कोरोना व्हायरस : एकांतवास आणि अलगीकरण यांनी आपली विचारप्रक्रिया कशी बदलते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झरिया गॉरवेट
- Role, बीबीसी
माणूस समाजशील प्राणी आहे, मग आपण दीर्घ काळासाठी एकटे असतो तेव्हा काय होतं?
नील अॅन्सेल पूर्णतः अपघाताने संन्यासी झाले.
1980 च्या दशकात ते लंडनमध्ये इतर 20 लोकांसोबत अनधिकृतरित्या राहत होते. मग कोणीतरी त्यांच्या समोर वेल्शमधील पर्वताळ भागातील एका बंगलीमध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवला. यासाठी वर्षाचं केवळ 100 पौंड (130 डॉलर) भाडं भरावं लागणार होतं. अॅन्सेल यांना हा प्रस्ताव नाकारणं शक्यच नव्हतं. ही जागा अतिशय दुर्गम वनात होती, तिथे रात्री आकाशामध्ये चांदण्यांची चादर पांघरलेली दिसायची, आणि घराजवळच्या देवदार वृक्षावर गेली 20 वर्षं राहणाऱ्या डोंबकावळ्यांच्या जोडप्याचाच शेजार होता.
या निसर्गसुंदर दृश्यासोबतच टोकाचं अलगीकरणही स्वीकारावं लागणार होतं, हा यातला पेच होता. किमान युनायटेड किंगडममध्ये तरी इतक्या प्रमाणात अलगीकरण साध्य करणं अवघड होतं. अॅन्सेल एका टेकडीवरच्या शेतावर राहत होते, तिथे केवळ एकच वृद्ध भाडेकरू होता. या ठिकाणावरून सर्वांत जवळचं गावही काही मैल दूर होतं. त्यांच्याकडे फोन नव्हते. पाच वर्षं ते या घरात राहत होते आणि या कालावधीमध्ये त्यांना घरावरून एकही व्यक्ती चालत जाताना दिसली नाही.
"मला एकट्याने राहायची इतकी सवय झाली होती की एके दिवशी मी गावातल्या एका दुकानात गेलो, तर तिथल्या काउन्टरवर काही वस्तूसंबंधी विचारणा करताना माझा आवाज घोगरा झाल्याचं मला जाणवत होतं," असं ते सांगतात. "दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मी एक शब्दही बोललो नव्हतो, असं माझ्या लक्षात आलं. आणि हीच माझ्यासाठी सर्वसाधारण परिस्थिती झाली होती."
मानवी सभ्यतेच्या अवकाशात अॅन्सेल परतले तोवर ते एकट्याने राहायला पूर्ण सरावलेले होते आणि सामाजिक जग हे त्यांच्यासाठी काहीसं धक्कादायक होतं. "इतक्या प्रमाणात बोललं जातंय, हे मला झेपत नव्हतं. मी असामाजिक व्यक्ती नाही, पण याबाबतीत मला बरंच झगडावं लागलं."
आणखी एक गोष्ट अॅन्सेल यांच्या लक्षात आली ती म्हणजे- त्यांची ओळख ओसरायला लागली होती. "आपण एकटे असतो तेव्हा आपण कोण आहोत याची जाणीव ओसरायला सुरुवात होते, कारण इतर लोकांच्या प्रतिसादांद्वारे आपल्याला स्वतःच्या प्रतिमेचं प्रतिबिंब सापडत नाही. त्यामुळे परत आल्यावर सामाजिक अवकाशामध्ये मी कोण असेन याचा काही प्रमाणात पुनर्शोध मला घ्यावा लागला," असं ते सांगतात.
आता 'फास्ट-फॉरवर्ड' करून 2020 या वर्षामध्ये येऊ. अॅन्सेल यांच्या अनुभवांचे अनुनाद आता कधी नव्हे इतक्या व्यापक प्रमाणात ऐकू येऊ शकतात. टाळेबंदी, मुखपट्ट्या आणि स्व-अलगीकरण यांसारख्या गोष्टींमुळे आपल्यापैकी अनेकांनी स्वतः सोबत आधीपेक्षा अधिक वेळ घालवला आहे.
