जेव्हा लोकमान्य टिळकांवर गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनात चप्पल फेकण्यात आली होती

    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

26 डिसेंबर 1907 चा दिवस. सूरतमधला. काँग्रेसचं 23 वं अधिवेशन सुरू होतं. आज जिथं वनिताश्रम आहे त्याजवळ दिवालीबाग नावाचा एक बंगला आहे. अधिवेशनाचं सत्र तिथेच भरवलं गेलं होतं.

त्या वेळी काँग्रेसमध्ये दोन गट होते. एक मवाळमतवादी आणि दुसरा जहालमतवादी. हे गट कसे निर्माण झाले, याची पार्श्वभूमी समजून घेण्यापूर्वी आपण 26 डिसेंबर 1907 च्या या अधिवेशनात काय घडलं, ते पाहूया.

26 डिसेंबर सत्र सुरू झालं तेव्हा सभामंडपात जयजयकार दुमदुमत होता. या संमेलनाला जवळपास 7,000 प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. त्यात रास बिहारी घोष यांना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे अहमदाबादमधले नेते अंबालाल साकरलाल देसाई यांनी समोर ठेवला.

काँग्रेसचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रस्तावाच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्यांनी बोलायला सुरूवात करताच बैठकीत गोंधळ माजला.

सभा संपवली गेली. आता काँग्रेसचे दोन तुकडे होतील अशी स्थिती निर्माण झाली. मवाळांचे नेते गोपालकृष्ण गोखले आणि जहालांचे नेते बाळ गंगाधर टिळक यांच्यात चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर 1907 ला अधिवेशन पुन्हा सुरू झालं.

सभेसमोर भाषण करण्याची परवानगी टिळकांनी मागितली. मात्र, ती त्यांना दिली गेली नाही. त्यातच डॉ. रासबिहारी घोष यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.

त्याचा टिळकांनी विरोध केला. अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली नसताना घोष पदाभार कसा सांभाळू शकतात? असा सवाल त्यांनी केला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण मागितलं.

वाद वाढत गेला तसं वातावरणंही तापत गेलं. टिळक व्यासपीठाकडे पळत गेले. मवाळ गटातले काही तरूण टिळकांना व्यासपीठावरून खाली खेचण्यासाठी समोर आले. मात्र, गोखलेंनी मधे पडून परिस्थिती सांभाळली आणि तरूणांना थांबवलं.

टिळकांवर फेकल्या चपला

बैठकीतल्या गोंधळात मध्येच चपल फेकली गेली. ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि फिरोजशाह मेहता यांना लागली.

त्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला. मावळ गटाचे प्रतिनिधी टिळकांवर ओरडू लागले. त्यांनी व्यासपीठावरून ताबडतोब खाली यावं म्हणून त्यांचा गलका सुरू होता. पण टिळकही अडून बसले.

त्यांनी प्रत्युत्तर दिलं, "तुमच्यात हिंमत असेल तर मला खाली आणून दाखवा. मी खाली येणार नाही."

'द हिस्ट्री ऑफ दी फ्रिडम मुव्हमेंट इन इंडिया' या पुस्तकात ही माहिती दिली गेली आहे.

त्या काळच्या ब्रिटीश सरकारच्या बॉम्बे प्रांतांच्या अर्काईव्हजमधून ती घेतली गेली होती. हे दस्तावेज गुजरातचे इतिहासकार रिजवान कादरी यांनी मिळवले.

चपला टिळकांच्या दिशेने फेकल्या गेल्या होत्या, असंही या दस्तावेजात म्हटलंय.

त्या दस्तावेजांच्या आधारावरच रिजवान कादरी लिहितात की टिळकांनी म्हटलं, "तुम्ही माझ्यावर काहीही फेकू शकता. अगदी भालासुद्धा. पण मी इथून जाणार नाही."

टिळकांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या. मवाळ गटाचे प्रतिनिधी टिळकांना मारण्यासाठी पुढेही आले. पण मदन मोहन मालवीय आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना थांबवलं.

गोखल स्वतः टिळकांच्या शेजारी उभे होते आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याभोवती हाताचं कडं करून थांबले.

वातावरण अधिकच तापलं. फेकलेल्या चपलेने आगीत तेल टाकण्याचं काम केलं.

स्वातंत्र्यसैनिक ईश्वरलाल देसाईंनी यांनी सुरत काँग्रेस नावाचं एक पुस्तक संपादित केलं आहे. या पुस्तकात या घटनेचा सविस्तर उल्लेख आहे.

