गोपीनाथ मुंडे : 'शेठजी-भटजीं'च्या भाजपला 'माधव' पर्यंत पोहोचवणारा नेता

गोपीनाथ मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोपीनाथ मुंडे
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गोपीनाथ मुंडे यांचा आज (12 डिसेंबर) जन्मदिन. त्या निमित्ताने गोपीनाथ मुंडेंची एकूण राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती याचा आढावा घेणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

लाल रेष

कारमधून उतरताच रुबाबानं जाकीट झटकणं, खिशातून कंगवा काढून भांग पाडणं, बोलताना मिशीवरुन ताव मारणं नि बोलणं झालं की मोबाईलचा फ्लॅप बंद करुन शेजारच्या कार्यकर्त्याकडं फेकणं...

स्टाईलमध्ये वावरणारा नेता अशी एक ओळख ते भाजप पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्राची जमीन नांगरणारा लोकनेता अशी महत्त्वपूर्ण ओळख असलेल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये अपघाती निधन झाले.

ज्या काळात राज्यात काँग्रेसचं आणि त्यातही बहुतकरुन मराठा जातीच्या नेत्यांचं राजकारणावर वर्चस्व होतं, अशा काळात गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसी जातींची मोट बांधली. 'शेठजी-भटजींचा पक्ष' अशी ओळख असलेल्या भाजपला उच्चवर्णीय जातींच्या पल्याड नेण्यात त्यांनी यश मिळवलं.

गोपीनाथ मुंडे-प्रमोद महाजन जोडी

प्रमोद महाजन यांना वगळून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करताच येत नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या अत्यंत छोट्या गावातील वंजारी या राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित असलेल्या समाजामधून आलेल्या गोपीनाथ मुंडे यांना सामाजिक-राजकीय क्षेत्रात आणलं ते प्रमोद महाजन यांनीच.

घरात वारकरी परंपरा आणि भगवान गडाचे महंत भगवानबाबा गडकर यांचा अध्यात्मिक प्रभाव असलेल्या कुटुंबातून आलेले गोपीनाथ मुंडे उच्च शिक्षणासाठी पुण्यात दाखल झाले आणि प्रमोद महाजनांसोबतच्या मैत्रीमुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून गेलं.

घरातून कसलाच राजकीय वारसा नसताना केवळ कॉलेजमधील या मित्राचं बोट पकडूनच ते संघ विचारांच्या जवळ आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारण आणि नंतर पर्यायाने संघाच्या राजकीय फळीचे म्हणजेच भाजपचे आघाडीचे नेते बनले.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची केवळ मैत्री न राहता पुढे नात्यातही रूपांतर झालं. प्रमोद महाजन यांच्या बहिणीसोबतच गोपीनाथ मुंडे यांचा पुढे प्रेमविवाह झाला.

खऱ्या अर्थाने 1970 सालापासून गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आणीबाणीविरोधातील आंदोलनात मुंडे-महाजन ही जोडी जनसंघाचे तरुण शिलेदार म्हणून मराठवाड्यात आघाडीवर होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या काळात अटक झालेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये ही जोडीही नाशिकच्या तुरुंगात कैद होती.

'शेतकरी कुटुंबातून वरती आलेला, ग्रामीण भागाची नस न् नस माहीत असलेला नेता' असं गोपीनाथ मुंडेंचं वर्णन ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे करतात.

त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "गोपीनाथ मुंडे नामांतर आंदोलनातही सहभागी होते. आणीबाणीमध्ये तुरुंगात गेल्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पलीकडेही तेवढेच त्यागी कार्यकर्ते असतात, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे, गोपीनाथ मुंडे कधीच इतर हिंदुत्ववादी राजकारण्यांसारखे कडवट नव्हते. त्यांची लोकप्रियता सर्व समाजांमध्ये वाढण्यामागचं कारणही हेच होतं. सर्व जातींना ते आपलेसे वाटत होते. ते कधीच 'हिंदुराष्ट्र-ब्राह्मण्य' अशा भाषेत बोलत नव्हते."