दीर्घकालीन अलगीकरणाचे मेंदूवर कोणते परिणाम होतात? आपल्याला सामाजिकतेचा सराव गरजेचा असतो का? आणि सर्व गोष्टी पूर्ववत होतील तेव्हा सामाजिकीकरण कसं साधायचं याची आठवण तरी आपल्याला राहिलेली असेल का?
माणूस अत्यंत समाजशील प्राणी आहे. आपल्या जीवनरितीमधून हे पुरेसं स्पष्ट होतं, पण एक कळीचा पुरावा आपल्या डोक्यामध्ये लपलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वानरगणातील प्राण्यांच्या मेंदूचा आकार आणि या प्राण्यांनी तयार केलेल्या समुदायांचा आकार यांच्यात काहीएक नातं असल्याचं दिसतं: मेंदू जितका मोठा तितकी सामाजिक अवकाशाची व्याप्ती मोठी.
आपल्या सढळ प्रमाणबद्धता लाभलेल्या अवयवांमुळे वानरगणातील इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा माणसं सर्वांत मोठे गट करतात, त्यात सरासरी 150 व्यक्ती असतात. ही संख्या डनबर यांनी निश्चित केली, म्हणून त्याला 'डनबर्स नंबर' असं म्हणतात.
चर्चमध्ये जमणाऱ्या लोकांपासून ते ट्विटरवरच्या संपर्कजाळ्याच्या सरासरी व्याप्तीपर्यंत विविध ठिकाणी ही संख्या वापरली जाताना दिसते.
सामाजिकीकरण हा मानसिक व्यायाम असतो, हे यावरचं एक स्पष्टीकरण आहे. इतर माणसांशी यशस्वीरित्या संपर्क ठेवण्यासाठी आपल्याला आश्चर्य वाटावं इतक्या प्रमाणात माहिती लक्षात ठेवावी लागते. ती माणसं कुठे राहतात आणि कुठे काम करतात यांसारख्या प्राथमिक तपशिलांसोबतच त्यांचे मित्रमैत्रिणी, शत्रू, भूतकाळातली छोटीमोठी गैरवर्तनं, सामाजिक स्थान आणि त्यांच्या प्रेरणा अशी सूक्ष्म माहितीही असली तर ते उपयोगी पडतं.
अनेक वेळा या प्राथमिक गृहितकांबाबतीत गफलत झाल्यामुळे अवघडलेली परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, नुकतंच नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या मित्राला त्याच्या कामाबद्दल विचारपूस करणं किंवा लवकरच स्वतः पालक होणाऱ्या जोडप्याकडे मुलं जन्माला घालण्याबद्दल तक्रारी करणं.
आपल्या डोक्यात अशा प्रक्रिया पार पाडण्याची शक्ती किती प्रमाणात आहे, यावर आपण किती संबंध ठेवू शकतो हे ठरतं- आणि लाखो वर्षांच्या कालावधीमध्ये, अधिक सामाजिक संपर्क असलेल्या प्रजातींचे मेंदू उत्क्रांतीमध्ये अधिक मोठे होतात. हा संबंध उलट्याही दिशेने लागू होतो. थोडक्यात, सामाजिकीकरणाचा अभाव असेल तर मेंदू आकुंचन पावू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी जर्मन संशोधकांना असं आढळलं की, चौदा महिने अन्टार्क्टिकावरील एका संशोधन केंद्रामध्ये राहिलेल्या नऊ धृवीय संशोधकांचे मेंदू त्यांच्या वास्तव्याअखेरीला लहान झालेले होते. ते तिथे जाण्यापूर्वी आणि तिथून परतल्यानंतर घेतलेल्या एमआरआय स्कॅनची पडताळणी करण्यात आली. या शोधमोहिमेच्या कालावधीत त्यांच्या मेंदूतील 'दंतुर संवलि' (मुख्यत्वे नवीन स्मृती निर्माण होण्याशी संबंधित असलेला C आकाराचा मेंदूतील भाग) सुमारे सात टक्क्यांनी कमी झाला होता.
