हिटलरच्या DNA च्या विश्लेषणातून नेमकी कोणत्या वादग्रस्त आजाराबाबत माहिती समोर आली?

    • Author, टिफनी वर्थिमर

ॲडाल्फ हिटलरच्या रक्तातील डीएनएच्या क्रांतिकारक विश्लेषणातून या हुकुमशहाच्या वंशावळीबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल, संभाव्य आजारांबद्दल काही असामान्य, अद्भूत निष्कर्ष समोर आले आहेत.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकानं अतिशय मेहनतीनं ही वैज्ञानिक चाचणी केली आहे. या अभ्यासामुळे हिटलरचे पूर्वज ज्यू होते का (नव्हते) या अफवेचं खंडन करण्यात आणि त्याला लैंगिक अवयवांच्या विकासावर परिणाम करणारा अनुवांशिक विकार असल्याचं निश्चित करण्यात तज्ज्ञांना यश आलं आहे.

हा सर्व अभ्यास आणि चाचणी कपड्याच्या एका छोट्याशा तुकड्यावरील रक्ताच्या जुन्या डागावरून करण्यात आला आहे.

वाचकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मथळ्यांनी या नाझी हुकुमशहाला मायक्रोपेनिस म्हणजे सूक्ष्मलिंग होतं का आणि त्याला फक्त एकच अंडकोष होता का, यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मात्र या डीएनए अभ्यासातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

त्यात हिटलरच्या डीएनएमध्ये काही विशिष्ट गुण अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. ते फक्त 1 टक्क्यांमध्ये दिसतात.

यात ऑटिझम, स्क्रिझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर यासारखे विकार होण्याची प्रवृत्ती (प्रीडिस्पोझिशन) दाखवली आहे.

याचा अर्थ असा आहे का? की हिटलरला हे न्युरोलॉजिकल आजार होते? तर तज्ज्ञ म्हणतात, अजिबात नाही. हे काही आजारांचं निदान नाही.

मात्र तरी देखील, कलंक आणि हे संशोधन किती नैतिक स्वरुपाचं होतं, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

त्यातून प्रश्न निर्माण झाला आहे की, हा अभ्यास किंवा चाचणी करायला हवी होती का?

डीएनए संशोधनावरील माहितीपट

या संशोधनावर चॅनेल 4 वर 15 नोव्हेंबरला माहितीपट (डॉक्युमेंटरी) सादर करण्यात आला. त्याचं नाव होतं, हिटलर्स डीएनए: ब्लूप्रिंट ऑफ अ डिक्टेटर. या माहितीपटात पहिल्या काही मिनिटांतच प्राध्यापक तुरी किंग म्हणतात, "मी त्यावर बराच काळ चिंतन केलं आहे."

त्या अनुवंशशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा या प्रकल्पात भाग घेण्यासाठी त्यांना पहिल्यांदा संपर्क करण्यात आला, तेव्हा हिटलरसारख्या व्यक्तीच्या डीएनएचा अभ्यास करण्याच्या संभाव्य परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्या म्हणतात, "मला गोष्टींना सनसनाटी रूप देण्यात रस नाही."

मात्र हे कदाचित कधीतरी कोणीतरी केलं असेल. त्यांनी किमान त्यांच्या देखरेखीखाली याची खातरजमा केली की, हे संशोधन शैक्षणिक निकषांनुसार आणि सर्व 'सावधगिरी बाळगत आणि मार्गदर्शक तत्वां'सह केलं जाईल.

प्राध्यापक किंग यांना हाय प्रोफाईल आणि संवेदनशील प्रकल्प नवीन नाहीत. 2012 मध्ये युकेतील लेस्टरमधील एका कार पार्किंगखाली पुरलेला रिचर्ड तिसरा यांचा सांगाडा सापडला होता.

त्यानंतर त्या सांगाड्याची ओळख पटवण्यासाठी जी जनुकीय तपासणी करण्यात आली होती, त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.

रक्तानं माखलेल्या कापडाचा तुकडा आता 80 वर्षे जुना झाला आहे. हिटलरच्या भूमिगत बंकरमध्ये असणाऱ्या सोफ्यातून तो कापण्यात आला होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी मित्र राष्ट्रांच्या सैन्यानं जेव्हा बर्लिनवर हल्ला केला होता, तेव्हा याच ठिकाणी हिटलरनं आत्महत्या केली होती.