ईश्वरलाल देसाई लिहितात, "या अफरातफरीत अंबालाल सकरलाल देसाई यांचा मुलगा वैकुंठ देसाई यांनी खुर्ची उचलून टिळकांना मारण्याचा प्रयत्न केला. पण तसं काही व्हायच्या आधीच जहाल गटातले लोक टिळकांना वाचवण्यासाठी तिथे पोहोचले.

"व्यासपीठावर सर्वत्र गोंधळ आणि ओरडाआरड सुरू होती. शिव्याशाप दिले जात होते आणि मारामारी सुरू होती. काही लोक जखमीही झाले. लाठ्याकाठ्यांचा वापर केला जात होता. रक्त सांडत होतं."

अशातच डॉ. घोष यांनी बैठक संपल्याची घोषणा केली. पण कुणी कुणाचं ऐकल अशी परिस्थिती राहिलीच नव्हती. शेवटी पोलिस सभामंडपात घुसले. त्यांनी हळूहळू सगळ्यांना बाहेर काढलं.

बीबीसी गुजरातीसोबत बोलताना रिजवान कादरी सांगत होते, "वैकुंठ देसाई टिळकांना खुर्ची मारण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांना थांबवण्याच्या प्रयत्नांत त्यांच्या वडिलांचा, अंबालाल साकरलाल देसाई यांचा हात तुटला."

"अंबालाल देसाई त्याकाळच्या वडोदरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 1898 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर काँग्रेसच्या कामात त्यांनी रस घेतला. ते काही काळासाठी गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीचेही अध्यक्ष होते."

'अहमदाबाद - रॉयल सिटी टू मेगा सिटी' या पुस्तकात लेखक अच्युत याग्निक यांनीही या घटनेचं वर्णन केलं आहे.

ते लिहितात, "डिसेंबर 1907 मध्ये, अंबालाल देसाईं मवाळ गटाच्या 81 सदस्यांना सोबत घेऊन अहमदाबादवरून सूरतला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनला गेले होते. अधिवेशन सुरू झालं तसं परस्परविरोधी समुहांमध्ये तणाव वाढताना दिसला. वैकुंठलाल यांनी बाळ गंगाधर टिळक यांच्यावर चप्पल फेकून मारली. पण त्यांचा निशाणा चुकला."

काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामैय्या यांनी काँग्रेसच्या इतिसाहावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ते एक स्वातंत्र्य सैनिक, इतिहासकार आणि पत्रकार होते. 1938 मध्ये गांधीजींच्या आग्रहाखातर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सुभाष चंद्र बोस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण ते हरले.

सुरतमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशाबाबत सीतारामैय्या लिहितात, "टिळक मंचावर जाऊन भाषण देण्याचा हट्ट करत होते. स्वागत समितीचे अध्यक्ष त्रिभुवनदास मालवी आणि डॉ. घोष यांनी त्यांना बोलण्यापासून थांबवलं. डॉ. घोष यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली असल्याचं सगळ्यांनीच मान्य केलं होतं."

"वाद आणि ओरडाआरड वाढत गेली आणि त्यामध्येच एका प्रतिनिधीने चप्पल फेकलेली चप्पल सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सर फिरोजशाह मेहता यांना लागली. खुर्च्या फेकल्या गेल्या, लाठ्या मारल्या गेल्या आणि काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता झाली."

चप्पल कुणी फेकली आणि कोणावर फेकली गेली याबद्दल सीतारामैय्या यांनी स्पष्टपणे काही लिहिलेलं नाही.

सुरत महानगरपालिकेकडून शहराच्या इतिहासावर 'सुरत इतिहास दर्शन' एक नावाचं पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्याच्या दुसऱ्या खंडात लेखक हरेन्द्रभाई शुक्ला यांनी चप्पल टिळकांवर फेकली गेली की नाही हे सांगितलेलं नाही. फक्त 'चप्पल फेकली गेली' एवढंच म्हटलं आहे.

गुजरातचे प्रसिद्ध इतिहासकार रिजवान कादरी त्यांच्या 'गुजरातमध्ये काँग्रेसचा उदय आणि विकास' यात लिहितात, "डॉ. सुमंत मेहता यांनी सूरत काँग्रेस अधिवेशनाचं रसरशीत वर्णन करताना लिहिलंय : प्राध्यापक गज्जर यांच्या घरी मवाळ गटाच्या निवासाची व्यवस्था केली होती. तर रायजी यांचं घर जहाल गटाचा अड्डा बनला होता."

"खापर्डे, टिळक आणि इतरांनी त्या सभेत भाषणं केली होती, आणि हजारो लोक उपस्थित होते. टिळक म्हणजे संपूर्ण देशात प्रतिष्ठा मिळवलेला नर्वीर. पण त्यांच्या समोर फिरोजशाह मेहता, गोखले, बॅनर्जी आणि इतर अनेक मोठे नेते उभे होते.

