You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिटलरच्या छळछावणीतला नरसंहार तुम्हा-आम्हाला कळला, तो 'या' गुप्तहेरामुळे; वाचा त्याची गोष्ट
- Author, ॲमी मॅकफेरसन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. जर्मनीची घोडदौड सुरू होती. नाझींनी छळछावण्या उभारल्या होत्या. त्यात विशेषकरून ज्यू लोकांवर भयावह, अतोनात अत्याचार केले जात होते.
अशीच एक छळछावणी होती, जर्मनीनं जिंकलेल्या पोलंडमधील ऑशविट्झ इथं.
एका माणसाच्या ऑशविट्झमध्ये शिरकाव करण्याच्या धाडसी, जिगरबाज मोहिमेमुळे जगासमोर त्या छळछावणीतील भीषण अत्याचार आले. ही त्याचीच कहाणी आहे.
तो 27 जानेवारी 1945 चा दिवस होता. ती ऑशविट्झची मुख्य छळछावणी होती.
पहिल्या युक्रेनियन आघाडीचे सैनिक तिथे आले आणि त्यांनी छावणीतील गेट उघडले. या गेटच्या वर 'अर्बिट माच्ट फ्रे'(कामामुळे स्वातंत्र्य मिळतं) असं एक क्रूर वाक्य लिहिलेलं होतं.
छावणीतील कैदी हे पाहत होते. चार वर्षे प्रचंड दहशतीखाली घालवल्यानंतर अखेरीस त्यांची सुटका होणार होती.
यावर्षी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जगातील सर्वात कुख्यात छळछावणीच्या मुक्ततेचा 80 वा वर्धापन दिन आहे.
या छळछावणीत 11 लाखाहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यातील बहुतांश लोक ज्यू होते.
ऑशविट्झ छळछावणी आणि मृत्यूचा कारखाना
ऑशविट्झची स्थापना 1940 मध्ये झाली होती. त्यावेळेस नाझी जर्मनीनं कैद्यांना ठेवण्यासाठी दक्षिण पोलंडमध्ये ओस्विसिम इथं छावणीचं एक नवीन संकुल सुरू केलं होतं.
पोलंडमधील नागरिकांसाठी राजकीय तुरुंग म्हणून सुरू झालेलं हे ठिकाण युरोपातील ज्यू लोकांच्या मृत्यूच्या कारखान्यात रुपांतरित झालं होतं.
लवकरच ऑशविट्झ हे नाव नरसंहार आणि होलोकॉस्ट(ज्यूंचा नरसंहार) या शब्दांचं समानार्थी झालं.
या छळछावणीच्या पहिल्या वर्षात, तिथे होत असलेल्या कारवायांबद्दल बाहेरच्या जगाला फारसं माहिती नव्हतं. एका माणसानं ते जाणून घेण्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातल्यानंतर तिथलं भीषण वास्तव समोर आलं.
छावणीतील सुरक्षा रक्षक आणि इतर कैद्यांसाठी हा माणूस होता, टोमाझ सेराफिंस्की, कैदी क्रमांक 4859.
सरकारवर कठोर टीका करणारा हा व्यक्ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता.
नाझी जर्मनीच्या विरोधात भूमिगत प्रतिकार करणाऱ्या गटामधील एका छोट्या गटासाठी त्याचं नाव होतं, 'विटोल्ड पिलेकी'.
तो सैन्यात सेकंड लेफ्टनंट होता, एक गुप्तहेर होता, एक पती आणि दोन मुलांचा बाप आणि एक कॅथलिक व्यक्ती होता.
"सीक्रेट पोलिश आर्मी म्हणजे थोडक्यात 'टॅप' या प्रतिकार करणाऱ्या संघटनेच्या संस्थापकांपैकी विटोल्ड पिलेकी एक होता," असं डॉ. पिओटर सेटकीविच म्हणाले.
ते ऑशविट्झ-बर्केनाऊ मेमोरियल अँड म्युझियमधील इतिहासकार आहेत.
"जेव्हा 'टॅप'ला ऑशविट्स इथल्या नवीन छावणीची बातमी मिळाली, तेव्हा तिथे नक्की काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी कोणाला तरी तिथे पाठवण्याबाबत चर्चा सुरू झाली. पिलेकी ही कामगिरी शिरावर घेण्यासाठी तयार झाला."
सेटकीविच पुढे म्हणाले, "इथं ही बाब प्रकर्षानं नमूद केली पाहिजे की टॅपमधील कोणालाही ऑशविट्झ म्हणजे काय आहे, हे माहिती नव्हतं.
त्याचवेळेस वॉर्सामधून पहिल्या गटात पाठवण्यात आलेल्या लोकांच्या मृत्यूची माहिती देणाऱ्या सुरूवातीच्या तारा येऊ लागल्या."