नंतर या बंकरची तपासणी करताना अमेरिकेच्या सैन्यातील कर्नल रॉसवेल पी रॉसेनग्रेन यांना या युद्धाची एक अनोखी ट्राफी मिळवण्याची संधी दिसली.

त्यांनी ते कापड खिशात टाकलं. आता हे कापड एका फ्रेममध्ये ठेवण्यात आलं आहे आणि ती फ्रेम अमेरिकेतील गेटीसबर्ग म्युझियम ऑफ हिस्ट्रीमध्ये ठेवण्यात आली आहे.

या कापडाच्या नमुन्यावरील रक्त हिटलरचंच असल्याची वैज्ञानिकांना खात्री आहे. कारण त्यांना या रक्ताच्या डीएनएतील वाय गुणसूत्राशी हिटलरच्या एका पुरुष नातेवाईकाच्या डीएनएशी अचूकपणे जुळवता आला.

नातेवाईकाच्या डीएनएचा हा नमुना एक दशकाआधी घेण्यात आलेला होता.

अनेक अफवांबाबत सत्य समोर

या संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचं तज्ज्ञ अ द्याप पुनरावलोकन करत आहेत. हे निष्कर्ष खरोखरंच अत्यंत आकर्षक, लक्ष वेधून घेणारे आहेत.

हिटलरच्या डीएनएची ओळख पटवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चार वर्षांच्या कालावधीत, वैज्ञानिकांना जगातील सर्वात भयावह अत्याचारी हुकुमशहांपैकी एक असलेल्या हिटलरची जनुकीय रचना पाहता आली.

तज्ज्ञ म्हणतात की, हिटलरचे पूर्वज ज्यू नव्हते किंवा त्याचा वंश ज्यू नव्हता, ही निश्चित बाब आहे. 1920 च्या दशकापासून ही अफवा चर्चेत होती.

या संशोधनातून समोर आलेला आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, हिटलरला इतर गोष्टींबरोबरच कॅलमन सिंड्रोम होता. हा एक अनुवांशिक विकार असतो.

या विकाराचा यौवन आणि लैंगिक अवयवांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषकरून, त्यामुळे मायक्रोपेनिस म्हणजे छोटं लिंग आणि योग्य त्या ठिकाणी नसलेले अंडाशय किंवा वृषणाची समस्या उद्भवू शकते.

हिटलरला एकच अंडाशय आहे, अशा आशयाचं युद्धकाळातील एक ब्रिटिश गाणं (वॉर टाइम साँग) होतं. ती हिटलरबद्दल पसरलेली आणखी एक अफवा होती.

कॅलमन सिंड्रोमचा परिणाम लिबिडो म्हणजे कामेच्छेवर देखील होऊ शकतो. ही खूप रंजक बाब आहे, असं इतिहासकार आणि पॉट्सडॅम विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. ॲलेक्स के म्हणाले. ते हिटलरवरील या माहितीपटात दिसले आहेत.

"यातून आपल्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बरंच काही समजतं. किंवा अधिक अचूकपणे सांगायचं, तर त्याला खासगी आयुष्यच नव्हतं," असं ते म्हणतात.

हिटलरनं स्वत:ला राजकारणात इतकं वाहून का घेतलं होतं? किंवा तो इतका समर्पित का होता? याबद्दल इतिहासकारांनी प्रदीर्घ काळ वादविवाद केला आहे.

तो राजकारणात इतका दंग होता की "त्याचं जवळपास कोणतंही खासगी आयुष्यच नव्हतं." या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमधून हे स्पष्ट करण्यास मदत होऊ शकते.

तज्ज्ञ म्हणतात की, या मुद्द्यांमुळेच हे निष्कर्ष आकर्षक आणि उपयुक्त बनतात. प्राध्यापक किंग याबद्दल म्हणतात, "इतिहास आणि अनुवंशशास्त्राचा विवाह."

हिटलरचे संभाव्य आजार

या संशोधनातून समोर आलेले असे निष्कर्ष जे सूचित करतात की हिटलरला एक किंवा अधिक न्युरोडायव्हर्स किंवा मानसिक विकार असू शकतात, ते अधिक गुंतागुंतीचे आणि वादग्रस्त आहेत.

