You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतील मतांचं गणित पाहता ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीचा फायदा नेमका कोणाला होणार?
"मी मागेच म्हटले होतो की एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी", राज ठाकरे यांच्यासोबत केलेल्या युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरे यांनी याच वक्तव्याचा पुनरूच्चार केला.
मंगळवार, 24 डिसेंबर रोजी मुंबईतील वरळी येथील एका खासगी सभागृहात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची युती जाहीर करण्यात आली.
तूर्तास ही युती मुंबई महापालिकेसाठी झाली असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर यावेळी त्यांनी मराठी मतदारांना आवाहन करत एकत्र राहा, साथ राहण्याचं आवाहन केलं. तसंच मुंबई मराठी माणसापासून तोडू द्यायची नसेल तर मुंबईवर प्रेम करणाऱ्यांनी साथ द्या असंही आवाहन यावेळी केलं गेलं.
परंतु थोडक्यात आटोपलेल्या या पत्रकार परिषदेत मराठी भाषा, मराठी माणूस हा मुद्दा सोडला तर इतर कोणताही मुद्दा किंवा धोरण किंवा भूमिका दोघांनीही मांडल्याचं दिसलं नाही. यामुळे ठाकरे बंधू यांच्या राजकीय युतीचा नेमका फायदा काय आणि कोणाला? हा प्रश्न कायम आहे.
'महाराष्ट्र धर्मा'चा नारा
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या बॅकड्राॅपवरती यावेळी केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. तर याच्या एकाबाजूला मशाल आणि दुसर्या बाजूला रेल्वे इंजिन ही निवडणूक चिन्ह छापलेली होती.
व्यासपीठावर दोन्ही पक्षांचे नेते किंवा कुटुंबीय यांना स्थान देणं टाळलेलं होतं. खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीच पत्रकार परिषदेला संबोधित केलं.
या पत्रकार परिषदेची सुरुवातच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख करत झाली.
"महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात," असं म्हणत संजय राऊत पत्रकार परिषदेला सुरूवात केली.
तर उद्धव ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की", 105-107 त्याहून जास्त मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आम्ही ठाकरे बंधू इथे बसलेलो आहेत. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे त्यात पहिल्या त्या पाचमध्ये होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते. म्हणजे ठाकरे कुटुंब त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होतं."
"दिल्लीत जे बसले आहेत त्यांचे मुंबईच्या चिंधड्या उधळायच्या असे त्यांचे मनसुबे आहेत", असंही ते म्हणाले.
तर "मुंबईला महाराष्ट्रपासून जे तोडण्याचा प्रयत्न करेल त्यांचा राजकारणातून खात्मा केल्याशिवाय राहणार नाही", असा इशाराही त्यांनी दिला.
तर मराठी माणसाला एकत्र येण्याचं आवाहन करत ते म्हणाले", भाजपने अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे. आता मी मराठी माणसाला सांगतो की चुकाल तर संपाल, आता फुटातर संपून जाईल, मराठीचा वसा टाकू नका. मला खात्री आहे की मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही आणि त्याच्या वाटेला कोणी गेलं तर सोडत नाही."
"कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे", याच वक्तव्याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
तर उपरोधिक टोला मारत राज ठाकरे म्हणाले", महाराष्ट्रात अनेक लहान मुलांना पळवणा-या टोळ्या सक्रिय आहेत आणि आता त्यात आणखी दोन भर पडल्या आहेत. दोन राजकीय पक्षांनी इतर पक्षांमधून चोऱ्या करायला सुरुवात केली आहे", असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी सांगितले की युतीने जाणीवपूर्वक या टप्प्यावर उमेदवारांची नावे किंवा जागावाटपाची माहिती जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
"खबरदारी म्हणून आम्ही सध्या उमेदवारांची नावे जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार, हेही आम्ही सांगणार नाही. मात्र मला ठामपणे सांगता येईल की मुंबईचा पुढचा महापौर मराठीच असेल आणि तो आमच्या युतीतूनच असेल", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतलं मतांचं गणित
मराठीच्या मुद्यापलीकडे ठाकरे बंधुंनी या पत्रकार परिषदेत इतर कोणत्याही विषयावर भाष्य केलं नाही.
अर्थात ही पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या युतीच्या घोषणेची होती. परंतु पत्रकार परिषदेला संबंधित करतानाही मराठी भाषा, मराठी मतदार, मराठी अस्मिता यापलिकडे दोन्ही नेत्यांकडून इतर कोणताही विषय मांडण्यात आला नाही.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील मराठी बहुल मतदारसंघात निश्चित दोन्ही पक्षांना जिंकून यायला वाव आहे. त्यांना त्याचा फायदाही होईल. परंतु उर्वरित मुंबईत जिथे मोठ्या संख्येने हिंदी भाषिक आहेत. किंवा जिथे हिंदी भाषिक निर्णायक आहे अशा भागांत दोन्ही पक्षांची काय रणनिती आहे किंवा काय भूमिका आहे हे मात्र अस्पष्ट आहे.
