मुलांसोबत सराव, आईने दागिनेही विकले; वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत क्रांतीने पूर्ण केलं स्वप्न

आईचा त्याग, मुलीचा पराक्रम; पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात चमकलेल्या क्रांती गौडची कहाणी

फोटो स्रोत, Action Images/Reuters

    • Author, अंशुल सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वर्ल्डकपमध्ये जेव्हा क्रांती गौड पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत होती, त्यावेळी काही लोक मोठ्या स्क्रीनसमोर डोळे लावून बसले होते.

क्रांतीनं पाकिस्तानची सलामीवीर सदफ शम्स हिला बाद केलं, तेव्हा सगळ्यांनी आनंदानं उड्या मारत एकच जल्लोष केला.

जिथं ही गर्दी जमली होती, तिथंच क्रांतीनं पहिल्यांदा लेदर बॉलने सामना खेळला होता.

ही जागा मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातलं घुवारा गाव आहे. इथूनच क्रांती गौडनं टीम इंडियापर्यंतचा लांब पल्ल्याचा अविश्वसनीय असा प्रवास केला.

क्रांतीचा भाऊ मयंक सिंहने बीबीसीला सांगितलं की, "जिथं क्रांतीनं पहिल्यांदा लेदर बॉलने सामना खेळला होता, तिथं आम्ही मोठी स्क्रीन लावली होती.

भारताने सामना जिंकला आणि आम्ही खूप आनंदी झालो. पण त्याहून जास्त आनंद झाला, जेव्हा क्रांतीला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं."

क्रांतीने 10 ओव्हरमध्ये 20 रन देत तीन विकेट घेतल्या. यात तिने 3 ओव्हर निर्धाव (मेडन) टाकल्या आणि तिचा इकॉनॉमी रेट केवळ 2.00 इतका होता.

'प्लेअर ऑफ द मॅच' मिळाल्यानंतर क्रांती म्हणाली, "हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.

माझं पदार्पण श्रीलंकेत झालं होतं, आणि इथंच मला 'प्लेअर ऑफ द मॅच' मिळाला. आता मला आणखी चांगली गोलंदाजी करायची इच्छा आहे."

इंग्लंडविरुद्ध क्रांतीचा 'सिक्सर'

मे 2025 मध्ये क्रांती गौडने श्रीलंकेत झालेल्या वनडे मालिकेतून पदार्पण केलं. पण तिला खरी ओळख इंग्लंड दौऱ्यातून मिळाली.

22 जुलै 2025 रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत क्रांतीनं उत्कृष्ट गोलंदाजी करून भारताला 13 धावांनी विजय मिळवून दिला.

क्रांतीनं या सामन्यात 52 धावा देऊन तब्बल 6 विकेट्स घेतल्या. 21 वर्षे 345 दिवसांच्या वयात महिलांच्या वनडेत ती भारतासाठी सर्वात कमी वयात 5 विकेट घेणारी खेळाडू ठरली. तिनं झुलन गोस्वामीचा विक्रम मोडला होता.

क्रांतीने वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रांतीने वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं.

या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरनं शतक झळकावलं आणि ती 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरली. क्रांतीच्या कामगिरीमुळे हरमनप्रीतनं हा पुरस्कार क्रांतीसोबत शेअर केला होता.

तेव्हा हरमनप्रीत म्हणाली होती, "मी माझा पुरस्कार क्रांतीसोबत शेअर करायचा आहे, कारण तिनं खूप चांगली गोलंदाजी केली आहे. हे एक मोठं यश आहे आणि भारतीय संघाला क्रांतीसारख्या वेगवान गोलंदाजांची नितांत गरज आहे."

या कामगिरीमुळे 2025 वर्ल्डकपसाठी तिची भारतीय संघात निवड झाली.

क्रिकेटची सुरुवात मुलांबरोबर

क्रांती आदिवासी कुटुंबातून येते. तिची क्रिकेटची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटनं मुलांबरोबर झाली. कारण तिच्या घराजवळच्या मुली क्रिकेट खेळत नव्हत्या.

एका मुलाखतीत क्रांती म्हणाली की, "आमच्या घरासमोर एक मैदान आहे, तिथं काही मुलं क्रिकेट खेळत होते. मुली बाजूलाच आपला खेळ खेळत होत्या. पण मला वाटलं की, मी क्रिकेट खेळायला हवं. मग सगळ्या मुली एका बाजूला आणि मी मुलांसोबत क्रिकेट खेळू लागले."

प्रशिक्षक राजीव बिलथरे यांच्यासोबत क्रांती गौड

फोटो स्रोत, MAYANK SINGH

फोटो कॅप्शन, प्रशिक्षक राजीव बिलथरे यांच्यासोबत क्रांती गौड

यानंतर क्रांती भावाबरोबर जवळपासच्या टेनिस बॉल स्पर्धांमध्येही भाग घेऊ लागली. पण या काळात तिला काही आव्हानं आणि अडचणींनाही सामोरं जावं लागलं.

क्रांती म्हणते, "मुलांसोबत खेळल्यामुळे आई मला रागवायची. हा तर मुलांचा खेळ आहे, असं ती मला म्हणायची. पण हळूहळू तिला समजलं की, मुलींनाही क्रिकेट खेळता येऊ शकतं."

पहिल्याच सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच'

2017 मध्ये छतरपूर जिल्ह्यात 'श्री राज बहादूर सिंह बुंदेला स्मृती क्रिकेट टुर्नामेंट' आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये मुलींचाही एक सामना होता. क्रांती प्रेक्षक म्हणून तो सामना पाहायला गेली होती. जेव्हा ती घर परतली तेव्हा तिच्या हातात 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार होता.