हिटलरच्या जीनोमकडे (जनुकांचा पूर्ण संच ज्यातून संपूर्ण जनुकीय रचना स्पष्ट होते) पाहून आणि त्याची तुलना पॉलीजेनिक निकषांशी केली असता, संशोधकांना आढळलं की हिटलरमध्ये ऑटिझम, एडीएचडी, स्क्रिझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर यासारख्या विकार होण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात होती.

इथेच विज्ञान अधिक गुंतागुंतीचं होतं.

पॉलीजेनिक स्कोअरिंग एखाद्या व्यक्तीच्या डीएनएमध्ये शोध घेते आणि त्याला आजार होण्याची किती शक्यता याची गणना करतं. एखाद्या व्यक्तीमध्ये ह्रदयरोग आणि सामान्य कर्करोगसारखे आजार होण्याची प्रवृत्ती शोधण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं.

मात्र यात डीएनएची तुलना मोठ्या संख्येतील नमुन्यांशी करते. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असा अभ्यास करण्याची वेळ येते तेव्हा हे निष्कर्ष खूपच कमी निश्चित स्वरूपाचे असू शकतात.

प्रवृत्ती आजाराचा पुरावा नाही

बीबीसीनं या संपूर्ण माहितीपटात, तज्ज्ञ वारंवार अधोरेखित करतात की, डीएनए विश्लेषण म्हणजे निदान नाही. तर ते प्रवृत्तीचे संकेत आहेत. हिटलरला यापैकी कोणताही विकार किंवा आजार होता, असा याचा अर्थ नाही.

मात्र काही अनुवांशिक शास्त्रज्ञांनी किंवा जनुकीय शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की, हे निष्कर्ष या विषयाची खूपच सोप्या पद्धतीनं मांडणी करणारे म्हणजे अतीसरलीकरण करणारे आहेत.

डेनिस सिंडरकोम्ब कोर्ट लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये फॉरेन्सिक जेनेटिक्सच्या प्राध्यापक आहेत. त्यांना वाटतं की ते "त्यांच्या गृहितकांमध्ये खूपच पुढे गेले आहेत".

"चारित्र्य किंवा वर्तनाचा विचार करता, मला वाटतं की ते खूपच निरुपयोगी आहेत," असं प्राध्यापक कोर्ट बीबीसीला म्हणाल्या. 2018 मध्ये त्यांनी त्याच रक्ताच्या नमुन्याची चाचणी केली होती.

त्या म्हणाल्या की, 'अपूर्ण पेनेट्रन्स'मुळे, समोर आलेल्या विश्लेषणावरून एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विकार किंवा आजार आहे की नाही याबद्दल त्या कोणतेही भाकित करू इच्छित नाही.

पेनेट्रन्स म्हणजे विशिष्ट जनुक असलेल्या लोकांचं लोकसंख्येतील प्रमाणाचं मोजमाप.

सोप्या भाषेत सांगायचं तर, त्यांचे सहकारी अनुवांशिक किंवा जनुकीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या रमन म्हणाल्या, "निव्वळ तुमच्या डीएनएमध्ये एखाद्या गोष्टीचा समावेश असेल याचा अर्थ ते तुमच्या बाबतीत प्रकट होईलच असं नाही."

प्राध्यापक सिमॉन बॅरन-कोहेन यांच्या माहितीपटात हे प्रतिबिंबित होतं. ते केंब्रिज विद्यापीठात ऑटिझम रिसर्च सेंटरचे संचालक आहेत. "जीवशास्त्रातून वर्तनाकडे जाणं ही खूप मोठी उडी आहे."

यासारख्या जनुकीय निष्कर्षांकडे पाहताना, एखाद्या विकार किंवा वर्तनाबद्दल लोकांच्या मनात निंदात्मक विचार असण्याचा धोका असतो.

लोक विचार करू शकतात की, "मला ज्या आजाराचं निदान झालं आहे ते एखाद्या राक्षसी कृत्य करणाऱ्या व्यक्तीशी जोडलं जातं आहे का?"

"यात धोका असा आहे की, लोक सर्वकाही फक्त अनुवांशिकतेतून किंवा जनुकीय रचनेतून स्पष्ट करू शकतात आणि इतर महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष करू शकतात," असं ते म्हणतात.

