पेट्रोल पंपावर काम करत जोपासली आवड, जगभरातल्या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी पठ्ठ्याने लढवली ही शक्कल

    • Author, विनायक दळवी
    • Role, पॅरिसहून बीबीसी मराठीसाठी

तो नेहमीच असतो. सगळीकडे असतो आणि प्रत्येक ऑलिंपिकला तो भेटतो.

मला तो अथेन्स ऑलिंपिकला भेटला होता. नंतर लंडन मग बीजिंग, मग रिओ आणि आता पॅरिसला. क्रिकेट विश्वचषकातही दिसला होता.

मला नेहमीच वाटायचं हा कुणी श्रीमंत उद्योगपती असणार बहुदा. भरपूर पैसा असलेला. प्रत्येक वेळी विचारायचे टाळायचो, पण अखेर विचारून टाकले आणि त्याचे उत्तर ऐकून धक्काच बसला.

‘तो’ म्हणजे विपुल पटेल. विपुल अमेरिकेत लॉस एंजेलिसला रहातो.

रफाल नदालचा दुहेरी सामना पाहायला गेलो होतो, तेव्हा पत्रकार कक्षात बसलेल्या आम्हा पत्रकारांचा फोटो त्याने टिपला आणि आम्हालाच व्हॉट्सअॅप वर पाठविला.

तेव्हा लक्षात आलं, सभोवताली कुठेतरी तो आहे. सामना संपला आणि आमची वाट अडवून तो प्रवेश द्वारावरच उभा.

विपुलने 1996 च्या अटलांटा ऑलिंपिकपासून एकही ऑलिंपिक चुकवलेले नाही. कोव्हिडमुळे टोकियो हुकले, पण त्याची कसर त्याने फिफा वर्ल्डकप, भारतातला क्रिकेट वर्ल्डकप आणि अमेरिकन टेनिस स्पर्धा पाहून भरून काढली.

तो खरोखरच खेळासाठीचा एक दिवाना आहे. तो लॉस एंजेलिसमधील एका पेट्रोल पंपावर एक कामगार म्हणून काम करतो.

दर आठवड्याला मिळणाऱ्या पगारातील 200 डॉलर्स वेगळे काढून साठवतो. म्हणजे महिन्याला 800 डॉलर्स आणि वर्षाकाठी सुमारे 10-12 हजार डॉलर्स. (रुपयात आकडा मोठा वाटेल, पण परदेशात ऑलिंपिकसाठी जायचं तर तेही कमी पडतील)

एवढ्याच रक्कमेत फिरणार कसं? विपुलने तेही रहस्य सांगून टाकले. तो म्हणाला प्रत्येक विमानात रिकाम्या सीट्स असतात. त्याचे काही मित्र आहेत, ते याला तिकिटावरचा टॅक्स भरून पाठवतात. मात्र त्यासाठी विमानतळावर कितीही तास आणि कितीही दिवसांची प्रतीक्षा करण्याइतपत चिकाटी तुमच्याकडे पाहिजे.

अशीच तो ऑलिंपिकची, क्रिकेट विश्वचषकाची तिकिटे विकत घेतो. जगभरातील क्रीडाक्षेत्रातील लोकांशी त्याचा चांगला संपर्क आहे.

तो अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ओळखतो. काल परवाच मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष झालेल्या अजिंक्य नाईक आणि सचिन तेंडुलकरशीही त्याची ओळख आहे.

तो सच्चा क्रीडाप्रेमी आहे आणि त्याला खेळातील बारकावेही कळतात.

अत्यावश्यक अशा कमीत कमी कपड्यांची बॅग पाठीला लावलेला विपुल सदैव प्रवासाच्या तयारीत असतो.

पेट्रोल पंपावर काम करून जगातल्या सर्व प्रमुख स्पर्धा पाहणारा एवढा हुशार, कल्पक, क्रीडाप्रेमी मी तरी पाहिलेला नाही.

पाकिस्तानची एकमेव महिला पत्रकार

टेनिसचे सामने पाहतानाच पाकिस्तानची महिला पत्रकार नताशा भेटली. पाकिस्तानातून पॅरिस ऑलिम्पिकला आलेली ती एकमेव महिला पत्रकार आहे आणि कराची एक्सप्रेससाठी काम करते.

पाकिस्तान संघाने छोटेखानी पथकच पॅरिसमध्ये पाठविल्याबद्दल तिला खंत वाटत होती. एवढे कमी स्पर्धक देशाने पाठविले हे सांगायलाही लाज वाटते, असं म्हणत होती.

