेत का, याबद्दल संशोधन काय सांगतं आणि तज्ज्ञांना काय वाटतं?

मानववंशशास्त्रज्ञांना (अँथ्रोपोलॉजिस्ट) वाटतं की गॉसिप ही अशी बाब आहे, जी जवळपास सर्व प्रकारच्या संस्कृतींमध्ये आढळते. मग ते शहर असो की गाव, गॉसिप असतंच.

डॉ. निकोल हेजन, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इव्होल्युशनरी अँथ्रोपोलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात, प्रत्येक संस्कृतीमध्ये, "अनुकूल वातावरण मिळालं की लोक गॉसिप नक्की करतात."

सर्वसाधारणपणे, एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल वाईट बोलणं, त्याला नावं ठेवणं याला 'गॉसिप' म्हटलं जातं.

मात्र डॉ. हेस यांना वाटतं की गॉसिपची कक्षा यापेक्षा अधिक व्यापक आहे.

गॉसिप

फोटो स्रोत, Getty Images

त्यांना वाटतं की, ज्या ज्या गप्पांमध्ये, ज्या ज्या संवादांमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या "प्रतिष्ठेशी निगडीत गोष्टी"बद्दल बोललं जातं किंवा इतरांना सांगितलं जातं तो प्रत्येक संवाद किंवा गप्पा गॉसिप असतात.

त्यांचं म्हणणं आहे की आपले मित्र, कुटुंबिय, सहकारी इतकंच काय आपले विरोधकदेखील आपल्याबद्दल जे बोलतात, त्या सर्व गोष्टी, गप्पा यांचा समावेश गॉसिपमध्ये होऊ शकतो.

डॉ. हेस म्हणतात, "माझ्या मते, प्रत्येक वेळेस गॉसिप तिसऱ्या व्यक्तीच्या अनुपस्थितीतच होतं असं आवश्यक नाही. ज्या व्यक्तीबद्दल बोललं जात असतं, ती तिथे उभी देखील असू शकते."

"जर तुम्ही त्या व्यक्तीच्या कपड्यांबद्दल किंवा त्यांच्या एखाद्या कामाबद्दल बोलत असाल, तर त्याला देखील मी गॉसिपच मानेन."

मात्र माणसं गॉसिप का करू लागली, या प्रश्नाचं उत्तर अजूनही संशोधकांना सापडलेलं नाही. ते अजूनही एक कोडंच आहे.

गॉसिप करण्यामागे काय कारणं असू शकतात, त्याबद्दल जाणून घेऊया.

एकमेकांशी जोडून घेण्याचं साधन आहे गॉसिप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

समाजात गॉसिपची एक चांगली भूमिका देखील असू शकते. इव्होल्युशनरी अँथ्रोपोलॉजीचे प्राध्यापक रॉबिन डनबार यांनी हा दृष्टीकोन लोकप्रिय केला.

त्यांच्या मते, 'प्रायमेट' म्हणजे माकड आणि नरवानर वर्गात ग्रूमिंग (देखभाल करणं, साफसफाई करणं) हे फक्त स्वच्छतेसाठी तर सामाजिक नातेसंबंध मजबूत करण्याचा, तणाव कमी करण्याचा आणि भांडणानंतर समेट घडवून सलोखा निर्माण करण्याचा देखील मार्ग आहे.

डनबार याला 'ॲलोग्रूमिंग' असं म्हणतात. त्यांना वाटतं की माणसं करत असलेलं गॉसिप याच ॲलोग्रूमिंगचं आधुनिक रूप आहे. ते तर इथपर्यंत म्हणतात की भाषेचा विकासदेखील बहुधा याच गोष्टीसाठी झाला असावा की माणसांना गॉसिप करता यावं.

अमेरिकेतील डार्टमाऊथ विद्यापीठात 2021 मध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात आढळलं की जे लोक गॉसिप करतात, ते फक्त एकमेकांच्या विचारांवरच प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्यातील जवळीक देखील वाढते.

संशोधकांनी म्हटलं आहे, "आम्हाला वाटतं की या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना आपापसात समानता जाणवली. त्यामुळे त्यांच्यात एक सामायिक वास्तव निर्माण झालं."

"यामुळे त्यांची एकमेकांबरोबरची वर्तणूक आणि दृष्टीकोन तर बदललाच, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक संबंधांची भावनादेखील निर्माण झाली."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संशोधनातून हे देखील समोर आलं की गॉसिप करणाऱ्या गटात एकमेकांबरोबरचं सहकार्य वाढतं.

संशोधनातून हे देखील समोर आलं की गॉसिप करणाऱ्या गटात एकमेकांबरोबरचं सहकार्य वाढतं.

जेव्हा लोकांना गॉसिप करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी ग्रुप गेम मध्ये जास्त पैसे देण्याची इच्छादेखील दाखवली.

संशोधक म्हणाले, "गॉसिप म्हणजे फक्त टीका करणं, नाव ठेवणं किंवा वाईट बोलणं इतकंच नाही. ती यापेक्षा अधिक गुंतागुंतीची गोष्ट आहे."

