शर्मिला टागोर म्हणतात, ‘बॉलिवूडमध्ये संवाद उरलेला नाही, पुरस्कार सोहळे निव्वळ हास्यास्पद’

शर्मिला टागोर, बॉलीवूड, मनोरंजन

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, शर्मिला टागोर

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत अभिनयाच्या चंदेरी दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या शर्मिला टागोर अल्पावधीतच सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या.

अनेक हिट चित्रपट देण्याबरोबरच भारतीय क्रिकेटमधील सर्वांत हुशार कर्णधारांपैकी एक असलेल्या टायगर पतौडी यांच्यासोबतचं त्यांचं प्रेम प्रकरणही चांगलंच गाजलं होतं.

शर्मिला टागोर आजकाल पडद्यावर फार काही दिसत नाहीत. मात्र सैफ अली खानची आई आणि करीना कपूर खानची सासू म्हणून त्या प्रसिद्धीच्या झोतात कायम असतात.

शर्मिला टागोर यांना मानाचा पद्मभूषण पुरस्कार मिळालाय. त्या व्यतिरिक्त त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.

त्यांनी चित्रपट पत्रकार अर्णब बॅनर्जी यांच्याशी खास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी बॉलिवूडमधील त्यांची मैत्री आणि इतर गोष्टींच्या आठवणींना उजाळा दिला.

शर्मिला टागोर यांनी त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि आताच्या बदलांबद्दल खुलेपणाने आपली मतं मांडली.

या मुलाखतीचा संपादित अंश येथे देण्यात आलाय -

शर्मिला टागोर, बॉलीवूड, मनोरंजन

फोटो स्रोत, MANOJ BAJPAYEE/INSTAGRAM

फोटो कॅप्शन, मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर

आम्ही हल्लीच तुमचा गुलमोहर चित्रपट पाहिला. तुम्ही इतर चित्रपटातही काम करण्यास तयार आहात का?

उत्तर - मला कोणत्या प्रकाराची भूमिका मिळते त्यावर गोष्टी अवलंबून आहेत. गुलमोहरमध्ये मी माझ्याच वयाची एक व्यक्तिरेखा साकारलीय. जर मला डोळ्यासमोर ठेवून भूमिका लिहिल्या जात असतील तर मी नाही का म्हणेन?

सिनेमाच्या बदलत्या काळात तुम्ही स्वतःला जुळवून घेतलंय का?

उत्तर - हो, मी असं करते. आता स्टार सिस्टिम बदललीय, कलाकारांच्या अवतीभोवती असणारं रहस्यमय जगही आता संपलंय.

यापूर्वी कलाकार फक्त पडद्यावर दिसायचे. चाहत्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फार काही माहीत नसायचं. पण आज सोशल मीडियाचं जग आहे.

एका क्लिकवर तुम्हाला कलाकारांच्या विषयी संपूर्ण माहिती मिळते. युसूफ साहेबांची (दिलीप कुमार) एक झलक पाहण्यासाठी लोक त्यांच्या घरासमोर तासनतास उभे राहायचे. अशी तळमळ आता कुठे दिसत नाही.

शर्मिला टागोर, बॉलीवूड, मनोरंजन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोहा अली खान आणि शर्मिला टागोर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आजच्या घडीच्या कोणत्या दिग्दर्शकासोबत तुम्हाला काम करायला आवडेल?

उत्तर - मला आजच्या नव्या दिग्दर्शकांचं काम आवडतं. तिग्मांशू धुलिया, अनुराग बासू, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, झोया अख्तर, शूजित सरकार हे सगळेच चांगले दिग्दर्शक आहेत. पण बदलत्या काळात प्रत्येकाच्या इच्छा वाढल्या आहेत.

आजकालचे चित्रपट केवळ कलाकारांच्या नावावर चालत नाहीत. भूमिकांच्या बाबतीतही आज बदल झालेत. जसं की, चित्रपट कलाकारांसाठी आता करिअरचा एक पर्याय बनलाय.

एवढं होऊनही प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात येतील की नाही याबाबत सांगता येत नाही. शिवाय बॉलीवूड सुद्धा आत्मसंतुष्टी झालंय, याचाही विचार करावा लागेल.

तुमच्या काळातील कलाकार आणि आजच्या पिढीतले कलाकार यांच्यात काय फरक सांगाल?

उत्तर - आजची पिढी जास्त हुशार आहे यात शंका नाही. पण आजच्या कलाकारांना आमच्या पिढीबद्दल फारशी माहिती नाहीये. तसेच त्यांना दक्षिण भारतीय कलाकार आणि तंत्रज्ञांचीही माहिती नाहीये.

पण यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्यांना हॉलिवूड कलाकारांविषयी सगळं माहिती आहे. यातले काहीजण तर छोट्या शहरातून येऊन मोठे स्टार बनलेत. पण एकदा मिळालेल्या यशामुळे हुरळून जाऊन ते आपला भूतकाळ विसरतात.

त्यांनी आपला भूतकाळ विसरला नाही पाहिजे. कश्मीर की कली या चित्रपटासाठी मला 25 हजार रुपये मानधन मिळालं होतं, त्या तुलनेत नवी पिढी भरपूर पैसे कमावते आहे.