मुंबईतलं आतापर्यंतचं पारंपरिक व्होटिंग पॅटर्न पाहता, मुंबईतला मराठी मतदारही विभागला गेलेला आहे. शिवसेना, मनसे आणि आता तर शिवसेनेचे दोन गट शिवाय, भाजप.
तर हिंदुत्वाची मतं पूर्वी शिवसेना-भाजपच्या युतीला जात होती ती आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीकडे राहतील. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची पारंपरिक मराठी मतं वगळता युतीतली हिंदी भाषिक मतं आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता कमी आहे.
शिवाय, गुजराती, जैन हा मतदार भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. उत्तर भारतीय आणि इतर प्रांतीय मतं ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात विभागली जातील. तर मुस्लीम आणि दलित मतेही काँग्रेसची पारंपरिक मतं मानली जातात. यात वंचित बहुजन आघाडीलाही मतं मिळतात.
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे स्वबळावर लढणार की कुणासोबत आघाडी करणार हे अद्याप स्पष्ट नाहीये.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुस्लीम मतदार मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू शकतात.
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान असं सांगतात, "मराठी मतदारही एकगठ्ठा मतदान करेल असं नाही. शिवाजी पार्क, माहीम या भागातही राहत असलेला उच्च मध्यमवर्गीय हा सुद्धा भाजपच्या बाजूने सध्या दिसतो. तर आर्थिकदृष्ट्या गरीब मतदारांना विविध प्रकारची आमिष दाखवली जाऊ शकतात. ज्यांचं बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेवर प्रेम आहे, ठाकरेंवर प्रेम विश्वास आहे असेच कमिटेड मतदार ठाकरे बंधूंच्या युतीला मतदान करतील."
दुसरीकडे भाजप सत्तेत असल्याने अधिक ताकदवान आहे. मुंबईतल्या विकास कामांचं श्रेय घेतलं जाईल, त्याची जाहिरातबाजी केली जाईल आणि पारंपरिक मतदारांसोबत नवीन मतदारांनाहीाची भूरळ पडू शकते असंही संदीप प्रधान यांना वाटतं.
ठाकरे बंधुंच्या युतीचा फायदा कोणाला?
आता मुंबईतील मतांचं गणित पाहिल्यावर ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा नेमका कोणाला होणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सांगतात, "दोन ठाकरे एकत्र आले तरी आव्हानं बरीच आहेत. 2017 च्या निकालानुसार, 27 टक्के व्होट शेअर भाजपचा होता. त्यावेळी अखंड शिवसेना होती आणि दोन्ही पक्षांची युती हेती. राज ठाकरे यांचं 7.5% व्होट शेअर होतं. शिवाय, मनसेचा व्होट शेअर अनेक वर्षांपासून टिकून आहे. यामुळे शिवसेना दोन गट झाले असले तरी राज ठाकरेंचा व्होट शेअर त्यांच्याकडे वळू शकतो."
"मुंबईत 227 प्रभांगापैकी जवळपास 150 जागांवर मराठी मतांचा प्रभाव आजही आहे. हे कंसोलीडेशन किती होतं हे महत्त्वाचं आहे. आणि आता मुस्लीम मतदारही ठाकरेंकडे वळू शकतात," असंही ते सांगतात.
तर अनेक वर्षांपासून शिवसेना आणि ठाकरे कुटुंब जवळून कव्हर केलेले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान असं सांगतात की, "दोघांचं एकत्र येणं पालिकेवर सत्ता येईल यापेक्षा भाजपला कोणाचीही मदत न घेता महानगरपालिका एकहाती मिळू नये यासाठी आहे.
भाजप सध्या सर्वात प्रबळ आहे. केंद्रात राज्यात सत्ता, देणग्यांचा ओघ, मुंबईतली कामं भाजपकडे आत्ता प्रचंड मोठ्या ताकदीत आहे. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजप पार अपयशी होईल असं नाही पण मतांची ताटातूट होईल."
शिवाय, ते हा सुद्धा मुद्दा उपस्थित करतात की, राज ठाकरे यांना भाजपनेच तर सांगितलेलं नाही ना? हा समज किंवा गैरसमज राज ठाकरे यांना दूर करावा लागेल.
ते म्हणाले, "भाजपनेच राज ठाकरेंना पाठवलेलं आहे हे सुद्धा राज ठाकरे यांना दूर करावं लागेल. विशिष्ट वर्गात हा संभ्रम आजही आहे. यामुळे यात स्पष्टता आणावी लागेल. कारण असं नाही झालं तर लोक भाजपलाच मत देतील."
परंतु या युतीनंतर सत्तेच्या चाव्या मात्र राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता नाही असंही ते सांगतात, "ह्या युतीनंतर सत्तेच्या चाव्या असतील अशी चीन्ह दिसत आहेत. भाजप उद्या राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही सोबत घेऊ शकतो. तर भाजपला सत्तेवर येऊ न देण्यासाठी सोबत आले असतील.