माहितीपटावरील आक्षेप

या संशोधनावर युकेच्या नॅशनल ऑटिस्टिक सोसायटीनं लगेच प्रतिसाद दिला. त्यांनी याला 'स्टंटबाजी' असं म्हटलं.

"हे निकृष्ट विज्ञानापेक्षाही वाईट आहे. (माहितीपटात) ऑटिस्टिक लोकांच्या भावनांबद्दल दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे आम्हाला धक्का बसला आहे," असं टिम निकोल्स कडक शब्दात म्हणाले. ते या सोसायटीत संशोधनाचे सहाय्यक संचालक आहेत.

ते म्हणाले, "ऑटिस्टिक लोक यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहेत."

बीबीसीनं चॅनेल 4 आणि ब्लिंक फिल्म्ससमोर याबद्दल चिंता व्यक्त केली. ब्लिंक फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीनं हा माहितीपट बनवला आहे.

एका वक्तव्यात, त्यांनी निदर्शनास आणून दिलं की, प्राध्यापक बॅरन-कोहेनसारखे तज्ज्ञ, "स्पष्ट करतात की एखादी व्यक्ती कशाप्रकारे वागते यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यासाठी फक्त त्यांची अनुवांशिकता किंवा जनुकीय रचनाच कारणीभूत नसते."

"त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण, बालपण आणि त्यांना आयुष्यात आलेले अनुभव, त्यांचं संगोपन कसं झालं, त्यांना उपलब्ध असलेलं शिक्षण आणि संसाधनं आणि त्यांच्या सभोवतालचे सांस्कृतिक घटक सर्वकाही यासाठी कारणीभूत असतात."

"हा कार्यक्रम यावर भर देतो की माहितीपटात दाखवण्यात आलेल्या जनुकीय बाबी हिटलरवर प्रकाश टाकतात. मात्र त्याच्या विशिष्ट वर्तनामागे त्याची जैविक रचना पूर्वनियोजितरित्या कारणीभूत होती हे ते आपल्याला सांगत नाहीत."

या माहितीपटाच्या शीर्षकासंदर्भात देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, विशेषकरून दुसऱ्या भागाच्या नावाबाबत. त्या भागाचं नाव आहे, 'ब्लूप्रिंट ऑफ अ डिक्टेटर'.

प्राध्यापक किंग म्हणाल्या की त्यांनी हे शीर्षक निवडलं नसतं. इतिहासकार प्राध्यापक थॉमस वेबर या कार्यक्रमात दिसतात. त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना या शीर्षकाबद्दल आश्चर्य वाटलं.

बीबीसीशी बोलण्यापूर्वी त्यांनी माहितीपट पाहिला नव्हता. ते म्हणाले की, त्यांना हे डीएनएचं विश्लेषण रोमांचक आणि चिंताजनक, दोन्ही वाटलं.

"रोमांचक वाटलं, कारण मला हिटलरबद्दल आधीच ज्या गोष्टींची शंका होती त्याची यातून पुष्टी झाली. मात्र मला चिंता वाटली की, 'राक्षसी जनुक' शोधण्याचा प्रयत्न करण्यासारखं लोक माणसाच्या वर्तनामागे किंवा विकारांबाबत अनुवांशिकता किंवा जनुकीय रचनेची भूमिका अधिक शोधण्याचा प्रयत्न करतील का."

त्यांना या गोष्टीची देखील चिंता वाटत होती की, हे कसं स्वीकारलं जाईल. विशेषकरून ऑटिझम आणि या कार्यक्रमात नमूद करण्यात आलेले इतर सिंड्रोम असलेल्या लोकांच्या बाबतीत ते कसं स्वीकारलं जाईल.

जेव्हा तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी गुंतागुंतीच्या विज्ञानाबद्दल एखादा अचूक कार्यक्रम बनवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्यात अनेक अडचणी आणि धोके असतात.

"हे टेलीव्हिजन आहे. तिथे कधीकधी गोष्टी सोप्या होतात," असं प्राध्यापक किंग म्हणाल्या. एक वैज्ञानिक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणं आणि प्रसारमाध्यमांमधील वास्तवाचं संतुलन साधण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.