"विकास आणि लोकांची कामे करत राहणं हाच त्यांच्या राजकारणाचा भाग होता. त्यामुळे, ते लोकप्रिय तर झालेच झाले; पण ते खरोखरचे 'मास लीडर'ही झाले. लोकांना पुरेपूर वेळ देणारा, खूप प्रश्नांची जाण असणारा, भाषेवर प्रभुत्व असणारा नेताच मास लीडर होऊ शकतो. हे सगळे गुण त्यांच्यात होते. आंदोलने करुन, लाठ्या खाऊन, तुरुंगात जाऊन त्यांचं नेतृत्व उभं राहिलं होतं," असं डोळे सांगतात.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे

बीडचे ज्येष्ठ पत्रकार आणि 'सकाळ'चे माजी सहसंपादक अशोक देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "महाराष्ट्राची जमीन नांगरुन शिवसेनेसोबतच्या युतीच्या माध्यमातून भाजपसाठी सत्तेचा सोपान सोपा करण्यासाठी ते झटले. आज त्याचीच फळे महाराष्ट्रातील भाजप उपभोगतो आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये."

भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या घातल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या प्रमोद महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांनीच दवाखान्यात नेलं होतं. थोडक्यात, अगदी कॉलेजपासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जोडी सोबतच होती.

वसंतराव भागवतांचे शिष्य आणि 'माधव' फॉर्म्युल्याचा प्रयोग

स्थापनेपासूनच 'शेठजी-भटजीं'चा म्हणजेच तथाकथित वरच्या जातींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाने 1980 च्या दशकात आपला चेहरा-मोहरा बदलायला सुरुवात केली होती.

जनसंघाचे नेते वसंतराव भागवत हेच यासाठी राबवलेल्या 'माधव' अर्थात 'माळी-धनगर-वंजारी' फॉर्म्युल्याचे प्रवर्तक होते.

माळी समाजामधून ना. स. फरांदे, धनगर समाजामधून अण्णा डांगे आणि वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे यांना राज्याच्या राजकीय पटलावर नेता म्हणून पुढे आणलं गेलं.

दौऱ्यावर गेल्यावर कधीही हॉटेलमध्ये न उतरता, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्याच घरी मुक्काम करायचा, अशा स्वरूपाची शिकवणही वसंतराव भागवत यांनीच गोपीनाथ मुंडे यांना दिल्याचं सांगितलं जातं.

लोकसंपर्क कसा वाढवावा, जनतेचे प्रश्न कसे हाताळावे, बेरजेचं राजकारण कसं करावं इथपासून ते भाषण कसं करावं इथपर्यंतचे राजकीय बाळकडू भागवतांनीच दिल्याचं स्वत: गोपीनाथ मुंडे सांगायचे.

पुढील काळात वसंतराव भागवतांचा 'माधव प्रयोग' गोपीनाथ मुंडे यांनी पुढे नेला. साळी, माळी, धनगर, वंजारी, दलित, मराठा अशा अनेक जातीजमातींचे कार्यकर्ते आणि नेते भाजपकडे आकर्षित करण्याचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला.

याबाबत बोलताना जयदेव डोळे सांगतात की, "1989 साली मंडल आयोग स्वीकारला गेला; तेव्हापासून मुंडेंचं नेतृत्व अधिक विस्तृत होत गेलं. उघडपणे आणि अधिकृतपणे त्यांना मागासलेल्या जातींचं राजकारण करता आलं. तोपर्यंत मागासलेल्या जाती म्हणजे दलित जाती असंच मानलं जायचं. पण ज्या मध्यम जाती म्हटल्या जातात, त्या जातींचं नेतृत्व मंडल आयोगामुळे विस्तारलं गेलं आणि त्याचा मुंडे यांनी भरपूर फायदा घेतला."

तसेच, त्यांनी स्वत: आंतररजातीय विवाह केला होता. त्यांची बायको ब्राह्मण जातीची म्हणजेच प्रमोद महाजनांची बहिण होती, हा मुद्दादेखील ते अधोरेखित करतात.

गोपीनाथ मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

लोकमतचे माजी शहर प्रतिनिधी आणि बीडचे ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "गोपीनाथ मुंडे हा बेरजेचं राजकारण करणारा नेता होता. त्यांचं राजकारणात कुणीही कायमस्वरुपी शत्रू नव्हतं. भाजपमध्ये असतानाही त्यांना मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा होता. त्यांच्यामुळेच भाजपमध्ये विविध जातींचे नेते आले. त्यांना भलेही ओबीसी वा वंजारी नेता म्हणवलं जात असलं तरीही ते सर्वव्यापी असे नेते होते."

आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तसेच इतर जाती-जमातींमध्ये भाजप इतका मजबूत झाला आहे, त्यामागचं कारण गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व असल्याचं ते सांगतात.