"सर्व पक्षांनाही ते सोबत घेऊ शकतात. उदा. शिवसेना शिंदे गटाला अंबरनाथ, बदलापूरमध्येही नगराध्यक्ष निवडून आलेले नाहीत. यामुळे उद्या शिंदेंच्या शिवसेनेलाही फटका बसत असेल तर राजकीय समीकरण कसंही बदलू शकतं," असं प्रधान सांगतात.
'खूप उशिरा आणि खूप कमी'
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठ्ये यांनी युतीच्या घोषणेचं वर्णन ,"टू लेट आणि टू लीटल" म्हणजे "खूप उशिरा आणि खूप कमी," असं केलं.
ते सांगतात, "अगदी पाच दहा मिनिटात पत्रकार परिषद आटोपली गेली. किमान यात मुंबई सह इतर पालिकांबाबत घोषणा अपेक्षित होती. परंतु तसं ते स्पष्ट करू शकले नाहीत. केवळ अस्वस्थता संपेल आणि किमान युतीची घोषणा तरी करू असंच या पत्रकार परिषदेचं वर्णन करता येईल."
राज ठाकरे यांची ही भूमिका कायम राहील का? यावर ते म्हणाले, "हे कोणीच सांगू शकणार नाही. हे दोघं कोणत्या परिस्थितीत एकत्र आलेत यावरून त्याचा अंदाज बांधू शकतो."
ते पुढे सांगतात, "भावनिकतेच्या आधारावर केवळ ही निवडणूक जिंकता येईल असं वाटत नाही. कारण मुंबई ही मराठी माणसाची आहे, शिवसेना रक्षणकर्ते आहे असं वाटत होतं. तसं बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व सुद्धा होतं. परंतु विशेषतः जागतिकीकरणानंतर मुंबईतला मराठी समाज हा इतर समाजांत इतकाच आहे. म्हणजेच इतर समाजांसारखाच त्याचं स्थान झालेलं आहे. शिवसेनेची ताकदही गेल्या काही काळात कमी झालेली आहे. मराठी मतं आता जेमतेम 28 टक्के राहिलेली आहेत. त्यातही फाटाफूट झालेली आहे. हिंदुत्वाकडे अनेक मराठी मतदार वळलेले आहेत."
"अशा परिस्थितीत मराठी मतदारामुळे हे एकत्र आलेत. किंवा त्यामुळे भावनिकता निर्माण व्हावी किंवा त्यांच्यापर्यंत भावनिक आवाहन पोहोचावं ही शक्यता कमी आहे," असंही ते सांगतात.
"शिवाय, युतीची घेषणाही उशिरा झाली असून आता हातात वेळही कमी उरला आहे. हीच युती जर विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच केली असती. एखादा कार्यक्रम राबवला असता तर कदाचित अधिक प्रतिसाद दिसला असता," असं साठ्ये सांगतात.
कोण ठरणार 'किंग मेकर'?
यात मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे बंधुंसोबत लढणार की काँग्रेस सोबत की आणखी कोणासोबत युती करणार हे अद्याप स्पष्ट नाही. यामुळे मविआतील तीन मित्र पक्ष मुंबईसाठी मात्र तीन वेगळ्या दिशेने गेलेत का असं चित्र आहे.
याबाबत महाविकास आघाडी अबाधित आहे का? असं उद्धव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले, "महाविकास आघाडीतले पक्ष बाहेर पडले पण मविआ अबाधित आहे."
मुंबईतल्या मतांचं गणित पाहता देशाच्या आर्थिक राजधानीची आणि सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर खुर्चीवर विराजमान करणं हे कोणत्याही युतीसाठी सहज, सोपं नाही हे स्पष्ट आहे.
भाजप हा राज्यातल्या सध्याचा क्रमांक एकचा पक्ष असला आणि मुंबईतल्या मोठमोठ्या प्रकल्पांचं श्रेय भाजप घेताना दिसत असलं तरी भाजपसाठी सुद्धा मुंबईत एकहाती सत्ता मिळवणं सोपं नाही.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला आणि महायुतीला मराठी मतांची जुळवाजुळव करावी लागेल असंच चित्र आहे. यामुळे हिंदुत्ववादी 'व्होट बँक' भाजपसोबत कायम राहिली तरी ठाकरे बंधूंचं मराठी 'नरेटीव्ह' यशस्वी झाल्यास मराठी मतदार निर्णायक असलेल्या प्रभागांमध्ये मात्र महायुतीला घाम फुटू शकतो.
यामुळे मराठी मतांच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या मदतीने अधिक मराठी मतं मिळवता येतात की भाजपला एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मराठी मतदारांचं मन जिंकता येतं? हे निर्णायक आहे.
शिवाय, काँग्रेसलाही अपेक्षित यश मिळाल्यास विरोधी पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरू शकतात. आणि राज ठाकरे यांच्याप्रमाणे काँग्रेसही किंगमेकर ठरू शकते.
मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले माजी नगरसेवक यांनी प्रभावी कामगिरी केल्यास एकनाथ शिंदे हे सुद्धा किंगमेकर ठरल्यास आश्चर्य वाटू नये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)