पदकांची अपेक्षा काय असं विचारताच म्हणाली, तुमच्या नीरज चोप्राला तोडीस तोड कामगिरी करून झुंज देणारा अर्शद नदीम आमच्याकडे आहे.

भारतीय पत्रकारांच्या ग्रुपमध्ये ऑलिंपिक कव्हर करायला बऱ्याच महिला पत्रकारही आल्या आहेत हे कळल्यावर तिला आश्चर्य वाटले. त्या सगळ्याजणींना भेटवून द्या, गळच तिने घातली.

शातेरू गाव, जिथे मनू, स्वप्नीलनं इतिहास रचला

ऑलिंपिकचं आयोजन पॅरिसमध्ये होतंय, पण नेमबाजीच्या स्पर्धा पावणेतीनशे किलोमटीर दूर शातेरू गावात पार पडल्या.

‘शाते’ म्हणजे किल्ले. शातेरू गावाच्या परिसरात भरपूर किल्ले आहेत. त्यामुळे या गावाला शातेरू असं नाव पडलंय.

तर या शातेरूचे महापौर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे जवळचा मित्र आहेत आणि मित्राच्या आग्रहावरून नेमबाजीच स्पर्धा या गावात घ्यायचा निर्णय झाला. पण या निर्णयावर कुणी आक्षेपही घेतला नाही.

याचं कारण म्हणजे शातेरू गावात फ्रान्सच्या शूटिंग फेडरेशनची स्वत:ची शूटिंग रेंज आहे.

शातेरू गाव टूमदार घरांचं. दुपारी फेरफटका मारताना तिथे एका भारतीय रेस्टॉरंट दिसलं. नाव होतं 'बॉम्बे इंडियन'. आत शिरलो तेव्हा सर्वच टेबल रिकामी होती. रेस्टॉरंटचा मॅनेजर हमझा पुढे आला.

हमझाला म्हटलं मोठ्या आशेनं आलो होतो. तो म्हणाला कूक घरी गेला, येथे दुपारी त्याला विश्रांती द्यावी लागते.

शातेरू गावात दुपारी 2 ते 5 या वेळेत रेस्टॉरंट बंद असतात. म्हणजे आपल्या पुण्यासारखाच काहीसा प्रकार.

हमझा 28 वर्षांचा आहे आणि चार वर्षांचा होता, तेव्हा पाकिस्तानातून फ्रान्समध्ये आला होता. त्याने अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो.

हॉटेलसमोरच तीन मजली इमारतीत हमझाचं मोठ्ठं कुटुंब राहतं. ते सगळे मिळून दोन रेस्टॉरंट, एक सलून आणि ऑटोमोबाईलचा व्यवसाय सांभाळतात.

हमझाला हिंदी बोलता येतं, पण तो फ्रेन्च भाषेतून बोलताना जास्त खूश असतो.

हमझाला पाकिस्तानात जाऊन आपल्या वधूची निवडही करायची आहे. राहायला मात्र हमझा फ्रान्समध्येच परत येणार आहे.

शातेरू या गावात जेमतेम वीस भारतीय कुटुंब आहेत, मग तीन-चार इंडियन रेस्टॉरंट्सचा धंदा कसा होतो? हमझा सांगत होता ,"भारतीय पदार्थ खाण्यासाठी इथले स्थानिक लोक जास्त येतात. युरोपियन लोकांना आपलं खाणं फार आवडतं, पण त्यांच्यासाठी कमी तिखट बनवावं लागतं.”

फ्रान्समधला उन्हाळा

पॅरिसमध्ये अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे प्रेक्षक-पर्यटक यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतातून आलेल्यांना देखील या उष्णतेचा त्रास होतो आहे.

पॅरिसची लाईफलाईन असलेल्या मेट्रोचा प्रवास बहुतांशी जमिनीखालून, भुयारातूनच होत असतो. या मेट्रोचे डबे वातानुकुलीत आहेत. परंतु तरीही गरम होतं. मग पर्यटक काचेच्या खिडक्या उघडू लागतात, तेव्हा मोटरमन किंवा मोटरवूमन माईकवरून घोषणा देतात, खिडक्या उघडू नका ही ट्रेन वातानुकुलीत आहे.

एरवी पत्रकारांना वेगवेगळ्या स्टेडियम्सवर ने-आण करण्यासाठी वातानुकुलीत बसेस आहेत. पण एसी असूनही गरम होणं थांबत नाहीत. तापमानापेक्षा इथे आर्द्रता जास्त जाणवते आहे.