ती सांगते की, "मुलींच्या दोन संघांत हा सामना होणार होता-नौगाव आणि सागर. मी फक्त सामना पाहायला गेली होते. तिथं सागर संघाचे प्रशिक्षक सोनू सरांनी मला 'तू सामना खेळशील का? कारण आमच्या संघात एक मुलगी कमी आहे,' असं विचारलं. मी हो म्हणाले.

हा माझा लेदर बॉलचा पहिलाच सामना होता. यात मी 25 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. मला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला."

क्रांती वुमेन प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्सकडून खेळते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रांती वुमेन प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्सकडून खेळते.

मयंक सिंह म्हणतो की, अडचणी खूप होत्या, पण कुटुंबानं कधी हार मानली नाही. मयंक सहा भावंडांपैकी सर्वात मोठा आहे आणि क्रांती सर्वात लहान आहे.

तो म्हणतो, "क्रांतीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा गावातील लोक प्रश्न उपस्थित करायचे. पण आमच्या कुटुंबाने प्रत्येक टप्प्यावर तिची साथ दिली.

क्रांतीने टीम इंडियासाठी खेळायला सुरुवात केल्यापासून आता हे प्रश्न विचारणारे लोक तिला पाठिंबा देत आहेत."

'आईला दागिने विकावे लागले'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2017 मध्ये एका सामन्यात क्रांतीची भेट प्रशिक्षक राजीव बिलथरेंशी झाली. राजीव बिलथरे छतरपूरमध्ये एक क्रिकेट अकादमी चालवतात. क्रांतीने आपल्या वडिलांकडे अकादमीमध्ये जाऊन क्रिकेट शिकण्याचा आग्रह धरला.

बीबीसीशी बोलताना प्रशिक्षक राजीव बिलथरे सांगतात, "2017 मध्ये आमची टीम टिकमगड जिल्ह्यात एक स्पर्धा खेळत होती. तेव्हा तिचे वडील मुन्ना सिंह क्रांतीला घेऊन आले होते. 'आमची मुलगी मुलांसोबत क्रिकेट खेळते, आणि तुम्ही तिला क्रिकेट शिकवावं, अशी माझी इच्छा आहे', असं ते म्हणाले."

त्यावेळी क्रांतीचं कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करत होता. वडिलांना पोलीस खात्यातील नोकरीतून निलंबित करण्यात आलं होतं. भावालाही नोकरी नव्हती.

अशावेळी प्रशिक्षक बिलथरे यांनी क्रांतीच्या राहण्यापासून तिला लागणारं क्रिकेटचं साहित्यही पुरवण्याची जबाबदारी उचलली होती.

क्रांती त्या दिवसांची आठवण सांगते, "एक वेळ अशी आली होती की, आम्हाला अन्नासाठीही उधारी घ्यावी लागायची. पैसे लवकरच देऊ असं आम्ही लोकांना सांगायचो. वाईट वेळी कोणी साथ देत नाही, असं म्हणतात, आणि जेव्हा आमचा वाईट काळ आला, तेव्हा खरंच कोणीच आम्हाला साथ दिली नाही."

"त्या काळात मला सरावासाठी जायचं होतं, पण कोणी पैसे देत नव्हते. तेव्हा आईने तिचे दागिने विकून मला सामने खेळायला पाठवलं होतं."

'हार्दिक पांड्या व्हायचंय'

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या हा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळांडूपैकी एक आहे. क्रांती गौड हार्दिक पांड्याला आपला आदर्श मानते.

ती सांगते, "जेव्हा मी वेगवान गोलंदाजी करायची, तेव्हा मी हार्दिक पांड्याचं अनुकरण करत असत. त्याच्या गोलंदाजीचे व्हीडिओ पाहायचे. मला त्याचा अ‍ॅटिट्यूड खूप आवडतो.

मी त्याला पाहायचे, तेव्हा मला वाटायचं की मी जेव्हा मोठी खेळाडू होईन तेव्हा माझा अ‍ॅटिट्यूड हा हार्दिक पांड्यासारखाच असेल. सुरुवातीपासूनच मी ठरवलं होतं की मला हार्दिक पांड्या व्हायचं आहे."

हार्दिक पांड्याला आदर्श मानण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची ऑलराउंडर क्षमता आहे. सध्या ती टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज म्हणून खेळते.

कुटुंबासह क्रांती

फोटो स्रोत, MAYANK SINGH

प्रशिक्षक राजीव बिलथरे म्हणतात, "खरंतर क्रांतीही अष्टपैलू खेळाडू आहे. तिची फलंदाजी खूप चांगली आहे. पुढे जाऊन ती फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करेल.

सध्या भारतीय संघात चांगले अष्टपैलू आहेत, पण मला पूर्ण विश्वास आहे की एक दिवस ती टीम इंडियामध्ये ऑलराउंडर खेळाडू म्हणून दिसेल."

मध्य प्रदेशकडून खेळणारी क्रांती गौड वुमेन प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्ससाठी खेळते.

माजी भारतीय क्रिकेटर अंजुम चोप्रा म्हणतात की, "क्रांती गौड मला खूप चांगली खेळाडू वाटते. कारण ती प्रत्येक सामन्यात पूर्वीपेक्षा चांगलं खेळण्याचा प्रयत्न करते. तिने ज्याप्रकारे विकेट्स घेतल्या ते खरोखरच कौतुकास्पद आहे."

क्रांतीने आतापर्यंत 9 वनडे सामने खेळले असून त्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. ती सध्या केवळ 22 वर्षांची आहे. त्यामुळे भारतीय संघाला तिच्याकडून भविष्यात खूप मोठ्या आशा आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)