मेंदूची घनता कमी होण्यासोबतच या शोधमोहिमेतील संशोधकांनी दोन बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये अतिशय वाईट कामगिरी केली. यातील एक चाचणी अवकाश प्रक्रियेविषयीची होती- अवकाशामध्ये कोणती वस्तू कुठे आहे हे सांगण्याची क्षमता त्यात तपासण्यात आली. दुसरी चाचणी निवडक लक्ष देण्यासंदर्भातील होती- एका विशिष्ट वस्तूवर ठराविक काळ किती चांगल्या रितीने लक्ष केंद्रित करता येतं, हे त्यात तपासण्यात आलं.
दीर्घ काळ सामाजिक अलगीकरण अनुभवावं लागणं आणि संपूर्ण हिवाळाभर एका लोखंडी खोक्यामध्ये बंदिस्त राहावं लागल्यामुळे जगण्यात आलेला एकंदरच एकसुरीपणा- यामुळे हे घडलं असावं, असा अंदाज संशोधकांनी बांधला. शोधमोहिमेवर जाण्यापूर्वी, मोहिमेदरम्यान आणि मोहिमेवर परतल्यानंतर शोधकांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये कोणते बदल झाले, हे या अभ्यासात नोंदवलेलं नाही. पण इतर संशोधनांनुसार, अन्टार्क्टिकामध्ये हिवाळाभर राहणाऱ्या व्यक्तींना मधल्या काळात अचानक सामाजिक बिघाड अनुभवावा लागतो. वास्तविक, तिथे जाण्यापूर्वी त्यांच्या परस्परांशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची काटेकोर छाननी केली जाते.
एकाकीपणा विरुद्ध एकांत
सामाजिक अंतर राखण्याच्या अपरिहार्यतेमुळे आपल्या सामाजिक कौशल्यांवर परिणाम होईल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक गुंतागुंतीचं आहे, पण त्यासंबंधी काही खाणाखुणा मिळतात.
एक, मुळात आपण किती लोकांच्या संपर्कात असतो या अचूक संख्येशी मानसशास्त्रज्ञांना काही देणंघेणं नाही. उलट, आपण आपल्या परिस्थितीकडे कसं पाहतो यावर बहुतांश संशोधन केंद्रित झालेलं आहे. "एकांता"मध्ये एकटं असणं अभिप्रेत आहे, पण एकाकीपणा त्यात येत नाही- ही एक समाधानी अवस्था असते, वेल्शच्या दुर्गम भागात अॅन्सेल यांनी घेतलेल्या अनुभवाशी याचं साधर्म्य आहे. "एकाकीपणा" हा एक अत्यंत वेगळाच प्रकार आहे, त्यात माणसाला तुटल्यासारखं वाटतं आणि अधिक सामाजिक संपर्काची आस त्याला असते.
एकाकी लोकांना समाजात मिसळण्याची संधी असते, पण आजूबाजूला काय घडतंय याबद्दलच्या त्यांच्या आकलनाला बाधा पोचलेली असते. यातून विरोधाभास निर्माण होतो- एकीकडे त्यांना अधिक सामाजिक संपर्काची आस असते, पण त्याच वेळी इतरांशी स्वाभाविकपणे संवाद साधण्याची त्यांची क्षमता खालावलेली असते.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ, एकटं पडल्यासारखं वाटणारे लोक सामाजिक धोक्यांबद्दल- उदाहरणार्थ, काहीतरी चुकीचं बोललं जाणं- अधिक जागरूक असतात. ते सहजपणे "पुष्टीकरण पूर्वग्रहा"च्या सापळ्यात अडकतात- म्हणजे स्वतःच्या स्थानाविषयी किंवा सामाजिक क्षमतेविषयी त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन आधीच तयार झालेला असतो आणि आपल्या या दृष्टिकोनाची पुष्टी होईल अशाच रितीने ते इतरांच्या कृतींचं व शब्दांचं अर्थनिर्णयन करतात. इतरांकडून त्यांना फारशी अपेक्षा नसते आणि स्वतःला ते अन्याय्य परिस्थिती गणत राहतात, परिणामी इतर लोकांनी आपल्याला वाईट वागवावं यासाठी त्यांचा सक्रिय प्रयत्न सुरू असतो.