'नॉर्मल गॉसिप' या पॉडकास्टमध्ये सर्वसामान्य लोक गॉसिपबद्दलचा त्यांना अनुभव सांगतात. केल्सी मॅकिनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आहेत. केल्सी यांना माहीत आहे की कसं एखादी रंजक कहाणी अनोळखी लोकांना देखील एकमेकांजवळ आणू शकते.

कोरोनाच्या संकटात सर्व जण क्वारंटाईन होते. त्या काळात अशा कथांचं महत्त्व आणखी वाढलं.

केल्सी म्हणतात, "माझ्या लक्षात आलं की आपल्याला सर्वांना गॉसिपची किती उणीव भासत होती."

त्यांना वाटतं, "आपण जे बोलतो आणि ऐकतो, त्यातूनच जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन तयार होतो. यात जोखीम तर असते. मात्र यामुळे खूप काही चांगलं देखील घडू शकतं."

तग धरण्याचा, जिवंत राहण्याचा मार्ग

उत्क्रांतीच्या लाखो वर्षांच्या काळात, संभाव्य धोक्यांपासून स्वत:चं आणि आपल्या जवळच्या लोकांचं संरक्षण कसं करायचं हे माणूस शिकला आहे.

काहीजणांसाठी गॉसिप हा जिवंत राहण्याचा किंवा तग धरण्याच्या डावपेचाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषकरून जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोरील परिस्थिती कठीण असते तेव्हा याचा उपयोग होतो.

आपलं जगणं आणि समाजातील आपलं स्थान, बऱ्याचअंशी आपल्या प्रतिष्ठेवर देखील अवलंबून असतं.

डॉ. हेस सांगतात की जर एखाद्या व्यक्तीची बदनामी झाली, तर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे त्या व्यक्तीच्या समाजातील स्थानावर परिणाम होऊ शकतो. उत्पन्नाच्या संधी कमी होऊ शकतात. इतकंच काय अन्नासारख्या मूलभूत गरजा भागवणं देखील कठीण होऊ शकतं.

त्या म्हणतात, "त्यामुळेच नकारात्मक गॉसिपमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काहीजणांसाठी गॉसिप हा जिवंत राहण्याचा किंवा तग धरण्याच्या डावपेचाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

डॉ. हेस यांना वाटतं की गॉसिप हे एक प्रकारचं सामाजिक नियंत्रण देखील आहे. गॉसिपचा वापर लोक स्वत:चं समाजातील स्थान राखण्यासाठी किंवा ते उंचावण्यासाठी करतात.

समाजातील प्रतिमा चांगली असावी, त्यावर आपलं नियंत्रण असावं, असा लोकांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे ते गॉसिपच्या माध्यमातून एकमेकांवर प्रभाव टाकतात.

डॉ. हेस म्हणतात की लोक गॉसिपचा वापर सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी करतात. तर अनेकवेळा प्रतिस्पर्ध्यांना कमकुवत करण्यासाठी, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठीदेखील गॉसिपचा वापर केला जातो.

त्यांना वाटतं, "माणूस मूळातच आपल्याच प्रजातीतील इतर लोकांचा सामना करतो. हा संघर्ष कधीही पूर्णपणे संपत नाही."

गॉसिप हे मनोरंजनाचं एक साधन

बहुतांश लोकांना गॉसिप म्हणजे एक किरकोळ आणि मजेशीर गोष्ट वाटते.

पॉडकास्टर मॅकिनी म्हणतात, "अशाच गॉसिपमध्ये मी निपुण आहे."

गॉसिपबद्दल त्यांना असणारी ओढ आणि कथा ऐकण्याचा त्यांचा छंद त्यांच्या एका अनुभवाशी जोडलेला आहे. त्या एका धार्मिक वातावरणात मोठ्या झाल्या. तिथे शिकवण्यात आलं होतं की गॉसिप करणं पाप असतं.

त्या म्हणतात, "तुमच्या तोंडातून निघून दुसऱ्यापर्यंत जे पटकन पोहोचतं, तेच उत्तम गॉसिप असतं."

जगात जर गॉसिपच नसेल तर? यावर हसून त्या म्हणतात, "अरे देवा! मग तर हे जग खूपच कंटाळवाणं होईल."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोरंजनासाठी असो, की जिवंत राहण्यासाठीचा डावपेच म्हणून असो की मग लोकांशी जोडून घेण्यासाठी असो, गॉसिप आता आपल्या आयुष्याचा कायमस्वरुपी भाग झालं आहे.

मग ते मनोरंजनासाठी असो, की जिवंत राहण्यासाठीचा डावपेच म्हणून असो की मग लोकांशी जोडून घेण्यासाठी असो, गॉसिप आता आपल्या आयुष्याचा कायमस्वरुपी भाग झालं आहे.

डॉ. हेस म्हणतात की हे एक "सामान्य मानवी वर्तन" आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही.

त्या सांगतात, "गॉसिपचा खरोखरच परिणाम होतो. जर या फक्त काल्पनिक, खोट्या किंवा अशाच केलेल्या गप्पा असत्या, तर त्यामुळे समाजात लोकांनी कोणाची मदत करावी आणि कोणाची करू नये, हे ठरलं नसतं."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.