जेव्हा या बंडाचे पडसाद ऐकू येऊ लागले, तेव्हा अंबालाल शंकरलाल, सॉलिसिटर त्रिभुवनदास माळवी (सुरत काँग्रेस अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष) आणि इतर काही गुजरातींनी चुकीच्या प्रकारे स्वदेशाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला."

"ते म्हणायचे, की मराठ्यांनी दोन वेळा सुरत लुटलं, पण आता ते आपली इज्जत लुटायला येत आहेत. बडोद्याहून अनेक मित्र गेले होते. त्यात शारदाबाई आणि अब्बास तय्यबजीसुद्धा होते."

"नाशिकच्या जेलमध्ये माझ्यासोबत जाधव नावाचा एक गुंड माणूस होता. तो म्हणायचा की त्याने 'दक्षिणी बॉम्ब' फेकला होता. तो रास बिहारी घोष यांना मारायला गेला होता. पण त्यात फिरोजशाह मेहता यांचा जीव गेला."

दुसरीकडे, या सगळ्याबाबत कन्हैय्यालाल मुन्शी काहीतरी वेगळंच सांगतात.

'स्वप्नदृष्टा' या आपल्या पुस्तकात ते लिहितात, "मोठ्या संख्येनं आलेल्या विरोधकांनी सगळ्या मर्यादा पार केल्या. खुर्च्या फेकल्या, दोरीचं कुंपण तोडलं. मागे मागचे लोक पुढे आले. प्रतिनिधी ओरडू लागले - 'टिळक महाराजांना मारणार का हे लोक?"

पुण्याच्या केसरीला मारून टाकणार का? कोणाची हिंमत आहे? नारायणभाई दहाडे यांचं रक्त उसळत होतं. ते ओरडले, "टिळक महाराजांचा विजय असो."

"पुण्याच्या केसरीला मारणार का? कोणाची हिंमत आहे? नारायणभाईंनी गर्जना केली, त्यांचं रक्त उसळलं. 'टिळक महाराज की जय' म्हणून ते खाली वाकले आणि पायातली एक वहाण फिरोजशाहांना फेकून मारली. ती फिरोजशाहवर पडली आणि तिथून उडी मारून सुरेंद्र बाबूंच्या अंगावर गेली."

काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हतं. सारे स्तब्ध उभे होते. जहालमतवाद्यांनी हल्ला केला आहे हे समजल्यानंतर सगळे लगेचच मदतीसाठी पुढे धावले.

ते पुढे धावले ते टिळक महाराजांना मारण्यासाठी असा समज जहालमतवाद्यांनी करून घेतला. सगळ्यांनी 'शिवाजी महाराज की जय'च्या घोषणा दिल्या. नारायणभाई व्यासपीठावर उडी मारून आले आणि टिळकांच्या हातात काठी दिली. मवाळमतवादी मागच्या दारानं पळू लागले.

सुरत इतिहास दर्शन पुस्तकात लिहिलंय की टिळकांवर फेकली गेलेली चप्पल सुरेन्द्रनाथ बनर्जी त्यांच्यासोबत कलकत्त्याला घेऊन गेले.

त्यात लिहिलंय, "त्यांनी या चपला त्यांच्या घरात एका कपाटात ठेवल्या होत्या. एकदा त्यांच्या घरी आलेल्या कुणीतरी त्याबद्दल विचारलं तेव्हा सुरेंद्रनाथ म्हणाले की मी देशासाठी आजवर जे काही केलं आहे त्याबदल्यात त्या चपला मला भेट म्हणून मिळाल्या आणि स्मृतीचिन्ह म्हणून मी त्या जपून ठेवल्यात."

ही चप्पल महाराष्ट्रीय चप्पल नावानं प्रसिद्ध झाली. काही पुस्तकात या चपलेचा उल्लेख मिसाईल असाही केला गेलाय. टोकदार, तपकिरी रंगाची आणि दक्षिणेकडे वापरली जाते तशी.

बनारसमध्ये फाटाफुटीची चाहूल

काँग्रेसमध्ये विघटनाचं बीज तेव्हा पेरलं गेलं, जेव्हा 1905 मध्ये बनारसमध्ये अधिवेशन भरलं होतं. त्यावेळी ब्रिटनच्या वेल्सचे राजकूमार भारतात आले होते.

त्यांचं स्वागत करणारं एक पत्र पाठववावं असं गोपाळकृष्ण गोखले यांच्या मनात आलं. त्यांनी हा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला.