स्वतःचे विचार, भावना व वागणूक यांच्यावर नियमन ठेवण्याची क्षमता खालावल्यामुळे एकाकी लोकांना सातत्याने दुहेरी कसोटीला सामोरं जावं लागतं. सामाजिक नियमांचं पालन करण्यासाठी ही क्षमता अतिशय महत्त्वाची असते. इतर लोकांच्या अपेक्षांनुसार स्वतःच्या वागणुकीचं सातत्याने विश्लेषण करणं व त्यात दुरुस्ती करणं, याच्याशी संबंधित ही क्षमता आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया सर्वसाधारणतः आपोआप होते- आणि आपल्या लक्षातही येणार नाही अशा रितीने आपल्या स्वनियमनाची कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
अशा रितीने, अलगीकरणातून "एकाकीपणाचा फास" बसण्याचं भाकित खरं ठरतं. आत्मविश्वास प्रचंड खालावणं, वैरभाव, तणाव, निराशा व सामाजिक भय यांचा विखारी संयोग यातून उद्भवू शकतो. यामुळे अलग पडलेल्या व्यक्तीला इतरांपासून आणखी अंतर राखावंसं वाटू लागतं. सर्वांत वाईट परिस्थितीमध्ये एकाकीपणामुळे लोकांना नैराश्य येतं, आणि समाजातून अंग काढून घेणं हे नैराश्याचं एक सर्वाधिक आढळणारं लक्षण आहे- तेसुद्धा हानिकारकच असतं.

फोटो स्रोत, Getty Images
एकटं राहणाऱ्या उंदरांकडे इतर उंदीर कमी आकर्षक सामाजिक सोबती म्हणून पाहतात, हे इतकं शोकात्म पातळीला जातं की, अधिक संपर्क असलेले उंदीर एकट्या उंदरांना जाणीवपूर्वक टाळतात. एकट्या राहणाऱ्या उंदरांमध्ये काहीतरी "गफलत" आहे असं यातून सूचित होतं आणि इतर प्राण्यांमध्येही सामाजिक अनुभव वाटून घेणं परस्परांमधील अनुबंधासाठी महत्त्वाचं मानलं जातं, हे यातून दिसतं.
स्वतःहून निवडलेला एकांत ही सौम्य बाब असल्याचं अनेक दशकं मानलं जात होतं. तत्त्वज्ञांनी, धार्मिक नेत्यांनी, आदिवासी लोकांनी व कलावंतांनी अशा एकांताच्या लाभांचं बरंच गुणगान गायलं आहे. पण समाजापासून दूर जाण्याचे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतात, असा अधिकाधिक पुरावा आता समोर आला आहे. अगदी सहेतूक एकांत पत्करला तरीही हे पुरावे लागू होतात.
एकट्यात वेळ घालवणं पसंत करणारी किशोरवयीन मुलं-मुली सामाजिकदृष्ट्या कमी सक्षम राहण्याची शक्यता असते. आपल्याला एकांत पसंत आहे असं काही लोकांना वाटत असलं, तरी वास्तवात त्यांना इतरांशी, अगदी पूर्ण अनोळखी लोकांशी संवाद करायला आवडतो. या नकारात्मक अपेक्षा अडचणीच्या असतात, कारण लोकांशी संवाद साधताना प्रत्यक्षात काय घडतं हे शिकण्यापासून दूर नेणाऱ्या या गोष्टी आहेत.