त्या म्हणतात, "ते (माहितीपट निर्माते) वेगळा मार्ग धरू शकले असते आणि खूप सनसनाटी निर्माण करू शकले असते. मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी यातील काही बारकावे पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच गोष्टी रुळावर ठेवण्याची आणि समस्या टाळण्यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्वं ठेवली आहेत."

चॅनल 4 नं या कार्यक्रमाच्या नावाचा बचाव केला. ते म्हणाले की, "बोलचालीत डीएनएला 'जीवनाची ब्लूप्रिंट' म्हटलं जातं."

याव्यतिरिक्त, "जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचणारे कार्यक्रम बनवणं हे त्यांचं काम आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट गुंतागुंतीच्या वैज्ञानिक कल्पना आणि ऐतिहासिक संशोधन सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्याचं आहे."

संशोधनावर नैतिकतेच्या आधारे उपस्थित झाले प्रश्न

या प्रकल्पाच्या नीतिमूल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हिटलरच्या डीएनएचा अभ्यास करण्यास हिटलर किंवा त्याच्या थेट वंशजाची परवानगी दिली जाऊ शकत नसेल, तर असं संशोधन करणं, नैतिकदृष्ट्या योग्य आहे का?

इतिहासातील सर्वात वाईट अत्याचारांपैकी एकासाठी तो जबाबदार होता या वस्तुस्थितीवर याचा कसा परिणाम होतो? त्यामुळे त्याचा प्रायव्हसीचा अधिकार नाकारला जातो आहे का?

"हा हिटलर आहे. ते काही एखादं गूढ पात्र नाही, ज्यावर कोणीही डीएनए संशोधन करू शकत नाही. यासाठीचा निर्णय कोण घेतं?" असा युक्तिवाद प्राध्यापक किंग करतात.

इतिहासकार सुभद्रा दास याच्याशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "वैज्ञानिक हेच करतात. बऱ्याच आधी मृत झालेले शेकडो लोक आहेत, ज्यांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आले होते. विज्ञान आणि पुरातत्वशास्त्रातील ही सामान्य पद्धत आहे. ते काय आहे, ही समस्या नाही, तर लोक त्याचा अर्थ कसा लावतात ही समस्या आहे."

इतिहासकार डॉ. के म्हणाले की, "जोपर्यंत त्यात तथ्यांची मांडणी करण्यात आलेली होती आणि सर्वकाही दोनदा तपासण्यात आल्याची आम्ही खात्री केली", तोपर्यंत त्यांना नैतिकतेच्या मुद्द्याची काळजी नाही.

हिटलरच्या डीएनएला स्पर्श करायला हवा होता का? यावर ते म्हणतात, "हिटलरचा मृत्यू होऊन 80 वर्षे झाली आहेत. त्याचे कोणीही थेट वंशज नाहीत आणि त्याला मुलंदेखील नाहीत.

तो अगणित दु:खासाठी जबाबदार होता. त्याच्या डीएनएचे विश्लेषण करण्याबद्दलच्या नैतिक संभ्रमाविरुद्ध आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील."

रंजक बाब म्हणजे, युरोपातील असंख्य प्रयोगशाळांनी या प्रकल्पाचा भाग होण्यास नकार दिला होता. शेवटी अमेरिकेतील एका प्रयोगशाळेनं ही चाचणी केली.

या माहितीपटाचे निर्माते बीबीसीला म्हणाले की, "हे संशोधन शैक्षणिक कामासाठी असलेल्या स्टँडर्ड नैतिक पुनरावलोकनाच्या प्रक्रियेतून गेलं आहे." यात दोन देशांमध्ये करण्यात आलेल्या पुनरावलोकनाचा समावेश आहे.

वैज्ञानिक आणि इतिहासकारांची विविध मतं

मग, खरोखरंच हे संशोधन करायला हवं होतं का? यासंदर्भात बीबीसी विविध अनुवांशिक शास्त्रज्ञ आणि इतिहासकांशी बोललं. तुम्ही काय विचारता यावर उत्तर अवलंबून आहे.

जे लोक माहितीपटात आहेत, ते अर्थातच, हो म्हणतील. यामुळे हिटलरच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर संतुलित व्यक्तीचित्र तयार होण्यास मदत होते. हिटलर हा असा व्यक्ती आहे ज्याच्याबद्दल अजूनही आकर्षण आहे आणि ज्याची तितकीच भीतीदेखील वाटते.