पण टिळकांनी त्याचा कडाडून विरोध केला.

विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशींचं धोरण काँग्रेस अवलंबेल तेव्हात स्वागत संदेश पाठवला जाईल, ते म्हणाले.

शेवटी, स्वागताचं पत्रही पाठवलं गेलं नाही आणि टिळकांचा प्रस्तावही पारित झाला नाही.

पण लाला लाजपत राय यांनी टिळकांना पाठिंबा दिला. काँग्रेसमध्ये दोन प्रवाह फुटण्याची सुरूवात इथूनच झाली.

20 जुलै 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यानंतर 1906 मध्ये कलकत्त्यात काँग्रेसचं अधिवेशन झालं. या अधिवेशनासाठी लोकमान्य टिळक किंवा लाला लाजपत राय यांना अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू होती.

पण मवाळमतवादी नेत्यांना हे दोघेही अध्यक्ष म्हणून नको होते.

'सुरत काँग्रेस' पुस्तकात याचा उल्लेख करताना ईश्वरलाल देसाई लिहितात की, याविरोधामुळे दादाभाई नौरोजी यांचं नाव अध्यक्ष म्हणून पुढे ठेवण्यात आलं. या नावासाठी काँग्रेसमधे कोणाचा विरोध असणार नव्हता.

पण स्वदेशी वापरा आणि विदेशीवर बहिष्कार टाका असं सांगणारा प्रस्ताव पारित करण्याची जहालमतवाद्यांची इच्छा पूर्ण झाली.

दादाभाई नौरोजी यांनी स्वराजचा कानमंत्र दिला आणि स्वदेशी अवलंबवण्याचं आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आव्हानही केलं.

नागपूरऐवजी सुरत

कोलकात्यात दादाभाई नौरोजी यांनी जहाल आणि मवाळ मतवाद्यांमध्ये पडणारी फूट कमी करण्याचा प्रयत्न केला. पण आतल्या असंतोषाचा लाव्हा तापत होता.

कोलकात्यातील अधिवेशनानंतर फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक पुन्हा एकत्र भेटले.

सुरत काँग्रेस पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यावेळी फिरोजशाह मेहता टिळकांना म्हणाले की 'तुम्ही कोलकात्यात स्वदेशीचा प्रस्ताव पारित करून घेतलात. पण मुंबईमध्ये त्यात तुम्हाला यश मिळणार नाही.'

टिळक उत्तरले, "तुम्ही मुंबईबद्दल काय बोलता? तुमचं आव्हान मी स्वीकारतो. आयाळ पकडून सिंह गुहेतून बाहेर ओढण्याचं काढण्याचं बळ माझ्यात आहे."

त्यावेळी फिरोजशाह मेहता यांना 'मुंबईचा सिंह' म्हटलं जाई.

गोखले हस्तक्षेप करत म्हणाले, "मेहता तुम्ही चुकत आहात. या माणसाच्या ताकदीचा अंदाज लावणं अशक्य आहे."

काँग्रेसचं पुढचं अधिवेशन नागपुरात होणार होतं.

स्वागत समितीच्या 314 सदस्यांच्या मतांच्या सहाय्याने अध्यक्षाची निवड करण्याचं ठरवण्यात आलं. दादासाहेब खारपडे आणि इतरांनी लोकमान्य टिळकांचं नाव अध्यक्ष म्हणून सुचवलं.

पण यामुद्द्यावरून मवाळ आणि जहालमतवाद्यांमध्ये मतभेद झाले. फिरोजशाह मेहता यांनी डॉ. रासबिहारी घोषचे नाव सुचवलं.

'सुरत इतिहास दर्शन'मध्ये लिहिलं आहे, "अध्यक्षपदाच्या नावावर एक उपाय निघणं शक्य नसल्यानं अखेर नागपूरच्या मवाळपंतींनी नागपूरमध्ये आमच्यासाठी काँग्रेस भरवणं शक्य नाही असं सांगून हात धुऊन टाकले."

या दरम्यान सूरतवरून प्रतिनिधींचा एक गट मुंबईला आला आणि त्यांनी सुरतमध्ये संमेलन आयोजित करण्याचं आमंत्रण दिलं.

त्यावरून टिळक नाराज झाले. त्यांनी 'केसरी'त लिहिलं, "फिरोजशाहने असे समजू नये की या बदलामुळे वाद मिटेल. नव्या आणि जुन्या पक्षाचा वाद नवीन पक्षाच्या विजयापर्यंत सुरू राहील.