तर, आपल्याला सामाजिक सराव गरजेचा असतो, असं दिसतं- पण याचं कारण वेगळंच आहे. इतरांशी नियमितपणे संवाद केल्याने आपल्याला मूल्यप्राप्ती झाल्यासारखं वाटतं आणि इतरांच्या हेतूंचं अचूक अर्थनिर्णयन करायला आपल्याला मदत होते, परिणामी अधिक सकारात्मक सामाजिक अनुभवांसाठी आपल्याला याचा उपयोग होतो.

फोटो स्रोत, Getty Images
"ऑकवर्ड: द सायन्स ऑफ व्हाय वी आर सोशली ऑकवर्ड अँड व्हाय दॅट्स ऑसम" या पुस्तकाचे लेखक व मानसशास्त्रज्ञ ताय ताशिरो यांच्या मते, सध्या आपण सामूहिकरित्या अवघडलेल्या स्थितीत आहोत ही इष्टकारकच गोष्ट आहे. पण बहुतांश लोकांच्या वागण्याबोलण्याला याने अतिशय किरकोळ बाधा पोचेल, असंही ते नमूद करतात.
"सामाजिकदृष्ट्या अपेक्षित असलेल्या वर्तनापासून असं थोडंसं विचलित झाल्याने प्रचंड प्रमाणात शरमेची भावना निर्माण होऊ शकते. म्हणजे, सामाजिक अपेक्षांशी सुसंगत राहण्यासाठी आणि आपण त्यानुसार वागतोय का याची छाननी करत राहण्यासाठी आपण मानवी मनाची किती तयारी केलेली असते, हे यातून दिसतं," असं ताशिरो म्हणतात.
सामाजिकदृष्ट्या अवघडणारी मुलं
अजून कौशल्यं विकसित करत असणाऱ्यांना जितका अधिक संपर्क लाभेल, तितके ते अधिक चांगले होतात.
"बालकांसाठी व किशोरवयीन मुलामुलींसाठी समोरसमोरचा संवाद गरजेचा असतो," असं ताशिरो म्हणतात. "आपण वास्तव जीवनातील परिस्थितीमध्ये असतो तेव्हाचे मुबलक सामाजिक संकेत व अपेक्षा त्यांना शिकाव्या लागतात." नैसर्गिक कलच अवघडलेपणाकडे असणाऱ्या लोकांसाठी हे जास्त महत्त्वाचं असतं, असं ताशिरो म्हणतात, आणि स्वतः त्यांचाही कल असाच असल्याचंही नमूद करतात.
"मी माध्यमिक शाळेत होतो, तेव्हा स्वतःच्या सामाजिक कौशल्यांबद्दल माझं मत फारसं चांगलं नव्हतं. आपण या गोष्टी आत्मसात करण्याबाबतीत थोडे संथ आहोत, असं मला वाटत असे. मी फारसा उत्स्फूर्त वागत नव्हतो, ते ठीक होतं." या अभावाची भरपाई करण्यासाठी ताशिरो यांनी सामाजिकदृष्ट्या जागरूक व्हायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि सरावासाठी वेळ दिला.
याला मोठ्या प्रमाणात संशोधनाचाही आधार आहे. इतर प्राण्यांवर टोकाच्या अलगीकरणाचे कोणते परिणाम होतात, यावरही अभ्यास झालेला आहे. मेंदूचा विकास होत असताना सामाजिक अनुभव विशेषत्वाने महत्त्वाचा असतो, असं या अभ्यासांमधून सूचित होतं.