"भूतकाळातील कट्टरतावाद किंवा टोकाची विचारसरणी समजून घेण्यासाठी आपण जे काही करू शकतो, ते आपण केलं पाहिजे," असं प्राध्यापक वेबर यांना वाटतं.

तर डॉ. के म्हणतात, "आपण याबद्दल प्रामाणिक राहूया. हे विषय आधीच अस्तित्वात होते. आम्ही ही कल्पना अचानक लोकांच्या डोक्यात रुजवलेली नाही. हिटलरला विशिष्ट विकार होते की नाही? याबद्दल लोक अनेक दशकांपासून अंदाज लावत आहेत."

मात्र यावर सर्वच इतिहासकार सहमत नाहीत.

"मला वाटतं की, हिटलरच्या कृती कशामुळे घडल्या हे स्पष्ट करण्याचा हा एक अतिशय शंकास्पद मार्ग आहे," असं इवा वुकुसिक म्हणतात. त्या उट्रेक्ट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत.

डॉ. वुकुसिक यांचा अभ्यास सामूहिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांवर केंद्रित आहे. त्या बीबीसीला म्हणाल्या की, लोकांना यात रस का आहे, हे त्या समजू शकतात. मात्र "आपण जी उत्तरं शोधत आहोत, ती आपल्याला डीएनए चाचणीतून मिळणार नाहीत."

हे संशोधन रंजक असलं तरीदेखील, इतिहासाचे खरे धडे अस्पष्ट करण्याचा धोका त्यात आहे, असं ॲन व्हॅन मॉरिक म्हणतात. त्या ॲमस्टरडॅममधील एनआयओडी इन्स्टिट्यूटमध्ये इतिहासकार आहेत.

यातील धडा असा आहे की "सर्वसामान्य लोक काही विशिष्ट संदर्भात, भयानक हिंसाचार करू शकतात, भडकावू शकतात किंवा त्याचा स्वीकार करू शकतात."

त्या पुढे म्हणतात, की हिटलरच्या (शक्य असलेल्या) मायक्रोपेनिसवर लक्ष केंद्रित केल्यानं, सामूहिक हिंसाचार आणि नरसंहार कसा होतो आणि तो का घडतो, याबद्दल आपल्याला समजत नाही.

अभ्यास पूर्ण झालेला असताना आणि संशोधन तज्ज्ञांच्या पुनरावलोकनाखाली असताना, कधीतरी यातील संपूर्ण निष्कर्ष उपलब्ध होतील.

प्राध्यापक वेबर म्हणतात की, हे निष्कर्ष अतिशय काळजीपूर्वक आणि संयमीपणानं वापरले पाहिजेत. मात्र त्यांना आशा आहे की ते काही प्रमाणात उपयुक्त ठरतील.

ते पुढे म्हणतात, "संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांबद्दल ही चांगली गोष्ट आहे. ते कदाचित 5 वर्षे, 150 वर्षे, 500 वर्षांच्या कालावधीत घडू शकतं. हे संशोधन भावी पिढ्यांसाठी आहे. मला खात्री आहे की हुशार लोक भविष्यात त्याचा वापर करतील."

मात्र या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांचा वापर आपण कसा करतो, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

डॉ. के म्हणतात की, प्रत्येकानं 'विज्ञानाचं अनुसरण केलं' पाहिजे आणि आपल्याला काय माहित आहे आणि काय माहित नाही हे स्पष्ट केलं पाहिजे.

यात प्रसारमाध्यमं आणि त्यामधून वृत्तांकन कसं केलं जातं, याचा समावेश आहे.

ते म्हणतात, "हा माहितीपट पाहणाऱ्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्यावर अचूकपणे लिहावं. जेणेकरून ते एखादी गोष्ट हीन ठरवण्यासाठी किंवा लांछन लावण्यासाठी हातभार लावत नाहीत याची खातरजमा होईल."

"या माहितीपटाला खऱ्या आयुष्याचा संदर्भ आहे आणि तो त्यासंदर्भातील गोष्टी लक्षात घेतल्याशिवाय समजला जाऊ शकत नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.