भाजपमुळे गोपीनाथ मुंडे नव्हे तर गोपीनाथ मुंडेंमुळे महाराष्ट्रात भाजप आकारास आला, असंही ते सांगतात.

विलासराव देशमुखांचे सख्खे मित्र, तर शरद पवारांचे खमके विरोधक

गोपीनाथ मुंडे भाजप नेते असले तरीही विलासराव देशमुखांशी असलेली त्यांची मैत्री जगजाहीर होती. दुसऱ्या बाजूला शरद पवारांना विरोध करण्याचं राजकारण मात्र त्यांनी जोरदारपणे लावून धरलं. एकाच दिवशी वाढदिवस असलेले हे दोन नेते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होते.

1990 च्या दशकात महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून प्रमोद महाजन यांचीच ख्याती होती. मात्र, 1994-95 च्या सुमारास जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करण्याची मोहिम उघडली तेव्हाच ते खऱ्या अर्थाने प्रमोद महाजन यांच्या सावलीतून बाहेर पडू शकले.

शरद पवार यांचे सत्ताधारी बाकांवर जितके चाहते होते, तितकेच चाहते विरोधकांमध्येही होते, असं म्हटलं जायचं. शिवाय, प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे संबंधही चांगले होते. तरीही गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांना लक्ष्य करण्याची मोहिम उघडली होती.

शरद पवारांच्या तत्कालीन सरकारविरोधात टीकेची राळ उठवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रा काढली. त्यांच्या टीकेचा भर सरकारचा कथित भ्रष्टाचार आणि पवारांच्या कथित जमिनीच्या व्यवहारांवर होता.

गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ

यासंदर्भात बोलताना जयदेव डोळे म्हणाले की, "शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी आदिवासींनी मोर्चा काढला होता, त्यामध्ये 105 आदिवासी चेंगराचेंगरीत मरण पावले होते. गोपीनाथ मुंडे यांनी तो मुद्दा हातात घेतला. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिमसोबत शरद पवारांचे संबंध आहेत, असा एक प्रचार त्यांनी केला. खरं तर या दोन्ही मुद्द्यांना थेट शरद पवार जबाबदार नव्हतेच, पण अशी दाऊदशी संबंध असल्याची अफवा पसरवून तशी राळ त्यांनी नक्कीच उठवली आणि शरद पवारांच्या विरोधातलं वातारवण अधिक गडद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1995 साली जे युतीचं सरकार आलं, त्याला गोपीनाथ मुंडे यांचा हाच प्रचार अधिक कारणीभूत होता."

शरद पवारांना गोपीनाथ मुंडे यांनी प्रकर्षाने लक्ष्य का केलं, याविषयी बोलातना महेश वाघमारे आपली आठवण सांगितात.

ते म्हणाले की, "यासंदर्भात आम्ही गोपीनाथ मुंडे यांना प्रश्न विचारले की ते सांगायचे, 'आपण मोठ्या माणसाला खेटलो तरच आपल्यालाही तशी उंची गाठता येऊ शकते.' म्हणूनच, त्यांनी पवारांच्या विरोधातलं राजकारण केलं. शरद पवारांच्या सहकार क्षेत्रातल्या प्रभावाला शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. 'कट्टर पवार विरोधक' अशी त्यांची लक्षणीय ओळखच झाली होती."

1992 साली बाबरी मशिदीच्या पाडावानंतर झालेल्या दंगली आणि हिंदुत्वाच्या देशव्यापी लाटेमुळे भाजपचा जनाधार वाढलेलाच होता. अशातच, याच काळात मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करुन जमीन कसल्यामुळेच शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी 1995 ची विधानसभा सोपी ठरली होती.

याच निवडणुकीत, युतीतील 'मोठा भाऊ' असलेल्या शिवसेनेकडून मनोहर जोशी मुख्यमंत्री तर 'लहान भाऊ' ठरलेल्या भाजपकडून गोपीनाथ मुंडेंना पहिल्यांदा उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं.

गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचे किस्से आजही सांगितले जातात.

गोपीनाथ मुंडेंच्या विलासराव देशमुखांसोबत असलेल्या मैत्रीबाबत बोलताना महेश वाघमारे म्हणाले की, "या दोघांची मैत्री खूपच चांगली होती. त्या काळात बऱ्यापैकी सहमतीचं राजकारण चालायचं. अशा राजकारणाचं हे दोघे चांगले प्रतीक होते.