फोटो स्रोत, OLIVIER DOULIERY/GETTY IMAGES
उंदरांची एकट्यामध्ये वाढ झाली तर त्यांचे मेंदू लहान आकारात विकसित होतात आणि त्यांचं वर्तन इतकं बदलून जातं की अनेकदा छिन्नमनस्कतेसंबंधीच्या संशोधनात प्राण्यांचा दाखला म्हणून त्यांचा वापर केला जातो. सामाजिक कार्यक्षमतेला आलेली बाधा, हे छिन्नमनस्कतेचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. जन्मतः अलग राहिलेल्या मुंग्यांचे मेंदू त्यांच्या समवयीन मुंग्यांपेक्षा छोटे असतात आणि त्या निराळ्या पद्धतीने वागतात. सामाजिक कल असणाऱ्या माशाला अलगपणे वाढवलं तर त्याची सहकार्य करण्याची वृत्ती कमी होते.
आयुष्यात सुरुवातीला किंवा शेवटाकडे सामाजिक संपर्कापासून वंचित राहाव्या लागलेल्या, प्रयोगशाळेत वापरल्या गेलेल्या चिम्पांझींची तुलना केल्यावर संशोधकांना असं दिसून आलं की, लहान वयापासून एकट्या वाढलेले चिम्पांझी त्यांच्या वैयक्तिक अवकाशावर अतिक्रमण झाल्यावर कमी सहिष्णूता दाखवत होते, त्यांच्या गटातील इतर सदस्यांची काळजी घेण्याकडेही त्यांचा कमी कल होता (अनुबंध वाढवण्याची ही एक महत्त्वाची पद्धत आहे), ते कमी सामाजिक पुढाकार घेत, आणि संपर्काची लहान जाळी तयार करण्याकडे त्यांचा कल होता.
माणसाच्या मुलांमध्ये सामाजिक सरावाचं प्रमाण आणि सामाजिक कौशल्यं यांच्यात थेट संबंध असल्याचं अभ्यासांमधून निदर्शनास आलं आहे. पोर्तुगालमधील शालेयपूर्व वयातील मुलांच्या एका गटामध्ये ज्या मुलांनी सामाजिक संपर्क वाढवला त्यांच्या सामाजिक क्षमतांना चालना मिळाली, तर शाळेतील क्रमिक अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या उपक्रमांमध्ये- अगदी खेळांमध्येही- सहभाग घेतल्याने उपयोग होत असल्याचंही वारंवार दिसून आलं.
दरम्यान, अधिक बहीणभावंडं असलेली मुलं सामाजिक अवकाशामध्ये अधिक सहजतेने जुळवून घेताना दिसतात, आणि एकट्यात वेळ घालवणारी मुलं सामाजिक परिस्थितीकडे स्वपराभूत रितीने पाहण्याची शक्यता जास्त असते.
सामाजिक सरावासाठी सोबती मिळवायचे असतील, तर मुलांना शाळेहून दुसरी उत्तम जागा कुठली असणार! कोरोनाची जागतिक साथ येण्याआधीही जगभरातील प्रचंड संख्येने मुलांना अशा रितीने शिक्षण मिळत नव्हतं. 2012 सालच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये १८ लाख मुलांना घरातच शिक्षण दिलं जातं. पण आता आपण क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत, असं भाकित काही तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. शिक्षकांशी समोरासमोर संवाद साधण्याऐवजी दूरस्थ शिक्षणात वाढ होणार आहे, असं ते म्हणतात.
घरातच शिक्षण दिल्याने अनेक धोके उद्भवू शकतात, अशी चिंता अनेक वर्षांपासून व्यक्त होत आली आहे. जर्मनीमध्ये 1919 सालापासून अशा शिक्षणावर बंदी आहे. शाळेद्वारे सामाजिक सहिष्णूतेचं प्रशिक्षण दिलं जातं, हे या बंदीमागचं कारण आहे. परंतु, हा दृष्टिकोन वादग्रस्त आहे- घरातच शिक्षण झालेली मुलं सामाजिकदृष्ट्या कमी सक्षम असतात, याचा काही पुरावा मिळत असला, तरी प्रौढ म्हणून ते नागरीदृष्ट्या अधिक सजग असण्याची शक्यता असते.