यावेळी सुरतमध्ये अधिवेशन ठरलं आहे. पुढच्या वर्षी दुसरी सुरक्षित जागा मिळेल, असं कुणी समजू नये. सूरतसुद्धा सुरक्षित आहे का, हा एक प्रश्न आहे."

टिळकांनी स्वतःचं नाव मागे घेतलं आणि लाला लाजपत राय यांचं नाव पुढे केलं. पण मवाळमतवादी नेते डॉ. रास बिहारी घोष यांच्या नावावर अडून राहिले.

काँग्रेसमध्ये मतभेद नकोत म्हणून नंतर लाला लाजपत राय यांनी आपलं नाव मागे घेतलं.

अधिवेशनाच्या एका आठवड्याआधीच म्हणजे 23 डिसेंबरला टिळक सूरतला पोहोचले होते.

'सुरत इतिहास दर्शन'मध्ये लिहिलं आहे की, दोन्ही पक्षांकडून प्रचार सुरू झाला. एकीकडे अंबालाल सांकरलालांची सभा होत होती, तर दुसरीकडे टिळकांचा प्रचार चालू होता.

एका सभेत टिळक म्हणाले, "मी राष्ट्रीय सभेत फूट पाडण्यासाठी किंवा भांडणं लावण्यासाठी इथं आलेलो नाही. स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार हा कलकत्त्यात पारीत झालेला प्रस्ताव इथे मागे पडून चालणार नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी या ठरावाला तिलांजली देण्याचा विचार व्यक्त केला आहे. ते आम्ही सहन करणार नाही"

24 तारखेला लाला लाजपत रायही आले. हद्दपार झाल्यानंतर बर्माला काही दिवस घालवल्यानंतर ते थेट सुरतला आले होते.

'द शेपिंग ऑफ मॉडर्न गुजरात' या पुस्तकात लेखक अच्युत याग्निक लिहितात, "कोलकात्यात पारित झालेल्या अनेक प्रस्तावांपैकी चार महत्त्वाचे मानले गेले. त्यात स्वराज, विदेशी वस्तूंचा बहिष्कार, स्वदेशीचा विस्तार आणि राष्ट्रीय स्तरावर शिक्षणात सुधार याचा समावेश होता.

"हे अधिवेशन नागपूरात होणं अपेक्षित होतं. पण ज्यापद्धतीनं टिळक, अरबिंदो घोष, अजित सिंह आणि इतर जहालमतवादी नेत्यांनी पक्षावर त्यांची पकड मजबूत केली ते पाहता नागपूरचं व्यासपीठ टिळकांसाठी फायदेशीर ठरेल असं जहालमतवाद्यांना वाटू लागलं."

त्यामुळे फिरोज शाह मेहता, गोखले आणि दिनशा वाचा अशा मवाळमतवादी नेत्यांनी अधिवेशनाचं ठिकाण बदलून सुरत केलं.

अधिवेशनाच्या आधीही वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले होते. 25 डिसेंबरला टिळकांना गोखलेंनी तयार केलेल्या प्रस्तावाची एक प्रत मिळाली.

ब्रिटिश वसाहतवादाच्या धरतीवर भारतात स्वराज आणणं हे त्या प्रस्तावाचं ध्येय होतं. त्यातल्या अनेक मुद्द्यांवर टिळकांनी कडाडून टिका केली.

लाला लाजपत राय स्वतः दोन्ही गटांमध्ये समझोता करण्याच्या प्रयत्नांत होते. पण ते निरर्थक ठरलं.

26 डिसेंबरला काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं तेव्हा फक्त भांडण सुरू होतं. 27 डिसेंबरपर्यंत त्याचं रुपांतर अराजकतेत झालं होतं. शेवटी काँग्रेस दोन तुकड्यात विभागली.

ही सगळी घटना 'सुरत विभाजन' या नावाने ओळखली जाते.

सुरत काँग्रेसमध्ये दहा वर्ष अध्यक्षपद सांभाळलेले 84 वर्षांचे सुनीलभाई फुकनवाला बीबीसी गुजरातीसोबत बोलताना म्हणाले, "या अधिवेशनानंतर लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशांत एक महान नेता म्हणून झेप घेतली. टिळकांवर जोडे फेकले गेले ते 'महाराष्ट्र जोडे' नावानं ओळखले जाऊ लागले."

सुरतमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनातल्या भांडणाचं वर्णन अनेक पुस्तकात वाचायला मिळतं.

या घटनेची क्षणाक्षणाची माहिती ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचत होती. संपूर्ण सत्रावर पोलिसांची नजर होती.

मुंबईच्या काही वृत्तपत्रांनी त्याबद्दलची बातमी छापली होती. पोलिसांनी लाठीचार्ज करून काही लोकांना अटक केली, असं त्यात लिहिलं होतं. पण सूरत पोलिसांनी ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं.