"बीडमधील परळी आणि लातूरमधील रेणापूर असा जोडून गोपीनाथ मुंडेंचा रेणापूर मतदारसंघ (आताचा लातूर ग्रामीण) तयार होत होता. त्यामुळे, त्यांचं ते म्युच्यूअल अंडरस्टँडीग होतं. ते दोघेही जबरदस्त वक्ते होते. बाहेरदेखील त्या दोघांना एकत्रितपणे बोलवलं जायचं," वाघमारे सांगतात.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे सार्वजनिक व्यासपीठावर टीका करायचे. मात्र, ती टीका अजिबात बोचरी नसायची, असं अशोक देशमुख सांगतात.

"दोघेही एकमेकांना मदत करायचे. ते सार्वजनिक ठिकाणीही जी टीका करायचे ती लोकांना हसवायची वा बरी वाटायची. त्यांनी आपली मैत्री राजकारणातही जपली. काँग्रेसच्या बैठकीत जरी गोपीनाथ मुंडेंचा विषय निघाला तरी विलासराव देशमुख स्पष्ट सांगायचे की, आमची मैत्री कायम राहणार," देशमुख सांगतात.

सत्तेतील पाच वर्षे वगळता नेहमीच विरोधी बाकांवर

गोपीनाथ मुंडे यांनी 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्या पुढील 1980 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेची पायरी चढू शकले.

1985 हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी निराशाजनक ठरलं. यावर्षी झालेल्या विधानसभा तसेच लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत ते पराभूत झाले होते.

1986 साली ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही झाले होते.

त्यानंतर 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कधीच पराभूत झाले नाहीत.

त्यांनी 1992 साली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं.

1978 साली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कर्जमुक्ती मोर्चा, तर 1992 साली महाराष्ट्राच्या राजकारणातील गुन्हेगारीकरणाविरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ असा संघर्ष मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.

सत्ताधारी काँग्रेसविरोधात आणि खासकरुन शरद पवार यांच्याविरोधात गोपीनाथ मुंडेंनी रान पेटवलं होतं.

1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.

1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. उर्जा आणि गृहखातंही त्यांच्याकडेचं होतं.

ही पाच वर्षे सोडली तर राज्याच्या राजकारणात ते नेहमीच विरोधी बाकांवर बसले.

गोपीनाथ मुंडेंची नाराजी?

प्रमोद महाजन यांच्या जाण्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमधील वजन कमी 'केलं गेल्याचं' सांगितलं जातं. यावरुन ते नाराज होते आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते, असंही म्हटलं गेलं.

यासंदर्भात बोलताना अशोक देशमुख यांनी सांगितलं की, "प्रमोद महाजन जिवंत होते, तोपर्यंत गोपीनाथ मुंडेंचा भाजपमधील आलेख चढता राहिलेला होता. प्रमोद महाजन गेल्यानंतर भाजपमधील त्यांचे जे शत्रू होते त्यांनी गोपीनाथ मुंडेंना त्रास द्यायला सुरुवात केली."

मात्र, हे पेल्यातील वादळ असल्याचा मुद्दा महेश वाघमारे मांडतात.

ते म्हणाले की, "थोडीफार नाराजी झाली होती, हे खरं आहे. मात्र, हे पेल्यातील वादळ होतं आणि ते फार कमी काळ चाललं. भाजप सोडण्याचा निर्णय त्यांनी पूर्णपणे घेतला होता, असं काहीही नव्हतं. त्यांना माहिती होतं की, हा पक्ष मुळात आपणच मोठा केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतरही किमान बीडमध्ये त्यांचा प्रभाव टिकून आहे. त्यांच्या नावावर आजही मतदान होतं. उलट मुंडेंना जाऊ देणं हे भाजपलाच खूप महागात पडलं असतं."

गोपीनाथ मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

गोपीनाथ मुंडे यांनी 2009 आणि 2014 साली बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला होता.

2014 साली जेव्हा भाजपचे सरकार पहिल्यांदा बहुमताने सत्तेत आलं तेव्हा मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात म्हणजेच 26 मे 2014 रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी म्हणजेच बीडला परतणार होते. मात्र, 3 जून 2014 रोजी दिल्लीवरुन मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते.

मुंडेचं दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघा अर्ध्या तासाचा प्रवास. पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमवावे लागले.

मुंडेच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात अशी शंकाही व्यक्त केली गेली. यासंदर्भात तुम्ही इथे सविस्तर वाचू शकता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)