तुनिशा शर्मा प्रकरणात लव्ह जिहाद असेल तर त्याची चौकशी केली जाईल- राम कदम

तुनिशा शर्मा

फोटो स्रोत, INSTAGRAM/TUNISHA SHARM

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. तुनिशा शर्मा प्रकरणात लव्ह जिहाद असेल तर त्याची चौकशी केली जाईल- राम कदम

तुनिशा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असं विधान भाजप नेते राम कदम यांनी केलं आहे.

या प्रकरणी षडयंत्र रचणारे कोण आहेत याचाही तपास केला जाईल, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.

न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

राम कदम

फोटो स्रोत, TWITTER

तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचा सहकलाकार शिझान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार टुनिशा आणि शिझान खान यांचं 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं, त्यामुळे तुनिशा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती.

प्रथमदर्शनी ही आत्महत्या दिसत असली तरी पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगलने तपास करत आहेत. तुनिशाच्या मृतदेहाचं मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत.

2. ज्या कोठडीत होतो, त्या कोठडीत तुम्हाला टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही- संजय राऊत

“तुमच्या सगळ्या फाईली तयार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत नागपुरात जाऊन गौप्यस्फोट करणार,” असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काही महत्त्वाचे नेते सोमवारी (26 डिसेंबर) नागपूरला जाणार असल्याचं टीव्ही9 मराठीने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

“तुम्हाला वाटलं, मला तुरुंगात टाकलं म्हणजे मी गप्प बसेन. ज्या कोठडीत मी होतो त्या कोठडीत तुम्हाला टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही. हा माझा शब्द आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“40 गेले, 140 निवडून आणायचे आहेत. आजपासून शिंदे सरकारची झोप उडाली पाहिजे”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

3. माझ्यावर टीका करणारे हे मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी- सुषमा अंधारे

सुषमा अंधारे

फोटो स्रोत, FACEBOOK

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी समुदायाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत असतानाच त्यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

‘माझ्यावर टीका करणारे हे खरे वारकरी नाहीत, ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत, पेड कीर्तनकार आहेत,’ अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पंधरा वर्षांनंतर माझी क्लिप व्हायरल केली जात आहे, कारण आता काही विचारलं तर त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

भाजपच शिंदे गटाला संपवायचा प्रयत्न करत आहे, हे एकनाथ शिंदेना कळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

लोकमतने ही बातमी दिली आहे.

4. दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार?

दिशा सालियान प्रकरणी सातत्यानं होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.

माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे दाऊद गँगशी संबंध- राहुल शेवाळेंचा आरोप

राहुल शेवाळे

फोटो स्रोत, Facebook

शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दाव्यानंतर ठाकरे गटातील नेते शेवाळे यांच्याविरोधात आक्रमक झाले.

शेवाळेंच्या या दाव्यानंतर त्यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराची केलेली तक्रार पुन्हा एकदा चर्चेत आली. शेवाळे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेला मुंबईत यायचे असून तिला संरक्षण द्यावे, अशी मागणी ठाकरे गटातील नेत्या मनिषा कायंदे यांनी केली.

हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राहुल शेवाळे यांनी रविवारी (25 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत तक्रार करणाऱ्या महिलेचा दाऊग गँग आणि पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला.

“तक्रारदार महिलेचा एक पाकिस्तानी ग्रुप आहे. या महिलेच्या गँगमध्ये एक फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. तसेच राशीद म्हणून एक पाकिस्तानी एजंटही आहे. तक्रारदार महिला दाऊद गँगसोबत काम करते. तिचा दाऊद गँगशी संबंध आहे,” असा दावा राहुल शेवाळे यांनी केला.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)