कन्हैयालाल मुन्शी त्यांच्या 'स्वप्नदृष्टा' पुस्तकात लिहिलतात की त्यावेळी संपूर्ण शहर दोन भागात विभागलं गेल्यासारखं वाटत होतं.

त्यावेळी मुन्शी मुंबईत वकीली शिकत होते. अधिवेशनात भाग घेण्यासाठी ते मुंबईवरून सुरतला गेले होते.

ते लिहितात, "लाला लाजपत राय यांचे शांत शब्द, अजित सिंह (भगतसिंहचे काका) यांचे जहाल शब्द, टिळकांचे टोमणे आणि आरोप, तसंच खापर्डे यांच्या अश्लील आणि टवाळपूर्ण भाषण संपूर्ण सभेला हादरवून टाकत होतं."

"सुरतमध्ये प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात दोन गट पडले होते, जहाल आणि मवाळ, त्यांत भांडणं होती. एक मवाळ बापाचा जहालमतवादी मुलगा घर सोडून गेला. जहालमतवादी आणि मवाळमतवादी भाऊ जेवणादरम्यान ताटं आणि वाट्यांवरून भांडत होते.

दारूच्या अड्ड्यावर गप्पा मारणारे मित्र हैराण झाले होते. एका जहालमतवादी बापाच्या मुलीला तिच्या मवाळ विचाऱ्यांच्या नवऱ्याने माहेरी जाण्यापासून बंदी घातली होती.

गांधीवादी आणि कर्मठ प्रकृतीचे प्रकाश एन. शाह म्हणतात, '"हे खरं आहे की सुरतमधील वातावरण तणावपूर्ण होतं आणि अफवांचे पेव फुटले होते. पण हे सगळे वर्णन अतिशयोक्तिपूर्ण आहे. लेखकाने या पुस्तकाला कादंबरीसारखा स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे."

नेत्यांची भाषणबाजी

रिझवान कादरी त्यांच्या 'गुजरातमध्ये काँग्रेसचा उदय आणि विकास – 1885 ते 1922' या पुस्तकात लिहितात, "सुरत काँग्रेस अधिवेशनात जे काही घडले त्या संदर्भात आपला निषेध नोंदवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी 2 जानेवारी 1908 रोजी चौक बाजाराजवळ एक सभा बोलावली होती.

"या सभेत भागुभाई द्वारकादास, गांगादास भारतीया, तैयाबभाई मस्कती, त्रिभुवनदास मालवी, माणेकजी जंबुसरिया आणि शावकशा होरमसजी खसुखां यांच्यासह 36 लोकांनी टिळकांच्या विरोध करणाऱ्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या."

या पुस्तकात पुढे लिहिले आहे, "या सभेत अंबालाल साकरलाल यांनी सांगितले की पुण्यातून केसरी नावाचे एक वृत्तपत्र प्रकाशित होते. त्यात सुरत शहरासाठी एक अपमानजनक शब्द वापरला गेला आहे. सुरत म्हणजे सर फिरोज शाह परत जातात ते शहर.

"सुरतमधल्या लोकांसाठी 'नामर्द आणि हिजड्यां'सारखे शब्द वापरले गेले. त्यांनी सांगितलं की, 26 तारखेला रात्री सूरतमधला एक माणूस अंबालाल साकरलाल यांच्याकडे आला आणि म्हणाला की आजचा गोंधळ जहालमतवादी लोकांनी घडवून आणला. जर तुम्ही त्याचा काही बंदोबस्त केला नाही तर उद्या अजून मोठा गोंधळ होईल."

पण टिळक समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले. याउलट त्यांनी मवाळमतवादी नेत्यांवरच गोंधळ घडवून आणल्याचा आरोप केला.

त्यांनी असा आरोप केला की, "नरमपंथीय समर्थक स्वागत समितीतील लोकांनी सभेमध्ये लाठ्या घेऊन गुंड आणले होते."

नागपूरऐवजी सुरतमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरवण्याचा निर्णय झाला, तेव्हा टिळकांनी केसरीत लिहिलेलं, "कुत्रंही त्याच्या गल्लीत सिंह होऊन बसतं."

हे उद्गार त्यांनी फिरोजशाह मेहता यांना लक्ष्य करून लिहिले होते असं मवाळमतवाद्यांचं म्हणणं होतं. कारण फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जाई.

त्यामुळे मवाळ नेत्यांनी 'केसरी' वृत्तपत्र जाळण्याची आणि ते खरेदी न करण्याचं ठरवलं.

