You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1 जानेवारी 2026 पासून कोणते पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायचं?
आजच्या काळात, पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन ही कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक बाब झाली आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) असो की बँक खातं उघडायचं असो, किंवा इतर कोणतंही काम करायचं असो. पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) त्यासाठी आवश्यक असतो.
मात्र, आता तुमचं आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे.
तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यास उशीर केला, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) कडून यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेत म्हटलं आहे की, ज्या व्यक्तींना ऑक्टोबर 2024 पूर्वी आधारसाठीच्या अॅप्लिकेशन फॉर्मच्या एन्रोलमेंट आयडीवर PAN नंबर देण्यात आला होता, त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत आधार आणि पॅन लिंक केलं नाही, तर त्यांचा पॅन नंबर बंद होऊ शकतो.
जर ते या मर्यादेत झालं नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाईल.
त्यानंतर, तुम्हाला सर्वच ठिकाणी विविध अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. ही अधिसूचना एप्रिल 2025 च्या सुरूवातीला आली होती. मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर होती.
त्यामुळे तुमचं पॅन कार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे? जाणून घेऊया.
जर पॅन आणि आधार लिंक केलेलं नसेल तर काय होईल?
हल्ली, पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता असंख्य ठिकाणी असते. ते इतके महत्त्वाचे आहेत की पॅन कार्डशिवाय काम करणं निव्वळ अशक्य झालं आहे. उदाहरणार्थ,
- तुमचं पॅन कार्ड बंद किंवा निष्क्रिय झालं, तर तुम्हाला बँक खातं उघडता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला डिमॅट अकाउंटदेखील उघडता येणार नाही. परिणामी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्स किंवा ईटीएफचे व्यवहार करता येणार नाहीत. त्याचबरोबर 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मुदत ठेवींसाठीदेखील पॅन कार्डची आवश्यकता असते.
- काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. विशेषकरून, कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक असतं.
- पॅन कार्डशिवाय तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जदेखील मिळू शकत नाही.
- घर किंवा वाहन विकत घेण्यासाठीदेखील पॅनची आवश्यकता असते. त्यामुळे जर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आलं तर त्यामुळे समस्या निर्माण होईल.
- जर तुम्हाला 50 हजार रुपयांहून अधिक रकमेचे परकीय चलनातील व्यवहार करायचे असतील, तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
- जर पॅन कार्ड बंद झालं, तर कर परतावा (टॅक्स रिफंड) मिळू शकत नाही, तसंच प्रलंबित परताव्यावर व्याजदेखील मिळणार नाही.
- तुमचा टीडीएस किंवा उद्गम कर (स्त्रोतावर कपात केलेला कर) आणि टीसीएस (स्त्रोतावर गोळा केलेला कर) हे दोन्ही अधिक दरानं कापले जातील.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक कसं करावं?
पॅन आणि आधार कार्ड, लिंक सोपं आहे.
- यासाठी, प्राप्तिकर विभागाच्या www.incometax.gov.in/iec/foportal/. या वेबसाईटवरील ई-फायलिंग पोर्टलवर जा.
- तिथे डाव्या बाजूच्या पॅनलवर, 'लिंक आधार' असं टॅब आहे.
- त्या टॅबमध्ये तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. त्यानंतर 'व्हॅलिडेट' बटणावर क्लिक करा.
- जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आधीच लिंक असेल, तर तुम्हाला तसा मेसेज दिसेल. मात्र जर ते नसेल, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक होईल.
पॅन-आधार कार्ड एसएमएसद्वारे देखील लिंक करता येतात
तुम्ही तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एसएमएसद्वारे देखील लिंक करू शकता.
यासाठी, तुमच्या मोबाईलमधून एसएमएस करा. त्यासाठी एसएमएसमध्ये जाऊन पुढीलप्रमाणे टाईप करा
UIDPAN<स्पेस><12 अंकी आधार क्रमांक ><स्पेस><10 अंकी पॅन क्रमांक>
मग हा एसएमएस 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.
उदाहरणार्थ, UIDPAN 111122223333 AAAPA9999Q
जर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यात आलं नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
मग ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. इतकंच नाही, तर पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ते सक्रिय होण्यासाठी एक आठवडा ते एक महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.