हातावर ज्याचं नाव लिहिलं, त्यानंच लग्नाच्या दिवशी होणाऱ्या वधूला संपवलं; घटनेमागं होतं 'हे' कारण

गुजरातच्या भावनगरमधील प्रभुदास तलाव परिसरात लग्नाच्या दिवशीच भावी वधूची हत्या केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भावनगरमधील 22 वर्षीय सोनी राठोड हिचा विवाह 15 नोव्हेंबर रोजी साजन बारेया याच्याशी होणार होता.

परंतु, भावनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यात एका गोष्टीवरून वाद झाल्यामुळे साजनने सोनीच्या घरी जाऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केली.

या प्रकरणातील आरोपी साजनला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येनंतर तो दोन दिवस फरार होता.

साजन बारेया हा आधीच तापट आणि हिंसक स्वभावाचा आहे, पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. त्याने सोनीला जबरदस्तीने आपल्यासोबत ठेवलं होतं, असंही म्हटलं आहे.

त्यानंतर, घरच्यांनी साजन आणि सोनीचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. परंतु लग्नाच्या दिवशी दोघांमध्ये भांडण झाल्याने साजनने सोनीची हत्या केली.

संपूर्ण प्रकरण नेमकं काय?

मृत सोनी यांचा भाऊ विपुल राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते भावनगरमधील आगरिया वड परिसरात राहतात आणि ट्रक ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात.

त्यांची 22 वर्षीय बहीण सोनी राठोड गेल्या आठ महिन्यांपासून साजन उर्फ भुरो खन्नाभाई बारेया यांच्यासोबत राहत होती.

साजनने सोनीला धमकावून तिला आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप आहे. त्यानंतर, कुटुंबाने त्यांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रण पत्रिकाही छापल्या.

त्यानुसार 15 नोव्हेंबरला त्यांचे लग्न होणार होते.

पण सोनी आणि साजन यांच्यात लग्नाच्या दिवशी भांडण झालं. साजनने सोनीला मारहाण केली. नंतर सोनी तिचा भाऊ विपुल राठोड यांच्या घरी गेली.

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोनीला मारहाण करू नये म्हणून कुटुंबीयांनी तिला तिची आजी शांताबेन बंभानिया यांच्या घरी पाठवले होते.

पण 14 आणि 15 नोव्हेंबरच्या रात्री 2 वाजण्याच्या सुमारास साजन सोनीच्या घरी आला. त्याने सोनीचा धाकटा भाऊ सुनीलला मारहाण केली आणि सोनीचा ठावठिकाणा विचारायला सुरुवात केली.

त्यानंतर, सुनीलने सोनीचा पत्ता साजनला दिला. तिथं साजन गेला तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या सोनीच्या वडिलांनाही साजनने मारहाण केली.

नंतर त्यानं सोनीला जबरदस्तीने पळवून नेले.

रात्रभर शोधूनही सापडली नाही सोनी

सोनी यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी रात्रभर बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा ठावठिकाणा सापडला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांना समजले की, साजन बारेया यांच्या घरी सोनीचा मृतदेह पडला आहे.

त्यांनी साजनच्या घरी धाव घेतली आणि तिथे त्यांना सोनीचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर गंभीर जखमेच्या खुणा आढळल्या.

चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर जखमेच्या खुणा होत्या तसेच जवळच एक लोखंडी पाईप पडला होता. त्यावरही रक्त दिसत होते.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पुढील कारवाई केली. मात्र, त्यावेळी साजन फरार होता.

16 नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी साजनला अटक केली.

पोलीस उपअधीक्षक आर. आर. सिंघल यांनी माध्यमांना सांगितले की, सोनीवर लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला आणि तिचं डोकं भिंतीवर आपटण्यात आले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

घुंगट आणि पैशाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

ज्याने मारले हातावर त्याच्याच नावाची मेंदी

ज्या दिवशी सोनीची हत्या झाली, त्याच दिवशी तिचं लग्नं होणार होतं. त्यासाठी तिनं हातावर मेंदीही काढलेली होती.

काही रिपोर्ट्सनुसार सोनी आणि साजन आठ महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

सोनीच्या हातावर 'आय लव्ह साजन' असं लिहिलेला टॅटूही गोंदून घेतलेला होता. तर तिच्या दुसऱ्या हातावर लिहिलेले होते 'सदा सौभाग्यवती'.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.