टिळकही वारंवार मवाळ नेत्यांची तुलना भिकाऱ्यांशी करत आणि इंग्रजांबरोबरच्या त्यांच्या चर्चांना भिक्षावृत्ती म्हणत होते.

प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते प्रकाश एन. शाह बीबीसी गुजरातीशी बोलताना म्हणाले, "दोन्ही गटांत शब्दांचं युद्ध सुरू होतं.

मवाळमतवाद्यांनी टिळकांच्या सुरत भेटीची तुलना शिवाजीच्या लूटीसोबत केली. तर जहालमतवादी डॉ. रासबिहारी घोष यांना 'भाग बिलाडी घोष' असं म्हणण्यातही संकोच केला नाही.

सुरुवातीला ही भाषा केवळ बोलचालीत होती, पण नंतर आरोप-प्रत्यारोपात शब्दांची मर्यादा हरवक गेली."

प्रकाश एन. शाह असंही म्हणतात की या प्रसंगात अरविंद घोष यांना विसरता येणार नाही. ते म्हणतात, "या अधिवेशनाला अपयशी होण्यामागे अरविंद घोष यांनीही महत्त्वाची भूमिका होती.

आणि ही गोष्ट त्यांनी स्वतःनेही मान्य केली आहे.

त्यांच्या एका पत्रांत त्यांनी असं लिहिलं होतं की टिळकांना न विचारता मी अधिवेशनात असे प्रयत्न केले जे मवाळ नेत्यांना अस्वस्थ करतील."

"ते चपला फेकण्यात, खुर्च्या मारण्यात किंवा लाठीमारात सामील होते असं कुठेही सांगितलेलं नाही.

रिजवान कादरी लिहितात, "अंबालाल देसाई यांच्या भाषणांचा आणि लेखांचा अभ्यास केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती अशी की सूरत अधिवेशनात या वरिष्ठ नेत्याने टिळकांविरोधात वापरलेले शब्द राजकारणात वादग्रस्त भाषा, खंडन-मंडनाचे डावपेच, पत्रकं आणि भाषणांद्वारे लोकांची गर्दी जमवण्यात आणि लोकभावना पेटवण्यात प्रभावी ठरले होते.

"तेच आजही होत आहे, असं त्यांना वाटतं. याबाबत बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "त्या काळातली भाषा आणि आजची भाषा यात काहीही बदल झालेला नाही.

"आज निवडणुकींच्या भाषणात ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते तशाच भाषेचा वापर त्याही काळी प्रचारासाठी केला जात होता."

'सुरतचं इतिहासदर्शन' या पुस्तकात लिहिलं आहे की ब्रिटनच्या लंडन टाइम्सने, आणि टिळकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सर वॅलेंटाईन शिरोल यांनी, सुरतमधल्या घटनेचा पूर्ण दोष टिळकांवरच टाकला. त्यांनी टिळकांना एक धोकादायक आणि फूट पाडणारी व्यक्ती म्हटलंआणि काँग्रेसमधील फाटाफुटीस जबाबदार धरलं.

डेली न्यूजचं प्रतिनिधित्व करणारा एका ब्रिटिश पत्रकार नेविंस हा टिळकांना दोष देत नव्हता. उलट, त्याच्या लिखाणातून टिळकांचा गौरव केला जात होता.

अहमदाबादचं 'प्रजाबंधू' आणि सुरतचं 'गुजरातमित्र' ह्या दोन्ही वृत्तपत्रांनी देखील या घटनेवर लेखन केले होते.

या वृत्तपत्रांनी काँग्रेसमधल्या फाटाफुटीवर आणि हिंसेवर करडी टिका केली. गुजरातमित्रमध्ये टिळकांच्या विरोधात लेख लिहिले गेले. त्यात त्यांनी लिहिलं, 'शिवाजीने दोनदा सूरत लुटली. तर टिळकांनी पुन्हा एकदा सूरत आणि गुजरातची इज्जत लुटली.'

समझोत्याचे प्रयत्न

मवाळमतवादी नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात लिहिलं होतं, 'वसाहतींना स्वराज्य मिळालं आहे, तसंच स्वराज्य भारतालाही मिळावं, हे आमचं उद्दिष्ट आहे. ते मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने चळवळ करणार आहोत.

हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येकाने अधिवेशनात शिस्त पाळावी आणि नेत्यांच्या आज्ञा मानाव्यात. ज्यांना हे मान्य असेल त्यांनी 28 डिसेंबरच्या दुपारी काँग्रेस मंडपात उपस्थित राहावे.