मला याचा आनंद देखील आहे पण त्यांनी दिलीप कुमार किंवा सत्यजित रे यांचं सिनेजगतातील योगदान समजून घेतलं पाहिजे. शिवाय प्रत्येक नवी गोष्ट बरोबरच असेल हे देखील गरजेचं नाहीये.

यश मिळवण्यासाठी नारळ फोडण्याच्या परंपरेमागे धार्मिक किंवा पारंपारिक असं कोणतंही कारण असू शकेल. अशा परंपरा आपण जपल्या पाहिजेत.

प्रश्‍न - बॉलीवूडमध्‍ये खूप बदल झाल्याचं तुम्हाला दिसलंय का?

उत्तर - पूर्वी आम्ही सर्वजण फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात भेटायचो आणि एकमेकांचं अभिनंदन करायचो. मला पुरस्कार मिळाला असेल, तर वहिदाजी, नर्गिसजी, नूतनजी आणि इतरही आनंदात सामील व्हायच्या.

आजच्यासारखं काहीच नव्हतं. आजचे कलाकार या कार्यक्रमांना तेव्हाच जातात जेव्हा त्यांना पुरस्कार देण्याचं आश्वासन मिळालेलं असतं. किंवा त्यांच्या परफॉर्मन्ससाठी मोठी रक्कम दिली जाते.

म्हणजेच एकंदरीत हा पुरस्कार सोहळा टीव्ही शोसारखा झालाय, आणि हे निव्वळ हास्यास्पद आहे.

शर्मिला टागोर, बॉलीवूड, मनोरंजन

फोटो स्रोत, ani

फोटो कॅप्शन, शर्मिला टागोर

प्रश्न - चित्रपटसृष्टीत तुमची कोणाकोणाबरोबर मैत्री आहे?

उत्तर - अपर्णा सेन, जावेद अख्तर आणि बरेचसे मित्रमंडळी आहेत. पण आमच्या जास्त भेटीगाठी होत नाहीत.

सौमित्र चॅटर्जी आणि मी जवळपास 40 वर्षं जुने मित्र होतो. सत्यजित रे यांच्याप्रमाणेच त्यांना कला, नाट्य, राजकारण, पुस्तकं, सिनेमा आणि संगीतात रस होता. ते बोलायचे आणि मी त्यांचं ऐकतच राहायचे.

उत्तम कुमार यांच्याशी फारशी मैत्री नव्हती, पण ते मदत करणारे होते. मला हरिभाईंची (संजीव कुमार) खूप आठवण येते.

मनोज बाजपेयी आणि माझी ओळख आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मी जास्त बोलत नाही. अमिताभ बच्चन यांच्याशी चांगले संबंध आहेत. गुलजार साहेबांप्रती खूप आदर आहे.

प्रश्‍न - तुमच्या मते चित्रपट जगताची समस्या नेमकी काय आहे?

उत्तर - चित्रपटसृष्टीत परस्पर बंधुभाव दिसत नाही. हे कलाकार पुरस्कार सोहळ्यांसाठी एकत्र जमतात आणि एकमेकांना शुभेच्छा न देता त्यांच्या जागेवर जाऊन बसतात.

आमच्या वेळी आम्ही एकमेकांची ख्याली खुशाली विचारण्यासाठी जायचो. संकटाच्या वेळी सगळेजण राज कपूर यांच्या घरी जमायचे. किंवा देशात कोणतीही आपत्ती आली तरी सुनील दत्त आम्हा सर्वांना गोळा करून मदत उभी करायचे.

त्या काळात परस्पर संवाद होता, पण आता तो संवाद उरला नाहीये ही खेदाची बाब आहे.

प्रश्न - एक देश म्हणून लोकांच्या नैतिकतेमध्ये घसरण झालीय, याचा तुम्हाला त्रास होतो का?

उत्तर - सगळेच जण धर्मांध किंवा कट्टर आहेत असं म्हणता येणार नाही. काहीचजण असे आहेत जे गोंधळ निर्माण करतात. शिवाय सगळ्या गोष्टी वाढवून सांगतात. या सगळ्यामागे खास लोकांचा अजेंडा आहे.

त्यात आणखीन इंटरनेटच्या युगात बातम्या वायूवेगाने पसरतात. पीडितांच्या शांत बसण्यामुळे अन्याय करणाऱ्यांचं मनोबल उंचावलंय.

प्रश्न- या मुद्द्यांवर बॉलिवूड कुठे आहे ?

उत्तर - देशाच्या ज्वलंत प्रश्नावर बोलणं टाळलं जातंय. आपल्याकडे ऋषी कपूरसारखे दिग्गज अभिनेते होते जे कशाचीही तमा न बाळगता आपलं मत मांडायाचे.

गेल्या वर्षी कोलकात्यात पार पडलेल्या चित्रपट महोत्सवादरम्यान अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानशी संवाद साधताना आपलं मत मांडलं होतं. हे पाहून मला खूप आनंद झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त