शनिवारी भारताचे पॅरिसमधील राजदूत जावेद अश्रफ यांनी भारतातून आलेल्या पत्रकारांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. त्यांनाही मी विचारले, “ऑलिंपिक आयोजित करताना उकाड्याची शक्यता यजमानांनी गृहित धरली होती का?”

जावेद अश्रफ यांनी सांगितलं की पर्यावरण जपण्यासाठी असे प्रयत्न केले पाहिजेत. पॅरिस ऑलिंपिक हे ग्रीन ऑलिंपिक होईल असा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.

त्यामुळे कमीत कमी ठिकाणी एअर कंडिशनर्स बसविण्यासाठी ते आग्रही होते. पॅरिस आणि आसपासच्या परिसरात हिरव्यागार जागा आहेत.

भारताचा नेमबाजीतला कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे याला भेटायला मी शातेरूमधल्या अॅथलिट व्हिलेजजवळ गेलो होतो. तिथली सरावाची शूटींग रेंजही गर्द-गडद झाडीमध्ये आहे.

उकाड्याविषयी स्वप्नीलला विचारले असता, तो म्हणाला, “बाहेर उकाडा जाणवतो. पण, खोलीमध्ये असताना कमी उष्णता जाणवते. आपल्यासाठी ही उष्णता काहीच नाही.”

खरं तर भारतीय खेळाडूंना पॅरिसला पोहचण्याआधीच विचारण्यात आले होते की व्हिलेजमध्ये ‘एसी’ शिवाय राहाल का? त्यावर खेळाडूंनीच म्हटलं होतं, की तपमान 18 अंशांवर जाणार नसेल तर आम्हाला आहे तसेच चालेल.

पण हे तपमान 30 अंशावर गेलं, तेव्हा मग भारतीय दुतावासानं ऑलिंपिक व्हिलेजमध्ये 40 एसी पाठवले.

अमेरिका किंवा काही संघांची एसीची मागणी प्रचंड असेल आणि तेव्हा आपल्याला कदाचित एसी मिळणार नाही, हे लक्षात घेऊन दुतावासानं आधीच व्यवस्था करून ठेवली होती.

यजमानांनीही ही शक्यता गृहीत धरून काही उपाययोजना आधीपासूनच केल्या आहेत.

प्रत्येक स्टेडियम आणि दरम्यानच्या मार्गावर थंड पाण्याच्या स्प्रिंकलर्सची व्यवस्था केली आहे. तिरंदाजीच्या खुल्या स्टेडियमसारख्या जागीही अशी कारंजी बसवली आहेत.

काही ठिकाणी मोठ्या शेड्स, छत्र्यांची व्यवस्था केली आहे. पैसे भरून शीतपेय, छत्र्या, हाताने हवा घेण्यासाठी पंखे, सनस्क्रीम घेता येतं.

प्रेक्षक आणि पर्यटक यांच्यासाठी वाटेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे कूलर्स बसवले आहेत. स्वत:कडच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हे पाणी भरून घ्यायचे, म्हणजे झालं.

लहान मुले आणि वयस्कर लोकांना त्रास होऊ नये म्हणून स्वयंसेवक जातीने लक्ष देतायत. तिकिटांवर हेल्पलाईनचे क्रमांकही दिले आहेत आणि संकटसमयी काय करायचे याची यादीही दिली आहे.

उन्हात, मोकळ्या जागी, छत नसलेल्या ठिकाणी थांबू नका अशा सूचना लाऊडस्पीकरवरून दिल्या जात आहेत.

ऑलिंपिक कुटुंब

एरवी उन्हाळ्यात फ्रान्सला फक्त नागरिक आणि पर्यटकांची काळजी घ्यावी लागते. मात्र ऑलिंपिकसाठी जगभरातील दोनशेहून अधिक देशांचे खेळाडू क्रीडाधिकारी, प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी आले आहेत. हे सगळे ऑलिम्पिक कुटूंब (ऑलिम्पिक फॅमिली) आहे.

ऑलिंपिक ‘चार्टर’ नुसार, ऑलिंपिक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणं यजमानांचं कर्तव्य आहे.

या ऑलिंपिक कुटुंबीयांच्या व्हिसापासून ते स्थानिक प्रवासाची व्यवस्था करण्यापर्यंत अनेक गोष्टी यजमानांना विनामूल्य कराव्या लागतात. त्यामुळेच या कुटुंबियांच्या गळ्यातील ओळखपत्र प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे असते.

तर, आता या कुटुंबाला उन्हाचा त्रास होणार नाही, याकडेही पॅरिस ऑलिंपिकच्या आयोजकांना लक्ष द्यावं लागतंय.