जाहिरनाम्यावर मवाळमतवाद्यांचे नेते डॉ. घोष यांच्यासह फिरोजशाह मेहता, सुरेन्द्रनाथ बनर्जी, मदन मोहन मालवीय आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

मवाळपंथीयांनी असा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही गटांमध्ये समेट व्हावा यासाठी प्रयत्न सुरूच राहिले. मोतीलाल नेहरू, लाला हरकिशनलाल यांसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला.

शेवटी टिळकांनी डॉ. घोष यांच्या निवडीला विरोध मागे घेण्यास तयारी दर्शवली, पण त्यांनी आग्रह धरला की काँग्रेसने कलकत्त्यात पारित केलेल्या ठरावांना चिकटून राहिलं पाहिजे.

त्यांनी अशीही मागणी केली की डॉ. घोष यांच्या भाषणातले जहालमतवाद्यांविरोधात वापरलेले अपमानास्पद शब्द वगळले जावेत.

पण, दोन्ही पक्षांमध्ये कोणताही तडजोडीचा मार्ग निघू शकला नाही.

गोखलेंनी एक निवेदन जाहिर केलं, "आपल्याला सरकारसोबत भांडायचं असेल किंवा त्यांच्याविरोधात उभं राहायचं असेल तर दोन्ही गटात एकता असायला हवी. सरकारी मदतीशिवाय आपलं काम सुरू राहू शकणार नाही. आपण सरकारविरोधात गेलो तर सरकार काही काळातच आपला आवाज दाबून टाकेल."

30 डिसेंबरला टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत फिरोजशाह मेहता म्हणाले, "देशातल्या राजकारणात सुधारणा करणं हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे. ब्रिटिश सरकार जाऊन जनतेचं राज्य येईल हे कल्पनेच्याही पलिकडचं अशक्य आहे. तसं शक्यही नाही. काँग्रेसचं हे धोरण न स्विकारणाऱ्याला सदस्यत्व दिलं जाणार नाही."

राजकारणातलं टिळकांचं स्थान मेलेलं आहे, असंही फिरोजशाह मेहता म्हणाले.

सुरत काँग्रेसवरील पुस्तकात ईश्वरलाल देसाई लिहितात, "काँग्रेसमधल्या फुटीसाठी एक गट टिळकांना दोषी मानत होता, तर दुसरा गट त्यांच्यावर अन्याय झाल्याचं म्हणत होता.

"अशा प्रकारे काँग्रेसच्या इतिहासाचा पहिला खंड सुरतमध्ये संपला. सुरतमध्ये झालेली फुटाफूट अटळ होती. या भिन्न प्रवाहांचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि बंडखोरीची साखळी मोडून काढली."

सुरतमध्ये काँग्रेसचं विभाजन झाल्यानंतर 1916 मध्ये लखनऊमध्ये झालेल्या काँग्रेसच्या सभेत लोकांनी भरपूर उत्साह दाखवला. सुरतमध्ये झालेल्या गोंधळानंतर टिळक पहिल्यांदात काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित होणार होते.

या सभेत टिळकांसोबत डॉ. रासबिहारी घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते.

"सुरतमधल्या संघर्षानंतर लखनऊमध्ये आपल्यासोबत आलेल्या आपल्या मित्राचं, टिळकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपण पुन्हा त्यांच्यापासून तुटणार नाही अशी मला आशआ आहे," सभेचे अध्यक्ष अंबिकाचरण म्हणाले.

लखनऊ काँग्रेसचे अध्यक्ष अंबिकाचरण मजूमदार होते. स्वागत समितीचे अध्यक्ष जगत नारायण यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं, "राष्ट्रीयवादी (जहालमतवादी) आणि मुस्लिम (मुस्लिम लीग) काँग्रेसमध्ये सामील होत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

जे लोक फ्रेंच गार्डनमध्ये काँग्रेसपासून विभक्त झाले होते, ते आता लखनऊमधल्या केसर्बागमध्ये एकत्र आलेत, याचं मला समाधान आहे."

राजकारणासाठी टिळक मेले आहेत, असं म्हणणारे फिरोजशाह मेहता या अधिवेशनात सामील होऊ शकले नाहीत. कारण या अधिवेशनाआधी एक वर्ष म्हणजे 1915 मध्ये त्यांचं निधन झालं. गोखलेंचाही मृत्यू झाला होता.

पण या संमेलनात गांधीजींनी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये सहभाग घेतला होता. इथेच त्यांची जवाहरलाल नेहरूंशी पहिल्यांदा ओळख झाली.

लखनऊमधून काँग्रेसला नवी दिशा मिळाली आणि नव्या नेतृत्वाची सुरूवात झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)