पिलेकीची छळछावणीत शिरकाव करण्याची योजना
मात्र पिलेकीला त्या छळछावणीत शिरण्यासाठी एका योजनेची आवश्यकता होती. म्हणून मग, 1940 च्या सप्टेंबर महिन्यातील एका दिवशी पोलिसांच्या एका छाप्याच्या वेळेस त्यानं वॉर्सातील झोलिबोर्झ परिसरातील त्याच्या मेहुणीच्या एका फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
मग त्यांनी त्याला अटक व्हावी यासाठी एका मृत पोलिश सैनिकाची ज्यू ओळख वापरली.
तीन दिवसांनी, पिलेकीला त्या छळछावणीच्या, त्या कुप्रसिद्ध 'अर्बिट माच्ट फ्रेई' लिहिलेल्या गेटमधून आत नेण्यात आलं.
तिथे पुढील अडीच वर्षे पिलेकी त्या छळछावणीत घुसखोरी करत होता आणि तिथल्या कारवायांबद्दल जगाला सतर्क करण्यासाठी पुरावे पाठवत होता.
या छळछावणीत त्याला इतर कैद्यांप्रमाणेच कठोर परिश्रम, उपासमार आणि मृत्यूच्या धोक्यांना सामोरं जावं लागलं.
पिलेकीनं छावणीतील परिस्थितीबद्दल अहवाल लिहिले. ते त्या छावणीतून तस्करी करून बाहेर आणण्यात आले. यात तिथली परिस्थिती, तिथे होणारे छळ आणि मृत्यू याबद्दलच्या माहितीचा समावेश होता.
त्याचवेळी, त्यानं तिथे एका भूमिगत चळवळीला प्रेरणा दिली. या चळवळीनं त्या छावणीत घातपातानं नुकसान घडवून आणलं आणि एसएस अधिकाऱ्यांची हत्या केली. तसंच चोरून, तस्करी करून तिथे अन्न आणि औषधं आणली.
पिलेकीच्या कामाबद्दल कुटुंबं होतं अनभिज्ञ
त्याच्या मेहुणीव्यतिरिक्त, त्याच्या कुटुंबाला त्याच्या लष्करी कारवायांबद्दल फारशी कल्पना नव्हती.
पिलेकीची मुलगी झोफिया पिलेका-ऑप्टुलोविच म्हणाल्या, "आमचे वडील काहीतरी महत्त्वाचं काम करत आहेत, अशी आम्हाला थोडीशी कल्पना होती.
मात्र लहान मुलं असल्यामुळे आम्हाला ती नेमकी कशाप्रकारची आणि कोणती कामं आहेत हे माहिती नव्हतं. आईला याबद्दल अधिक माहिती होती का, याबद्दल मला खात्री नाही."
"मात्र मला वाटतं की, तिलादेखील वडिलांच्या या कारवायांबद्दल तपशीलानं माहिती नव्हती. वडिलांच्या आणि आमच्या सुरक्षिततेसाठी, आम्हाला जितकं कमी माहिती असेल, तितकंच चांगलं होतं."
पिलेकीनं त्याच्या अहवालांमध्ये, ऑशविट्झमधील वास्तवावर प्रकाश टाकला. त्यानं विनंती केली की मित्रराष्ट्रांनी या छावणीवर हल्ला करावा.
ही कागदपत्रं जरी काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, तरीदेखील त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. कारण त्यावेळेस लष्करी मोहिमेच्या दृष्टीनं पोलंडला प्राधान्य नव्हतं.
अगदी त्या छावणीच्या अंतिम मुक्ततेच्या दिवशीदेखील, जवळच्याच क्राको शहराला मुक्त केल्यानंतर लाल सैन्याला (रेड आर्मी) योगायोगानंच या छळछावणीबद्दल समजलं.
कैद्यांची मुक्तता आणि पिलेकीचा दुर्दैवी शेवट
पिलेकीनं त्या छळछावणीबद्दल दिलेल्या माहितीमुळे त्या छावणीची थेट मुक्तता झाली नाही, तरीदेखील त्यामुळे तिथल्या परिस्थितीबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरण्यास सुरूवात झाली.
मित्रराष्ट्रांच्या कमांडर्सनी या छळछावणीच्या अस्तित्वाला अधिकृतपणे मान्यता देण्याच्या तीन वर्षे आधी त्या छावणीत होत असलेल्या छळाची आणि तिथल्या कैद्यांच्या मृत्यूंची प्रत्यक्ष पाहिलेली माहिती जगासमोर आणणारा पिलेकी हा पहिला व्यक्ती होता.
त्याच्या पलायनानंतर ऑशविट्झमधील जिवंत कैद्यांना वाचवण्यासाठी आणखी दोन वर्षे लागली.
तोपर्यंत, त्या छावणीत आणण्यात आलेल्या एकूण जवळपास 11 लाख लोकांपैकी जवळपास फक्त 7,000 जणांनाच स्वातंत्र्य मिळालं.
पिलेकीनं केलेल्या कामाची कहाणी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षे जरी सांगितली गेली तरीदेखील, 'ऑशविट्झमध्ये सद्भावनेच्या एका विशिष्ट हेतूनं जाणारा माणूस' म्हणून पिलेकी ओळखला जाऊ लागला.
दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडवर सोव्हिएत राजवट आली. त्यामुळे वॉर्सातील उठाता पिलेकी आणि त्याच्या भूमिगत गटानं पोलंडच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा सुरूच ठेवला.
अखेरीस त्याला अटक झाली आणि देशद्रोही असल्याच्या कबूलीजबाबावर सही करण्यास भाग पाडण्यात आलं.
1948 मध्ये त्याला तुरुंगात गुप्तपणे फाशी देण्यात आली. त्यानंतर विटोल्ड पिलेकीचा उल्लेख करण्यासदेखील मनाई करण्यात आली.
त्याच्या कारवायांबद्दलचे अहवाल आणि कागदपत्रं नष्ट करण्यात आली किंवा लपवून ठेवण्यात आली.
पिलेका-ऑप्टुलोविच आणि त्यांचा भाऊ आंद्रेज रेडिओवर पिलेकीवरील खटला आणि फाशीच्या बातम्या ऐकत असताना, पिलेकी हा एक देशद्रोही होता आणि देशाचा शत्रू होता, हे ऐकतच ते मोठे झाले.
1990 च्या दशकात त्यांना माहिती झालं की प्रत्यक्षात त्यांचे वडील नेहमीच एक हिरो, नायक होते.
प्रेमळ, जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारा पिता
पिलेका-ऑप्टुलोविच यांना त्यांचे वडील आठवतात ते एक दयाळू मात्र कडक व्यक्ती म्हणून. एक अशी व्यक्ती जी तत्वनिष्ठ होती आणि जिचं तिच्या कुटुंबावर प्रेम होतं.
त्या म्हणतात, "निर्सगाबद्दल, निसर्गात जीवांची साखळी कशी चालते. या साखळीत असणारे सर्व प्राणी किती महत्त्वाचे आहेत, याबद्दल मी माझं माझ्या वडिलांशी बोलणं व्हायचं. ते मला स्पष्टपणे आठवतं."
"त्यांनी मला जग अतिशय खेळकर पद्धतीनं आणि प्रेमानं दाखवलं. वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागावं हे त्यांनी मला शिकवलं. वेळ पाळणं आणि विशेषकरून प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, हे त्यांनी आमच्यावर बिंबवलं. त्यांच्याकडून घेतलेले हे धडे मी आयुष्यभर अंमलात आणले आहेत."
1989 मध्ये पोलंडमधील सोव्हिएत युनियनची राजवट संपुष्टात आली. त्यानंतर पिलेकीची खरी कहाणी लोकांसमोर आली.
पिलेकीवरील पुस्तकं प्रकाशित झाली. रस्त्यांना पिलेकीचं नाव देण्यात आलं. पिलेकीची कहाणी पोलंडमधील शाळांमध्ये शिकवण्यात आली.
20 व्या शतकातील पोलंडच्या राजकीय इतिहासावर संशोधन करण्यासाठी आणि ज्यांनी कठीण काळात पोलिश नागरिकांना मदत केली अशांचा सन्मान करण्यासाठी पिलेकी इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली.
पिलेकीची कहाणी ही, ऑशविट्झ-बर्केनाऊन मेमोरियल अँड म्युझियममधील प्रदर्शनांचा एक भाग आहे.
प्रेरणादायी, भावनिकदृष्ट्या हेलावून टाकणारं संग्रहालय
या संग्रहालयाला भेट देणं हा भावनिकदृष्ट्या एक अतिशय तीव्र, हेलावून टाकणारा अनुभव असतो. माणूस एकमेकांशी किती क्रूरपणे वागू शकतो, याचं एक चित्र त्यातून दिसतं.
डोरोटा कुझिन्स्का गेल्या 27 वर्षांपासून या संग्रहालयात मार्गदर्शक आणि प्रेस अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांना हे काम आव्हानात्मक आणि भावनिकदृष्ट्या कठीण वाटतं.
फक्त मार्गदर्शन करणं आणि तिथली माहिती देणं एवढंच त्यांचं काम नाही. तर कधीकधी इथं कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पूर्वीच्या कैद्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटणं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे कामही त्यांना करावं लागतं.
"हे एक असामान्य, अद्भूत ठिकाण आहे. इथं भेट दिल्यावर आम्ही ज्याबद्दल बोलतो, ते विषय अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि भावनिकदृष्ट्या ताण आणणारे, दु:खी करणारे आहेत," असं त्या म्हणाल्या.
मात्र, त्या पुढे म्हणतात की, यात अनेक क्षण असे असताता ज्यातून बरंच काही मिळतं.
"असे तरुण, जे फक्त भूतकाळातील इतिहासाबद्दलच ऐकत नाहीत तर वर्तमानाबद्दल आणि आदर, सहानुभूती आणि सत्यावर आधारित जग कसं निर्माण करायचं, यावरच्या चर्चेत सहभागी होतात, अशांना पाहिल्यामुळे आपल्या मनात मानवतेबद्दल आशा निर्माण होते. हे महत्त्वाचं काम सुरू ठेवण्यासाठीची प्रेरणा आपल्याला मिळते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.