सामाजिक अलगीकरणाचे अनेक दुष्परिणाम नोंदवले गेले असले, तरी हे तितकंही वाईट नसतं.

फोटो स्रोत, Science Photo Library
सकारात्मक एकांत
सामाजिक अवघडलेपणा स्वीकारणं महत्त्वाचं आहे, असं ताशिरो यांना वाटतं. भिडस्त व सामाजिकदृष्ट्या चिंताग्रस्त असणारे लोक सहचरी म्हणून अत्युत्तम असतात, असं त्यांच्या जोडीदारांकडून ताशिरो यांना वेळोवेळी ऐकायला मिळालं आहे.
एखाद्या व्यक्तीला अमुक एका रितीने भावना का जाणवत असेल, आणि भिन्न परिस्थितींना प्रतिसाद देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, याचा अधिक काळजीपूर्वक विचार करणारे हे लोक असतात, त्यामुळे जीवनात जोडीदार म्हणून त्यांचा कामगिरी उत्तम राहते. "त्यांची ही विचारी वृत्ती प्रत्यक्षात अतिशय मोहक होऊन जाते," असं ताशिरो म्हणतात.
दुसऱ्या बाजूला, एकांतामधील आपले अनुभव किती सकारात्मक होते, यावर अॅन्सेल यांनीही भर दिला आहे. योग्य मनोवृत्ती स्वीकारणं गरजेचं असतं, असं ते नमूद करतात. "लोक दीर्घ काळ याचा पाठपुरावा करत नाहीत, म्हणून त्यांना झगडावं लागतं, असं मला वाटतं," असं अॅन्सेल म्हणतात. वेल्शमधील पर्वतांमध्ये एकटं राहण्याची संधी हे त्यांनी आव्हान मानलं. आपण किती स्वावलंबी पद्धतीने जगू शकतो, याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी ही संधी वापरली.
केवळ एकट्याने राहण्याची ही कसोटी नव्हती. अॅन्सेल यांच्याकडे नळाचं पाणी नव्हतं, वीज नव्हती, वाहन नव्हतं, फोन नव्हता आणि स्वतःचं बहुतांश अन्न ते स्वतःच पिकवत किंवा जमवून आणत. "पण लवकरच हे आव्हानच वाटेनासं झालं," असं ते म्हणतात. "मी माझं आयुष्य जगत होतं, हीच एक स्वाभाविक अवस्था असल्यासारखं वाटायला लागलं."
त्यांचा हा एकांत किती काळ सुरू राहणार आहे, याची अॅन्सेल यांना काहीच कल्पना नव्हती. "लोक एकांतवासासाठी जातात तेव्हा हे कधी संपणार आहे याकडे त्यांचं लक्ष असतं- आपण पुन्हा नेहमीच्या जगण्यामध्ये कधी परतणार, याचा विचार त्यांच्या मनात असतो," असं ते म्हणतात. "मी जे काही करत होतो ते अनियोजित होतं, आणि माझ्या कामाचा शेवट निश्चित झालेला नव्हता. त्यामुळे मी स्वतःला या कामात झोकून दिलं."
आजही तीन पुस्तकं लिहिल्यानंतरही (त्यांचं अगदी ताजं पुस्तक 'द सर्कलिंग स्काय: ऑन नेचर अँड बिलाँगिंग इन अॅन एन्शन्ट फॉरेस्ट' 2021 मध्ये येणार आहे) अॅन्सेल यांना त्या पाच वर्षांच्या एकांतवासाचा लाभ अजूनही होत असल्याचं वाटतं. सगळंच बिघडून गेलं आणि त्यांना निर्जन ठिकाणी मोडकळीस आलेल्या बंगलीत एकटं राहावं लागलं, तरी ते डळमळणार नाहीत, कारण परिस्थिती याहून वाईट असू शकते, हे त्यांना माहीत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








